

नवलनगरी
सोनाली कोलरकर-सोनार
इटालियन चवीची आणि जागतिक प्रसिद्धी मिळवलेल्या पिझ्झाच्या रंजक इतिहासाची ही एक चविष्ट सफर!
पिझ्झा म्हटलं की सान-थोर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. काय ते वेगवेगळे टॉपिंगज! वा! मूळ इटालियन असलेला हा पिझ्झा आता अनेक देशात त्यांच्या पद्धतीने पण मिळतो. पिझ्झा नेमका कोणी पहिल्यांदा शोधून काढला याची काही इतिहासात नोंद नसली तरी पार १० व्या शतकाच्याही आधी इटली मध्ये पिझ्झा तयार व्हायचा. या सगळ्या पिझ्झा प्रकारात पिझ्झा मरीनारा आणि मार्गरिता हे सगळ्यात आवडते प्रकार म्हणून प्रसिद्ध झाले. आता तर पिझ्झा बेसही निरनिराळ्या प्रकारचे मिळू लागले आहेत. गव्हाचा पिझ्झा बेस किती तरी जण आता घरी पण करतात.
मूळ इटालियन पिझ्झा हा मऊसूत असतो. मरिनारा पिझ्झा हा दर्यावरी, कोळी लोकांचा फार आवडता प्रकार होता. साधा अगदी. लसूण, ओरिगानो, टोमॅटो फार तर. आणि याच हे नाव कसं पडलं तर सतत समुद्रसफरीवर असलेल्या एका माणसाच्या बायकोच नाव मरिनारा होतं आणि तिने सगळ्यात पहिल्यांदा असा झटपट पिझ्झा बनवला आणि नवऱ्याला दिला. तेव्हापासून हा पिझ्झा नाविकांमध्ये आवडता झाला आणि कालांतराने सगळ्यांनाच आवडू लागला.
मार्गारिटा हा पिझ्झा प्रकार १८८९ साली एका शेफ ने तयार केला. अगदी खास ठरवून. 'पिझझेरिया दी पित्रो' या बेकरीत काम करणाऱ्या राफेल एसपोसितो या शेफ ने इटालियन राणी साठी हा तयार केला. राजा उंबेर्तो पहिला आणि त्याची सेवोय ची राणी मार्गारिता हिच्या आगमनाप्रित्यर्थ त्याने तीन रंगांचे तीन पिझ्झा तयार केले. हिरवा ज्यात बेसिल ची पाने टाकली होती, पांढरा ज्यात मोझेरिला चीज होते आणि लाल ज्यात टोमॅटो होते. असे त्याने तयार केले याचे कारण हा तिरंगी झेंडा आहे इटलीचा! राणीचे देशावर फार प्रेम त्यामुळे राष्ट्रध्वजाच्या रंगांचे पिझ्झा तयार करून तिला आगळी सलामी देण्याचे त्याने ठरवले आणि त्याला नाव दिले : मार्गारिता पिझ्झा! तोपर्येंत बेसिल ची पाने पिझ्झा मध्ये कोणी वापरली नव्हती. राणीला हा पिझ्झा खूपच आवडला आणि मग राफेल ने एका पिझ्झा वरच असे तीन थर देऊन पिझ्झा तयार करणे सुरू केले. मार्गारिटा पिझ्झा ला प्रचंड मागणी आली आणि अजूनही हा पिझ्झा लोकप्रिय आहे.
पिझ्झा तयार करणाऱ्यांची इटली मध्ये चक्क असोसिएशन आहे आणि कालांतराने या असोसिएशन ने पिझ्झा तयार करण्याचे जगभरासाठी नियम घालून दिले आहेत! पिझ्झा ३५ से.मी पेक्षा जास्त मोठ्या आकाराचा नको, पिझ्झा बेस ची कणिक हाताने आणि मऊ च मळल्या गेली पाहिजे, तो विशिष्ट लाकडाच्या ओवन मध्ये बेक होऊन लाकडी बेस मधेच सर्व्ह केला पाहिजे, अश्या अनेक अटी यात आहेत. त्या काळानुसार बदलत राहतातही पण मूळ इटालियन चव आणि दर्जा बदलणार नाही याची काळजी घेतली जाते! आहे ना गंमत?
पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक
sonalikolarkarsonar@gmail.com