

दृष्टिक्षेप
उत्तम जोगदंड
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विविधतेत एकता हा भारतीय संविधानाचा पाया होता, पण सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत धर्माधारित द्वेष वाढत असल्याचे दिसते. हा लेख या द्वेषामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांचा तपशीलवार अभ्यास करतो.
प्रजासत्ताक भारताचे दोन शब्दांत वर्णन करताना 'विविधतेत एकता' हे जादुई शब्द केवळ एका दशकापूर्वी मनाला किती आल्हाददायक वाटायचे ! इथल्या विविधतेचे पदर तरी किती ! स्वतंत्र भारतात सामील झालेली ५६२ संस्थाने, विविध धर्म, हजारो जाती, शेकडो भाषा, वेगवेगळी वेशभूषा, शारीरिक फरक, वेगवेगळ्या आहार पद्धती, वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती हे सारे घेऊन भारताची वाटचाल कशी होणार याची भीती त्या वेळच्या नेतृत्वाला नक्कीच वाटली असणार. परंतु संविधानाने धर्मनिरपेक्षतेचे, समतेचे, बंधुभावाचे मूल्य स्वीकारून या विविधतेला एका धाग्यात असे काही गुंफून टाकले की, देशाचा प्रत्येक नागरिक आपली व्यक्तिगत ओळख, आपले अधिकार जपून, इतरांचा आदर करून एक भारतीय म्हणून उभा ठाकला आणि गुण्यागोविंदाने नांदत देशाला प्रगतीच्या वाटेने पुढे घेऊन जाऊ लागला.
परंतु राजकीय स्वार्थापायी संविधानातील या मूल्यांना पद्धतशीरपणे सुरुंग लावण्यात देशविघातक शक्ती मोठ्या प्रमाणात यशस्वी होत असल्याचे भयावह दृश्य गेल्या काही काळात दिसून येत आहे. धार्मिक आधारावर मतांचे ध्रुवीकरण करून, अल्पसंख्यांक विरुद्ध बहुसंख्यांक अशी दरी निर्माण करून धर्मनिरपेक्षता, समता आणि बंधुभावाच्या मूल्यांची वासलात लावली गेली आहे. यातील सर्वात गंभीर बाब ही, की हे ध्रुवीकरण करताना अल्पसंख्यांकांविषयी द्वेष, तिरस्कार निर्माण करण्यासाठी केलेला दुष्प्रचार, व्हायरल केलेले फेक नरेटीव्ह आणि त्यांच्यावर उगारलेले बहिष्काराचे अस्त्र. याचा परिणाम असा झाला आहे की तळागाळातील सामान्य माणसापासून ते अगदी उच्चभ्रू, उच्च शिक्षित लोकांपर्यंतचा बहुसंख्य समाज अल्पसंख्यांकांचा तिरस्कार करू लागला आहे आणि अल्पसंख्यांक लोकांची एक नवीन 'अस्पृश्य जात' जन्माला येऊ घातली आहे की काय, अशी भीती वाटू लागली आहे. या द्वेषाने लोकांना एवढे अंध करून टाकले आहे की त्यांचे स्वतःचे जीवन-मरणाचे म्हणजे महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य हे प्रश्न त्यांना गौण वाटू लागले आहेत. देशाचे ऐक्य आणि एकात्मता तसेच आर्थिक स्थिती हे प्रश्न तर विचारात घ्यायची देखील त्यांना गरज भासत नाही.
एकीकडे हे चालले असताना देशाचे नेतृत्व मात्र अल्पसंख्यांक समाजासोबत फोटोसेशन करून त्या समाजाशी 'पुराना नाता' असल्याच्या दंतकथा सांगून, वसुधैव कुटुंबकम्च्या बाता मारून विश्वगुरू असल्याची बतावणी करत आहेत. यामुळे एका बाजूला अल्पसंख्यांक समुदायाच्या लोकांचे मॉब लिंचिंग, घरावर बुलडोझर, मतदार यादीतून त्यांची नावे काढून टाकणे, दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील नेतृत्वाकडून हेट स्पीचचा विखारी प्रचार, तर दुसऱ्या बाजूला नेतृत्वाकडून 'पुराना नाता' ची मलमपट्टी अशी देशाची अंतर्विरोध दर्शविणारी प्रतिमा जगाला दिसत आहे.
मांजर डोळे मिटून दूध पिते तेव्हा आपल्याला कोणी पाहत नाही असे तिला वाटते, अशा अर्थाचा आपल्याकडे वाक्प्रचार आहे. अल्पसंख्यांकांविरुद्ध द्वेषाचा, तिरस्काराचा आविष्कार दर्शविणाऱ्यांनी या मांजरासारखाच आपला समज करून घेतलेला असला तरी जग त्यांच्याकडे डोळे सताड उघडे ठेवून बघत आहे आणि त्याचे पडसाद विविध देशांत उमटत आहेत. विश्वगुरू म्हणवणाऱ्यांनी पेरलेल्या द्वेषाचा फैलाव होऊन आता त्याला द्वेषाची फळे लागली आहेत हे गेल्या काही काळात घडत असलेल्या घटनांवरून दिसून येईल. कारण, इथे अल्पसंख्यांकांना दडपल्याचा विकृत आनंद घेता येत असला तरी अन्य देशांत आपण अल्पसंख्यांक आहोत तर इथले अल्पसंख्यांक मात्र तिकडे बहुसंख्यांक आहेत याचे भान त्यांना राहिले नाही. त्यामुळे हा द्वेषाचा भस्मासुर आता त्यांच्यावरच उलटू लागला आहे.
अमेरिकन पत्रकार मॅट फॉर्नि याने सामाजिक माध्यमावर भारतीयांविरुद्धची पोस्ट करताना म्हटले होते, २०२६ सालामध्ये भारतीयांविरुद्ध तिरस्कार परमोच्च बिंदूवर असेल. परिणामी हिंदूंवर हल्ले होतील, त्यांना वेगळे पाडून हिंसा केली जाईल, त्यांच्या मालकीच्या व्यवसायाची नासधूस केली जाईल, हिंदू मंदिरांवर बॉम्ब टाकले जातील आणि त्यांच्यावर स्वैर गोळीबार केला जाईल. आपण हिंसाचाराच्या विरोधात असून सर्व भारतीयांना देशातून हाकलल्यास हा हिंसाचार टळेल, असा कुतर्क त्याने लढवलेला आहे. त्यास सोशल मीडियात प्रचंड विरोध झाल्यावर त्याने आपली पोस्ट काढून घेतली.
न्यूझीलंडमध्ये ऑकलंड येथे शीख समुदाय कीर्तनासाठी त्यांच्या गुरुद्वारामध्ये एकत्र जमला असताना तिथल्या स्थानिकांनी 'हा न्यूझीलंड आहे, भारत नाही' अशा अर्थाचे बॅनर्स घेऊन रॅली काढली आणि हका नावाचे पारंपरिक नृत्य करून भारतीयांविषयी निषेध नोंदवला होता. दोन-तीन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया येथे भारतीयांविरुद्ध बरीच निदर्शने झाली आणि भारतीयांना 'गो बँक' असा संदेश देण्यात आला.
भारतात कट्टर हिंदुत्ववादी सरकार आल्यापासून, एरव्ही परदेशात इभ्रतीने आणि त्या देशांची शिस्त पाळून राहणाऱ्या परदेशातील हिंदू बांधवांमधील (एनआरआय आणि मूळ भारतीय असलेले तिथले नागरिक) हिंदुत्व देखील कट्टर होऊ लागले आहे. सणावाराला इकडे जसा धुडगूस घातला जातो तसा तिकडे घालायला देखील त्यांनी सुरुवात केली आहे. वेळीअवेळी मोठा आवाज करणारे फटाके फोडणे, मोठे स्पीकर लावून गोंगाटी मिरवणुका काढणे आणि रस्ते अडविणे, तिथल्या तलावात, नदीत गणपती विसर्जन करणे हे प्रकार आता तिकडे सुरू केले गेले आहेत. त्या विरुद्ध इंग्लंड, अमेरिकेत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत आणि निदर्शने होऊ लागली आहेत. त्यात भर घातली आहे भारतीय पर्यटकांनी. यामुळे भारतीयांविषयीचा तिरस्कार वाढू लागला आहे. अन्य देशातील स्थलांतरित लोकांविषयी युरोप-अमेरिकेतील स्थानिकांच्या भावना वेगळे वळण घेऊ लागल्या असताना भारतात अल्पसंख्यांकांविरुद्ध होत असलेल्या हिंसाचारामुळे त्यांचा भारतीय विरोध टोकदार होऊ लागला आहे.
या परिस्थितीत विविध माध्यमांमध्ये भारतीयांविरुद्ध शक्यतेवढा द्वेष, तिरस्कार व्यक्त होताना दिसत आहे. अशातच भारतीयांचे अत्यंत एकांगी आणि हिडीस चित्र दर्शविणारा 'इंडिया द वर्स्ट कंट्री ऑन अर्थ' हा माहितीपट पुन्हा एकदा उसळी मारून वर आला आहे आणि तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा माहितीपट सुरुवातीपासूनच भारताचे एवढे नकारात्मक चित्र उभे करतो की, तो दहा मिनिटांच्या पुढे बघवत देखील नाही. आपण भारतीय या नात्याने त्याकडे दुर्लक्ष केले तरी भारतीयांविरुद्ध जिथे जिथे असंतोष आहे तिथे तिथे हा माहितीपट मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यामुळे भारतीयांविरुद्धच्या द्वेषाच्या आगीत तेल ओतले गेले आहे.
आपल्या संविधानात असलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मानवतेची मूल्ये आहेत, माणसांना जोडणारी मूल्ये आहेत. द्वेषाला त्यात अजिबात स्थान नाही. द्वेषाने द्वेषच वाढतो आणि सुपात असलेले आपण नंतर जात्यात जाणारच आहोत हे वरील विवेचनावरून लक्षात येईल. २०२६ सालात या द्वेषाला गाडून टाकण्याचा आणि संविधानातील मानवी मूल्ये जपण्याचा संकल्प आपण सारे करू या.
uttamjogdand@gmail.com