पाऊलखुणा
श्री गणेश अनेक गोष्टींनी सजलेला आहे. त्याची रूपं, त्याची प्रतीकं आणि त्याच्याशी जोडलेल्या परंपरा, कथा, स्तोत्रं या सगळ्यांमुळे तो कायमच लोकांच्या मनाला भुरळ घालतो. गणपती केवळ एक देव नाही, तर तो बुद्धी, यश आणि कलांचा देव आहे. त्याच्या प्रत्येक रूपातून एक वेगळा संदेश मिळतो आणि म्हणूनच त्याची कहाणी नेहमीच खास आणि वेगळी ठरते.
गणेशोत्सव उद्यावर येऊन ठेपला आहे. गणपतीची मूर्ती आणणं, पूजा आणि सजावटीची लगबग बहुतेकांच्या घरात सुरू असेल. सध्या तर गणपतीची मूर्ती दोन-तीन महिने आधीच बुक केली जाते. प्रत्येकाला स्वत:च्या इच्छेनुसार हवी तशी, हव्या त्या रूपातील गणेश मूर्ती आणायची असते. त्यात गणेश मंडळांमध्ये तर गणपतीच्या मूर्तीवरून जोरदार चढाओढ असते. कधी घोड्यावर, कधी माशावर किंवा हंसावर बसलेला, उभा राहिलेला गणपती, तर कधी ‘मल्हार’ किंवा ‘कृष्ण’ रूपातील गणपती, कधी लोकमान्य टिळक किंवा साईबाबांच्या पोशाखातील, तर कधी पोलिसाच्या वेशातील गणेश मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. पण हे सगळं करताना आपण कधी गणपतीची ‘खरी’ मूर्ती कशी असावी, शास्त्रानुसार ती कशी घडवावी, याचा विचार करतो का?
पुराणांमध्ये, वैदिक ग्रंथांमध्ये आणि ‘गाणपत्य’ संप्रदायात गणेशाची मूर्ती कशी असावी, याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. वेदांमध्ये ‘गण’ या शब्दाचा उल्लेख असला, तरी थेट गणपतीचा उल्लेख नाही. पण पुराणे आणि उपनिषदांमध्ये मात्र गणपतीबद्दल स्पष्ट माहिती आहे. गणेश पुराण, मुद्गल पुराण आणि गणेश अथर्वशीर्ष यामध्ये गणपतीच्या विविध रूपांचे आणि जन्माच्या कथांचे वर्णन आहे. महाभारतात गणपतीने व्यासमुनींसाठी लेखनिक म्हणून काम केल्याचा उल्लेखही प्रसिद्ध आहे, ज्यामुळे गणपतीला विद्येची देवता मानलं गेलं. पण अनेक अभ्यासकांच्या मते, हा उल्लेख महाभारतात नंतर समाविष्ट करण्यात आला आहे.
सुरुवातीला गणपतीला शैव परिवारात स्थान मिळालं. नंतर त्याची गणना शंकराच्या ‘गणां’मध्ये झाली आणि मग तो ‘गणांचा पती’ म्हणजेच ‘गणपती’ झाला. सूत्रकाळात त्याला खूप महत्त्व मिळालं. पुढे जो गणांचा पती होता, तोच शिव-पार्वतीचा पुत्र झाला, ज्यामुळे त्याचं महत्त्व आणखी वाढलं. ‘विनायक’ हे गणेशाचं आणखी एक प्रसिद्ध नाव आहे. पुराणांनुसार, विघ्ने निर्माण करण्यासाठी विधात्याने विनायकाला तयार केलं. म्हणजेच, विनायक हा मुळात ‘विघ्नकर्ता’ होता. पण नंतर त्याला ‘विघ्नहर्ता’ बनवण्याचं ठरवून तशा कथा तयार केल्या गेल्या. ही प्रक्रिया गुप्तकाळापासून सुरू झाली. आपण गणेश चतुर्थीला ज्याची पूजा करतो, तो मूळचा विनायकच आहे. त्याला सिद्धिविनायक असंही म्हणतात. त्याचं रूपध्यान पुढीलप्रमाणे वर्णिलेलं आहे,
“एकदन्तं शूर्पकर्ण गजवक्त्रं चतुर्भुजम्।
पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम्।।”
याचा अर्थ असा - एक दात, सुपासारखे कान, हत्तीचं तोंड, चार हात आणि हातात पाश व अंकुश धारण केलेल्या सिद्धिविनायकाचं ध्यान करावं.
भारतीय शिल्पकलेत गणपतीच्या मूर्तींना दोन, तीन, चार किंवा पाच मस्तकं दाखवलेली आहेत. त्यांना एक ते तीन दातही दिसतात. सुरुवातीला गणपतीला फक्त दोन हात होते. एका हातात परशू आणि दुसऱ्या हातात मूळ (मुळा) होता. पण जसजशी मूर्तीकला विकसित होत गेली, तसतसे गणपतीला चार, आठ, दहा, सोळा असे जास्त हात दिसू लागले. पुण्यात कोथरूडमध्ये दशभुज गणेशाचं आणि मंगळवार पेठेत त्रिशुंड गणपतीचं मंदिर आहे.
पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी त्यांच्या ‘भारताची मूर्तीकला’ या पुस्तकात गणेश मूर्तीबद्दल सांगितलं आहे की, “गणेश हा शिवपरिवारातील एक प्रमुख देव आहे. त्याची गणना पंचायतनातही होते. मानवी शरीर आणि हत्तीचं मस्तक असं त्याचं अद्भुत रूप आहे. बहुतेक संशोधकांच्या मते, गणेश ही मुळात आर्य लोकांची देवता नाही. आर्य सोडून इतर जमाती हत्तीची देव म्हणून पूजा करायच्या आणि त्याच पूजेतून आजची गणेशपूजा विकसित झाली असावी.”
गुप्तकाळात गणपतीचं महत्त्व वाढत गेलं आणि मोठ्या प्रमाणात त्याच्या मूर्ती कोरल्या जाऊ लागल्या. इसवी सन सहाव्या शतकातील वराहमिहिराच्या ‘बृहत्संहिते’मध्ये या मूर्ती कशा असाव्यात, याचं वर्णन आहे. साधारणपणे चार हात असलेल्या मूर्तींच्या हातात तुटलेला दात, परशू, अंकुश आणि मोदकाचं पात्र असतं. पण जेव्हा हातांची संख्या वाढली आणि नृत्यगणपतीसारखी वेगवेगळी रूपं तयार झाली, तेव्हा मूर्तीमध्ये इतर वस्तू, वाद्यं, आयुधं, भक्त, सेवेकरी, वादक, किन्नर यांचाही समावेश झालेला दिसतो.
गणपतीची सर्वात जुनी पाषाणमूर्ती इसवी सन पहिल्या-दुसऱ्या शतकातील कुषाण काळातील आहे. काही वर्षांपूर्वी मथुरेच्या कर्झन संग्रहालयात चाळीसहून जास्त गणेश मूर्ती होत्या, त्यापैकी तीन मूर्ती कुषाणकालीन (इ.स. १-३ शतक) होत्या. त्यापैकी एक मूर्ती मथुरेमध्येच यमुनेच्या पात्रात सापडली होती. ती मथुरा-आग्रा भागात मिळणाऱ्या लालसर दगडात कोरलेली आहे. या मूर्तीचे गुडघ्यापासून खालचे पाय तुटलेले आहेत. मूर्तीला दोन हात आहेत, डाव्या हातात मोदकाचं पात्र आहे आणि उजवा हात तुटलेला आहे. वराहमिहिराच्या ‘बृहत्संहिते’वरून हे स्पष्ट होतं की, इसवी सन सहाव्या शतकापर्यंत गणपतीच्या मूर्तीची वैशिष्ट्य निश्चित झाली होती. तेव्हा गणपती चार हातांचा देव बनला आणि त्याच्या हातात मोदकपात्र, तुटलेला दात, अंकुश आणि परशू दाखवला जाऊ लागला.
या संदर्भांवरून लक्षात येतं की, गणपतीच्या मूर्तींचा प्रवास खूप मोठा आणि मनोरंजक आहे. काळानुसार गणेशाच्या रूपात बदल होत गेले असले, तरी त्यामागे एक शास्त्र, एक इतिहास आहे. गणेशाच्या विविध रूपांची ग्रांथिक वर्णने कितीही असली, तरी सर्वसाधारणपणे चार हातांचा बसलेला गणेश सर्वात लोकप्रिय आहे. त्याच्या हातात परशू, कमळ, अंकुश, दात असतात. अंगावर अलंकार व डोक्यावर रत्नजडित मुकुट असतो. क्वचित त्याच्या कपाळावर तिसरा डोळा असतो आणि छातीवर चिंतामणी रत्न असते.
मग यंदा गणपतीची मूर्ती निवडताना आपण या इतिहासाचा आणि मूळ रूपाचा विचार करणार का? तुम्ही यंदा कोणत्या प्रकारची गणेश मूर्ती आणणार आहात?
rakeshvijaymore@gmail.com