

काव्यकट्टा
नीरजा
न्यायाच्या शोधात
सर्जनाचे सारे स्त्रोत
आटून जाताहेत आतल्या आत
गर्भाशयावर पडणाऱ्या अवकाळी
थापेच्या आवाजानं
कधी छिन्नविछिन्न होईल ते
या काळजीनं धास्तावलेल्या मुली
ओढून घेताहेत आपलं गर्भाशय खोल काळजात
आणि ठेवू पाहताहेत जपून स्वतःसाठी.
मुलींना आता वाटत तर नाही ना
करावीशी बंद
दारं गर्भाशयाची?
किंवा असंही वाटू शकेल त्यांना
असू नये लिंग
फाळासारखं रुतणारं जमिनीत
आपल्या आत वाढणार्या गर्भाचं
असावी निर्मिणारी योनीच केवळ.
गर्भाशय उखडून टाकणार्या हाताचं भय
वाढत गेलं मुलींच्या मनात
तर मुलीच संपवून टाकतील
निर्मितीच्या सार्या शक्यता.
मुलींना आता सांगाव्या लागतील गोष्टी
पुरुषातही लपलेल्या अपार मायेविषयीच्या
स्त्री आणि पुरुषात उमलून येणार्या अलवार नात्याविषयीच्या,
त्यांच्यातील संवादाच्या.
मुलींच्या हातातल्या
फडफडणाऱ्या मेणबत्तीभोवती
आता मुलांनाच धरावा लागेल हात
प्रकाशाच्या किरणांना वाचवायचं असेल तर!