पुरुषाच्या चारित्र्याचा ‘हनी’नामा

राजकारणातील ‘हनी ट्रॅप’चा वाढता वापर हा पुरुषसत्ताक मूल्य आणि बाजारकेंद्री अर्थव्यवस्था यांची हातमिळवणी अधोरेखित करतो. यात हनी ट्रॅप लावणारा आणि त्यात अडकणारा हे दोघेही समाजाच्या दृष्टीने सारखेच दोषी आहेत. ही एकप्रकारची राजकीय आणि आर्थिक गुन्हेगारी आहे, जी स्त्रीदेहाला पणाला लावून घडते. अशीही स्त्रीदेहाला पणाला लावायची परंपरा आहेच या देशात.
पुरुषाच्या चारित्र्याचा ‘हनी’नामा
Published on

विचारभान

संध्या नरे-पवार

राजकारणातील ‘हनी ट्रॅप’चा वाढता वापर हा पुरुषसत्ताक मूल्य आणि बाजारकेंद्री अर्थव्यवस्था यांची हातमिळवणी अधोरेखित करतो. यात हनी ट्रॅप लावणारा आणि त्यात अडकणारा हे दोघेही समाजाच्या दृष्टीने सारखेच दोषी आहेत. ही एकप्रकारची राजकीय आणि आर्थिक गुन्हेगारी आहे, जी स्त्रीदेहाला पणाला लावून घडते. अशीही स्त्रीदेहाला पणाला लावायची परंपरा आहेच या देशात.

बाईच्या चारित्र्याच्या उठाठेवी आजवर खूप झाल्या. बाईच्या अग्निपरीक्षाही आजवर खूप झाल्या.

पुरुषांच्या चारित्र्याचे काय? हा प्रश्न कधी विचारलाच जाणार नाही का?

का ते नसतेच?

का ते असून नसून सारखेच असते?

तसे असेल तर एकदाचे जाहीर घोषितच करावे...

एकीकडे रामाला आदर्श मानायचे, सतत रामनामाचा जप करायचा, राम मंदिर उभारायचे आणि आदर्श संस्कृतीच्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे एकेक रथी-महारथी हनी ट्रॅपमध्ये अडकलेले... दिसला पुरुष की लावा हनी ट्रॅप असेच काहीसे सुरू असावे...‘हनी ट्रॅप’ या शब्दातूनच पुरुषत्वाची वखवख स्पष्ट होते.

मासा गळाला लावतात तसा गळ. माशांसाठी गळाला किडे लावतात. पुरुषासाठी स्त्रीदेह नावाचा किडा लावला जातो.

होय किडाच. हनी ट्रॅप लावणाऱ्यांच्या लेखी आणि त्या ट्रॅपमध्ये लाळ घोटत अडकणाऱ्यांच्या लेखी तो स्त्रीदेह म्हणजे एक लोभवणारा मोहमयी किडाच असतो. त्यापेक्षा अधिक किंमत नसते त्या देहाला.

एक किडा एक रात्र..दुसरा किडा दुसरी रात्र.. तिसरा किडा तिसरी रात्र.. न संपणारी वखवख आणि न संपणारे किडे..

हनी ट्रॅपची प्रकरणं अलीकडे सातत्याने उघडकीस येत असतात. काहींची दबक्या आवाजात चर्चा सुरू असते. एखादं प्रकरण उघडकीस येतं आणि काही दिवसांतच ती चर्चा थांबते. कधी ही प्रकरणं सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसंदर्भात असतात, तर कधी राजकीय नेते, मंत्री, शासकीय अधिकारी यांची नावं पुढे येतात. कधी नाव जाहीर होत नाही, केवळ संशयाची सुई इथे-तिथे फिरते. काही काळात प्रकरण थंडावतं. पण काही काळाने पुन्हा एखाद्या नव्या प्रकरणाची चर्चा. जणू समाजाने हे हनी ट्रॅप मान्य केले आहेत. कारण एखाद्या जबाबदार पदावरील व्यक्ती हनी ट्रॅपला बळी पडते आणि आपल्याकडची गुपितं फोडते किंवा हनी ट्रॅपनंतर होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला घाबरून सार्वजनिक हिताच्या विरोधात निर्णय घेते, या कृत्यातील ‘सार्वजनिक द्रोह’, ‘समाजद्रोह’ कोणीच गांभीर्याने घेत नाही. कारण पुरुषसत्ताक समाजानेच सार्वजनिक जीवनात पुरुषाचे ‘घसरणे’ मान्य केले आहे. ‘आगीजवळ लोणी ठेवले की ते वितळणारच’ यासारख्या म्हणींमधूनही ही ‘समाजमान्यता’च अधोरेखित होते.

अलीकडेच हनी ट्रॅपचं आणखी एक प्रकरण उघडकीस आलं आहे. या प्रकरणात एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून साधारण तीन कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्यात आली. आणखी दहा कोटी रुपये मागितल्यावर अधिकाऱ्याने तेवढी रक्कम द्यायला नकार दिल्यावर हे प्रकरण उघडकीस आले किंवा आणण्यात आले. या प्रकरणात आणखी काही मोठे अधिकारी अडकले असून काही आजी-माजी मंत्रीही या ट्रॅपमध्ये अडकले आहेत, अशीही चर्चा सुरू आहे. हा एकूण आकडा ७२ एवढा मोठा असावा, असेही बोलले जात आहे. हे प्रकरण नाशिकमधले असून गेले काही दिवस या प्रकरणाची चर्चा सुरू होती. या प्रकरणावरून सध्या राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात प्रफुल्ल लोढा यांना अटक केली. त्यामुळे प्रफुल्ल लोढांबरोबर ज्या ज्या नेत्यांचे फोटो आहेत, ते फोटो एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी प्रसिद्ध केले जात आहेत.

या एका विशिष्ट प्रकरणात कोण कोण आरोपी आहेत, कोण किती अडकले आहे, हा हनी ट्रॅप नेमका कोणी लावला होता, त्यातील त्या महिलेची भूमिका काय, त्यामागचा मास्टर माइंड किंवा अलीकडच्या राजकीय भाषेत बोलायचे तर त्यामागचा ‘आका’ कोण, बडा आका कोण, छोटा आका कोण, हे सगळे पोलीस तपासात कदाचित कधीच बाहेर येणार नाही किंवा तुकड्या तुकड्यात काही बाहेर येईल, काही तसेच रहस्य बनून राहील. तोवर पुढचे प्रकरण उघडकीस येईल.

प्रश्न आहे तो एक समाज म्हणून आपण या ‘हनी ट्रॅप’च्या प्रकरणांकडे कसे पाहतो? कारण प्रश्न फक्त या एका प्रकरणाचा नाही. या प्रकरणाच्या निमित्ताने जे चर्चेत आहे, त्यानुसार हे हिमनगाचे एक टोक आहे, असे म्हटले जात आहे. त्यावरून हनी ट्रॅप हे सध्याचे नियमित राजकीय हत्यार झाले आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतो. हनी ट्रॅपचा राजकीय कुरघोडीसाठी स्ट्रॅटेजी म्हणून नियमित वापर होत असेल तर ते केवळ राजकीय अध:पतन नाही, तर सामाजिक नीतिमत्तेचीही उघड घसरण आहे. पण माणिकराव कोकाटेंच्या रमीची विविध माध्यमांमध्ये जेवढी चर्चा झाली, तो खेळ कायदेशीर आहे का बेकायदेशीर, यावर जेवढे चर्वितचर्वण झाले, तेवढी चर्चा ‘हनी ट्रॅप लावणे आणि त्यात अडकणे’ याची झाली नाही. म्हणजे त्यानिमित्ताने झालेल्या आरोप-प्रत्यारोपांना प्रसिद्धी मिळत आहे, पण मुळातल्या ‘हनी ट्रॅप’ या मुद्द्याविषयी फारशी चर्चा होताना दिसत नाही. कोकाटेंच्या रमीची विविध माध्यमांमध्ये जेवढी चर्चा झाली, तो खेळ कायदेशीर आहे का बेकायदेशीर, यावर जेवढे चर्वितचर्वण झाले, तेवढी चर्चा ‘हनी ट्रॅप लावणे आणि त्यात अडकणे’ याची झाली नाही. म्हणजे त्यानिमित्ताने झालेल्या आरोप-प्रत्यारोपांना प्रसिद्धी मिळत आहे, पण मुळातल्या ‘हनी ट्रॅप’ या मुद्द्याविषयी फारशी चर्चा होताना दिसत नाही.

या हनी ट्रॅपचे काही प्रकार दिसतात. यातला सगळ्यात सर्वसाधारण प्रकार हा हेरगिरीच्या संदर्भात वापरला जातो. एका स्त्रीदेहाच्या मोहात पुरुष अडकतो आणि त्या स्त्रीला हवी असलेली माहिती देतो किंवा ती स्त्री आपल्या चातुर्याने हवी असलेली माहिती काढून घेते. हा प्रकार बहुतेक देशाच्या सैन्य दलांकडून शत्रू पक्षातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना किंवा राजकीय नेत्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी केला जातो. यात ज्या स्त्रियांचा वापर केला जातो त्याही बहुतेकवेळा हेर असतात. त्या आपल्या सौंदर्याचा किंवा देहाचा वापर करून हवी असलेली माहिती मिळवण्याचं काम करतात. यात हेर असलेली स्त्री आपल्या राष्ट्रासाठी माहिती काढून राष्ट्रनिष्ठा व्यक्त करत असते, तर या जाळ्यात अडकणारा पुरुष माहिती देऊन राष्ट्रद्रोह करत असतो. हा प्रकार व्यापक असून जागतिक पातळीवर तो घडत असतो. या स्वरूपाच्या हनी ट्रॅपच्या बातम्याही अलीकडच्या काळात प्रसिद्ध झाल्या आहेत. अर्थात, या प्रकारच्या हनी ट्रॅपच्या म्हणजेच शत्रूराष्ट्रासाठी हेरगिरी करण्यासाठी स्त्रीदेहाचा वापर करण्याच्या घटना ऐतिहासिक काळापासून घडताना दिसतात. अगदी कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही शत्रूराष्ट्रासाठी विषकन्यांचा वापर करण्याचा उल्लेख आहे. विषप्रयोगासाठी सुंदर स्त्रीचा वापर करण्याची कुटनीती यामध्ये अभिप्रेत आहे. अगदी आजच्या काळातही ही विषप्रयोगाची थिअरी एखाद्या बड्या, मान्यवर नेत्याच्या अकस्मात मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांकडून उच्चारली गेली आहे, असे आढ‌‌ळते. या प्रकारच्या हनी ट्रॅपमध्ये राष्ट्रनिष्ठा विरुद्ध राष्ट्रद्रोह, विचारनिष्ठा विरुद्ध विचारद्रोह असे मुद्दे गुंतलेले दिसतात.

हनी ट्रॅपचा दुसरा प्रकार स्थानिक पातळीवर स्थानिक राजकारणात घडताना दिसतो. म्हणजे आपल्या विरोधकांचा काटा काढण्यासाठी त्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवणे. यात सापळा रचून त्या संबंधांच्या सीडीज् काढून, व्हिडीओ काढून, ते जाहीर करण्याची धमकी देऊन किंवा प्रसंगी जाहीर करून त्या विरोधकाला संपवले जाते. त्याला गप्प केले जाते. त्याचे उपद्रवमूल्य संपवले जाते. हनी ट्रॅपचा हा प्रकार सध्या अधिक घडताना दिसतो. ही एक प्रकारची राजकीय गुन्हेगारी आहे. कधी हाच प्रकार निव्व‌ळ खंडणी वसुलीसाठीही केला जातो. उच्चपदस्थ अधिकारी, उद्योगपती किंवा स्थानिक पातळीवरील राजकीय नेतृत्व यांना यात अडकवलं जातं. यामागचा उद्देश हा राजकीय हेतूपेक्षा आर्थिक लाभाचा अधिक असतो. त्यामुळे ही आर्थिक गुन्हेगारी आहे.

सध्याच्या मूल्यऱ्हासाच्या काळात स्थानिक राजकारणात स्थानिक कुरघोड्यांसाठी हनी ट्रॅपचा वापर अधिक होताना दिसत आहे आणि हे अधिक चिंताजनक आहे. मुळात कोणत्याही कारणासाठी स्त्रीदेहाचा हा असा अनुचित वापर होणं गैर आहे. स्त्रीदेहाकडे केवळ उपभोग्य वस्तू म्हणून पाहणारी ही पुरुषसत्ताक मानसिकता आहे. ही मानसिकता पुरुषाकडे एक उपभोक्ता म्हणून पाहते. एक असा उपभोक्ता जो कायम उपाशी आहे, ज्याची भूक कधीही न संपणारी आहे. हातातले गंडेदोरे, बोटातल्या नवग्रहांच्या अंगठ्या, गळ्यातल्या जपाच्या माळा, घरातले वास्तुशास्त्र, घराबाहेरचे सत्संगाचे सोहळे..हे सगळे करूनही या उपभोक्त्याची तृष्णा, त्याची भूक कधीही संपत नाही. बाजारकेंद्री अर्थव्यवस्था, पैशांची अतिरिक्त आवक ही भूक अधिक वाढवते. ही भूक मग केवळ ऐहिक सुबत्तेची राहत नाही, ती ऐंद्रियही बनते आणि एकदा इंद्रियांच्या वखवखीने बुद्धीवर, विचारशक्तीवर, विवेकावर ताबा मिळवला की मग भल्या भल्यांचे पाय ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकतात.

इथे हनी ट्रॅप लावणारा आणि त्यात अडकणारा हे दोघेही पुरुषसत्ताक मूल्यांचे वाहक असल्याने या दोघांसाठीही स्त्रीदेह ही एक उपभोग्य वस्तू आहे. त्यामुळे स्त्रियांच्या दृष्टीने हे दोघेही तितकेच गुन्हेगार आहेत. ‘हनी ट्रॅप’ हा प्रकार समस्त स्त्रीजातीचा अवमान करणारा आहे. कारण हा प्रकार स्त्रीदेहापलीकडचं स्त्रीचं अस्तित्व नाकारतो. स्त्रीचं वस्तुकरण करतो. तिला केवळ एक ‘सेक्स ऑब्जेक्ट’ बनवतो. स्त्रीच्या या वस्तुकरणासंदर्भात स्त्रीवादी चळवळीने सातत्याने आवाज उठवला आहे. स्त्रियांचं लैंगिक दुय्यमत्व अधोरेखित करतच जहाल स्त्रीवादाने ‘मूळ संघर्ष हा दोन वर्गांमधला नसून दोन लिंगांमधला आहे’, अशी मांडणी केली. तर मार्क्सवादी स्त्रीवादाने अतिरिक्त पैसा अतिरिक्त लैंगिक गरज निर्माण करतो, अशी मांडणी करत भांडवली अर्थव्यवस्थेत पुरुषाची लैंगिक भूक कशी वाढती आहे, हे स्पष्ट केलं आहे.

लैंगिकतेचं हे राजकारण महिलांना ९० च्या दशकात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्यात आलं त्यावेळी उलट्या बाजूने दिसून आलं आहे. पहिल्यांदाच सार्वजनिक जीवनात येणाऱ्या, राजकीय सत्तेच्या प्रांगणात उतरणाऱ्या महिलांना नामोहरम करण्यासाठी, पुन्हा घराच्या चार भिंतीत परत पाठवण्यासाठी त्यांच्याविरोधात चारित्र्यहननाचे शस्त्र वापरले गेले. ही बाई तालुक्याच्या गावी चारजणांबरोबर फिरते, इथपासून ते तिचे वरिष्ठ नेत्यांबरोबर संबंध आहेत..असे आरोप धडाडीने काम करणाऱ्या स्त्रियांबाबत केले गेले. कारण पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रीचं चारित्र्य हे काचेचं भांडं मानलं जातं आणि ते जपण्याची जबाबदारी स्त्रीवरच असते. अनेकजणी चारित्र्यहननाच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळातून कायमच्या बाहेर पडल्या, तर काहीजणी आपल्या सार्वजनिक कार्याच्या माध्यमातून या आरोपातून तावूनसुलाखून बाहेर पडल्या.

एखादी स्त्री राजकीय क्षेत्रात कर्तृत्व गाजवू लागली की तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे आणि राजकारणात एखादा पुरुष खुपू लागला की त्याच्याभोवती हनी ट्रॅप लावायचा, या दोन्हीमागे राजकारणातील पुरुषसत्ताक मानसिकता कार्यरत असते. पहिल्या प्रकारात बहुतेकवेळा स्त्रीचा काही दोष नसताना तिला गोवले जाते, तर दुसऱ्या प्रकारात बहुतेकवेळा अडकणारा पुरुषही तितकाच दोषी असतो. अंगाशी आलं की ‘मी नाही त्यातला’ असा कांगावा तो करू लागतो, एवढंच. शिवाय हनी ट्रॅपसाठी वापरल्या जाणाऱ्या स्त्रियांचे शोषण हा आणखी एक वेगळा मुद्दा आहे, जो फारसा उघडकीस येत नाही.

म्हणूनच वाढत्या हनी ट्रॅपच्या प्रकरणांनंतर ‘पुरुषांच्या चारित्र्याचे काय?’ हा प्रश्न निर्माण होतो.

अर्थात, पुरुषसत्ताक मूल्यांच्या जागी स्त्री-पुरुष समताप्रधान मूल्य मानणारी, कोणत्याही स्वरूपाची लैंगिक हिंसा नाकारणारी समाजव्यवस्था निर्माण झाल्याशिवाय ‘पुरुषांच्या चारित्र्याचे काय?’ या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही, हेही तितकंच खरं.

sandhyanarepawar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in