बाटलीबाय

हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर सापडलेल्या एका गुढ बाटलीत नेमकं काय होतं, ज्यामुळे दोन भावंडांचं आयुष्यच बदलून गेलं?
बाटलीबाय
Published on

कथा

ईशान पुणेकर

हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर सापडलेल्या एका गुढ बाटलीत नेमकं काय होतं, ज्यामुळे दोन भावंडांचं आयुष्यच बदलून गेलं?

अरे, हे बघ काय?” मनीषा म्हणाली. ती पुढे होती. माधव वाळूतून पळत तिकडे गेला. ती एक बाटली होती. नेहमीसारखीच तर होती, काचेची. लोकांनी कचरा म्हणून फेकलेली.

पण ती बाटली खरंच तशी साधी होती? कचरा होती? की अल्लाउद्दीनच्या दिव्यासारखं काही?

मनीषा आणि माधव बहीण-भाऊ होते. संध्याकाळची वेळ होती. दोघे आता समुद्रकिनाऱ्यावरून चालत होते. कुठल्या म्हणताय, तर हरिहरेश्वरच्या. ते कोकणातलं एक गाव आहे. छोटंसं, निवांत अन् निसर्गरम्य. गावातल्या टेकडीवर हरिहरेश्वराचे मंदिर आहे. त्यामुळे त्याला दक्षिण काशी असेही म्हणतात. गावाला समुद्राचा शेजार. दोन बाजूला दोन देखणे बीच.

आता ते मंदिरासमोरच्या लांबलचक किनाऱ्यावर होते. उन्हे लांब झाली होती. पिवळसर प्रकाश लाटांवर घसरगुंडी खेळत होता. सुरुची झाडं वाऱ्याने सळसळत

होती. मस्त वातावरण. मागे

समुद्राची गाज.

ते बोलत होते त्यांच्या मनातलं दुःख. दुःख म्हणजे त्यांची गरीब परिस्थिती. त्यामुळे आईवडिलांना होणारा त्रास. असं काही बोलायचं असेल तर ते किनाऱ्यावर यायचे. जिथे कोणी नसायचं. सुट्टीच्या दिवशी काय ते पर्यटक. त्यावेळी त्यांची गर्दी असे आणि ते करत असलेला कचरा. मुर्खासारखा! निसर्गाला त्रासदायक.

माधव-मनीषा गरीब होते. त्यामुळे त्यांना चटकन काही मिळत नसे. खाऊ म्हणा, कपडे म्हणा. अभ्यासासाठी वह्या मिळणंही अवघड असायचं. माधवला खेळायला आवडायचं, तर मनीषाला वाचनाची आवड होती. पण त्यांना ती हौस भागवणंही कठीण होतं. त्यांना आईवडिलांना मदत करावी लागायची. त्यांचे वडील सुतार होते; तर आई एका वाडीत कामाला जायची.

चालताना मनीषा पुढे गेली होती. तिला एक प्लास्टिकची बाटली दिसली. त्यामुळे रागाने तिने ती बाटली म्हणजे तो कचरा पायाने उडवला. ती बाटली पुढे जाऊन पडली. ती बरोबर नेऊन घरच्या कचऱ्यात टाकावी, असा विचार तिने केला. तेवढीच किनाऱ्यावरची घाण कमी.

ती त्या बाटलीजवळ गेली, तेव्हा तिला वर उल्लेख आलेली दुसरी बाटली दिसली होती. वाळूत तोंड खुपसून पडलेली. काचेची- अन् आत काहीतरी दिसत होतं. पण द्रव नव्हे.

ती बाटली वेगळ्याच आकाराची होती. गडद हिरव्या रंगाची. त्यावर एक स्त्रीच्या चेहऱ्याचा आकार होता. त्याभोवती छानशी नक्षी होती. तिला कॉर्क लावलेलं होतं. कॉर्क म्हणजे बूच. माधवने ते उघडायचा प्रयत्न केला; पण त्याला ते जमलं नाही. मनीषाने त्याला थांबवलं. जोर लावल्याने ती बाटली फुटली असती. बूच घट्ट बसलेलं होतं. आता काय करायचं? त्यांना फारच उत्सुकता वाटत होती- त्या बाटलीच्या आत काय आहे म्हणून?

पण खरंच आत काय असावं?...

मनीषाला वाचायची आवड होती. तिला वाचलेलं काही काही आठवू लागलं. ती ते माधवला सांगू लागली. पूर्वीच्या काळी समुद्रामार्गे वाहतूक चालायची. संदेश पाठवण्याची साधनं नव्हती. विमानं नव्हती. तेव्हा जहाजावरचे लोक असे बाटलीतून संदेश पाठवायचे. साधारणपणे एखाद्या बेटावर जहाजातील लोक अडकून पडलेले असायचे. ते त्यांच्या सुटकेसाठी संदेश पाठवायचे. अशा लोकांमध्ये समुद्री डाकूसुद्धा असायचे. चाचे लोक! त्यांचे संदेश साधारणपणे खजिना कुठे लपवून ठेवला आहे, अशा प्रकारचे असायचे. असा चाच्यांचा संदेश म्हणजे खजिन्याचा पत्ताच की!

पण पाण्यात टाकलेली बाटली ती. पोचेल तेव्हा पोचेल किंवा ती खडकावर आपटून फुटायचीसुद्धा.

तिने हे सांगितलं त्यावर-

‘चल काहीतरीच काय? काहीतरी वाचतेस अन् सांगतेस. या जुन्या गोष्टी आता कुठे खऱ्या व्हायला लागल्या? ही अशीच असेल एखादी भंगार बाटली. भलतीच!’ माधव म्हणाला .

त्याचंही बरोबर होतं. मनीषा विचारात पडली. हो ना! तिला ती बाटली घरी न्यायची होती.

घरी जाऊन आईची बोलणी खावी लागली असती- कचरा गोळा करता म्हणून.

पण तिने माधवला पटवलं आणि त्या दोन्ही पोरांनी ती बाटली काळजीपूर्वक घरी नेली. त्यांच्या बाबांकडे दिली. त्यांच्याकडे सुतारकामाची हत्यारं होतीच. त्यांनी ती बाटली एकदा नीट पाहिली. ती बूच लावून बंद केलेली होती आणि त्याभोवती मेण व त्यावर लाल रंगाची लाख लावलेली होती. त्या लाखेचे तुकडे पडू लागले होते. त्यांनी एक छोटा स्क्रू ड्रायव्हर घेतला. बाजूची लाख खरवडून काढली. तरी ते बूच घट्टच होतं. कित्ती वर्षांचं जुनं असावं? ते एक ती बाटलीचं जाणे! बऱ्याच प्रयत्नांनी त्यांनी ते काढलं.

काय असावं आतमध्ये?...

आत एक कागद होता. काय लिहिलेलं असावं त्या कागदावर? जुनाट, पिवळसर, घडी पडलेला कागद… याहू! म्हणजे नक्कीच खजिन्याचा पत्ताच की! समुद्री डाकूंनी लुटलेल्या खजिन्याचे लोकेशन? त्या बेटाचा सांकेतिक नकाशा? - तर असं त्यावर काहीच नव्हतं,

त्यावर इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं -

१२ मार्च १९६८. आज आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. मी खूप आनंदी आहे. हा संदेश जेव्हा मिळेल त्यावेळी कृपया खालील पत्त्यावर संपर्क साधावा. मीरा भाऊसाहेब, मॉरिशस हाऊस, पोर्ट लुई, मुख्य रस्ता, मॉरिशस.

बापरे! हा संदेश पाठवला, त्याला चक्क अठ्ठावन्न वर्षं झाली होती आणि आज तो मिळाला होता - मनीषा आणि माधवला!

मॉरिशस हा एक देश आहे. एक भलंमोठं बेटच म्हणा ना. मादागास्कर बेटाच्या पलीकडे. त्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं. मॉरिशसला स्वातंत्र्य मिळालं ते १९६८ साली. त्याआधी ब्रिटिशांनी अनेक भारतीयांना तिकडे कामाला जुंपलं होतं. त्यात अनेक मराठी माणसंही होती आणि कोकणातलीही. त्यामध्ये एक होते भाऊसाहेब, रत्नागिरीचे. त्यांनी तिकडे मोठ्या कष्टाने स्वतःचा व्यवसाय उभारला होता. मीरा त्यांची धाकटी मुलगी. मीरा पुढे त्यांच्या भाषेत मीराबाय झाली. मीराबायने पुढे वडिलांचा व्यवसाय वाढवला आणि नंतर त्यांनी स्वतःचा साखर कारखाना उभारला. मॉरिशसमध्ये साखर मोठ्या प्रमाणात तयार होते. आता त्या तिथल्या प्रतिष्ठित अशा एक नागरिक होत्या. या मीराबायने त्यांच्या स्वातंत्र्याच्या दिवशी हा संदेश सोडला होता. पोर्ट लुईहून म्हणजे मॉरिशसच्या राजधानीमधून. ते त्यांचं सगळ्यात मोठं बंदर आहे. त्यावेळी मीरा लहान होती. फक्त आठ वर्षांची. त्या वयात असं काहीतरी करावं असं वाटतंच ना. मीराचा जन्म मॉरिशसचा आणि त्यांच्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं. म्हणजे कित्ती आनंदाची गोष्ट! हे भारतीयांना वेगळं सांगायची गरज नाही.

झालं तर- मनीषा-माधवने त्यांना पत्र पाठवलं. त्यांना शंकाच होती, एवढ्याशा पत्त्यावर ते पत्र जाईल की नाही ते. पण गेलं. ते पत्र पोहोचलं. जे चक्क मराठीत होतं. पण काही प्रश्न नव्हता. मीराबायसुद्धा तोडकंमोडकं मराठी बोलू शकत होत्या. त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांचा संदेश सातासमुद्रापार पोहोचला होता. तोही भारतात आणि तोही आपल्या कोकणात आणि कित्ती वर्षांनी!

कसलं भारी!

त्यांनी वडिलांकडून कोकणच्या कितीतरी गोष्टी ऐकलेल्या. त्या तिकडे असल्या तरी त्यांची मुळं कोकणातलीच ना.

मीराबायचं उलट पत्र आलं तेव्हा माधव आणि मनीषा किती खुश झाले म्हणून सांगू आणि तो कागद त्यांच्यासाठी खजिन्याचा पत्ता ठरला खरा.

तो कसा?...

आता झालंय असं- मीराबाय त्या दोघांच्या शिक्षणाचा सगळा खर्च उचलणार आहेत आणि त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या शाळेला त्या एक छोटं जिम आणि ग्रंथालयसुद्धा बांधून देणार आहेत. जमलं तर हरिहरेश्वला भेटही देणार आहेत.

त्या बाटलीवर स्त्रीची प्रतिमा आहे म्हणून मनीषाने त्या बाटलीचं नाव बाटलीबाय ठेवलंय आणि त्या पोरांनी ती बाटली सन्मानपूर्वक त्यांच्या शोकेसमध्ये मांडली आहे. जे शोकेस खास त्यांच्या बाबांनी स्वतः बनवलेलं आहे.

आता गावातली शाळकरी पोरं किनाऱ्यावर बाटल्या शोधत फिरतात. कशासाठी? हे तुम्ही ओळखू शकाल. पण अशी बाटली काय रोज रोज येते का? पण मुलांना कुठे ठाऊक. ते प्लास्टिकच्या बाटल्या मात्र गोळा करतात. आत काही नसतं. मग त्या बाटल्या ते कचऱ्यात नेऊन टाकतात. किनाऱ्यावर नाही.

पण समुद्राला बरं वाटत असावं! तेवढाच त्यानिमित्ताने त्याच्यामधला कचरा कमी. हो की

नाही?

ज्येष्ठ साहित्यिक

Bip499@hotmail.com

logo
marathi.freepressjournal.in