चिमूटभर मिठासाठी...

आयुष्यातील मौजमजा संपली की आयुष्य अळणी झालं, असं म्हटलं जातं. चिमुटभर मिठाचं महत्त्व हे असं केवळ आयुष्यालाच नव्हे, तर संपूर्ण इतिहासाला व्यापून शिल्लक आहे. मिठाने केवळ अन्नालाच चव आणली नाही, तर सैन्य पोसलं, राज्यक्रांती घडवून आणली आणि स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली.
चिमूटभर मिठासाठी...
Published on

फूडमार्क

श्रुति गणपत्ये

आयुष्यातील मौजमजा संपली की आयुष्य अळणी झालं, असं म्हटलं जातं. चिमुटभर मिठाचं महत्त्व हे असं केवळ आयुष्यालाच नव्हे, तर संपूर्ण इतिहासाला व्यापून शिल्लक आहे. मिठाने केवळ अन्नालाच चव आणली नाही, तर सैन्य पोसलं, राज्यक्रांती घडवून आणली आणि स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली.

हवा आणि पाण्याखालोखाल मीठ ही कदाचित जीवनातील सर्वात मोठी गरज आहे. मीठ हे हवा आणि पाण्याइतकंच आवश्यक आहे आणि भारतात तर ते अधिकच आवश्यक आहे. विशेषतः कष्ट करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या गरीब माणसांसाठी आणि त्यांच्या जनावरांसाठी. कारण येथील हवामान उष्णकटिबंधीय आहे. मीठ-भाकरी खाणाऱ्या जनतेसाठी असणारं मिठाचं महत्त्व महात्मा गांधींन नीट ओळखलं होतं. त्यामुळेच भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात १९३० साली झालेला मिठाचा सत्याग्रह हा सर्वांत यशस्वी ठरला.

अन्नपदार्थाची चव राखण्यासोबतच ते टिकवणं आणि शरिराचं कार्य योग्य पद्धतीने चालण्यासाठी मिठाची आवश्यकता असते. त्यामुळे मानवी इतिहासामध्ये अनादि काळापासून मिठाचं महत्त्वं वादातीत असल्याचं दिसून येतं. मिठाची निर्मिती सगळीकडे होणं शक्य नसल्याने त्याचा व्यापारही मोठा होता. मिठाचा वाढता वापर पाहता विविध देशांमध्ये अनेक राजसत्तांनी मिठावर कर बसवून आपल्या तिजोऱ्या भरल्या आणि जनतेचं शोषण केलं. मिठाचं राजकारण हे कायमच जनतेच्या उद्रेकाचा विषय ठरलं.

चीनमधील मिठाचे उल्लेख

इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार मिठाचा सर्वात जुना उल्लेख इ.स.पूर्व ६,०० च्या सुमारास चीनमध्ये झालेला दिसतो. तिथल्या यूनचन भागातील तलावाच्या पाण्याचं सूर्यप्रकाशामुळे बाष्पीभवन होऊन तिथे मिठाचे खडे तयार व्हायचे. चीनमध्ये इ.स.पूर्व ६८५ ते ६४३ या काळात ग्वाँझी नावाच्या कागदपत्रांमध्ये मिठाच्या कारभाराबाबत माहिती मिळते. त्यामध्ये मिठाची किंमत ठरवणं, त्यातून नफा कमवणं यांचा समावेश आहे. चीनमध्ये मिठावर कर लावल्याचा उल्लेख इ.स.पूर्व २० मध्ये केलेला आढळतो. मिठातून मिळणारा नफा इतका जास्त होता की, त्या नफ्यातूनच राजेमंडळींना आपल्या सैन्याला पोसणं शक्य होत असे. तसंच त्या नफ्यातूनच ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’चीही निर्मिती झाली. साधारण १०६६च्या सुमारास मिठाचाच एक उपप्रकार असलेलं पॉटेशियम नायट्रेट किंवा सॉल्टपीटर वापरून चीनने बंदूकीची दारू बनवली होती.

भारतामधील लवणाध्यक्ष

भारतामध्ये मीठ बनवण्याचा इतिहास हा ५,००० वर्षांपूर्वीचा आहे. आताच्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाबमध्ये रॉकसॉल्ट उपलब्ध होतं. कच्छच्या रणामध्ये पावसाळ्याच्या हंगामात मिठाची निर्मिती केली जायची. अर्थशास्त्रातील उल्लेखानुसार, चंद्रगुप्ताच्या काळात ‘लवणाध्यक्ष’ नावाचा एक अधिकारीच मिठाचा व्यापार आणि परवाना देण्यासाठी नेमण्यात आला होता.

मीठ वाहणारे उंट

आफ्रिका खंडातही मिठाच्या व्यापाराचे जुने उल्लेख सापडतात. साधारण चौथ्या-पाचव्या शतकामध्ये सहारा वाळवंटामधून ४०,००० उंट पाठीवर मीठ घेऊन मालीतील तौदेनी शहरातून टिंबक्टू असा सुमारे ७०० किलोमीटरचा प्रवास करत असत.

मिठावरचा कर आणि फ्रेंच राज्यक्रांती

फ्रान्सनेही ‘गाबल’ मीठ कर जनतेवर लादला होता. पण तो पुढे नाराजीला कारणीभूत ठरला. गरीब आणि श्रीमंत यांना सारख्या परिमाणातच मीठ लागत असल्याने त्यांच्यावर एकसारखा म्हणजे १.६६ टक्के कर लावण्यात आला. त्यानंतर प्रत्येक राजाने त्यात वाढच केली. १६६० मध्ये सत्तेत आलेल्या राजा लुई-१४ साठी तर ‘गाबल कर’ हा तिजोरी भरण्याचा मोठा मार्ग होता. ‘सेल डू देवोर’ म्हणजे ‘सॉल्ट ड्युटी’ या नावाने हा कर आणखी कडक करण्यात आला. आठ वर्षांवरील प्रत्येक माणसाने दरवर्षी सात किलो मीठ विकत घेणं अनिवार्य करण्यात आलं. त्या मिठाची किंमतही सरकारने महाग करून ठेवली होती आणि एवढं मीठ वापरणं एका व्यक्तीसाठी अशक्य होतं. त्यातून पदार्थ खारवण्यासाठी या मिठाचा वापर करण्यासही मनाई करण्यात आली होती. १६७० मध्ये तर आत्महत्या करणाऱ्यांच्या विरोधातही सरकारने कायदे केले. त्यांचे मृत शरीर मीठ लावून न्यायालयात हजर करण्यात यावं, असा विचित्र कायदा सरकारने केला. फ्रेंच राज्यक्रांतीची बीजं रोवण्यामध्ये हा करसुद्धा कारणीभूत ठरला. राज्यक्रांती झाल्यावर १७८९ मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला.

मराठेशाही, ब्रिटिश आणि मिठाचं स्मगलिंग

भारतातही मिठाच्या सत्याग्रहाचं मूळ हे त्याआधी काही वर्ष ब्रिटिशांनी स्थानिक मीठ उत्पादकांवर केलेल्या जुलूमांमध्ये आहे. ब्रिटिशांच्या आधी मराठ्यांनी ओरिसामधून वाहतूक होणाऱ्या मिठावर कर लावला. पण तो कर माफक होता जेणेकरून मिठाची किंमत आवाक्यात राहिली. ब्रिटिशांना स्वत:च्या देशातलं मीठ इथे विकायचं होतं. पण ओरिसातल्या मिठाच्या किंमती त्या तुलनेत खूपच कमी होत्या. त्यामुळे १७९० मध्ये ब्रिटिशांनी ओरिसामधील सर्व मीठ विकत घेणाची तयारी दाखवली. पण तेव्हाचा ओरिसाचा प्रमुख रघुजी भोसले याने नकार दिला. मग ब्रिटिशांनी या मिठावर बंगालमध्ये बंदी घातली. त्यामुळे ओरिसामधून बंगालमध्ये मिठाचं स्मगलिंग सुरू झालं आणि लोकांना पुन्हा स्वस्तं मीठ उपलब्ध झालं. शेवटी ब्रिटिशांनी १८०४ मध्ये मिठाच्या स्मगलिंगचा हा उपद्रव थांबवण्याच्या नावाने ओरिसा ताब्यात घेतलं. त्यातून तेथील मिठावर ब्रिटिशांची मक्तेदारी तयार झाली. खासगीरित्या मिठाची विक्री बंद करण्यात आली. ब्रिटिशांशिवाय अन्य कोणी मीठ तयार करणं हे बेकायदेशीर ठरवण्यात आलं. त्यातून मिठावरील मक्तेदारी मोडीत निघाल्याने नाराज झालेल्या जमीनदार, वतनदार आणि इतर मीठ व्यावसायिक यांनी पहिल्यांदा या कायद्याला विरोध सुरू केला. दुसरीकडे मिठागरांमध्ये काम करणारे मलंगी जातीचे कामगार ब्रिटिशकाळात अधिकच कर्जबाजारी झाले आणि त्यांच्यापुढे शेवटी रोजगारासाठी वेठबिगारी करण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नाही. जमीनदार आणि कामगारांचा नव्या कायद्याला विरोध सुरूच राहिला. पण ब्रिटिशसत्तेपुढे तो टिकू शकला नाही.

पुढे १८३६ मध्ये आयात मीठ आणि देशात बनणारं मीठ यावर ब्रिटिशांनी एकसारखा कर लावला. त्यातून आणखी नाराजी वाढली. १८६३ मध्ये तर स्थानिक मिठाचं उत्पादनच ब्रिटिशांनी थांबवलं. त्यामुळे कामगारांची होरपळ झाली. भूकेने काहीजण अक्षरशः मेले. अनेकजण विस्थापित झाले. याविरोधात पहिला राजकीय लढा १८८८ मध्ये कटक येथे ‘उत्कल सभा’ या पक्षाने रॅली काढून केला. गरीब भारतीय जनतेवर ब्रिटिश जनतेपेक्षा ३० टक्के अधिकचा कर लादण्यात आला होता. हा विरोध पुढे खदखदत राहिला. त्याचं स्वरुप म. गांधींनी पहिल्यांदा ओळखलं. मीठ हे केवळ जेवण नव्हे, तर इथल्या संस्कृतीचा भाग असल्याचं त्यांनी जाणलं. त्यामुळेच इतर काँग्रेस नेते मीठासारख्या क्षुल्लक गोष्टीला महत्त्वं द्यायला तयार नसतानाही म.गांधी आपल्या निर्णयावर ठाम होते. केवळ ५० लोकांना सोबत घेऊन या सत्याग्रहाचा आराखडा म.गांधींनी बनवला, पण प्रत्यक्षात त्यामध्ये ५० हजारांहून अधिक लोक सहभागी झाले. यावरुन तत्कालिन नाराजीची कल्पना येते. मूठभर मीठ उचलून शक्तिशाली ब्रिटिश साम्राज्याला त्यांनी हादरा दिला.

जेवणात चिमूटभर लागत असलं तरी मिठाचं इतिहासामधलं स्थानं प्रचंड मोठं आहे. अनेक उलथापालथी घडवणारं आहे.

सॅलरी, सलाड, सॉल्टेड

सर्वसामान्य जनतेला खूष करण्यासाठी किंवा त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी रोमन सम्राट मीठावरचा कर कमी-जास्त करायचे. इ.स.पूर्व ५०६ मध्ये रोमन राजघराण्याने मिठाच्या किंमतींवर नियंत्रण मिळवलं. पण युद्धासारख्या आपत्तीच्या काळात ते मिठावरचा कर वाढवून त्यातून लष्कराला पोसायचे. सैनिकांना पैशांएवजी मीठ दिलं जात असे. त्यातून इंग्रजीतला ‘सॅलरी’ हा शब्द आला. ‘सलाड’ हा शब्दही ‘सॉल्टेड’ भाज्या यातून आलेला आहे. कारण मिठाचा वापर लोणची बनवण्यासाठी, अन्नं टिकवण्यासाठी, चीज बनवण्यासाठी, भाज्या व मासे सुकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जायचा.

मीठ, ममी आणि खारवलेले मासे

मिठाचा आणखी जुना संदर्भ इजिप्तमध्ये सापडतो. साधारण इ.स.पूर्व २,००० मध्ये पिरॅमिडमध्ये पुरलेल्या ममींसाठी जेवणही ठेवलं जायचं. त्यात खारवलेले मासे आणि मिठाचा लाकडी डबा सापडला आहे. ममी बनवण्यासाठीही मिठाचा वापर व्हायचाच. इजिप्तमध्ये मासे आणि मांस खारवण्यासाठी मीठ वापरलं जात असे. या खारवलेल्या माशांची निर्यात करण्यात इजिप्त आघाडीवर होता. मिठापेक्षा खारवलेले पदार्थ विशेषतः मांस, भाज्या यांची निर्यात करणं जास्त फायदेशीर समजलं जात असे. कारण दमट हवा, पाऊस यामुळे मिठाच्या वजनात फरक पडून नुकसान होई.

अन्न इतिहासाच्या अभ्यासक व मुक्त पत्रकार

shruti.sg@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in