

अजब निसर्ग
मकरंद जोशी
निसर्गातील अनेक जीव दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. हवामानातील बदल, अन्नाची उपलब्धता आणि पिल्लांच्या संगोपनासाठी हे जीव एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर करतात- आणि म्हणूनच त्यांना निसर्गातील खरे ‘भटकबहाद्दर’ म्हटले जाते.
निसर्गातील विविध जीवांमध्ये जी अनोखी स्वभाव वैशिष्ट्ये, वागण्याच्या पद्धती पाहायला मिळतात, त्यातली सर्वात लक्षवेधी सवय म्हणजे ‘प्रवासा’ची. पक्षी, पशू, कीटक, जलचर असे सगळ्या प्रकारचे प्राणी एका प्रदेशातून दुसरीकडे जा-ये करतातच, पण त्यातले काही मात्र दरवर्षी न चुकता आपला प्रदेश-मायदेश सोडून हजारो किलोमीटर अंतरावरच्या दुसऱ्या देशात, वेगळ्या हवामानाच्या प्रदेशात जातात. साहजिकच असा प्रवास करणारे हे वन्यजीव ‘भटकबहाद्दर’ या पदवीला अगदी योग्य ठरतात. त्यांच्या या प्रवासाला ‘स्थलांतर’असं म्हणतात. निसर्गातील विविध प्रकारचे जीव ज्यात आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांपासून ते महासागरात विहार करणाऱ्या जलचरांपर्यंत अनेक प्रकारचे प्राणी येतात असे अनेक जीव स्थलांतर करतात ते प्रामुख्याने दोनच कारणांसाठी एकतर हवामान प्रतिकुल झाले की, जीव वाचवण्यासाठी आणि अनुकूल हवामानाच्या प्रदेशात पिल्लांना जन्म देण्यासाठी.
महासागरातले जलचर सस्तन प्राणी म्हणजे व्हेल्स. किमान ८ फुटांपासून ते ९८ फुटांपर्यंत (प्रजातींनुसार) वाढणाऱ्या व्हेल्सच्या जगभरातील महासागरांमध्ये मिळून सुमारे ४५ जाती आढळतात. त्यातील काही व्हेल्समध्ये फक्त माद्याच स्थलांतर करतात. कारण नव्या पिल्लांना जन्म देण्यासाठी त्यांना अनुकूल वातावरण हवे असते तर काही जातींमध्ये नर आणि माद्या दोघेही स्थलांतर करतात. हम्पबॅक व्हेल या जातीमधले व्हेल्स दक्षिण गोलार्धातील उन्हाळा अंटार्क्टिका जवळच्या सागरात काढतात आणि हिवाळ्याची चाहूल लागली की स्थलांतर करून पॅसिफिक महासागर गाठतात. जिथे त्यांना भक्ष्यही मिळते आणि ते पिलांना जन्म देऊन वाढवतात. पॅसिफिकचा उन्हाळा सरत आला की ते परत अंटार्क्टिकाचा रस्ता धरतात. या स्थलांतरात हम्पबॅक व्हेल्स किमान ५००० ते कमाल २०००० किलोमीटरचा प्रवास करतात. सदर्न राइट व्हेल या प्रजातीमधले व्हेल्स हे हिवाळ्यात त्यांच्या विणीच्या परिसरात म्हणजे द. आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ, द. अमेरिकेच्या किनाऱ्याजवळ तसेच न्यूझीलंडच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पाहायला मिळतात, तर उन्हाळ्यात हे व्हेल्स अंटार्क्टिकाजवळच्या सागरात स्थलांतर करतात.
आफ्रिका खंडातील केनिया आणि टांझानिया या दोन देशांमध्ये होणारे वाइल्ड बीस्ट, झेब्रा आणि थॉमसन्स गॅझेल यांचे स्थलांतर हे त्यांच्या अफाट संख्येसाठी विक्रमी मानलं जातं. सुमारे १५ लाख वाइल्ड बीस्ट, साडेतीन लाख थॉमसन्स गॅझेल आणि दोन लाख झेब्रा इतके प्राणी एकाच वेळी एका देशातून दुसऱ्या देशात दरवर्षी नेमाने जा-ये करतात. जुलै-ऑगस्टच्या महिन्यात हे सगळे प्राणी टांझानियातील सेरेनेगेटीची गवताळ कुरणे सोडून केनियातील मसाई माराच्या कुरणांकडे प्रस्थान करतात. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हे प्राणी आपल्या मूळ स्थानाकडे म्हणजे टांझानियातील कुरणांमध्ये परत आलेले पाहायला मिळतात. या स्थलांतरामध्ये फार मोठ्या संख्येने वाइल्ड बीस्ट आणि इतर प्राणी प्राणालाही मुकतात. कारण त्यांच्या स्थलांतराच्या मार्गावर जमिनीवर सिंह, चित्त्यासारखे शिकारी प्राणी आणि नदीत मगरी दबा धरून बसलेल्या असतात. या स्थलांतरातले वैशिष्ट्य म्हणजे हे सगळे प्राणी तृणभक्षी आहेत, पण प्रत्येकाची गवत खाण्याची पद्धत वेगळी आहे. यातील एक गट उंच गवताचे फक्त शेंडे खातो, तर दुसरा गट मध्यम उंचीचे गवत मुळापर्यंत खातो. त्यामुळे एकाच गवताळ भागातून एकाच वेळी लाखो प्राणी जात असतानाही त्यांच्यात अन्नासाठी स्पर्धा होत नाही.
निसर्गातील सर्वात आश्चर्यकारक स्थलांतर पाहायला मिळते ते फुलपाखरांमध्ये. फुलपाखरासारखा चिमुकला, नाजूक जीव स्थलांतर करतो हेच मुळात अद्भूत आहे. उत्तर अमेरिका खंडामधली ‘मोनार्च’ फुलपाखरे झुंडीने दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतर करतात. कॅनडाचा दक्षिण भाग आणि युनायटेड स्टेट्सच्या काही भागांमधून मोनार्च फुलपाखरे उडत उडत मेक्सिको गाठतात. त्याचप्रमाणे रॉकी पर्वतरांगेच्या पश्चिमेच्या भागातून तिथली मोनार्च फुलपाखरे कॅलिफोर्नियाच्या किनारी भागाकडे स्थलांतर करतात. या स्थलांतरात एकावेळी सुमारे पाच लाखांपर्यंत फुलपाखरे एकत्र उडत जातात. भारतामध्ये या मोनार्चचे चुलत भाऊ म्हणता येतील अशी म्हणजे ब्लू टायगर, स्ट्राइप्ड टायगर ही फुलपाखरे स्थलांतर करतात. फुलपाखरांच्या स्थलांतरामधील अनोखा पैलू म्हणजे स्थलांतर केलेली पिढी परत येत नाही, तर नवीन पिढी परत येते. सस्तन प्राणी, पक्षी यांचं स्थलांतर जितक्या ठळकपणे नजरेत भरतं, त्यावर संशोधन केलं जातं तितकं कीटकांच्या बाबतीत होत नाही. त्यामुळेच त्याबाबत फार कमी माहिती उपलब्ध असते. २००९ मध्ये चार्ल्स ॲन्डरसन या मरीन बायोलॉजिस्टने ऑटम म्हणजे शिशीर ऋतूत मालदिवजमध्ये हजारोंच्या संख्येनं चतुरांचे थवे उतरताना पाहिले आणि त्याने या चतुरांच्या स्थलांतराचा मागोवा घ्यायला सुरुवात केली. या संशोधनात असं लक्षात आलं, की चतुरांमधील ‘ग्लोब स्कीमर’ हा आकाराने फक्त ५ सेंटीमीटर लांब असलेला आणि ३०० मिलीग्रॅम वजनाचा चतुर दरवर्षी भारतातून न थांबता उडत हिंदी महासागर ओलांडून पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्यावर जातो. जे चतुर भारतातून आफ्रिकेत जातात ते परत भारतात येत नाहीत तर त्यांची नवीन पिढी भारतात परत येते. भारत ते आफ्रिका हा मार्ग प्रत्यक्षात एका मोठ्या सर्किटचा भाग आहे, कारण हे ग्लोब स्कीमर्स फक्त भारतातूनच नाही तर मध्य आशियातूनही स्थलांतर करतात. त्यामुळे त्यांच्या स्थलांतराचा वर्तुळाकार मार्ग हा जवळ जवळ चौदा हजार किलोमीटर्स इतका दीर्घ असतो. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरचा पावसाळा संपत आला की म्हणजे ऑगस्ट अखेरीस- सप्टेंबर सुरुवातीला हे चतुर भारतातून आफ्रिकेकडे प्रस्थान ठेवतात, तर आफ्रिकेकडून ते नोव्हेंबर-डिसेंबर या काळात परत येतात. चतुरासारखा अगदी लहानसा जीव इतकं दूरचं अंतर, महासागरावरून - न थांबता कसं पार करतो? त्याच्या पंखांमध्ये ही ताकद कुठून येते? तर या भरारीसाठी निसर्गतः वाहणाऱ्या वाऱ्यांची मदत हे चतुर घेतात. महासागरातले व्हेल काय किंवा चिमुकल्या पंखांनी हजारो मैलांचे अंतर पार करणारी फुलपाखरे काय, यांच्यापेक्षा सर्वसाधारणपणे सहजगत्या पाहायला मिळते ते पक्ष्यांचे स्थलांतर. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांमध्ये सर्वात जास्त अंतर दरवर्षी कापण्याचा विक्रम आर्क्टिक टर्न नावाच्या लहानशा पक्ष्याच्या नावावर आहे. दरवर्षी आपल्या आर्क्टिकमधील ब्रिडिंग ग्राऊंडपासून ते अंटार्क्टिकाच्या बर्फाळ किनाऱ्यापर्यंत हा पक्षी प्रवास करतो. या स्थलांतरामुळे त्याला उत्तर आणि दक्षिण गोलार्ध अशा दोन्ही ठिकाणचा उन्हाळा अनुभवता येतो. त्यासाठी आर्क्टिक टर्न सुमारे नव्वद हजार किलोमीटरचे अंतर कापतो. या पक्ष्याला सुमारे तीस
वर्षांचे आयुष्य लाभलेलं आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात तो तीन वेळा पृथ्वी ते चंद्र इतके अंतर कापतो असे म्हणता येईल. निसर्गाच्या अजब जगातले भटकबहाद्दर हे खरोखरच आश्चर्यचकित करणारा प्रवास करतात. फक्त नैसर्गिक प्रेरणेमुळे आणि निसर्गातील वारे, तारे यांची मदत घेऊन हे भटकबहाद्दर आपला प्रवास यशस्वीपणे करतात. त्यामुळे माणसांमधील भटक्यांपेक्षा निसर्गातील भटके अधिक श्रेष्ठ ठरतात.
निसर्ग अभ्यासक व लेखक
makarandvj@gmail.com