थकले रे नंदलाला!

मालकीणबाईंच्या घरी एकही मोलकरीण टिकायची नाही. त्यामुळे घरातील सगळी कामं त्यांच्याच अंगावर पडायची. एक काम संपलं की दुसरं काम वाटच बघत असायचं. ही सगळी कामं करून करून बिचाऱ्या थकून जात. थकले ग बाई आता, असं सारखं म्हणत म्हणत, शेवटचं काम उरकवत.
थकले रे नंदलाला!
Published on

बालमैफल

सुरेश वांदिले

मालकीणबाईंच्या घरी एकही मोलकरीण टिकायची नाही. त्यामुळे घरातील सगळी कामं त्यांच्याच अंगावर पडायची. एक काम संपलं की दुसरं काम वाटच बघत असायचं. ही सगळी कामं करून करून बिचाऱ्या थकून जात. थकले ग बाई आता, असं सारखं म्हणत म्हणत, शेवटचं काम उरकवत.

रॉबिन्सन मामा आपल्या बिळातून मालकीणबाईचं निरीक्षण करायचा. त्याला बरेचदा मालकीणबाईंची दयासुद्धा यायची. आपण मालकीणबाईंना काहीच मदत करू शकत नाही, याचं त्याला वाईट वाटायचं. मालकीणबाई काम करताना मार्गेटली सोफ्यावर ताणून देते, याचं तर त्याला आणखीनच वाईट वाटायचं.

मालकीणबाई, मार्गेटलीस चांगली खाऊपिऊ घालते. न्हाऊ घालते. बरेचदा लाडलूड करते, तरी तिला मालकीणबाईची जराही दया येत नाही. मार्गेटलीला हाकलून देण्यासाठी मालकीणबाईंचे कान फुंकायला हवेत, असंही त्याला बरेचदा वाटायचं. पण मालकीणबाईंना आपण हे सांगायला जायचो नि त्याच आपल्यावर लाटणं फेकून काटा काढायच्या, या विचाराने त्याच्या अंगावर काटा यायचा. मार्गेटली हीच, मालकीणबाईंच्या घरातील आपली संरक्षक भिंत असल्याचं त्याच्या लगेच लक्षात यायचं नि तिच्याबद्दलचे दुष्ट विचार तो मनातून बाहेर ढकलून द्यायचा.

एके दिवशी काम संपल्यावर, थकले ग बाई आता, असं म्हणत म्हणत मालकीणबाई सोफ्यावर बसल्या बसल्याच काही क्षणातच घोरू लागल्या. ही संधी साधून रॉबिन्सन बिळाच्या बाहेर आला नि त्याने मार्गारेट मावशीला उठवलं. मावशी आळोखेपिळोखे देत उठली. झोपमोड केली म्हणून तिने रागाने मामाकडे बघितलं. मामाने मावशीचं लक्ष मालकीणबाईंकडे वेधलं. त्यांची ही गाढ झोपण्याची वेळ म्हणजेच आपली मनसोक्त चीज हादडण्याची वेळ असल्याचं मावशीच्या लक्षात आलं. मावशीचा रॉबिन्सनवरचा राग पळाला. तिने हसून त्याला बाहेर बोलावलं. दोघेही किचनमध्ये गेले. रेफ्रिजरेटवर ठेवलेल्या चीजकडे दोघांनी झेप घेतली. चीजवर ताव मारता मारता, मामाने मावशीला विचारलं,

“मावशे, या मालकीणबाई, मी थकले ग बाई, थकले ग बाई, असं का म्हणतात, सारखं सारखं?”

“व्हेरी सिम्पल.”

“कसं?”

“त्या सारख्या काम करतात, म्हणून थकतात.”

“पण त्यांना हा थकवा येतो कसा ग?”

“अरे, मालकीणबाई काम करतात याचा अर्थ त्यांच्या शरीरातील स्नायू काम करतात. त्यासाठी या स्नायूंना शक्ती किंवा ऊर्जा लागते.”

“ही ऊर्जा कुठून मिळते बरं?”

“मालकीणबाईंच्या शरीरातील ग्लुकोज हे इंधनाचं काम करतं. स्नायूंच्या हालचालींमुळे हे इंधन जळतं. ही एक जैवरासायनिक प्रकिया असते. त्यातून एटीपी (ॲडोनासाइन ट्रिफोस्फेट) या रसायनाची निर्मिती होते. या रसायनाला जाळण्यासाठी ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायूची गरज भासते.”

“हे ऑक्सिजन कुठून मिळतं?”

“ते रक्तातूनच मिळतं. पण स्नायूंकडून अधिक काम झालं किंवा होत असल्यास ऑक्सिजनची गरज अधिक वाढते. ही गरज वेगाने काम करून हृदय भागवतो. खूप काम करताना श्वासोच्छ्वासाचा वेगही वाढवावा लागतो.”

“मग काय होतं?”

“मामू, श्वासोच्छ्वासाचा वेग एका मर्यादेपलीकडे वाढवता येत नाही. स्नायूंचा काम करण्याच्या वेग, या मर्यादेच्या बाहेर गेला की एटीपीची निर्मिती पुरेशा प्रमाणात होत नाही. त्यामुळे शरीर, एटीपीची निर्मिती करणाऱ्या ऑक्सिजनविरहित पर्यायी प्रक्रियेला चालना देते.”

“याचा अर्थ इथेही भानगड सुरू होते म्हणना.”

“रॉब्या, ही भानगड रासायनिक प्रकियेची असते.”

“म्हणजे?”

“म्हणजे असं की, या प्रक्रियेत ग्लुकोजऐवजी शरीरातील ग्लायकोजेनचा इंधन म्हणून वापर सुरू होतो. त्यातून या ग्लायकोजनचं ग्लुकोज आणि पायरुव्हिक या आम्लांमध्ये विभाजन होतं. यातल्या पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर पुढे लॅक्टिक आम्लात होतं. इथेच गडबडीला प्रारंभ होतो.”

“भानगडीनंतर होणारच ना गडबड. तेच तर मला नेहमी म्हणायचं असतं, मावशे. बरं ते जाऊ दे. आता ही गडबड मला भडभड सांग बघू.”

“राब्या, हे लॅक्टिक आम्ल स्नायूंसाठी विषासारखं असतं.”

“ऑ!”

“हाॅ! अरे, लॅक्टिक आम्लरुपी विष स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणाच्या कामात बाधा आणतं. हे आम्ल साठत गेलं की अधिकाधिक स्नायू त्याच्या आवरणाखाली येतात. त्यामुळे स्नायूंची काम करण्याची क्षमता घटते. या आम्लाचा निचरा होण्याची प्रकिया सुरू होऊन हे आम्ल रक्तात शिरतं. त्यातून, जे स्नायू काम करत नाहीत, त्यांच्यापर्यंत ते पोहचतात.”

“बदमाश लेकाचे.”

“हो ना. अरे, हे जे स्नायू असतात, ते या आम्लाच्या प्रभावाखाली येऊन आखडतात. त्यामुळे मग मालकीणबाईस थकवा येऊ लागतो.”

“यावर काही उपाय नाही का मावशे?”

“जिथे असतो अपाय, तिथेच असतो उपाय! पण करणार काय? बुडत्याचे जातात खोलात पाय?”

“हाय काय, नाय काय, मालकीणबाईंना सांग उपाय, माझे बाय!”

“नको रे बाबा. मालकीणबाईंच्या गळ्यात घंटी बांधण्याची हिंमत नाही बाॅ आपली.”

“ओके, त्यांच्या नाही पण माझ्या गळ्यात तर घंटी बांधू शकतेस ना तू. म्हणजे, मला सांग की काय असतो, हा उपाय!”

“राबू, या उपायात येतं नियमित व्यायाम करणं.”

“त्याने काय होतं?”

“त्याने हृदयाची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे स्नायूंना अधिक काळ ऑक्सिजन पुरवठा करता येणं शक्य होतं. शरीरात लॅक्टिक आम्ल जमायला वेळ लागतो. त्यामुळे थकवा येत नाही किंवा जाणवत नाही.”

“मग त्यात अवघड ते काय?”

“मग धरू का तुझी शेपटी पकडून मालकीणबाईंच्या नाकासमोर. तुझ्या घाणेरड्या वासाने, पळतील तुझ्या पाठीमागे नि होईल त्यांचा मस्तपैकी व्यायाम.” नाक फेंदारत मावशी म्हणाली. मार्गेटलीचा दुष्ट विचार प्रत्यक्षात साकारण्याआधी आपण पोबारा करणं चांगलं, हे मामाच्या लक्षात येताच, तो टुणकन रेफ्रिजरेटरवरून उडी मारून बुळकन बिळात शिरला.

ज्येष्ठ बालसाहित्यिक

logo
marathi.freepressjournal.in