

अजब निसर्ग
मकरंद जोशी
प्रतिकूल हवामानात टिकून राहण्यासाठी निसर्गातील विविध प्राणी व कीटक कुंभकर्णासारख्या ‘दीर्घ निद्रेचा’ अनोखा मार्ग कसा अवलंबतात, याचे रंजक वर्णन.
रामायणातील कोणती व्यक्तिरेखा आवडते? या प्रश्नाचे उत्तर अनेकजण कुंभकर्ण हे नक्की देतील, कारण पाच-सहा महिने झोपून काढायचे ही कल्पनाच किती मजेदार आणि हवीहवीशी आहे. आता रामायणातला कुंभकर्ण खरंच असा महिनोन महिने झोपून राहात होता का ते एक रामाला नाहीतर रावणालाच माहिती. पण निसर्गात या कुंभकर्णाची गादी चालवणारे (का वापरणारे!) प्रति-कुंभकर्ण मात्र नक्की पाहायला मिळतात. निसर्गाचे एक वैशिष्ट्य म्हणजे परिस्थिती कितीही प्रतिकूल झाली तरी तिच्यापुढे हार न मानता, त्यावर मात करण्याचे मार्ग निसर्ग शोधून काढतोच. जेव्हा शीत कटिबंधातील हिवाळा तीव्र होऊ लागतो आणि सगळ्या परिसरावर बर्फाचा थर साठतो तेव्हा तिकडचे पक्षी स्थलांतर करून उष्ण कटिबंध गाठतात. मात्र ज्यांना उडता येत नाही आणि ज्यांच्या शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानावर अवलंबून असते असे कोल्ड ब्लडेड म्हणजे शीत रक्ताचे प्राणी काय करतात? तर कुंभकर्णाचा मार्ग अनुसरतात आणि संपूर्ण हिवाळा चक्क झोप काढतात.
हिवाळ्यातल्या या दीर्घ झोपेला शीतनिद्रा म्हणजे हायबरनेशन असे म्हणतात आणि हायबरनेशन म्हटल्यावर आठवतो तो प्राणी म्हणजे ‘बेडूक’. जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकणारा, जलचर आणि भूचर यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे मिश्रण असलेला बेडूक प्रसिद्ध आहे तो त्याच्या दीर्घ निद्रेसाठी. युरोप आणि अमेरिकेतील बेडूक हिवाळ्यातील प्रतिकूल परिस्थितीवर उपाय म्हणून स्वतःला जमिनीत बिळ करून गाडून घेतात किंवा खडकातल्या कपार शोधून आत दडी मारतात नाहीतर एखाद्या डबक्याच्या, ओढ्याच्या तळाशी जाऊन पडून राहातात. शीतनिद्रा घेणाऱ्या बेडकांच्या हृदयाचे स्पंदन अगदी हळू होत असते आणि त्यांचा श्वासही एकदम मंद सुरू असतो. मुळात शरीराची अजिबात हालचाल नसल्याने शरीरातील चयापचयाचा वेगही संथावलेला असतो. शरीराची हालचालच नसल्याने त्यांना साठवलेल्या चरबीच्या जोरावर या काळात गुजारा करता येतो. भारतातले बेडूक उन्हाळ्यात अशा दीर्घ निद्रेत जातात, त्याला ‘एस्टिव्हेशन’ (उन्हाळी झोप) म्हणतात. त्यामुळेच उन्हाळ्यात गायब झालेले बेडूकराव पावसाला सुरुवात झाली की आपली दीर्घ निद्रा सोडून डराव डराव करत फिरताना दिसतात.
अशी लांबलचक झोप घेणाऱ्या प्राण्यांमधलं दुसरं मोठे नाव म्हणजे ‘अस्वल’. निसर्गानेच अंगावर जरी लांब लांब केसांचे कवच दिलेले असले तरी शीत कटिबंधातील अस्वलांना कडक हिवाळ्यापासून बचाव करायला झोपेचाच आसरा घ्यावा लागतो. मात्र अस्वलांच्या या झोपण्याला हायबरनेशन - शीतनिद्रा म्हणत नाहीत. याला ‘टोर्पर’ म्हणतात. कारण शीतनिद्रेतील प्राण्यां च्या शरीराचे तापमान जसे आणि जितके खालावलेले असते, तसे टोर्परमधल्या अस्वलांचे जात नाही. शिवाय अशा झोपलेल्या अस्वलांना झटकन जाग येते, अनेकदा आपल्या गाढ निद्रेतून जागे होऊन गुहेत साठवलेल्या अन्नाचा फडशा पाडून ही अस्वले परत झोपी जातात. जर एखादी गर्भार मादी अशा दीर्घ निद्रेत गेली तर या गाढ झोपेतून जागी होऊन ती आपल्या बाळाला जन्म देते आणि पुन्हा त्याच्यासह झोपी जाते. शीत कटिबंधातली अस्वले या हिवाळी झोपेसाठी खास जागा तयार करतात, या जागेवर ते वाळकी पाने आणि झाडाच्या फांद्या अंथरून बिछानाही बनवतात आणि मस्तपैकी किमान १०० दिवस तरी त्यावर ताणून देतात.
हिवाळ्याच्या काळात अशी लांबलचक झोप काढणारा आणखी एक प्राणी म्हणजे ‘कासव’. शीतकटिबंधातील जमिनीवरची आणि पाण्यातली दोन्ही प्रकारची कासवे हिवाळ्यापासून बचाव करायला दीर्घ निद्रेचाच आश्रय घेतात. मात्र त्यांच्या या अवस्थेला ‘हायबरनेशन’ म्हणत नाहीत तर याला ‘ब्रुमेशन’ म्हणतात. हायबरनेशनमध्ये प्राणी दीर्घ काळासाठी गाढ झोपी जातात. पण कासवे झोपत नाहीत. या अवस्थेत कासवांची चयापचय क्रिया अतिशय मंद झालेली असते, ते कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाहीत आणि त्यामुळे अनेक महिने काहीही न खाता ते जिवंत राहू शकतात. मात्र वरचेवर ते हालचाल करतात आणि त्यांना पाणी पिण्याची गरज भासते, त्यामुळे ते शक्यतो पाण्याच्या जवळ आपली ही दीर्घ विश्रांती घेतात. याला काही कासवे अपवाद आहेत जी खऱ्या अर्थाने शीतनिद्रा घेतात. त्यातलं एक म्हणजे नॉर्थ अमेरिका खंडातील ‘बॉक्स टर्टल’. हे कासव हिवाळा सुरू झाला की जंगलाच्या आतल्या भागात जाऊन स्वतःला जमिनीत गाडून घेतं आणि तीन ते पाच महिने तिथेच राहाते. पाण्यातली कासवे तळ्याच्या नाहीतर नदीच्या तळाशी जाऊन बसतात आणि ब्रुमेशन करतात. अशावेळी पाण्यात हिवाळा काढणारी कासवे त्यांच्या गरजेपुरता ऑक्सिजन त्यांच्या पार्श्वभागावर असलेल्या खास पेशींच्या मदतीने मिळवतात.
शीत कटिबंधातील हायबरनेशन करणाऱ्या प्राण्यांच्या यादीतील आणखी एक नाव म्हणजे ‘वटवाघूळ’. दिवसभर उलटं लटकून, रात्री उडणारा हा सस्तन प्राणी शीत कटिबंधातील हिवाळ्यात भक्ष्याचं दुर्भिक्ष्य असतं म्हणून दीर्घ निद्रेत जातो. या काळात बॅट्सच्या हृदयाचे ठोके २०० ते ३०० प्रति मिनिटवरून फक्त दहा प्रति मिनिट इतके कमी होतात. वटवाघुळेही खऱ्या अर्थाने हायबरनेशनमध्ये न जाता, टोर्पर अवस्थेत जातात, या अवस्थेत ते सहा महिन्यांपर्यंतचा काळ काढू शकतात. अमेरिका खंडात आढळणारा ‘कॉमन पूअरवील’ हा भारतातील रातवा-नाईटजार पक्ष्याच्या कुळातला पक्षी देखील टोर्पर अवस्थेत जातो. दीर्घनिद्रेत जाणारा हा एकमेव पक्षी आहे.
सस्तन प्राणी, उभयचर, रेप्टाईल्स आणि पक्ष्यांप्रमाणेच कीटक सुद्धा हिवाळ्यातील प्रतिकूल हवामानापासून बचाव करण्यासाठी हायबरनेशनचा अवलंब करतात. मात्र त्यांच्या या अवस्थेला ‘डायपॉज’ असं म्हणतात. या अवस्थेत कीटकांची हालचाल पूर्ण थांबलेली असते, शरीरातील चयापचयाची क्रिया एकदम मंदावलेली असते शिवाय त्यांच्या शरीरात आतमध्ये एक विशिष्ट रसायन स्रवू लागते, ज्यामुळे त्यांचे रक्त गोठत नाही. फुलपाखरे, डास, लेडीबग्ज, वास्प असे अनेक कीटक हिवाळ्यात डायपॉज अवस्थेत जातात आणि स्वतःचा बचाव करतात. जणू हिवाळ्यात या कीटकांना कोणीतरी ‘स्टॅच्यू’ म्हटलेलं असतं आणि ते ज्या अवस्थेत आहेत त्याच अवस्थेत थांबतात. त्यामुळेच फक्त प्रौढ कीटकच नाही तर अंडी, अळ्या, कोषातले कीटक हे सुद्धा हिवाळ्यात डायपॉजमध्ये गेलेले पाहायला मिळतात. निसर्गाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी, अशा वातावरणापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या प्राण्यांना दिलेलं हे ‘दीर्घ निद्रेचे’ वरदान खरंच अजब आहे.
निसर्ग अभ्यासक व लेखक
makarandvj@gmail.com