

डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
मालवण म्हणजे फक्त समुद्रकिनारा आणि वॉटरस्पोर्ट्स नाही, तर पहाटे जागा होणारा मासळी बाजार, घामेजलेली माणसं आणि समृद्ध खाद्यसंस्कृती यांचं जिवंत दर्शन. या गाभ्यात शिरल्यानंतर मालवण खरं काय आहे, ते उमगत जातं.
मालवण हे कोकणातील प्रसिद्ध ठिकाण. परिचयाचं ठिकाण. इथे येऊन विविध वॉटरस्पोर्ट्स करणं, मत्स्यहाराचा आस्वाद घेणं याला पर्यटक प्राधान्य देतात. पण मालवण फिरण्याचा आणि तिथल्या खाद्यसंस्कृतीचा चोखंदळपणे अनुभव घ्यायचा असेल तर मालवणच्या गाभ्यात शिरायला हवं. ही गाभ्यात शिरायची सुरुवात केली मालवणच्या मासळी बाजारात जाऊन. मालवणी माणसाच्या दिवसाची सुरुवात होते तरी कशी हे इथं आल्यावर समजलं.
सूर्यदेवाला जाग यायच्या आधीच मालवणचे मच्छीमार जागे होतात आणि बोटी घेऊन लाटांवर स्वार होतात. सूर्याचे किरण किनाऱ्यावर पडण्याआधीच त्यांच्या बोटी मासळी घेऊन किनाऱ्याला लागतात. सूर्य जसजसा वर येऊ लागतो तसे मासे जाळीतून सोडवून टोपलीत भरतात आणि लिलावाच्या ठिकाणी पाठवून देतात. साधारण सात वाजता मालवणमधून तसंच आजूबाजूच्या गावातून लोक मासे खरेदी करण्यासाठी लिलावाच्या जागी येतात. किनाऱ्यावर गर्दी वाढत जाते. हळूहळू मालवणचा किनारा मालवणी बोलीने गजबजू लागतो. एका बाजूला माश्यांचा लिलाव सुरू असतो. त्यांचे आकडे कानावर पडत असतात. काहीजणांचे हिशोब लिहिणं सुरू असतं तर व्यवहार चोख व्हावा यासाठी काहींचे चढ्या आवाजात बोलणंही सुरू असतं. ही गजबज इतकी असते की, नवखा आलेला माणूस भांबावून जाईल. सगळेच मासे महाग नसतात हे इथे आल्यावर समजलं. पण काही माश्यांचे दर ऐकून माझे डोळे मात्र विस्फारले गेले.
मला या मालवणच्या बाजारात मासे खरेदी विक्रीसाठी स्त्रियांची संख्या पुष्कळ दिसली. त्या मोठ्या प्रमाणावर टोपली टोपलीने मासे लिलावातून खरेदी करतात. काहीजणी ही माश्यांनी भरलेली टोपली कडेवर किंवा डोईवर घेऊन तिठ्यावर जातात. काहीजणी इथेच किनाऱ्यावर विक्रीसाठी मासे मांडतात. त्यांचे दुकान साधे सुटसुटीत. खाली दोन चार टब आणि त्यावर आडवी लाकडी फळी. त्या फळीवर माश्यांचे वाटे मांडतात आणि मासे विकायला सुरू करतात. असं हळूहळू लिलावाच्या जागेचे रूपांतर बाजारात झालेलं असतं.
एका काकूंना मी न राहवून विचारलं- “तुमचा दिवस कधी सुरू होतो?” त्या थोड्या हसल्या. या प्रश्नाचं त्यांना कौतुक वाटलं. त्यांनी उत्तर दिलं- “सकाळी वाजताच मी घरातून आवरून बाहेर पडते. किनाऱ्यावर येऊन लिलावात मासे खरेदी करते. आणि इथे येऊन विकते. मासळी किती मिळते त्यावर लिलाव होतो. कधी मासळी जास्त मिळाली तर कमी दरात लिलाव होतो. मासळी कमी मिळाली तर जास्त दर लावून लिलाव होतो.”
मी गेले होते तेव्हा सुरमई भरपूर मिळाली होती. स्थानिकांच्या व्यवहारी भाषेत बंपर मिळाली होती. सुरमईची रास लागली होती. दर कमी असल्यामुळे सुरमई खरेदीसाठी हॉटेल व्यावसायिक, स्थानिकांची गर्दी उसळली होती. खांद्यावर मोठमोठ्या सुरमई घेऊन काहीजण फिरत होते. या गर्दीत मी माश्यांचे वेगवेगळे प्रकार बघत फिरत होते. एका स्टॉलवर पापलेट, खापरी पापलेट, काळा पापलेट होते. बोडाव नावाचा कुठलासा मासा होता. कोळंबीचे वाटे लावले होते. बांगडे, सौंदळे तर टोपली टोपलीने होते. डायना नावाचाही मासा आहे, हे इथे फिरताना कळलं. काही मासे करंगळी एवढे तर काही हातभार लांब. छोटे मासे टोपलीत होते तर सुरमई, डायना यासारखे मोठे मासे किनाऱ्यावर रेतीवर पसरले होते. मालवणचा किनारा या माश्यांच्या राशीने आणि त्यांच्या चांदीसारख्या चमकीने अक्षरशः चमचमत होता.
किनाऱ्यावर माश्यांचा लिलाव, बाजार तर असतोच पण खरेदी केलेले मासे कापून, स्वच्छ करून देणाऱ्यांचीही वेगळी रांग असते. मासे खरेदी करायचे आणि कापून देणारीकडे घेऊन जायचे. ती मासे व्यवस्थित स्वच्छ करून, कापून देते. किलोवर आणि माश्यांच्या आकारावर कापण्याचे दर ठरलेले असतात. सकाळच्या प्रहरी मालवणचे अर्थचक्र असं माश्यांभोवती गोलगोल फिरत असतं.
इथून मी सुरमइ तर खरेदी केली शिवाय दुपारच्या जेवणासाठी गुंजली नावाचा मासाही घेतला. या माश्यात फॅट अगदी कमी आणि प्रथिने जास्त असतात. पचायला हलका असतो. केरळ, कोकणात हा मासा आवर्जून खाल्ला जातो, अशी माहिती मिळाली.
मासे खरेदी करून मी होमस्टेकडे जायला निघाले तेव्हा वाटेत गावठी भाज्यांचा बाजारही भरलेला दिसला. घरच्या परसात किंवा गावाजवळच्या रानात मिळणाऱ्या ताज्या ताज्या भाज्या घेऊन स्त्रिया बाजारात आल्या होत्या. इतकी टवटवीत, रसायनमुक्त भाजी मिळणं ही माझ्यासाठी श्रीमंती आहे. मी या बाजारातही भाज्या घेत फिरत होते. तिथे मला समुद्राच्या रेतीत उगवून येणारी समुद्रीमेथी दिसली. ओली आणि सुकी तिरफळे विकायला होती. गंमत बघा आता; कोकम नावाच्या फळापासून तयार केलेले किती प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. कोकमाची सोल म्हणजे आमसुलं मांडली होती, घरीच केलेलं कोकमाचे आगळही बाटल्या भरून विक्रीसाठी आणले होते, कोकमच्या बी पासून तयार केलेलं कोकम बटरही बाजारात होतं. हे कोकम बटर खाण्यासाठी आणि त्वचेला वरून लावण्यासाठीही वापरलं जातं.
बाजारात फिरताना माझं मन प्रसन्न झालं ती फुलं पाहून. इथल्या स्त्रियांनी आपल्या आंबड्यात जशी फुलं नेटकी माळली होती, तशीच निगुतीने विक्रीसाठी मांडलीही होती. कृष्णकमळ, सोनचाफा, कुंदा यांनी बाजार सुगंधित झाला होता.
इथे फिरताना फक्त खरेदी कधीच होत नाही बोनस म्हणून मालवणी जेवणाची, भाज्यांची रेसिपीही स्त्रिया सांगून टाकतात. अन्नपूर्णेनं भाज्या पिशवीत घालत आशीर्वाद दिला आहे असंच वाटतं.
मी या बाजारातून पातळ सालीचे आणि आतून नारंगी रंगाचे गावठी लिंबू खरेदी केले. पपनस, अंबाडे, मालवणी मसाला यांचीही खरेदी केली. जे माझ्या शेतात ते माझ्या पानात हे तत्व अनेक कोकणी माणसे पाळतात.. त्यामुळे अगदी विश्वास ठेवून या बाजारातून मी तांदूळ, पालेभाज्या, फळं, मसाले खरेदी करत असते. या खरेदीतून माझी कधीच फसवणूक झालेली नाही उलट उत्तम भाज्या खाण्याचं समाधानच मिळालं आहे.
माझ्या उजव्या हातात माश्यांची पिशवी आणि डाव्या हातात भाज्यांनी भरलेल्या दोन पिशव्या होत्या. आणि मनात पराकोटीचं समाधान होतं. असं समाधान मोठ्या मॉलमध्ये फिरतानाही मिळणार नाही.
मालवणमध्ये एका प्रेमळ मालवणी कुटुंबाच्या होमस्टेमध्ये माझा मुक्काम होता. अरण्य होमस्टे. हा होमस्टे शेतीच्या बाजूला शांत जागेत आहे. दुपारी वहिनीने मालवणी पद्धतीने मासे करून खाऊ घातले. सोलकढी, माश्याची कढी, गुंजली फ्राय असा मस्त बेत केला होता. ताजा फडफडीत मासा तोही मालवणी पद्धतीने केलेला, हे खाण्याचं सुख मला मिळालं. रात्री समुद्रीमेथीची भाजीही करून दिली. भाजी कडू लागेल म्हणून सोबत तांदळाची खीरही तिने आठवणीने केली होती. घरचीच व्यक्ती असल्याप्रमाणे केलेला मालवणी पाहुणचार मी विसरू शकत नाही.
कुठलीही भटकंती करून आल्यावर स्थळ लक्षात रहाण्यामागे अनेक कारणं असतात. त्यातील एक स्थानिकांसोबत झालेला सुसंवाद आणि दुसरी म्हणजे तिथली खाद्यसंस्कृती. या दोन कारणांमुळे स्थळ, नाव, रूप, गंध या गोष्टी आणि अनुभव हे तेथील वातावरणासहित लक्षात राहतात. मालवण तिथल्या मालवणी माणसांमुळे आणि तिथल्या चविष्ट पदार्थांमुळे माझ्या कायमच लक्षात राहीलच. तुम्हांलाही असं साधेपणातलं अतीव आनंद देणारं सुख आणि चव अनुभवायची असेल तर मालवण सफर नक्की करा.
ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com