

विशेष
सुधीर कोर्टीकर
वसंताच्या चैतन्यमय चाहुलीत साजरा होणारा होळीचा सण हा केवळ रंगांचा उत्सव नसून दुष्ट प्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचा संदेश देणारा पवित्र संस्कार आहे. या सणाला नव्या सामाजिक जाणिवेची आणि सकारात्मक परिवर्तनाची दिशा देणे, हीच आजची खरी “नवी संकल्पना” आहे.
मनास अल्लादायक वाटणारी थंडी. धुक्याची ती चादर धोसर होते. तर थंडीही चोर पावलांनी निघून जाते. मग सकाळची कोवळी वाटणारी उन ही तीव्र वाटू लागतात. दुपारनंतर वाऱ्याची ये-जा वाढते. तर तो वारा कधी सायंकाळी आपली मैत्रीण " धुलीके " बरोबर येऊन तांडव आरंभतो. मोहरलेल्या आम्रवृक्षावरून कोकिळेचे ते मधुर स्वर कानावर येतात.मन तृप्त होऊन जातं. पक्षांची किलबिल मनास सुखावणारी असते. कोवळ्या लुसलुशीत हिरव्या पोपटी पालवीनं भरलेला कडुनिंब झुळकी बरोबर डुलत असतो. त्याचा आनंद कोवळ्या नाजूकशा किरमीजी रंगाच्या फुलातून तो व्यक्त करत असतो. फुललेल्या पळसही वसंताच्या चाहुलीने सुखावून गेलेला असतो.
अशा बदललेल्या चैतन्यपूर्ण वातावरणात सारेजण वाट पाहत असतात ते होळी पौर्णिमेच्या त्या " होलिकोत्सवाची " होळी उत्सव सर्वच समाजात अतिशय उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो. पुराणात या होळी विषयी विविध संदर्भ आपणास वाचाव्यास मिळतात.उत्तर भारतातील लोक होळीच्या सणाची सांगड श्रीकृष्णाच्या जीवनाशी घालतात. कंसाने सात देवकी पुत्रांना मारल्यानंतर आठवा पुत्र श्रीकृष्ण यास मारण्यासाठी पुतना मावशींना पाठविले जाते . पुतना मावशी सुंदर सुस्वरूप रूप घेऊन यशोदेच्या घरात प्रवेश करते. कृष्णाला बाहेर खेळण्यास घेऊन त्यास विषारी स्तनपान देऊन मारण्याचा प्रयत्न ती करते. पण श्रीकृष्णाने तिला मारून टाकल्यावर तिला मूळ रूप अजस्त्र रूप असं प्राप्त होतं. नंतर नंद गोपालांनी मोठी होळी करून तिला भस्मसात करून टाकलं. अशा अमंगलाचा निप्पात केला त्या आठवणींचा दिवस म्हणजे " होलीकोत्सव "...
महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पुराणातील संदर्भाचा आधार घेऊन बालकांना त्रास देणाऱ्या ढौढा राक्षसणीला पिटाळून दिलेला हा दिवस असे मानण्यात येते. शंकराने मदनाला आपला तृतीय नेत्र उघडून जाळून टाकले त्याचे प्रतीक म्हणून हा दिवस दक्षिणेमध्ये उत्साहात साजरा केला जातो. होळी उत्सव विषयी आणखी एक पुराण कथा प्रचलित आहे. भक्त प्रल्हाद हा हिरण्यकशुपूचा पुत्र विष्णुभक्त होता. त्याची विष्णू वरील अपार भक्ती पाहून त्याचा राग त्याच्या वडिलांच्या मनात होता. त्याला या विष्णूच्या भक्तीपासून दूर करण्यासाठी ते त्याचे वडील प्रयत्न करतात तरी तो विष्णूच्या भक्तीत रममान झालेला असतो.हे पाहिल्यानंतर हिरण्य कश्यपुनी आपली मुलगी " होलिका " हिला आपल्या मांडीवर भक्त प्रल्हादास घेऊन मारण्याचे तो आयोजन करतो. पण भक्त प्रल्हादाने विष्णूचा धावा केल्यानंतर विष्णूच्या मदतीने " होलीकाच "जळून जाते. प्रल्हाद मात्र जश्याच्या तसा सुरक्षित राहून बाहेर येतो. अशा तऱ्हेने दुष्ट प्रवृत्तीवर मिळवलेला हा विजयाची आठवण म्हणून होलीका दहनाचा हा दिवस होलीकोत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा त्यानंतर रूढ झालेली आहे.
पुराणकथा प्रमाणे अमंगल गोष्टीवर विजय संपादन करून सत प्रवृत्तीची परंपरा सुरू झाली. त्या दुष्ट प्रवृत्तीची अमंगल गोष्टीची राख रांगोळी झाली. अशा अनेक वाईट प्रवृत्ती वृत्ती आगीमध्ये जळून भस्मसात झाल्या. त्या वाईट गोष्टींनां कायमची तिलांजली दिली गेली. अशा वाईट गोष्टीची आठवण ...म्हणून त्या होळीचे भस्म लावून होळीची रक्षा लावून वाजत गाजत ढोल ताशा झांज वाजवीत रंग गुलालाची उधळण करीत घरी यावयाचे. अगर आपल्या मित्रांच्या मैत्रिणीच्या नातेवाईकांच्या घरी जावयाचे. या विजयाची आठवण म्हणून एकमेकांना गाठी भेटी घ्यावयाच्या आलिंगन देऊन रंग गुलालाची उधळण करून रंगपंचमी खेळून गोडधोड करून खावयाचे आणि या सणाची सांगता करायची अशी परंपरा पूर्वापार चालू झालेली आहे.
भगवान श्रीकृष्ण हा परिपूर्ण अवतार मानलेला आहे .पुराणात रंग खेळणारा हा श्रीरंग बालगोपाळासह त्याचे गाव नांदगाव या ठिकाणी रंगपंचमीस रंग खेळत असे. तर राधेच बालपण गेलं ते " बरसाना " नावाच्या गावात. दोन्ही गाव मथुरेच्या जवळच आहेत. आजही दोन्ही गावात भक्ती भावाने श्रद्धेने होळी खेळली जाते. बंगालमध्ये मात्र " दोलायात्रा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उत्सवात होळी खेळले जाते. या उत्सवात श्रीकृष्णाच्या मूर्तीस पाळण्यात घालून झोके देण्याची प्रथा रूढ आहे. या पूजेनंतर गोडप्रसाद मिठाई वाटली जाऊन रंगची..गुलालाची.. उधळण करून होळी खेळण्याचे परंपरा आजही रूढ झालेली आहे.मात्र कुठल्याही विभत्स प्रकार या ठिकाणी आपणास पहावयास मिळत नाही.
कर्नाटकातही होळीचा उत्सव जो साजरा होतो तो सोज्वळ आणि सुंदर असा आहे. कर्नाटकातील शेतकरी हा उत्सव भक्ती भावनी साजरा करतात. त्यावेळी मद्यालाही शिवत नाहीत. कोणताही विभत्स प्रकारची नाच गाणी न करता पारंपरिक आणि सांघिक नृत्यांना ही होळी खेळली जाते त्यावेळी या नृत्यद्वारे गोळा केलेले संपूर्ण पैसे हे केवळ धार्मिक कार्यासाठीच वापरले जातात.कर्नाटकात धार्मिक पावित्र्य बरोबर निरागस मनोरंजनाचा सुंदर समन्वय या शेतकरी वर्गाने संपूर्ण समाजासमोर ठेवलेला आहे.
महाराष्ट्रात मात्र होळीच्या या उत्सवाच्या सुंदर आणि पवित्र संकल्पना लोप पावत चाललेली आहे. त्याची खूप मोठी सल अंतकरणात नेहमी होते. रांगांचं अलोकिक सौंदर्य नष्ट होऊन त्यास खूप मोठं असं विभत्स आणि रौद्र स्वरूप प्राप्त झालेलं आहे. चमकीचे भडक रंग लावून , काळे निळे हिरवे भडक रंग एकमेकांना लावून फासून उधळून या सणाचं सुंदर असं पावित्र्यच नष्ट करण्यात आलेलं आहे. आपल्या रंगाने भिजलेले कपडे एकमेकांच्या अंगावरून ओढून फाडण्याचे प्रकारही होळीमध्ये सुरू असतात. फाटलेले हे कपडे गॅलरीतून खाली होळी पाहणाऱ्या लोकांच्या अंगावर फेकले जातात. तर विजेच्या तारावरही टेलिफोनच्या केबल्स वर वायरवर असे कपडे फेकले जातात. लोकांच्या घरावरही असे कपडे फेकण्याची हिनकच मनोवृत्ती आणि प्रकार या होळी उत्सवात तरुण मुले करतात. होळीसाठी आजूबाजूच्या परिसरातील झाडांची वृक्षांची तोड करून पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा कामही आजचे हे युवक करीत आहेत. दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला असताना रंग निघत नाही म्हणून त्वचेस वाईट परिणाम होणारे साबण लावून वारे माप पाण्याचा वापर करून आज संपूर्ण परिसर वातावरण दुरुस्ती दूषित करण्यास हे तरुण हातभार लावत आहेत. हा सारा प्रकार थांबवण्यासाठी आपण कधी विचार करणार ..का विचार करणारच नाही. होळी म्हणजे मनसोक्त मद्याच्या बाटल्या पोटात रुजवणे.. नको ती गाणी डीजे वर लावणे.. विभत्स प्रकारचे हातवारे करत नाचणे ही संकल्पना या तरुणांनी आज समाजामध्ये रूढ केलेली आहे.
चांगल्या परंपरांची जपणूक करा. खऱ्या अर्थाने वाईट विचारांना वाईट गोष्टींना तिलांजली देऊन नव्या चांगल्या विचारांचे मंथन करण्याचा हा होळीचा दिवस. चांगल्या संकल्पना मनामनात रुजवून आपण एक दिलानी या समाजातील लोकांना एकत्रित आणण्यासाठी होळीच्या सणाचा उपयोग करून घ्यावयास हवा.समाजातील वाईट विचार भ्रष्टाचार लाचखोरी हुंडा प्रवृत्ती सामाजिक मतभेद जातीयवाद अशा असंख्य गोष्टीचे दहन करावयाचा सण म्हणजे होळीचा सण.
होळीच्या सणाच्या दिवशी खऱ्या अर्थाने दुष्यकर्माची होळी व्हावयास हवी. एक सुंदर एकसंध समाज.. सुंदर चारित्र्यसंपन्न समाज ..निर्माण करण्यासाठी या होळीच्या सणाचा उपयोग व्हावयास हवा. हाच या सणाचा संदेश होळीची ही " नवीन संकल्पना. " प्रत्येकाच्या हृदयापर्यंत आपण पोहोचवी. अशी नवी संकल्पना पोहोचविता आली तर या " होलीको उत्सवाचं " सार्थक झालं असं म्हणावं लागेल.. हो नां...