‘हल्लीच्या मुली’ म्हणण्याआधी

‘आजकालची मुलं...’ किंवा ‘हल्लीच्या मुली...’ अशी वाक्यं प्रत्येक पिढीत ऐकू येतात. पण Gen-Z मुलींबद्दल बोलताना हा सूर जरा जास्तच तीव्र होतो. खरंच ही पिढी इतकी वेगळी आहे का, की आपण बदल स्वीकारायला अजून तयार नाही?
‘हल्लीच्या मुली’ म्हणण्याआधी
Published on

विशेष

आभा पटवर्धन

‘आजकालची मुलं...’ किंवा ‘हल्लीच्या मुली...’ अशी वाक्यं प्रत्येक पिढीत ऐकू येतात. पण Gen-Z मुलींबद्दल बोलताना हा सूर जरा जास्तच तीव्र होतो. खरंच ही पिढी इतकी वेगळी आहे का, की आपण बदल स्वीकारायला अजून तयार नाही?

तशी ‘हल्लीच्या मुली बाई… ’, ‘आजकालची मुलं ना...’ किंवा तत्सम सुरू होणारी वाक्यं आजवरच्या सगळ्याच पिढ्यांनी, त्यांच्या पुढच्या पिढीसाठी वापरली असतील. तसा पिढी दर पिढी होणारा बदल, दोन पिढ्यांमधली तफावत तशी स्वाभाविकच. पण Gen-z च्या बाबतीत काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे किंवा त्यांचे पॅटर्न्स हा फार मोठा सामाजिक, प्रसंगी नैतिक प्रश्न आहे, यावर आधीच्या सगळ्या पिढ्यांची एकवाक्यता असते. त्यातून हल्लीच्या, Gen-z मुलींचे एकेक ‘प्रकार’ पाहिले की अचंबा वाटणाऱ्यांची संख्या मुबलक आहे. पुढल्या पिढीतल्या, म्हणजे Gen-z मुलींच्या आचार-विचारातल्या नावीन्याचा/ फरकाचा स्वीकार करणं त्यांच्या वरच्या पिढ्यांना का कठीण जातंय? याचा विचार करता एक महत्त्वाचं कारण मला वाटतंय. आमच्या आधीच्या पिढ्यांमधल्या मुली त्यांच्या आसपासच्या बायकांकडून, आई, मावशा, बहिणी, मैत्रिणींकडून शिकायच्या. आयुष्याबद्दलच्या अपेक्षा, स्वप्नं, योग्य-आयोग्याच्या कल्पना, आवडीनिवडी एका परिघात थोड्या बहुत फरकाने सारख्या असायच्या. ह्यात थोडे बदल होत राहायचे पण ते एका संस्कृतीच्या, समाजाच्या चौकटीत बांधलेले होते. आमची पिढी जवळपास जन्मापासून किंवा निदान घडत्या वयापासून इंटरनेट वापरत होती. लहान वयापासून जगभरातल्या बदलांशी, देशोदेशीच्या विचारांशी, संस्कृतींशी, माणसांशी आमची ओळख होत गेली. तो आमच्या संस्कारांच्या स्रोतांपैकी एक बनला. ज्या विचारांशी, संस्कृतींशी आई-पिढीची ओळखही नव्हती, ती काही प्रमाणात आमची संस्कृती झाली.

आता या ग्लोबल/पाश्चात्य संस्कारांचे आपल्या घरांमध्ये पडसाद उमटले. हल्लीच्या मुलींना लेबलं चिकटली- अति सेनसिटिव्ह, आडमुठ्या, नको तिथे पुरुषांशी बरोबरी करू पाहणाऱ्या, स्वतःला जास्त शहाण्या समजणाऱ्या, सारखं आपलं फेमिनिझम काढणाऱ्या, संसारघाण्या, भांडकुदळ, मोठ्यांचा मान न राखणाऱ्या, कृतघ्न, अतिच मतं असलेल्या, कित्तीतरी. या गटाचा भाग म्हणून ही लेबलं कशी चुकीचीच आहेत हे सांगण्याच्या प्रयत्नात मी पडणार नाही. पण ती वाटतात तेवढी वाईट नाहीत हे सांगायच्या प्रयत्नात नक्की असेन.

आमच्या पिढीची एक गोष्ट मला फार खास वाटते, आवडते. ती म्हणजे ‘इमोशनल’ या विशेषणाला लगडलेल्या, त्या भावनांच्या अनुभवाला पुरतं दाबून टाकणाऱ्या नकारात्मक नोशन्स आमच्या पिढीने तोडल्या, भावना अनुभवणं, व्यक्त करणं आणि खमकेपणा ह्यांचं व्यस्त प्रमाण आम्ही नाकारलं. मन मारून जगणं, कडवट नाती मन मारत जपणं, कुणालाही गृहीत धरू देणं आम्हाला थोर वाटत नाही. हसू आलं की हसणं, रडू आलं की धाय मोकलून रडणं आमच्यासाठी त्यामानाने सोपंय. आम्ही त्यागाभोवतीचं ग्लॅमर नाकारतो. चांगली मुलगी, बहीण, सहचर, आई ह्यातलं काहीही होण्याचा सोशिकपणाशी संबंध नसतो हे आम्हाला कळलंय. गोष्टी पटल्या नाहीत, वाईट वाटलं, कुणी वाईट वाटवलं, गृहीत धरलं तर आम्ही संवाद करतो, ‘confrontation’ करतो. ह्या लेखाच्या निमित्ताने मुद्दाम गूगल केल्यावर कळलं की त्याचा अर्थ तसा भांडण-खटक्यांचा आहे. पण त्यातला हल्ला करण्याचा भाव वगळून आम्ही मनसोक्त कॉन्फ्रंटेशन्स करतो. समोरच्याला ऐकायला काय चांगलं वाटेल तेच बोलणं सोडून अवघड, नाजूक, वादग्रस्त सगळ्या विषयांवर बोलतो. आपली म्हणणी, मतं, बासनात गुंडाळणं रुचत नाही, मतावरून हटणं पटत नाही आणि केवळ बायकांनी असं वागण्यावरच्या नाराजीला बधत नाही.

स्वातंत्र्याची आस हा आमच्या निर्णयांचा पाया असावा. स्वतःच्या तंत्राने, स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी शोधत जातो. त्यामध्ये स्वातंत्र्याची रूढ संकल्पना तर आहेच, म्हणजे पैसे कमावणं, स्वतःचे निर्णय आणि त्यांची जबाबदारी घेता येणं, स्वैरपणे नाही पण विवेकाला धरून वाटेल ते करता येणं वगैरे. पण त्याबरोबरच प्रेमात पडणं, लग्न करणं, घरसंसार थाटणं, मुलांचं पालनपोषण करणं अशी तद्दन स्त्रीसुलभ स्वप्न असण्याचं, ती पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य ज्याला त्याला असावं असं आम्हाला वाटतं आणि तीच आमच्या स्त्रीवादाची संकल्पना आहे. स्त्रीवादी असणं म्हणजे केवळ विखारी बोलणं, आंदोलनं करणंरोधात जाणं असं आम्हाला मुळीच वाटत नाही. माझं आयुष्य मला कसं जगायचं हे ठरवण्याचा अधिकार त्या मुलीकडे, बाईकडे असणं असा ‘जी जे वांछिल ती ते लाहो’तत्त्वाचा फेमिनिझम आम्हाला जास्त पटतो.

परवाच एक आजोबा वयाचे गृहस्थ म्हणाले, ‘परवा रात्री दोनेक वाजता घरी आलो तर इतक्या मुली बाहेर. काय मुली पण हल्ली मुलांसारख्या वागतात’. मला जरा गंमतच वाटली. ज्या गोष्टी केल्यानं मुलांना साधे कटाक्ष मिळत नाहीत त्या गोष्टी मुलींनी केल्या तर मात्र चूक? म्हणून दर्जा आणि संधीच्या समानतेसारखीच ‘नैतिक समानता’ महत्त्वाची वाटते. म्हणजे मुलीने स्वयंपाक केला तरी कौतुक नाही, मुलाने केला तर सोहळा किंवा मुलाने दारू, सिगारेट प्यायली तर त्या वाईट सवयी आणि मुलीने प्यायली तर थेट चारित्र्यावर प्रश्न? ती तफावत अधिक त्रासदायक वाटते. त्यामुळे नीतिमत्तेच्या प्रश्नात योग्यायोग्याचे नियम सगळ्यांना समान असायला हवेत असं सुद्धा वाटतं.

सोशल मीडियावर ‘ब्रेकिंग जनरेशनल कर्सेस’ची चर्चा होते. म्हणजे आधीच्या पिढ्यातल्या बायकांनी भोगलेले भोग, वाहिलेले शाप आपण थांबवायचे, ती साखळी आपण आपल्यापासून मोडायची असा त्यामागचा विचार आहे. त्यातला बऱ्याच जणींनी मोडून काढलेला ‘curse’ आहे ओळखीचा, आयडेंटिटीचा. कुणाची मुलगी, बायको, आई इतक्याच ओळखी आम्हाला तोकड्या वाटतात. त्यापलीकडे माझी ओळख आहे. कुणाची बायको झाले, आई बनले ह्यापलीकडे जगण्याला काहीतरी उद्दिष्ट आहे, जे इतरांवर, आयुष्यातल्या पुरुषांवर अवलंबून नाही हे आम्हाला माहीत आहे आणि ते जगण्याचं मकसद शोधायच्या सक्रिय प्रयत्नात असतो. त्यामुळे आधीच्या, अडकवून ठेवणाऱ्या, पारंपरिक व्यवस्थेला आव्हान देणारी, प्रसंगी छेद देणारी पिढी आहे. जसं आम्हाला केवळ कुणाच्या संदर्भाने ओळखलं जाणं नकोसं वाटतं तसं आमच्या जगण्यात, कुणाचा हस्तक्षेपही नको वाटतो. काळजीने विचारलेले प्रश्न, मायेने केलेली चौकशी आणि ती रेष ओलांडून हक्क दाखवून घातलेले नियम ह्यातला फरक दुसरा भाग नकोसाच वाटतो. त्यामुळे कुणी असे नियम आखून द्यायच्या आधीच आम्ही आमचे नियम घालून घेतो. म्हणजे स्वैराचारला आमंत्रण नाही तर केवळ स्वतःला उत्तरदायी असणे. My life my Rules चा अर्थ my life no rules असा होत नाही. ह्याची पूर्ण जाणीव असते. आम्ही चुकणार नाही असा भाबडा भ्रम नसतो, पण चुकांची जबाबदारी घ्यायची तयारी मात्र असते.

कोणत्याही माणसासारख्या आम्ही चुका करतोच, पण इतरांच्या निर्णयाच्या, चुकांच्या जबाबदाऱ्या घेण्यापेक्षा स्वतःच्या चुकलेल्या निर्णयांच्या जबाबदाऱ्या घेणं आम्हाला बरं वाटतं. अशा न ऐकणाऱ्या, न नमणाऱ्या, स्वतःच्या हक्कांसाठी भांडकुदळ, मोठ्यांचा केवळ एकतर्फी आदर न करणाऱ्या, मतं असलेल्या, मोठ्याने, समोरचा ऐकून घेईपर्यंत ते मांडत राहणाऱ्या, disobedient मुली असणं आणि अशा मुलींमध्ये वावरणंच फार फार कमालीचं आहे. Gen-z ला हे बळ मिळण्यासाठी आधीच्या पिढ्यातल्या ज्या ज्या बायका भांडल्या, झगडल्या, मोठ्या आवाजात बोलल्या, आपली म्हणणी ऐकायला लावली त्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता आणि हवी तशी बाई होण्याचं बळ सगळ्या जणींना मिळो. शुभेच्छा!

aabhapatwardhan.work@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in