

नवलनगरी
सोनाली कोलारकर-सोनार
आई, मला लेसचे बूट नको घेऊ, खूप त्रास होतो ती लावत बसायला आणि मधेच सुटते पण खेळताना! त्यापेक्षा वेलक्रोवाल्या पट्ट्यांचे सोपे बूट घे” चिनू आपल्या आईला सांगत होता.
तुमची पण अशीच प्रतिक्रिया असते ना? झटक्यात लागणारे वेलक्रोवाले बूट किती सोयीचे होतात ना? मग हा ‘वेलक्रो’चा शोध कसा लागला असेल? कोणी लावला असेल? एखाद्या बुटाच्या कंपनीनेच केलं असेल का संशोधन? तर अजिबात नाही. हा शोध चक्क एका कुत्र्यामुळे लागला आणि एका इलेक्ट्रिकल इंजिनिअरमुळे तो सर्वांपर्यंत पोहोचला.
जॉर्ज-दी-मेस्त्राल हा स्विस इंजिनिअर रोज आपल्या कुत्र्याला फिरायला घेऊन घराजवळच्या रानात जायचा. तिथून घरी आला की तो रोज बघायचा त्याच्या कपड्यांना आणि कुत्र्याच्या अंगालाही ‘गोखरू’च्या वनस्पतींची फळं चिकटलेली असायची. त्याला खूप मजा वाटायची की, हे गोखरू असे चिटकून कसे राहत असतील? पडत कसे नाहीत? त्याने मग ते गोखरू मायक्रोस्कोपखाली बघितले. त्याला दिसलं की या गोखरूंना लाखो छोटे हुक्स आहेत आणि ते कपड्याच्या आणि कुत्र्याच्या दाट मऊशार त्वचेला (फरसारख्या) अगदी सूक्ष्म लूप्समध्ये सहज घट्ट बसतात. त्यामुळे हे गोखरू पडत नाहीत. त्याने मग हा प्रयोग अनेक कापडांवर करून बघितला. त्याने संशोधन सुरू केलं की, असे हुक्स आणि लुप्स कापडांचे कसे तयार करता येतील. मग त्याच्या लक्षात आलं की, नायलॉन या कामासाठी अगदी उत्तम आहे आणि साधारण १९५५ च्या आसपास वेल्क्रोचा जन्म झाला! वेलक्रो हे ‘व्हेलवेट’ आणि ‘क्रोशा’चे कॉम्बो. पुढे न्यूयाॅर्कला एका फॅशन शो मध्ये हे सर्व दाखवण्यात आलं, पण लोकांनी ते काही फार मनावर घेतलं नाही. १९६० साली ‘नासा’ने जेव्हा चंद्रसफरीसाठी अंतराळवीरांसाठी अतिशय उपयुक्त असं मटेरिअल म्हणून वेलक्रो वापरलं तेव्हा खरी वेलक्रोला प्रसिद्धी मिळाली. शून्य गुरुत्वाकर्षणामुळे काही वस्तू खाली पडू नयेत म्हणून अंतराळवीरांनी वेलक्रोचा उपयोग करून त्यांना बांधून ठेवलं. वेलक्रो इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी वापरल्यामुळे पुढे मग दवाखाने आणि बुटांच्या कंपनीला देखील त्याच्या उपयोगाचं महत्त्व पटलं. १९६८ साली प्युमा कंपनीने सर्वात प्रथम बुटांसाठी वेलक्रोचा वापर केला आणि मग आदिदास, रिबॉक आणि इतर नावाजलेल्या कंपन्यादेखील लेसऐवजी वेलक्रो वापरू लागले.
आहे न मज्जा? चला तर फटाफट बूट घालून खेळायला चला! रस्त्याने जाताना ‘गोखरू’ बघायला मात्र आता विसरू नका!! गोखरू हे सर्वत्र आढळते. थोड्या जंगल भागात तर हमखास दिसते.
पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक
sonalikolarkarsonar@gmail.com