असा जन्मला पॉप्सिकल!

आज जगभर लोकप्रिय असलेल्या ‘पॉप्सिकल’चा शोध एका ११ वर्षांच्या मुलाने अगदी अपघाताने लावला होता, हे तुम्हाला माहीत आहे का?
असा जन्मला पॉप्सिकल!
'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

सोनाली कोलारकर-सोनार

आज जगभर लोकप्रिय असलेल्या ‘पॉप्सिकल’चा शोध एका ११ वर्षांच्या मुलाने अगदी अपघाताने लावला होता, हे तुम्हाला माहीत आहे का?

आपल्याला सगळ्यांनाच आइस कँडी किंवा कुल्फी खायला भलतीच आवडते, नाही का? कडक उन्हाळ्यात किंवा असंच फिरताना एका काडीवरचा तो थंडगार, गोड-आंबट फ्रोजन गोळा चाटत जायची मजाच काही वेगळी असते! हिंदी-मराठीत आपण त्याला प्रेमाने ‘चुस्की’ किंवा ‘काडी-गोळा’ म्हणतो आणि इंग्रजीत त्याला म्हणतात ‘पॉप्सिकल’ (Popsicle).

पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या भन्नाट, थंडगार पॉप्सिकलचा शोध नक्की कोणी लावला असेल? एखाद्या मोठ्या आइसक्रीम कंपनीने? किंवा एखाद्या हुशार शास्त्रज्ञाने? अजिबात नाही! या जगप्रसिद्ध पॉप्सिकलचा शोध चक्क एका अकरा वर्षांच्या खोडकर आणि चौकस मुलाने लावला होता. विश्वास नाही बसत ना? पण हे अगदी खरं आहे!

गोष्ट आहे १९०५ सालातली. अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को शहरात ‘फ्रँक ईपरसन’ नावाचा एक अकरा वर्षांचा मुलगा राहत होता. त्या काळी लहान मुलांमध्ये फ्रुट पावडर आणि पाणी एकत्र करून बनवलेलं एक थंडगार पेय खूप लोकप्रिय होतं. आपल्या फ्रँकलाही ते पेय भलतंच आवडायचं.

एक दिवस संध्याकाळी फ्रँक मस्त खेळून घरी आला. त्याने ग्लासमध्ये ते पावडर-पाण्याचं पेय बनवलं आणि एका काडीने ढवळत ढवळत गॅलरीत येऊन बसला. तो घोट-घोट घेत पेय पितच होता, इतक्यात आतून आईने हाक मारली, “फ्रँक, चल लवकर घरात ये!” आईचा आवाज ऐकताच फ्रँक उठला आणि धावत आत गेला. पण गडबडीत तो पेयाचा ग्लास, ती काडी तशीच ग्लासात ठेवून गॅलरीतल्या टेबलवर विसरला!

त्या रात्री सॅनफ्रान्सिस्कोमध्ये भयंकर थंडी होती. एकदम कडक गारठा! रात्रभर तो ग्लास तसाच बाहेर गॅलरीत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रँकला अचानक त्या ग्लासाची आठवण झाली. तो पळत पळत गॅलरीत गेला. बघतो तर काय... चमत्कार! ग्लासातलं ते सरबत पार गोठून बर्फ झालं होतं. फ्रँकने सहज म्हणून ती काडी धरून वर उचलली. तर काय आश्चर्य! त्या काडीला घट्ट धरून तो पूर्ण गोठलेला गोळाच बाहेर आला! फ्रँकने बालसुलभ चौकसपणा दाखवत तो गोळा चाटून पाहिला आणि काय सांगू मित्रांनो... आहाहाहा! चव तर इतकी अप्रतिम लागत होती की विचारूच नका! काडी धरून फिरता फिरता ते सरबत खाण्याची ही नवीनच युक्ती त्याला भलतीच आवडली.

पण गंमत पुढेच आहे. आपण काहीतरी भन्नाट शोधून काढलंय, याची जाणीव बिचाऱ्या बाल-फ्रँकला नव्हती आणि रोजच्या कामाच्या घाईत असलेल्या त्याच्या घरच्यांचेही याकडे लक्ष गेलं नाही. मग काय... ही गोष्ट तशीच विसरली गेली. पुढे तब्बल १७ वर्षं उलटली! फ्रँक आता मोठा झाला होता. एका कार्यक्रमात त्याने पाहुण्यांसाठी अशीच काडीवरची गोठलेली सरबताची ‘आईस कँडी’ बनवली आणि सगळ्यांना खायला दिली. ती खाऊन सगळे पाहुणे एकदम खूश झाले!

सगळ्यांनी विचारलं, “अरे वा! हे काय नवीन प्रकरण आहे?”

तेव्हा फ्रँकला आपल्या बालपणीच्या त्या गॅलरीतल्या घटनेची आठवण झाली. मधली १७ वर्षं जगात कोणालाही ही साधीशी कल्पना सुचली नव्हती! मग फ्रँकने वेळ न घालवता १९२३ मध्ये या कल्पनेचं अधिकृत ‘पेटंट’ (हक्क) घेतलं. सुरुवातीला फ्रँकने याचं नाव ‘एप्सिकल’ (Epsicle) असं ठेवलं होतं. पण पुढे त्याच्या मुलांनी हट्ट केला आणि नाव बदलून ‘पॉप्सिकल’ (Popsicle - म्हणजेच ‘बाबांचे फ्रोजन पेय’) असं ठेवलं. मग काय, हळूहळू हे पॉप्सिकल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या पसंतीस उतरलं! आज जगभरातल्या अनेक कंपन्या वेगवेगळ्या फ्लेवरचे पॉप्सिकल्स बनवतात.

बघा मित्रांनो, ‘बच्चे मन के सच्चे’ तर असतातच, पण अक्कल चालवण्यातही भलतेच हुशार असतात, हेच फ्रँकने जगाला दाखवून दिलं! आपल्या आसपासही अशा कितीतरी छोट्या-छोट्या गोष्टी घडत असतात. फक्त गरज असते ती थोडी अक्कल आणि चौकस बुद्धी वापरण्याची. म्हणूनच म्हटलं... चला, आपणही आपलं डोकं वापरू या आणि काहीतरी नवीन, भन्नाट करून दाखवू या!

पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक

sonalikolarkarsonar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in