कचरापेटी आली कुठून?

कचरापेटीला फ्रेंच भाषेत ‘पुबेल’ म्हणतात, हे तुम्हाला माहीत आहे का? एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या नावावरून कचरापेटीला हे नाव पडलं! आहे ना गंमत? साध्या झाकणाच्या डब्यापासून पायाने उघडता येणाऱ्या कचरापेटीपर्यंतच्या रंजक प्रवासाबद्दल...
कचरापेटी आली कुठून?
कचरापेटी आली कुठून?
Published on: 

नवलनगरी

सोनाली कोलारकर-सोनार

कचरापेटीला फ्रेंच भाषेत ‘पुबेल’ म्हणतात, हे तुम्हाला माहीत आहे का? एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या नावावरून कचरापेटीला हे नाव पडलं! आहे ना गंमत? साध्या झाकणाच्या डब्यापासून पायाने उघडता येणाऱ्या कचरापेटीपर्यंतच्या रंजक प्रवासाबद्दल...

आताच दसरा झाला. आता दिवाळीचे आणि खास करून दिवाळीच्या सुट्टीचे वेध तुम्हा सगळ्यांना लागले असणार! सणवार आले की घरात आधी स्वच्छतेला सुरुवात होते. दिवाळीआधीची परीक्षा संपत आली की घरातले आपल्या मागे लागतात.

“चल, आता तुझं कपाट आवर. नको असलेला कचरा टाकून दे. खोलीतली जाळी-जळमटं काढ आणि सगळं स्वच्छ करायला मदत कर.”

दिवाळीच्या दिवशी तर गॅलरीत, अंगणातली वाळलेली पानं आणि कुंड्याही स्वच्छ केल्या जातात. ही सगळी साफसफाई करताना जमा झालेला कचरा ओला आणि सुका असा वेगळा करावा लागतो. मग तो कचरापेटीत टाकून कचरा गोळा करणाऱ्या गाडीच्या स्वाधीन करावा लागतो.

किती महत्त्वाची असते ना ही कचरापेटी! पण तुम्हाला माहीत आहे का, ही कचरापेटी कोणी शोधून काढली?

तर मंडळी, आधुनिक कचरापेटीची संकल्पना एका फ्रेंच प्रशासकीय अधिकाऱ्याला सुचली. त्यांचं नाव होतं युजेन पुबेल. १८८३ च्या आसपास ते पॅरिसमध्ये प्रशासकीय अधिकारी होते. त्यांनी पॅरिसमधील लोकांना घराबाहेर झाकण असलेली कचरापेटी ठेवणं बंधनकारक केलं. म्हणजेच, कायद्यानेच तशी सक्ती केली. लोकांनी घरासमोर एक झाकण असलेला डबा ठेवायचा आणि त्यात कचरा जमा करायचा, असा नियम त्यांनी केला.

त्या काळात पुबेल यांनी कचऱ्याचं वर्गीकरण करण्याची संकल्पनाही मांडली होती. याआधी ब्रिटनमध्ये फिरत्या सार्वजनिक कचरापेट्यांच्या मदतीने कचरा गोळा करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. मात्र, पुबेल यांच्या निर्णयामुळे कचरा गोळा करण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला. लोकांना झाकण असलेल्या डब्यात कचरा जमा करण्याची सवय लागली. हळूहळू ही पद्धत युरोपातही पसरली. बंद डब्यातील कचरा उचलणं प्रशासनालाही सोपं झालं.

पुबेल यांच्या या निर्णयाची लोकांनी थट्टाही केली. कचरापेटीला ते ‘पुबेल’ म्हणू लागले! फ्रेंच भाषेत आजही कचरापेटीला ‘पुबेल’ असं म्हणतात.

पण कचरापेटीचा प्रश्न अजून पूर्णपणे सुटला नव्हता. डब्याचं झाकण हाताने उघडावं लागायचं. विशेषतः स्वयंपाक करताना हातातला कचरा टाकण्यासाठी वारंवार झाकणाला हात लावणं त्रासदायक होतं. आधी हातातला कचरा कुठेतरी ठेवायचा, मग झाकण उघडायचं, त्यात कचरा टाकायचा, असं करावं लागायचं. त्यामुळे कचरा सांडण्याचीही भीती असायची.

या समस्येवर उपाय शोधला एका हुशार अमेरिकन इंजिनिअर महिलेने. तिचं नाव होतं लिलियन मोलर गिलब्रेथ. १९२० च्या दशकात त्या आणि त्यांचे पती अनेक प्रकल्पांवर काम करत होते. त्या बारा मुलांची आई होत्या. पतीच्या अकाली निधनानंतरही त्यांनी घरची आणि व्यावसायिक जबाबदारी सांभाळली. त्याच काळात त्यांनी एक भन्नाट शोध लावला.

स्वयंपाक करताना कचरापेटीचं झाकण उघडण्यासाठी हाताचा वापर करावा लागतो, ही अडचण त्यांच्या लक्षात आली. त्यावर त्यांनी पायाने उघडता येणारी ‘पेडलवाली’ कचरापेटी तयार केली. आज आपण वापरतो त्या पेडलच्या मदतीने उघडणाऱ्या कचरापेटीच्या विकासात लिलियन मोलर गिलब्रेथ यांचं महत्त्वाचं योगदान होतं. आता हात न लावता कचरापेटी उघडता येऊ लागली आणि कचरा टाकणं सोपं झालं.

पुढे १९६० च्या दशकात जड कचरापेट्यांऐवजी हलक्या प्लास्टिकच्या कचरापेट्या वापरात येऊ लागल्या. अशा कचरापेट्यांच्या रचनेत चार्ल्स हॅरिसन यांचंही महत्त्वाचं योगदान होतं.

आहे ना गंमत! आज अगदी साधी वाटणारी कचरापेटी तयार होण्यासाठी किती विचार आणि प्रयत्न झाले! मग आपणही या वस्तूचं महत्त्व ओळखायला हवं. कचरा कुठेही न टाकता तो योग्य कचरापेटीत टाकायला हवा. ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवायला हवा. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ राहायला मदत होईल.

चला तर मग, दिवाळीची स्वच्छता करताना आपणही कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावूया!

पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक

sonalikolarkarsonar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in