

जगतवारी
मेधा आलकरी
हिरोशिमाच्या विध्वंसातून उमटलेला शांततेचा संदेश आणि जपानच्या संस्कृतीचा अद्भुत प्रवास- या दोन्ही टोकांचा अनुभव देणारी ही भावस्पर्शी कहाणी. विनाशातून उगवलेल्या आशेचा आणि मानवतेच्या जिवंत जाणिवेचा हा प्रवास आहे.
पारतंत्र्याचा अंधःकार दूर होऊन स्वातंत्र्यसूर्याचा उदय झाला म्हणून भारतीयांसाठी अभिमानाचा, आनंदाचा ऑगस्ट महिना, जपान्यांसाठी मात्र अंध:काराच्या खाईत नेणारा दुर्दैवी महिना ठरला आहे. ६ ऑगस्ट १९४५, मानव इतिहासातील काळाकभिन्न दिवस! त्या दिवशी अमेरिकेने जपानची राजधानी टोकियोपासून पाचशे मैलांवरील साडेतीन लाख वस्तीच्या हिरोशिमा शहरावर अणुबॉम्बचा स्फोट केला. युद्धाच्या इतिहासातील हा पहिला अणुहल्ला!
६ ऑगस्टची सकाळ नेहमीसारखीच. शहरातील लोक आपापल्या दिनचर्येत गुंतलेले, पुढच्या क्षणी शहर उद्ध्वस्त करणारा आगीचा गोळा आपल्यावर बरसून आपल्याला बेचिराख करणार आहे याची तसूभरही कल्पना नसलेले. सकाळचे सव्वाआठ वाजले. पंधरा हजार टन टीएनटीची शक्ती असलेला ‘लिटिल बॉय’ नावाचा नऊ हजार पौंड वजनाचा युरेनियम अणुबॉम्ब, B-29 बॉम्बर एनोला गाय विमानातून सुटला. एक जोरदार धमाका झाला आणि आगीचा प्रचंड लोळ आकाश व्यापून गेला. काळ्या धुराच्या दाट लोटाने आसमंत भरून गेला. त्या हल्ल्यात ऐंशी हजार लोक जागच्या जागी मृत्युमुखी पडले. आठवड्याभरात अजून चाळीस हजार लोकांचा बळी गेला. जे वाचले त्यांच्या शरीरावर भाजल्याचे पोपडे उठले, केस गळून गेले, चेहरे विद्रुप झाले. उत्सर्जित किरणांशी संपर्क आल्यामुळे बऱ्याच जणांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांनी घेरलं; तर काही अपंग झाले. दुसऱ्या महायुद्धाचा असा भयानक शेवट झाला.
हिरोशिमाला भेट देण्यापूर्वी हवाईला गेले असताना पर्ल हार्बरला भेट देऊन झाली होती. जपान्यांकडून अमेरिकन सैन्याची झालेली अपरिमित हानी पाहून आम्ही खिन्न झालो होतो. त्या हल्ल्यात कामी आलेल्या सैनिकांची यादी वाचताना आमचे डोळे पाणावले होते. वास्तविक ते आमचे कोणीच लागत नव्हते, पण माणसं आम्हीही आणि माणसं तेही! हे माणुसकीचं नातं संवेदनशील मनाला अस्वस्थ करीत होतं. तिथे एका शहीद वीराच्या मुलाने मोठ्या इतमामाने अमेरिकन झेंडा अर्पण केला. ब्युगलच्या करुण आवाजाच्या पार्श्वभूमीवर तो नवा झेंडा फडकवण्याचा सोहळा मनाला चटका लावून गेला. आता दुसरी बाजू बघत होतो. खून का बदला खून! परंतु हा नुसता बदला नव्हे, तर काळीज विदीर्ण करणारा नरसंहार होता.
हिरोशिमा हे जपान्यांचं लष्करी संपर्क केंद्र, जवानांची छावणी आणि जपानी सेनेला रसद पुरवणारं महत्त्वाचं शहर. ज्या इमारतींच्या डोक्यावर, सहाशे मीटर अंतरावर या अणुबॉम्बचा स्फोट झाला त्यापैकी एक होता ‘हिरोशिमा प्रिफेकट्युरल इंडस्ट्रियल प्रोमोशन हॉल’. आज त्या भयाण दिवसाची आठवण देत इमारतीचा फक्त सापळा तिथे उभा आहे. आता त्या इमारतीला A-Dome या नावाने ओळखलं जातं. त्याच्या आजूबाजूचा परिसर जसा पूर्वी गजबजलेला होता तसा उभा करणं जपान्यांना सहज शक्य होतं; परंतु तसं न करता त्यांनी, मानवजातीचा संहार करणाऱ्या ॲटमबॉम्बच्या संहारक वापराच्या निषेधार्थ त्याच जागेवर एक शांतीवन तयार केलं. ६ ऑगस्ट १९४५ पर्यंत A Dome ही इमारत आणि त्याचा हिरवा घुमट हिरोशिमाची शान होता आणि त्या दिवसापासून आजतागायत भग्नावस्थेत उभा राहून तो नवीन पिढीस शांततेचा संदेश देत आहे.
हिरवाईने नटलेल्या शांतिवनात एक म्युझियम आहे आणि मोकळ्या जागेत एक स्मारक उभं केलं आहे. दगडी कमानीखालील पेटीत बॉम्बस्फोटात बळी पडलेल्या मृत व्यक्तींची यादी जतन करून ठेवली आहे आणि त्यावर संदेश कोरला आहे- Let the souls rest in peace, for we shall never repeat the evil.
या बॉम्बस्फोटात बरीच निष्पाप मुलं मृत्युमुखी पडली होती. ‘सासाकी सादाको’ ही दोन वर्षांची मुलगी रेडिएशनच्या संपर्कात आल्यामुळे पुढे दहा वर्षांनी कॅन्सरग्रस्त झाली. आठ महिने ती मृत्यूशी झुंज देत होती. जपानी श्रद्धेनुसार हे संकट निवारावं म्हणून त्या आठ महिन्यांत तिने १००० ओरिगामी हंस बनवले. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आणि ती काळाच्या पडद्याआड गेली. तिच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पैसे गोळा करून ॲटमबॉम्बमुळे मृत्युमुखी पडलेल्या सासाकीसारख्या असंख्य मुलांसाठी शांतिवनात एक स्मारक उभं केलं आणि आजही त्या स्मारकाला भेट देणारी मुलं आठवणीने आपल्याबरोबर एक कागदाच्या घड्यांचा हंस भेटीदाखल घेऊन येतात.
जगात शांती प्रस्थापित करण्याच्या हेतूने शांतिवनात एक अखंड तेवती ज्योत प्रज्वलित केलेली आहे. कोपरापासून मनगटापर्यंत जोडलेले हात आणि आकाशाकडे तोंड केलेले पंजे अशा बैठकीत बसवलेली ही शांतिज्योत १ ऑगस्ट १९६४ पासून तेवत आहे आणि आण्विक शस्त्रांचा अंत होत नाही तोपर्यंत अशीच तेवत राहणार आहे. शांतिसंदेशाचा नाद उत्पन्न करणारी एक महाकाय शांतिघंटा तिथे उभी केली आहे. त्यावर आघात करताच त्याचा धीरगंभीर नाद दाही दिशांना शांतिसंदेश पोहोचवतो. विश्वशांतीसाठी ही घंटा प्रत्येकाने वाजवावी अशी विनंती करणारा एक बोर्ड तिथे लावला आहे. ‘नो युवरसेल्फ’ हा घंटेवरील शांतिसंदेश ग्रीक आणि जपानी भाषांसोबत संस्कृत भाषेत सुद्धा लिहिला आहे. ही घंटा उभारणारी ‘होप फ्रुटिशन सोसायटी’ त्या भयानक बॉम्बहल्ल्यातून वाचलेली आहे. ६ ऑगस्ट हा दिवस जागतिक शांतता दिन म्हणून जगभर पाळला जातो.
ॲटमबॉम्बच्या भयंकर प्रलयानंतर बेचिराख झालेल्या भूमीतून अंकुर फुटून, नवजीवन प्राप्त झालेलं फूल होतं कण्हेर (ओलियांडर). आज ते हिरोशिमाचं नागरीय फूल म्हणून ओळखलं जातं.
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेला आता ८० वर्षे लोटली. या कालावधीत देशादेशात अनेक संघर्ष निर्माण झाले. आज तिसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजत आहेत. आजमितीला अनेक विकसित आणि विकसनशील देश त्यांच्याकडे अणुबॉम्ब असल्याचा दावा करत आहेत; परंतु त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न अजूनतरी कोणी केला नाही ही गोष्ट संपूर्ण मानवजातीसाठी आश्वासक आहे. साऱ्या जगाला संहारापेक्षा शांती हवी आहे असाच अर्थ त्यातून निघतो.
हिरोशिमाहून तासाभराच्या अंतरावर मियाजीमा नावाचं बेट आहे. तिथलं ‘इत्सुकुशिमा श्राइन’ नावानं ओळखलं जाणारं भव्य मंदिर त्याच्या शेजारील पॅगोडा आणि जणू समुद्रात तरंगतेय असं वाटणारी केशरी टोरी (प्रवेशद्वार) हे पर्यटकांचं लाडकं स्थळ. तिथे जाण्यासाठी केलेला बोटीचा प्रवास खरंच आल्हाददायक होता. हिरोशिमाला भेट दिल्यावर मनावर आलेलं मळभ त्यानं पुसून टाकलं. त्या दिवशी भरती होती. समुद्रातील पाण्याचा खळखळाट तनमनाला जाणवत होता. दुरूनच ती केशरी टोरी दिसली. जणू गुडघाभर पाण्यातून चालत आमच्या स्वागताला येत होती.
हे शिन्तो पंथाचं मंदिर आहे ५९३ सालातलं. आताचं त्याचं भव्य रूप मात्र त्याला लाभलं बाराव्या शतकात. मंदिराची संरचना निसर्ग आणि स्थापत्यकलेचा एक सुंदर संगम म्हणता येईल. हे मंदिर पाण्यात असलेल्या खांबांवर बांधलं आहे. भरतीच्या वेळी ते समुद्रात तरंगत असल्याचा भास होतो. या पूर्ण बेटालाच पवित्र मानत असल्यामुळे, बेटाच्या जमिनीला धक्का न लावता ते लाकडी खांबांवर बांधण्याची क्लुप्ती लढवली गेली. मंदिरात केशरी रंगाचं लाकूड आणि पांढऱ्या भिंतींचा वापर केल्यामुळे ते खूपच आकर्षक दिसतं.
मंदिराच्या चौथऱ्यावर उभं राहून समोरचा देखावा बघण्यात आम्ही गुंगून गेलो. समुद्राच्या निळ्या पाण्यात उभी असलेली सोळा मीटर उंच टोरीची शेंदरी कमान, मंदिराला लाभलेली डोंगरावरील हिरवाईची पार्श्वभूमी आणि आकाशात दाटून आलेले कृष्णमेघ! आता ओहोटी सुरू झाली होती. टोरीच्या खालचं पाणी ओसरलं होतं. माणसं आता त्याखालून ये-जा करताना दिसू लागली. भराभर चालत दोनेकशे मीटरचा रस्ता पार करून आम्ही टोरीजवळ पोहोचलो. लांबून दिसणारी टोरीची भव्यता जवळून पाहताना अधिकच प्रभावी वाटली. तळवे भिजतील एवढ्या पाण्यातून टोरीच्या अवतीभवती चकरा मारल्या. या लडिवाळ टोरीने आमचं मन जिंकून घेतलं.
मंदिराशेजारील तितकाच भव्य पॅगोडा एका टेकडीवर स्थित आहे. १४०७ मध्ये बांधलेला हा २८ मीटर उंचीचा पॅगोडा बौद्ध आणि शिन्तो संस्कृतीच्या मिलाफाचं मूर्तिमंत रूप आहे. पंचमहाभूतांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पॅगोडाच्या पाच मजल्यांच्या मध्यभागी वरून टांगलेला खांब जमिनीला स्पर्श करत नाही. ही आहे प्राचीन जपान्यांची भूकंपरोधक रचना. चेरीच्या झाडांनी वेढलेला हा पॅगोडा वसंतात जितका सुंदर दिसत होता तितकाच देखणा तो लाल पानांच्या पार्श्वभूमीवर शरदातही दिसतो.
१९९६मध्ये या स्थळाला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. हे ठिकाण धार्मिक असले तरी ते प्रतीक आहे जपानच्या संस्कृती आणि कलेचे!
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com