आरोग्यदायी भारताची छोटीशी आशा

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली. त्यातच आता खाद्यपदार्थांच्या पाकिटावर मीठ, साखर, चरबीचे किती प्रमाण आहे, याची स्पष्ट माहिती देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाला दिले आहेत.
आरोग्यदायी भारताची छोटीशी आशा
आरोग्यदायी भारताची छोटीशी आशा
Published on: 

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली. त्यातच आता खाद्यपदार्थांच्या पाकिटावर मीठ, साखर, चरबीचे किती प्रमाण आहे, याची स्पष्ट माहिती देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाला दिले आहेत. ही स्वागतार्ह बाब असली तरी अमेरिका, युरोपप्रमाणे आरोग्यदायी, दर्जेदार, अन्नपदार्थांची निर्मिती, उपलब्धता व सेवन हे समस्त भारतीयांसाठी अजूनही स्वप्नच आहे.

महाराष्ट्राच्या भिवंडी शहरात शोरमा खाल्ल्याने ११६ जणांना विषबाधा होऊन रुग्णालयात दाखल करावे लागले. मध्य प्रदेशच्या बालाघाट येथील हिरी गावच्या जत्रेत चाऊमीन खाल्ल्याने ११२ जणांना विषबाधा झाली. ओदिशाच्या अंगुल भागात बिर्याणी खाल्ल्याने ३५ जणांना अन्नविषबाधा झाली. या अलीकडच्या काही घटना असल्या तरी बऱ्याच वेळा अशा घटनांची पोलिसांच्या दप्तरी नोंदसुद्धा होत नाही. कारण, निकृष्ट, दूषित, भेसळयुक्त अन्नपदार्थ हे प्रकार आपल्याकडे फारसे गांभीर्याने घेतले जात नाहीत. आपली मानसिकताही तशीच बनली आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील बड्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स‌वर कारवाईचा बडगा उगारला असला तरी रस्त्या-रस्त्यांवरील अनारोग्य वातावरणात खाद्यपदार्थ बनवून त्यांची तिथेच विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई झाल्याचेही फारसे आढळून येत नाही. प्रशासकीय डोळेझाक वा राजकीय वरदहस्तामुळे निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवणारे रस्त्यावरचे खाद्यपदार्थ विक्रेते मोकाटच आहेत आणि त्यांचे हप्तेखोर पुढारी वा अधिकारी नामानिराळेच राहत आहेत.

आपल्या देशातील अंदाजे ८ कोटी ८९ लाख नागरिक मधुमेहाने, तर सुमारे २२ कोटी नागरिक अतिरक्तदाबाच्या समस्येने हैराण आहेत. भारतात दरवर्षी हृदयविकार व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांमुळे सुमारे २८ ते ३२ लाख नागरिकांचा मृत्यू होत असल्याचा अंदाज आहे. देशातील वाढत्या मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि हृदयविकारांच्या वाढत्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश म्हणजे केंद्र व राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य धोरणाला दाखविलेला आरसाच आहे.

मधुमेह आणि हृदयविकार आता केवळ ज्येष्ठ नागरिकांचे आजार राहिलेले नाहीत. तरुण वयातच रक्तातील साखर वाढणे, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्राॅल आणि हृदयविकाराच्या समस्या दिसू लागल्या आहेत. यामागे बदललेली जीवनशैली, बैठी कामे, अपुरी झोप, मानसिक ताण, शारीरिक हालचालींचा अभाव आणि साखर, मीठ व चरबीचे अधिक प्रमाण असलेल्या खाद्यपदार्थांचे वाढते सेवन ही प्रमुख कारणे आहेत. या परिस्थितीला केवळ नागरिकांच्या चुकीच्या सवयी जबाबदार असल्याचे सांगून सरकारला आपले हात झटकता येणार नाहीत. नागरिकांना प्रदूषणकारी वातावरणात राहावे लागते, निकृष्ट दर्जाचे अन्न खावे लागते. त्यामुळे बाजारात आरोग्यदायी खाद्यपदार्थ कसे उपलब्ध होतील याकडे कटाक्षाने लक्ष देऊन त्यात सुधारणा घडवून आणण्याची मूलभूत जबाबदारी सरकारनामे यंत्रणेचीच आहे.

खाद्यपदार्थांच्या पाकिटावर साखर, मीठ आणि चरबीचे केवळ इशारे लावले म्हणजे आरोग्याचा प्रश्न सुटणार नाही. नागरिकांना आपण काय खातो याची माहिती मिळणेही तितकेच आवश्यक आहे. आरोग्यदायी खाद्यपदार्थांचे अन्य पर्याय उपलब्ध असणे त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहे. बाजारात कमी किमतीत मिळणारे अतिप्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, दोनदा तळलेले पदार्थ, तीच ती चहापावडर वापरून उकळलेला चहा, साखरयुक्त पेये, चिप्स, फरसाण, बिस्किटे आणि विविध स्नॅक्स सहज उपलब्ध आहेत. दुसरीकडे, अनेक कुटुंबांसाठी फळे, भाज्या, दूध, मोड आलेली कडधान्ये आणि प्रथिनयुक्त पदार्थ नियमित खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरत आहे. पौष्टिक अन्न महाग आणि जंक फूड स्वस्त असेल, तर नागरिकांच्या निवडीवर आर्थिक परिस्थितीचा प्रभाव पडतो. हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आरोग्यदायी अन्न परवडणाऱ्या दरात उपलब्ध करणे, ही केवळ बाजारपेठेची जबाबदारी नव्हे, तर सरकारच्या सकस व पोषण आहाराच्या धोरणाचाच भाग असायला हवा.

लहान मुलांना आकर्षित करणारी रंगीत पॅकेजिंग, खेळणी, प्रसिद्ध व्यक्तींच्या जाहिराती आणि डिजिटल माध्यमांवरील प्रचार यामुळे मुलांच्या खाद्यपदार्थांच्या निवडीवर मोठा प्रभाव पडतो. ज्या वयात मुलांमध्ये पोषण आहार आणि आरोग्य यांची समज विकसित होत असते, त्या कोवळ्या वयात त्यांना अधिक साखर, मीठ आणि चरबी असलेल्या पदार्थांच्या जाहिरातींच्या प्रभावाखाली ठेवणे योग्य आहे का, याचा सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा. तसेच, लहान मुलांना लक्ष्य करणाऱ्या व आरोग्याला हानिकारक असलेल्या खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर कठोर नियंत्रण आणायला हवे.

शाळांमध्ये सकस व संतुलित आहार, पुरेशी झोप, व्यायाम आणि मानसिक आरोग्य याचे महत्त्व काय हे अभ्यासक्रमातून शिकवले जाणे अपेक्षित आहे. तसेच, पौष्टिक अन्नपदार्थांचे विविध पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायला हवेत. शाळांमध्ये रोज खेळण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. तसेच, पालकांसाठीही आरोग्यविषयक मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करायला हवेत. नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येक परिसरात चालण्यासाठी सुरक्षित पदपथ, शुद्ध हवेसाठी उद्याने, मोकळी मैदाने आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी ओपन जिमसारखी सार्वजनिक व्यायामाची साधने उपलब्ध व्हायला हवीत. नॉर्वे, स्वीडन, फिनलंड देशाप्रमाणे सायकलिंगसाठी सुरक्षित व स्वतंत्र मार्गिकासुद्धा जाणीवपूर्वक तयार करायला हवी.

मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यांचे निदान अनेकदा उशिरा होते. काही नागरिकांना आजाराची लक्षणे दिसेपर्यंत तपासणी करण्याची गरज वाटत नाही. नियमित आरोग्य तपासणीची सवय नसणे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सुविधा अपुऱ्या असणे, यामुळे आजार गंभीर अवस्थेत पोहोचू शकतात. ते लक्षात घेता, सरकारी वा निमसरकारी रुग्णालयांमध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, वजन आणि आवश्यकतेनुसार कोलेस्ट्राॅल तपासणी नियमित व मोफत उपलब्ध करण्याची नितांत गरज आहे. मुख्य म्हणजे, या वैद्यकीय तपासण्या केवळ आजारी व्यक्तींसाठी न ठेवता सामान्य नागरिकांसाठीही सहज व घर-कार्यालयाजवळ उपलब्ध व्हायला हव्यात. ३० वर्षांवरील नागरिकांच्या नियमित तपासणीला प्रोत्साहन द्यायला हवे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा भर प्रामुख्याने आजार झाल्यानंतर उपचार करण्यावर असतो. तथापि, औषधे, रुग्णालये आणि वैद्यकीय उपचारांवर मोठा खर्च करण्यापेक्षा नागरिकांना आजार होऊच नये यादृष्टीने शासकीय यंत्रणांची नियोजनबद्ध पावले पडायला हवीत.

मधुमेहाचे निदान वेळेत होत आहे का, उच्च रक्तदाब नियंत्रणात आहे का, मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत तर नाही ना? बाजारपेठेत पौष्टिक अन्नाची उपलब्धता पुरेशी होत आहे का? शाळांमध्ये आरोग्यदायी खाद्यपदार्थ मिळत आहेत ना? यावर सरकारी सकस व पोषण आहार कार्यक्रमांचे मूल्यमापन ठरायला हवे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित सरकारी धोरणे ही निवडणुकीतील घोषणा किंवा एखाद्या मोहिमेपुरती मर्यादित न राहता ती शासन व्यवस्थेचा कायमस्वरूपी भाग बनून कृतीत उतरायला हवीत. आरोग्यदायी भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आता केवळ घोषणा करून अथवा आदेश देऊन चालणार नाही, तर खाद्यपदार्थाच्या निर्मितीपासून ग्राहकांपर्यंत सर्वांनाच शिस्त लावणारे उपाय सरकारने कटाक्षाने व काटेकोरपणे हाती घ्यायला हवेत.

खाद्यपदार्थांच्या पाकिटावरील धोक्याच्या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश म्हणजे सार्वजनिक आरोग्य धोरणातील उणिवा भरून काढण्याची नामी संधी आहे. आज नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अनेक समस्या त्यांच्या वैयक्तिक सवयींमुळेच निर्माण होत नाहीत; त्या अन्नाची उपलब्धता, किंमत, जाहिराती, शहरांची रचना, कामाचे स्वरूप आणि आरोग्य व्यवस्थेतील मर्यादा यांच्याशी काही प्रमाणात जोडलेल्या आहेत. त्यामुळे सरकारने केवळ नागरिकांना दोष देण्याऐवजी त्यांच्या आरोग्याला पोषक वातावरण निर्माण करण्याची मूलभूत जबाबदारी स्वीकारायला हवी. आज प्रतिबंधात्मक आरोग्य व्यवस्थेवर खर्च करण्यास सरकारने टाळाटाळ केली, तर उद्या आजारांच्या उपचारांवर अधिक मोठा आर्थिक खर्च सहन करावा लागेल. सरकारने आरोग्याला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून कालबद्ध, निधीयुक्त आणि परिणामांची जबाबदारी निश्चित करणारा कार्यक्रम राबवायला हवा; अन्यथा ‘आरोग्यदायी भारता’ची छोटीशी आशाही निव्वळ कागदावरच राहील.

prakashrsawant@gmail.com