

प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
घरात आपण अनेकदा ऐकतो- “तिच्या हाताला चव आहे.” ही फक्त पाककृतीची गोष्ट नसते; त्यामागे अनुभव, निगुती आणि खाणाऱ्यांविषयीची आपुलकी दडलेली असते. आजी-आईच्या हातच्या साध्या जेवणालाही जी खास चव असते, ती नेमकी कशामुळे येते, याचं हलक्याफुलक्या शब्दांत केलेलं हे सुंदर चित्रण.
आपण पूर्वीपासून ऐकत आलोय, “तिच्या हाताला चव आहे बरं का!” हे वाक्य. आता हाताला चव आहे म्हणजे हात चाटून पाहिलेला असतो का? तर नाही. त्या हातांनी बनवलेला कोणताही पदार्थ चवदार होतो, असा त्याचा अर्थ आहे. पुलंनी आपल्या एका पुस्तकात म्हटलंय, ‘आज्जीच्या हातच्या पुरणपोळीची चव आईच्या हाताला येत नाही आणि बायकोच्या हाताला तर नाहीच नाही.’ आता यामध्ये तुलना करण्याचा हेतू अजिबात नाही हा एक भाग आणि पुलंनी म्हटलंय असं लिहिल्यावर आपल्या मनातलं त्यांच्यावर टाकता येतं. असो, तर मुद्दा काय हात जितका ज्येष्ठ तितक्या पुरणपोळ्या चविष्ट. आता आजच्या पिढीतील एखादी सून म्हणेल, “काय तुम्ही हाताच्या चावीचं कौतुक सांगताय. आम्हीही करतोच की स्वयंपाक. आमच्या हाताला का चव नाही?”
हा प्रश्न अहो ना विचारल्यावर त्यांची काय हिंमत नाही म्हणण्याची. एक इंच आलं, सव्वा दोन चमचे तमुक आणि पाऊण चमचे अमुक अशा सहित्यानिशी पाककृती, पाकपारंगत, पाकसिद्धी, एका दिवसात पाकनिपूण अशी पुस्तकं वाचून जर पदार्थ होऊ शकत असता तर तो कुणाच्याही हातचा असो, चविष्टच लागला असता. आपल्या आज्या, पणज्या आणि अगदी आयांनीसुद्धा एखाद्या पदार्थाची पाककृती विचारल्यावर अशी मापं नाही सांगितली. लिंबाएवढा गुळ, उगीच जरासं बेसन, छटाकभर अमुक, चवीला साखर, बेताने पीठ अशा साहित्याने बनलेला त्यांच्या हातचा पदार्थ पहिल्या घासातच वा! झक्कास! ही दाद उत्स्फूर्तपणे घेऊन जायचा. लोणचं जसं मुरल्यावर आणखी चवदार लागतं तसे हे हात त्या स्वयंपाकात मुरलेले असतात. मग त्या हातांनी वरणाला फोडणी देऊन केलेली साधी डाळीची आमटी सुद्धा खमंगपणाचा स्वाद आणि चव घेऊनच वाफाळलेल्या भातावर अवतरते.
तर मंडळी, चविष्ट स्वयंपाक करणं हा एक भाग झाला, पण तो निगुतीने करणं हे फार महत्त्वाचं असतं. आता हे मी म्हणतोय याचा अर्थ मी उत्तम कुक आहे, स्वयंपाक किंवा एखादा पदार्थ मी अगदी आटोपशीर प्रकारे करू शकतो असा अजिबात नाही. इनफॅक्ट मी स्वयंपाक करू शकतो का? मुळात हा प्रश्न इथे वाजवी आहे.
तर, प्रत्येक घरातली गृहिणी (काही अपवाद वगळून) कशी अगदी व्यवस्थितपणे आधी स्वयंपाकाचा क्रम लावते. घरातील प्रत्येकाच्या फर्माईशींचा सुवर्णमध्य काढून आज काय रांधायचं याचा संपूर्ण आराखडा डोक्यात पक्का करते, मग त्या पदार्थांचा क्रम लावते आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते.
निगुतीने स्वयंपाक करण्यात हातखंडा असलेल्या गृहिणी पूर्वतयारी करताना, ओट्यावर जराही पसारा न करता काम आटोपत असतात. अर्थात पदार्थ शिजत टाकतानाच जोडीने त्यांची स्वच्छताही सुरू असते. म्हणजे कातणं, चिरणं, सोलणं, नारळाच्या कवडी म्हणा, भाज्यांचे देठं इत्यादी कचरा तातडीने डब्यात जातो. त्यांचा स्वयंपाक सुरू असताना कधीही आत शिरलं तरी स्वयंपाकघर अगदी नेटकं, स्वच्छ दिसून येतं. याला म्हणतात निगुतीने करणं. गृहिणीला विचारलं, “अजून किती वेळ आहे ग?” यावर लगेच उत्तर मिळतं,
“झालंच आता, दहा मिनिटांत गरम गरम पोळ्या करून पानं घेते...”
कडकडून भूक लागलेली असते आणि समोरच्या पानात गरमागरम अन्न उतरतं. भूक खवळून उठते आणि समोरच्या अन्नाचा कधी फन्ना उडतो लक्षातही येत नाही. आपण रिकामं झालेलं ताट ठेवायला येतो, त्यावेळी सगळं स्वयंपाकघर स्वच्छ चकचकीत झालेलं असतं.
आता याउलट पुरुषांची कथा, म्हणजे जगातले उत्तम कूक हे पुरुष आहेत असं म्हटलं जात असलं तरीही ते उत्तम गृहस्वामी आहेत का, हे सांगता येणार नाही.
तिच्या हाताची चव कश्शा कश्शाला नाही हे सत्य पुरुषांच्या बाबतीत नाही म्हटलं जात. म्हणजे अगदी साधे कांदे-बटाटे-पोहे करायला घेतले, तरी तिखटाचा डबा, मिठाची बरणी, साखरेचा डबा, मिरच्या कोथिंबिरीची देठं, कांदा-बटाट्याची सालं या सगळ्यांनी ओटा तुडुंब भरून गेलेला असतो. अगदी एखादा सोप्पा पदार्थ करायला घेतला, तरी त्यामध्ये घालायला लागणाऱ्या घटक पदार्थांचे डबे ओट्यावर, त्यांचं स्नेहसंमेलन असल्यासारखे मांडून ठेवलेले असतात. प्रत्येक घटक पदार्थ टाकण्यासाठी एक, यानुसार काढलेल्या चमच्यांच्या स्टँडवरचे सगळे चमचे किंचित रंग बदलून ओट्यावर हतबल होऊन वाकडेतिकडे पडलेले असतात. त्यातच एखादा डाव, झाकणी, वेळणी उलट्या पडलेल्या असतात. थोडक्यात ओट्यावर थोडीही जागा उरलेली नसते. बाजूच्या शेल्फवर टेकूसह तिरप्या उभ्या असलेल्या मोबाईलमध्ये यूट्यूबवरून सुरू असलेलं रेसिपी सादरीकरण कृतीच्या पुढे गेलेलं असल्यामुळे त्याला पॉज करून मागे आणायचं असतं. ते करताना मोबाईल शेल्फवरून ओट्यावर उडी मारतो, त्याच्या पडण्याने काहीतरी लवंडतं आणि त्यामध्ये ओटा न्हाऊन निघतो. सगळे डबेही उघडे राहून वैतागलेले असतात, एकदा काय ते पदार्थात पडून आणि बंद होऊन आम्हाला जागेवर जायला मिळूदे असं त्यांनाही मनापासून वाटत असतं. बरं, पुरुषाच्या हाताची त्यांना फारशी सवय नसते, त्यामुळे जिथून उतरलेले असतात तिथेच पुन्हा जातील याची शाश्वती नसते. चहाच्या पाल्याशेजारी वसणारा साखरेचा डबा अचानक गुळाशेजारी येतो, तर मिठाची गोरीपान बरणी अचानक काळ्या चहापाल्याला खेटून उभी राहते. कांदा-बटाट्याच्या कॅम्पसमध्ये रेललेल्या दोन हिरव्या मिरच्या, कढीलिंब अवतरतं आणि त्या दांडग्यांच्या मध्ये ती स्लिम ट्रिम मिरची आणि अशक्त पाला चेंगरून जातात. आपला शेजारी बदललेला किंवा आपल्यात कुणी अनाहुत आलेला त्यांना अजिबात आवडत नाही. सांडून किंवा उडी मारून निषेध व्यक्तही करतात आपला. कढईतल्या तेलात डोळे चुरचुरून सोनेरी झालेला कांदा, आपल्या जोडीदाराची वाट पाहून शिजलेला असतो. चांगला शिजण्यापूर्वीच हळद, तिखट, मीठ आपापल्या रंगाने त्याला रंगवून टाकत असतात. त्यामुळे चर्रऽऽ चर्रऽऽ आवाज करून तो आपला निषेध नोंदवत असतो, तर पोहे भिजून गोळा होऊन गारठलेले असतात आणि कधी एकदा गॅसवरच्या कढईत शिरून मोकळे होतोय याची वाट पहात असतात.
थोडक्यात काय, स्वयंपाकाचा, बनणाऱ्या पदार्थाचा आनंद घेणं बाजूला पडून फक्त यूट्यूब सांगत असलेले घटक पदार्थ त्यात पडत राहतात आणि या स्वयंपाक संघर्षातून काही एक पदार्थ तयार होतो, तो दिसतोही थोडाफार मूळ पदार्थासारखा, पण खाताना त्याला गृहिणीच्या हाताची चव मात्र येत नाही.
मुद्दा काय? रोजच्या हाताची चव पदार्थात उतरलेली नसते, फक्त पसाऱ्याने आणि विविध रंगाने ओटा, गॅस आणि आजूबाजूचा भाग भरून गेलेला असतो. पण यापेक्षाही स्वयंपाक बनवणाऱ्याची भावना जास्त जवळची असते. म्हणजे स्वयंपाक बनवताना खाणाऱ्यांनी चार घास जास्त खावेत या भावनेने तो बनलेला असतो. अर्थात कंटाळून केलेलं काहीच चांगलं होत नाही हे तर आपण जाणतोच. परंतु आपला कंटाळा थकवा बाजूला ठेवून सुग्रास स्वयंपाक एक स्त्रीच करू शकते. अशावेळी खुसपट न काढता दाद मिळाली की तिचं अर्ध पोट भरतं. आज उत्कृष्ट शेफ जरी पुरुष असले तरी ‘ती’च्या हाताची चव कश्श्या कश्श्यालाच नसते हे मात्र खरं.
लेखक, निवेदक, कवी
kprasad1959@gmail.com