समुद्रज्वाला निसर्गाचा ज्वालामय खेळ

प्रशांत महासागरातील हवाई बेटांवर जिवंत ज्वालामुखीचा समुद्राशी होणारा संगम म्हणजे निसर्गाचा अद्भुत आणि थरारक सोहळाच. लाव्हा आणि लाटांची ही भिडंत ‘समुद्रज्वाला’चा नेत्रदीपक अनुभव देऊन जाते.
समुद्रज्वाला निसर्गाचा ज्वालामय खेळ
Published on

जगतवारी

मेधा आलकरी

प्रशांत महासागरातील हवाई बेटांवर जिवंत ज्वालामुखीचा समुद्राशी होणारा संगम म्हणजे निसर्गाचा अद्भुत आणि थरारक सोहळाच. लाव्हा आणि लाटांची ही भिडंत ‘समुद्रज्वाला’चा नेत्रदीपक अनुभव देऊन जाते.

समुद्राच्या लाटांची जी अनेक रूपं आहेत, त्यातलं मला आवडतं ते भरतीला उचंबळून येणाऱ्या आणि खडकांना धडका देणाऱ्या फेसाळत्या लाटांचं रूप. लाट ओसरून गेल्यावर पाण्यानं निथळत शांत उभा असलेला खडक मला स्थितप्रज्ञाचा अवतार वाटतो. जर एखाद्या दिवशी मनाचं संतुलन ढळून, बेभान होऊन त्याने पलटवार करायचा ठरवला तर? रागाने लालेलाल होऊन त्याने समुद्रावर आग ओकायला सुरुवात केली तर? हवाई बेटसमूहातील बिग आयलंड या बेटावर गेलो असताना हे दृश्य मी प्रत्यक्ष पाहिलं. त्या खडकाळ टेकडीची सहनशक्ती संपली होती. आपल्या अनेक मुखांतून ती लाव्हारूपी आग ओकू लागली होती.

हवाई बेटं ही अमेरिकेच्या अखत्यारित येत असली तरी ती कॅलिफोर्निया या पश्चिमेकडील राज्यापासून तीन हजार आठशे किलोमीटर दूर प्रशांत महासागरात वसलेली आहेत. ही एकंदर १३७ बेटं असली तरी पर्यटक थोड्याच बेटांना भेट देऊ शकतात. तिथे गेल्यावर प्रशांत महासागराच्या निळाईत मनसोक्त डुंबायचं, आधुनिक समुद्री खेळ खेळायचे, हिरव्या पाचूच्या बनात फेरफटका मारायचा, किनाऱ्यावरील शांत सूर्यास्त पाहायचा किंवा दहा हजार फूट उंच डोंगरावर झुंजूमुंजू व्हायच्या आधीच विराजमान होऊन तिथला सूर्योदय बघायचा, फक्त दक्षिण गोलार्धातूनच दिसणाऱ्या नक्षत्रांनी भरलेलं रात्रीचं तारांगण पाहायचं, पॉलिनेशिअन सांस्कृतिक केंद्रात तिथल्या संस्कृतीचा आगळावेगळा अनुभव देणारा एक पूर्ण दिवस घालवायचा आणि बिग आयलंड बेटावरील धगधगता जिवंत ज्वालामुखी पाहायचा. हे सगळं अनुभवायचं तर कमीत कमी दहा दिवस तरी हवेत. हवाई हे अमेरिकेतील बहुतेक प्रमुख शहरांशी विमानाने जोडलं आहे.

बिग आयलंडवरील किलुआ ज्वालामुखी १९८३ पासून जागृत आहे. २०१३मध्ये त्याचा मोठा उद्रेक झाला आणि जवळजवळ पाचशे एकर नवीन जमीन त्याने जन्माला घातली. त्यानंतर तीन वर्षं हा कुंभकर्ण निद्रिस्त होता. बहुदा पृथ्वीच्या पोटातून वर येऊन हा लाव्हा दबा धरून बसला होता. समुद्रावर चाल करण्यासाठी नवी वाट शोधत होता. जुन्या लाव्हा खडकांच्या उदरात तयार झालेल्या भुयारी नळकांड्यांमधून दबक्या पावलांनी वाटचाल करत होता. या कानाची त्या कानाला खबर नव्हती. अचानक त्या डोंगराचा एक कडा दुभंगून समुद्रात कोसळला आणि प्रचंड वेगाने तो लाव्हारस जवळ जवळ सत्तर फूट उंचीवरून समुद्रात पडायला लागला. जणू आगीच्या बंबातील रबरी नळीतून जोराने येणारा पाण्याचा फव्वारा!

तो दिवसही खास होता. ३१ डिसेंबर २०१६. सगळं जग नववर्षाच्या स्वागताला सज्ज होतं; परंतु निसर्गाने ही वेगळीच आतषबाजी सुरू केली. दोन महिने हा लाव्हाचा ओघ अविरत चालू होता. या किलुआच्या दुर्दम्य ऊर्जेला दाद द्यायला हवी. वयाची चाळीशी उलटून गेली तरी खदखदतोय पठ्ठ्या! त्याचं रक्त अधूनमधून खवळतं आणि डोंगरांच्या भेगांमधून स्त्रवत राहतं. साधारणपणे आपल्या डोळ्यासमोर येतं ते जिभल्या चाटत मार्गात येईल त्याला गिळंकृत करणारं ज्वालामुखीचं रौद्र रूप. परंतु तो गडद केशरी रंगाचा लाव्हा, कभिन्न काळ्या सच्छिद्र खडकांमधून पाझरत समुद्रात विलीन होतो हे दृश्य अतिशय विलोभनीय असतं. एका छोट्याशा बोटीत बसून अवघ्या पन्नास फुटांवरून आम्ही तो नेत्रदीपक आणि अनुपम निसर्गसोहळा अनिमिष नेत्रांनी पाहिला. लाव्हा ट्यूबमधून ओसंडून वाहणारा लाव्हा पाहायला मिळाला नाही तरी केशरी रंगाची ही होळी पाहायला मिळणं हे आमचं भाग्यच! सध्या हा समुद्रातील ओघ बंद असला तरी खदखदणारा ज्वालामुखीचा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो.

उगवत्या सूर्याच्या लालीशी स्पर्धा करणाऱ्या लाव्हाचं दर्शन सूर्यनारायणाच्या साक्षीनं घ्यावं म्हणून भल्या पहाटे, खवळलेल्या समुद्राचे तडाखे खात वेगानं मार्गक्रमण करणाऱ्या बोटीत आम्ही बसलो. रेलिंगवरील हाताची पकड थोडी ढिली झाली असती, तर घरंगळलो असतो एखाद्या गोटीसारखे, बोटीच्या डावीकडून उजवीकडे. अर्धा तास ही रोमहर्षक सफर अनुभवली. गंतव्यस्थानापासून काही अंतरावर असताना तिथे पांढऱ्या वाफेचा लोट दिसू लागला. बोट आणखी जवळ जाताच काळ्या खडकावरची ती गडद केशरी रेघ उठून दिसली. आता वाफेचा पडदा दूर सरला होता. समुद्राकाठच्या खडकाळ टेकडीनं समुद्राशी झटापट करताना आपल्या बुरुजाच्या सगळ्या खिडक्या उघडल्या. सगळीकडून लाव्हा गळत होता. त्याचा पाण्याशी संपर्क आला की ‘चुर्रर्र’ असा आवाज येई. पुन्हा पांढऱ्याशुभ्र वाफेचा फुलोरा फुलून येई. त्या पडद्याआड दडलेला लाव्हा आपली समशेर बाहेर काढून जीवानिशी समुद्रावर तुटून पडे. पाण्यात पडल्यावर कधीतरी चुर्रर्रऐवजी सापाच्या फुत्कारासारखा आवाज ऐकू येई; तर कधी लाह्या फुटाव्यात तसा फटफट आवाज करत लाव्हा वर उसळी मारे. त्यातल्या खडकांचे छोटे छोटे तुकडे आणि लाव्हाच्या ज्वाला याचा पाऊस समुद्रात पडे. दिवाळीतल्या अनारची किंवा आकाशात फुटलेल्या फटाक्याच्या खाली पडणाऱ्या ठिणग्यांची आठवण व्हावी असा हा सडा! समुद्राचं खारं, थंड पाणी आणि अतिउष्ण लाव्हा एकमेकांना भिडले की रासायनिक प्रक्रिया होऊन हलकासा स्फोट होतो. पाण्यानं थंड होत असलेल्या लाव्हा खडकांचे तुकडे आणि ॲसिडयुक्त वाफेचे लोट आकाशाकडे झेपावतात आणि मग ते खडक समुद्रात पडतात.

ही अद्भुत दिवाळी पाहत असताना रविराज उगवले. लाव्हाच्या प्रतिबिंबाच्या नागमोडी लाटा आमच्या बोटीपर्यंत येत होत्या. कप्तानाच्या मदतनीसानं बादलीनं समुद्रातील पाणी उपसलं. हात बुडवून पाहिलं तर चांगलंच गरम होतं. लाव्हाचं तापमान असतं सातशे ते बाराशे डिग्री. समुद्राच्या गार पाण्यात पडून ते उतरलं तरी पाणी गरम असतंच. बोटीची निघायची वेळ झाली. आम्ही एकमुखानं ज्वालामुखी देवी ‘पेले माता’ हिचे ‘महालो’ म्हणत आभार व्यक्त केले आणि काय आश्चर्य! तिने प्रसन्न होऊन आम्हाला एक ‘क्लायमॅक्स सीन’ दाखवला. खडकांच्या नवीन खिडक्या उघडल्या आणि त्यातून किरमिजी रंगाचा लाव्हारस ओघळू लागला. अधिक चिकट आणि घट्ट! जणू रबराच्या झाडातून गळणारा चिक! स्लो मोशनमध्ये टपकणारा तो लाव्हा आणि बोटीमुळे हिंदकळणाऱ्या पाण्यात पडलेलं त्याचं प्रतिबिंब अप्रतिम दिसत होतं. शालेय जीवनात मराठीतील अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण देताना ‘समुद्राला आग लागली’ अशी वाक्य वाचलेली आठवतात. इथे मात्र ती अतिशयोक्ती नसून आम्ही प्रत्यक्ष तो वडवानल पाहत होतो.

हवाईमधील स्थानिक लोक ज्वालामुखीची देवी पेलेला भक्तिभावाने पूजतात. पेलेची कहाणी सुरू होते ताहिती या हवाई बेटसमूहातील एका बेटावरून. पृथ्वीदेवता ‘हाउमेची’ या कन्येला जन्मतःच अग्नीचं आकर्षण; तर विरुद्ध स्वभावाच्या तिच्या धाकट्या बहिणीला, जलदेवता ‘नमाका’ला त्याचं वावडं. पेले अग्नी चेतवून ज्वालामुखीचा उद्रेक करते, तेव्हा नमाका तिच्या भरतीच्या लाटांनी त्याला विझविण्याचा प्रयत्न करते. हे हाडवैर त्यांच्या जन्माला पुरलेलं. त्याला कंटाळून त्यांची आई पेलेला एका तराफ्यात बसवून दूरदेशी पाठवून देते. पेले तिथे वस्ती करण्याच्या विचाराने समुद्रावर आपली जादूची कांडी आपटते आणि ज्वालामुखी प्रकट करते. बहीण नमाका तिच्या मागावर असतेच. उंच समुद्रलाटांनी ती पेलेचं घर उलथवून टाकते. हे असं चालूच राहतं. पळता भुई थोडी झालेली पेले, शेवटी आज जिथे बिग आयलंड आहे त्या जागी येते. तिच्या आज्ञेने समुद्रात लुप्त झालेला किलुआ ज्वालामुखी उंच उसळी मारून बिग आयलँडची जमीन जन्माला घालतो. प्रचंड उंची असलेल्या किलुआचं मग नमाका काही वाकडं करू शकत नाही. पेलेच्या तापट स्वभावाची साक्ष मात्र आजही पटते. तिच्या मालकीच्या या बेटावरील एक इवलासा दगडही कुणी उचलून स्वदेशी घेऊन जायचा प्रयत्न केला तर तिचा थयथयाट सुरू होतो. भूकंपानं जमीन हलू लागते आणि लाव्हाच्या उसळ्या वाढतात. इतकंच नव्हे, तर दूरदेशी असलेल्या त्या व्यक्तीवर तिची वक्रदृष्टी पडून त्यांच्यावर आपत्तीचे डोंगर कोसळतात. अशा पश्चात्तापदग्ध पर्यटकांनी पोस्टाने ते दगड पेलेला साभार परत केले आहेत आणि त्याबरोबर एक क्षमापत्रही !

पेलेची पुराणकथा हवाई बेटांच्या जन्मकहाणीशी कशी जुळते पाहा. समुद्रतळाशी असलेल्या पृथ्वीच्या कवचाला भेदून बाहेर पडणाऱ्या मॅग्मामुळे या बेटांचा जन्म झाला. पृथ्वीच्या टेक्टॉनिक तबकड्यांपैकी पॅसिफिक तबकडीच्या मध्यभागी असलेल्या अतिउष्ण बिंदूतून हा लाव्हा बाहेर आला. पॅसिफिक तबकडी सरकली तेव्हा हा अतिउष्ण बिंदूही तिच्याबरोबर सरकला. अर्थातच जुन्या बेटांवरील ज्वालामुखी विझून आता तो नव्या जागी येऊन फुटला. येथील सर्वात जुनं बेट पन्नास लाख वर्षांपूर्वीचं आहे आणि सर्वात तरुण पाच लाख वर्षांपूर्वीचं. पेलेच्या गोष्टीत हाच क्रम आहे. काऊई बेटापासून सुरुवात करत नवनवीन बेटं जन्माला घालत ती आज किलुआच्या जागृत ज्वालामुखीच्या रूपात आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पुराणातील वानगी काही पुराणातच राहिलेली नाहीत, त्याला भरभक्कम शास्त्रीय आधार आहे.

लेखिका आणि ट्रॅव्हलर

medhaalkari@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in