

डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
गोवा म्हटलं की समुद्रकिनारे आणि गोंगाट आठवतो; पण या झगमगाटाच्या पलीकडे शांतता, निसर्ग आणि अध्यात्म जपून ठेवणारा एक गोवा आहे- तो म्हणजे नेत्रावळी.
गोव्याचं आपल्यापुढे असलेलं चित्र म्हणजे समुद्रकिनारा, त्यावरची गर्दी आणि पार्टी. पाऊस सरला की गोव्याचे किनारे गोंगाटात पार हरवून जातात. पण मी असा गोवा बघितला आहे जिथे शांतता नांदते. जिथे हिरव्यागार माड-सुपारीच्या बागांमधली शीतलता जाणवते. जिथल्या घनदाट जंगलातून जाताना अंगावर शहारा येतो. जिथे हिंदी भाषा नाही तर गोव्याची गोवन कोंकणी बोली कानावर पडते. हे सारे बघायला समुद्रकिनारा सोडून आत गाडी वळवावी लागते. मी गाडी वळवली आणि तिथे मला गोव्याची अप्रकाशित बाजू दिसली ती नेत्रावळीच्या रूपात.
नेत्रावळी (नेत्रावली) नावाप्रमाणेच सुंदर ठिकाण. नेत्रावळी नावातच किती सात्विक, निर्मळ भाव आहे बघा!! प्राचीनतेची छटाही या नावाला आहे आणि खरंच हे ठिकाण तसंच आहे- बुडबुड्याचं पुरातन तळं लाभलेलं आणि गोपीनाथाच्या प्रसन्नतेनं भारलेलं. नेत्रावळी वन्यजीव अभयारण्याजवळ हा भाग येत असल्याने निसर्गाचा आशीर्वादही या स्थळाला पुरेपूर आहे. तिथे भगवान श्रीकृष्णाचं देखणं मंदिर, मंदिरापुढे जांभ्यात बांधलेलं निळ्याशार पाण्याचं कुंड आहे. असा आटोपशीर आणि तरीही प्रशस्त वाटावा असा मंदिर परिसर आहे. आंबा, भेरली माड, आवळा, जांभूळ अशा वृक्षराजींनी या परिसराला कवेत घेतलंय.
तिथे गेल्यावर माझी पावलं कुंडाकडे आपसूकच गेली; कारण तिथे टाळी वाजल्यावर पाण्यात तयार होणाऱ्या बुडबुड्यांचा आविष्कार पाहण्यासाठी. पण तिथे बोर्डवर लिहिलेलं देवदर्शन करून कुंड पाहण्यासाठी जा. त्यामुळे नियमाचा मान ठेवून, मनाची अधीरता रोखून मी आधी मंदिराकडे गेले.
मंदिराजवळ पारिजातकाचं झाड होतं. फुलांचा गोलाकार सडा पडला होता. फुलांचा गंध आसमंतात दरवळत होता. हा पारिजात श्रीकृष्णाच्या आवडत्या फुलांपैकी एक. पारिजातकाची काही फुलं घेऊन मंदिरात प्रवेश केला. गाभाऱ्यात कल्पवृक्षाखाली वेणू वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची मूर्ती दिसली. गोपीनाथाला वाहण्यासाठी फुलं पुजारीबुवांना दिली. त्यांनी ती श्रीकृष्णाच्या चरणी वाहिली. त्यांनी तीर्थ तर दिलंच नंतर हातावर कुंदाचा मंद वासाचा गजरा आणि गुलाबाची दोन नाजूक फुलं ठेवली. हातावर ठेवलेला तो सुगंधित आशीर्वाद पाहून माझं मन आनंदानं आणि प्रसन्नतेनं भरून गेलं होतं.. पुन्हा एकवार हात जोडून मी मनोभावे नमस्कार केला.
मंदिरात आता जी मूर्ती आहे ती नवीन आहे. आधी जी मूर्ती होती ती १४ व्या शतकातील होती, अशी माहिती मिळाली. सध्या ती गोवा स्टेट म्युझियममध्ये आहे. मंदिरातून बाहेर आले आणि समोर असणाऱ्या कुंडाकडे वेळ न दवडता गेले. दगडांच्या फटीतून डोकावणारी छोटुशी हिरवी पानं आणि वाढलेली चिमुकली गुलाबी फुलं कुंडाच्या देखणेपणात भर घालत होती. जांभा दगडात बांधलेलं हे कुंड ३०० ते ४०० वर्षं जुनं आहे असं म्हणतात. या कुंडाची खासियत म्हणजे पाण्यातून येणारे बुडबुडे. कोणी आवाजामुळे निर्माण होणाऱ्या कंपनाशी या बुडबुड्यांचा संबंध बांधला, तर कोणी कार्बनडाय ऑक्साईड आणि सल्फरडाय ऑक्साईडमुळे बुडबुडे येतात असं म्हणतात. पण ठोस कारण कोणाला माहीत नाही. हे तळं देवाने निर्माण केलंय अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. टाळी किंवा टिचकी वाजवली, पावलांची हालचाल झाली की बुडबुडे येतात. म्हणून तर याला बुडबुड्या तळं म्हणतात. त्या बुडबुड्या पाहण्यासाठी तळीत पाय सोडून मी बसले होते. काळवेळेचे भानही विसरून गेले होते.
काही ठिकाणं चक्क तुम्हाला म्हणतात- “जाऊ नको थांब अजून”. त्यावेळी त्यांचं ऐकायचं. त्यांच्या संगतीत राहायचं. नेत्रावळीने मला तिथे थांबायला लावलंच. मी कुंडाच्या पायऱ्या चढून वर आले. मंदिराच्या खांबाला टेकले आणि परिसर न्याहाळीत बसले. पुजारी काका नुकतेच पूजा करून चालले होते. त्यांच्या एका हातात पूजेचे तबक आणि दुसऱ्या हातात तीर्थाचा गडू होता. वयाप्रमाणे सावकाश पावले टाकीत ते घरी परतत होते. मंदिरात केवळ मी, माझा नवरा आणि वेणु वाजवणारा श्रीकृष्ण इतकेच राहिलो होतो. मंदिरातून मोगऱ्याचा, गुलाबाचा परिमळ येत होता. त्यात उदाधुपाचा, अभिषेकाचा हलकासा गंध मिसळला होता. हा गंध आसमंतात हलके हलके पसरत होता. मगाशी कुंदाचा आणि गुलाबाचा मिळालेला गंधित आशीर्वाद अजून हातावर दरवळत होता. नितळता पवित्रता प्रसन्नता आपल्यात झिरपवणार असं हे स्थळ आहे नेत्रावळी.
थंडीच्या किंवा उन्हाळ्याच्या दिवसांत नेत्रावळीला जाता येईल, तसंच पावसाळ्यातही इथे जायला उत्तम ठिकाण आहे. नेत्रसुखद असा हा परिसर आहे.
जंगलाच्या संगतीत असल्यामुळे शीतलता तिथे जाणवत राहतेच. हे मंदिर तर तुम्हाला बघता येईलच, शिवाय इथल्या अभयारण्यात ट्रेल आणि जंगल सफारीही करता येईल. एकाचवेळी निसर्गानुभव आणि आध्यात्मिक अनुभव या ठिकाणी घेता येतो. नेत्रावळीत मुक्काम करण्यासाठी काही मोजकेच होमस्टे, रिसॉर्ट आहेतच.
तुम्ही आताही नवीन वर्ष किंवा सुट्टीसाठी गोव्याचा प्लॅन करत असाल तर नेत्रावळी तुमच्या प्लॅनमध्ये समाविष्ट करा. गोवा म्हणजे फक्त पार्टी नाही तर गोवा म्हणजे भक्तिसागरात बुडालेलं, अद्भुत शांतता आणि सुंदरतेनं नटलेलं आणि शांततेची प्रचिती देणारं राज्य आहे. नवीन वर्ष म्हणजे फक्त पार्टी नसते तर नवीन नवीन वर्षाची सुरुवात एखाद्या सुंदर ठिकाणी जाऊन, निसर्गदेवतेच्या सान्निध्यात किंवा मंदिरात देवाचं दर्शन घेत, सकारात्मकतेचा स्वीकार करत आणि आशीर्वाद घेऊन करावी, यातही एक वेगळीच शांतता असते. n
ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com