

ठाण्याच्या रस्त्यांवर ‘अबोली’ रिक्षा चालवत अश्विनी डोबाळे यांनी पुरुषप्रधान क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. संघर्ष, टोमणे आणि अडथळ्यांवर मात करत त्यांनी रिक्षाच्या चाकांवर स्वावलंबनाचा प्रेरणादायी प्रवास उभा केला.
ही रस्ते सरळ असतात, तर काही वळणावळणाचे. पण काही रस्ते असे असतात जे आपल्याला स्वतःलाच तयार करावे लागतात. ठाण्याच्या गजबजलेल्या रस्त्यांवर जेव्हा एक ‘अबोली’ रंगाची रिक्षा वेगानं धावते आणि तिच्या हँडलवर जेव्हा एका स्त्रीचे खंबीर हात दिसतात, तेव्हा समाजाच्या उंचावलेल्या भुवया आपोआप खाली झुकतात. ही गोष्ट आहे अश्विनी डोबाळे यांची. एका अशा रणरागिणीची, जिने केवळ रिक्षा चालवली नाही, तर परिस्थितीच्या चाकाखाली चिरडल्या जाणाऱ्या आपल्या स्वप्नांना पुन्हा उभारी दिली. ‘ती आली, तिने पाहिलं आणि तिने जिंकलं’ असं या अश्विनीताईबद्दल म्हणता येईल, पण हा विजय इतका सोपा नव्हता. त्यामागे प्रचंड धडपड होती, वारंवार अडखळणं होतं तरीसुद्धा टोमणे मारणाऱ्या समाजाला आपल्या कर्तृत्वाने गप्प बसवण्याची एक मूक पण प्रखर जिद्द होती.
अश्विनीताईचा प्रवास सुरू होतो सांगली जिल्ह्यातील सिद्धीवाडी नावाच्या एका छोट्याशा गावातून. ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलीप्रमाणेच तिचं बालपण मामाच्या गावी निसर्गाच्या सान्निध्यात गेलं. पण नशिबाची चक्रं फिरली आणि वयाच्या नवव्या वर्षी त्यांना मुंबईसारख्या मायानगरीत यावं लागलं. गावातून थेट मुंबईत आल्यावर आयुष्याचा वेग आणि सभोवतालचं जग पूर्णपणे बदललं होतं. वयाच्या नवव्या वर्षी त्यांना पहिलीत प्रवेश मिळाला. स्वतःपेक्षा वयाने खूप लहान असलेल्या मुलांसोबत बाकावर बसताना त्यांना सुरुवातीला खूप संकोचल्यासारखं वाटायचं. पण अंगी जिद्द होती आणि शिकण्याची ओढही. त्यांच्या शिक्षिका नेहमी म्हणायच्या, “आशू, तू हुशार आहेस, तू नक्कीच चांगलं शिकू शकतेस.” सातवीपर्यंतचं शिक्षण म्युनिसिपल शाळेत अगदी व्यवस्थित पार पडलं, पण जेव्हा आठवीला त्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला, तेव्हा तिथल्या मुलांच्या बोलण्यामुळे आणि काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांच्या मनातील शिक्षणाची गोडी कमी झाली. तिथेच त्यांच्या औपचारिक शिक्षणाला पूर्णविराम मिळाला आणि त्या घराच्या चार भिंतीत रमू लागल्या.
वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांच्या खांद्यावर संसाराची मोठी धुरा आली. ज्या वयात मुली आपल्या करिअरची स्वप्नं पाहतात किंवा कॉलेजच्या कट्ट्यावर मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारतात, त्या वयात अश्विनीताई एका घराची ‘सून’ आणि ‘पत्नी’ झाल्या होत्या. मात्र, लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत सकारात्मक वळण आलं. अश्विनीताईचे पती शिक्षित असूनही केवळ आर्थिक ओढाताणीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आलं नाही, याची एक सुप्त खंत त्यांच्या मनात होती. म्हणूनच आपली पत्नी शिकावी, ती स्वावलंबी व्हावी आणि तिने समाजात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करावं, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. अश्विनीताईला शिक्षणात आता रस उरला नव्हता, पण नशिबाने त्यांच्यासाठी एक वेगळीच आणि धाडसी वाट निवडून ठेवली होती.
२०१६ सालात जेव्हा राज्य सरकारने रिक्षा परमिटची लॉटरी काढली, तेव्हा त्यामध्ये महिलांसाठी ५ टक्के राखीव कोटा ठेवण्यात आला होता. अश्विनीताईच्या नवऱ्याने ही सुवर्णसंधी ओळखली. खरं तर, प्रवासात असताना ते नेहमी अश्विनीताईला रिक्षाच्या तांत्रिक गोष्टी आवर्जून सांगायचे- सिग्नलचे नियम, गिअर कसे टाकायचे, क्लचचा वापर कसा करायचा याबद्दल ते त्यांना माहिती देत असत. “तू रिक्षा शिक, तू हे नक्कीच करू शकतेस,” हा पतीचा अतूट विश्वासच अश्विनीताईच्या नव्या प्रवासाचा पाया ठरला. सुरुवातीला घरातील सासूचा या गोष्टीला विरोध होता. ‘मुलांना सोडून ही बाई रस्त्यावर रिक्षा कशी चालवणार?’ हा प्रश्न होताच, शिवाय दोन लाखांचे कर्ज काढून रिक्षा घ्यायची आणि ती चालली नाही तर आर्थिक गणित कोलमडेल, अशी भीतीही सर्वांच्या मनात होती. पण अश्विनीच्या मिस्टरांनी ठामपणे सांगितलं, “तिने जरी रिक्षा चालवून कर्ज फेडलं नाही तरी चालेल, पण तिला तिचं अस्तित्व शोधू दे.” पतीचा हा खंबीर पाठिंबा घेऊन अश्विनी रणांगणावर उतरल्या.
परमिट मिळालं ते ‘अबोली’ रंगाच्या रिक्षाचं. आरटीओच्या चाचणीवेळी अश्विनीताईला खूप दडपण आलं होतं. त्यांच्या सोबत शिकलेल्या इतर महिला दहावी-बारावी किंवा पदवीधर होत्या, तर अश्विनीताईचं शिक्षण त्या मानाने कमी होतं. अश्विनीताईच्या नवऱ्याला वाटायचं की, माझी बायको कमी शिकली आहे, तिला हे नियम आणि ऑनलाइन परीक्षा समजतील का? पण जेव्हा निकाल लागला, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सर्वात जास्त गुण मिळवून अश्विनीताई उत्तीर्ण झाली होती. तिथूनच तिच्या आत्मविश्वासाला खऱ्या अर्थाने धुमारे फुटले. मात्र, खरा संघर्ष तर आता रस्त्यावर सुरू होणार होता. ठाण्याच्या वर्तकनगर स्टँडवर जेव्हा पहिल्यांदा आपली नवीन रिक्षा घेऊन ताई उभी राहिली, तेव्हा तिचं स्वागत कौतुकाने झालं नाही, तर जळजळीत टोमण्यांनी झालं. पुरुष रिक्षाचालक त्यांना हिणवू लागले. “आता बायका पण रिक्षा चालवणार का? मग पुरुषांनी घरी जाऊन भांडी घासायची आणि कपडे वाळत घालायचे का?” अशा नकारात्मक प्रतिक्रिया त्यांना रोज ऐकाव्या लागत. शेअरिंग स्टँडवर त्यांना रिक्षा लावू दिली जात नसे. पुरुषांच्या या मक्तेदारीत स्वतःची जागा निर्माण करणं हे एखाद्या युद्धापेक्षा कमी नव्हतं.
पण अश्विनीताई डगमगली नाही. तिने शांत बसण्याऐवजी प्रतिउत्तर देण्याचं ठरवलं. “तुमच्या घरच्या स्त्रिया जर अशा कामासाठी बाहेर पडल्या असत्या, तर तुम्ही त्यांच्याशी असंच वागला असता का?” असा सडेतोड सवाल त्या विचारू लागल्या. त्यांच्यासोबत इतर दोन-तीन महिला चालकही होत्या, ज्यांनी एकीचं बळ दाखवलं. जेव्हा पुरुष चालकांना जाणवलं की, या महिला घाबरणाऱ्या नाहीत आणि त्या आपल्या हक्कासाठी पोलीस स्थानकापर्यंत जायलाही कचरणार नाहीत, तेव्हा कुठे त्यांचा विरोध मावळू लागला. आज त्याच स्टँडवर अश्विनीताई अभिमानाने उभी राहते आणि तेच पुरुष चालक आता तिच्याकडे आदराने पाहतात. रस्ता कोणाच्या बापाचा नसतो, तो कष्टाळू हातांचा असतो, हे तिने सिद्ध करून दाखवलं.
रिक्षा चलवणं म्हणजे फक्त हँडल फिरवणं नसतं. उन्हाचा चटका, धो-धो पडणारा पाऊस, अंगाला झोंबणारा वारा आणि तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडणं, या सगळ्याशी अश्विनीताई आणि तिच्यासारख्या अनेक अबोली रिक्षा चालवणाऱ्या महिलांना झुंज द्यावी लागते. कधी रिक्षा मध्येच बंद पडते, तर कधी भरपावसात टायर पंक्चर होतो पण अशा वेळी अश्विनीताई घाबरून न जाता स्वतः रिक्षा ढकलून बाजूला घेते. टायर बदलण्याचं तंत्रही तिने आत्मसात केलं आहे. त्यांना नऊ वर्षांच्या प्रवासात अनेक चांगले-वाईट अनुभव आले. त्यातील एक प्रसंग तर काळजाचा थरकाप उडवणारा होता. एकदा एका महिला प्रवाशाने स्वतः सरबत पिताना अश्विनीताईलाही लिंबू सरबत स्टॉलवरून घेऊन प्यायला दिलं. माणुसकीच्या नात्याने त्यांनी ते सरबत प्यायलं, पण काही वेळातच त्यांना चक्कर येऊ लागली आणि डोळ्यांसमोर अंधारी आली. त्यांच्या लक्षात आलं की, यात काहीतरी गुंगीचं औषध असावं. त्या महिला प्रवाशाचा हेतू काहीतरी वेगळाच होता. पण अशाही स्थितीत अश्विनीताई हिंमत हरली नाही. तिने रिक्षा एका मंदिराजवळ थांबवली आणि तिथल्या स्थानिक लोकांना मदतीसाठी हाक दिली. तिच्या त्या प्रसंगावधानमुळे त्या एका मोठ्या घातपातातून वाचली. हा अनुभव त्यांना अधिक सावध आणि खंबीर बनवून गेला.
अश्विनीताईचा दिवस सकाळी साडेनऊ वाजता सुरू होतो. घरचा डबा सोबत घेऊन ती बाहेर पडते आणि रात्र होईपर्यंत ठाण्याच्या गल्ल्यांमधून लोकांची ने-आण करते. ऑफीसमध्ये काम करणाऱ्यांना हक्काचा लंच ब्रेक मिळतो, पण रस्त्यावर काम करणाऱ्या या रणरागिणींना ते भाग्य नसतं. कधी डबा उघडला की समोरून प्रवाशाचा आवाज येतो आणि “ताई, अर्जंट आहे” म्हटल्यावर त्या क्षणाचाही विचार न करता डबा बंद करावा लागतो. सुरुवातीला अश्विनीताईच्या मुलांना आपल्या आईच्या व्यवसायाबद्दल थोडा संकोच वाटायचा. शाळेतील मित्र “तुझी मम्मी रिक्षा चालवते का?” असं विचारल्यावर त्यांना अवघडल्यासारखं व्हायचं. पण आज काळ बदलला आहे. आईने कष्टाने घर सावरलं आहे, हे पाहून आज त्याच मुलांना अश्विनीताईचा अभिमान वाटतो. कामाच्या गडबडीत जेव्हा ती खूप थकते, तेव्हा आपल्या मैत्रिणींसोबत उपवनच्या मंदिरात थोडा वेळ विसावा घेते, गप्पा मारते आणि पुन्हा नव्या जिद्दीने कामाला लागते.
आज समाजात महिलांचा प्रत्येक क्षेत्रात वावर वाढला असला, तरी रस्ते आणि वाहने आजही पुरुषांचीच मानली जातात. अशा काळात अश्विनीताईसारख्या महिला या चौकटी मोडून बाहेर पडत आहेत. केवळ परमिट मिळालं म्हणून नव्हे, तर परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी हे क्षेत्र निवडलं. अश्विनीताई सांगते की, “स्त्रियांनी कोणावरही अवलंबून न राहता स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं. आज टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झाली आहे की मॅपच्या सहाय्याने आपण कुठेही पोहोचू शकतो. त्यामुळे महिलांनी डगमगण्याची गरज नाही.” अश्विनीताईच्या चेहऱ्यावरचं ते हसू आणि शब्दांमधील आत्मविश्वास सांगून जातो की, तिने केवळ रिक्षा चालवली नाही तर तिने स्त्रियांच्या स्वावलंबनाचं एक नवं चाक फिरवलं आहे.
अश्विनीताईच्या मते ‘प्रत्येक दिवस हा महिलेचाच असावा. घरची कामं, जबाबदाऱ्या, मुलांचं संगोपन हे कधीच संपणार नाही. पण त्यातूनही स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि आपलं आयुष्य आनंदाने जगून घ्या.’
थोडक्यात सांगायचं तर खाकी वर्दी आणि अबोली रिक्षा हे आता अनेक महिलांचे दागिने झाले आहेत. रस्त्यावरून जेव्हा त्यांची रिक्षा सुसाट जाते, तेव्हा ती केवळ अंतर कापत नसते, तर ती हजारो स्त्रियांना ‘आपणही हे करू शकतो’ अशी प्रेरणा देत असते. अश्विनीताईच्या या जिद्दीला, कष्टाला आणि तिच्या या प्रवासाला मनापासून सलाम!
शब्दांकन- क्रांती गोडबोले पाटील