नगरसेवक कसा असावा?

नगरसेवक कसा असावा? रंजल्या गांजल्या, अडल्या नाडल्यांच्या मदतीला धावून जाणारा. आपल्या प्रभागातील प्रश्नांचे प्राधान्यक्रम निश्चित करून ते सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत, कायदेशीर व कालबद्ध उपाययोजना करणारा. महापालिकेच्या सभांमध्ये आपले विषय मुद्देसुदपणे मांडून प्रशासनाच्या माध्यमातून ते सोडविणारा.
नगरसेवक कसा असावा?
नगरसेवक कसा असावा?
Published on

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

नगरसेवक कसा असावा? रंजल्या गांजल्या, अडल्या नाडल्यांच्या मदतीला धावून जाणारा. आपल्या प्रभागातील प्रश्नांचे प्राधान्यक्रम निश्चित करून ते सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत, कायदेशीर व कालबद्ध उपाययोजना करणारा. महापालिकेच्या सभांमध्ये आपले विषय मुद्देसुदपणे मांडून प्रशासनाच्या माध्यमातून ते सोडविणारा. समाजापुढे विधायक व रचनात्मक कार्याचा आदर्श रचून शहरवासीयांच्या धकाधकीच्या जीवनात तीळगुळाप्रमाणे गोडवा निर्माण करणारा.

मुंबई महानगरपालिकेला अभ्यासू व कार्यसम्राट नगरसेवकांची मोठी परंपरा आहे. ही महापालिका म्हणजे राज्यकर्त्यांची प्राथमिक कार्यशाळाच जणू. त्यातूनच अनेक नगरसेवकांची कारकीर्द बहरली आहे. काहींनी विधानसभा, तर काहींनी संसद गाजवली. कित्येक नगरसेवकांनी मुंबई, राज्यच नव्हे, तर देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. आपल्या पूर्वसुरींनी विधायक कार्याचे जे आदर्श घालून दिले, त्याच पाऊलवाटेवरुन चालताना आपल्याला समाजसेवक म्हणून नेमके काय करायचे आहे, हे डोळ्यासमोर ठेवून त्याचा कालबद्ध कृती आराखडा प्रत्येक उमेदवाराने तयार करण्याची गरज आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेले मुंबईचे पहिले मराठी महापौर स. का. पाटील यांनी तब्बल तीन वेळा महापौरपद भूषविले. त्यांचा हा विक्रम आजही अबाधित आहे, हे विशेष. एकेकाळी मुरली देवरा हे शिवसेनेच्या मदतीने महापौर झाले. शिवसेनेचे पहिले महापौर होते डॉ. हेमचंद्र गुप्ते. त्यानंतर मुंबईत मराठी महापौर होण्याची रीघच लागली. छगन भुजबळ यांनी मुंबईचे महापौरपद दोन वेळा पटकावले. एकाचवेळी ते नगरसेवक होते व आमदारही. त्यांनीच गेट वे ऑफ इंडियाजवळ ‘बॉम्बे’ऐवजी ‘मुंबई’ची पाटी लावली व ती आजही मराठीमनाच्या अभिमानाचा विषयी ठरली आहे.

मनोहर जोशी यांनी केवळ मुंबईचे महापौर महापौरपदच पटकावले नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री होऊन केंद्रात मंत्रीही झाले. त्यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा सर्वोच्च बहुमान प्राप्त केला. नारायण राणे यांनी बेस्ट समिती गाजवलीच नाही, तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व त्यांनीही केंद्रात मंत्रीपद मिळवले. शरद आचार्य यांच्या काळात मुंबईच्या सीमेवरील चेंबूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. नगरसेवकांचा उच्च विद्याविभूषित चेहरा म्हणजे प्रिन्सिपल वामनराव महाडिक. सुसंस्कृत व तत्वनिष्ठ प्रा. सदानंद वर्दे यांच्यानंतर तितक्याच ताकदीचे सुधीर जोशी राज्याचे शिक्षण मंत्री झाले. दिवाकर रावते यांनी महापालिकेतच नव्हे, तर मंत्रालयाचे मराठीकरण करून मंत्रालयाला पत्ता मिळवून दिला. दत्ताजी नलावडे हे पुढे राज्य विधानसभेचे अध्यक्ष झाले. अनंत गीते हे खासदार होऊन केंद्रात मंत्री झाले. त्यांच्या पाठोपाठ राहुल शेवाळे हे देखील थेट खासदार झाले. साधा सज्जन महापौर म्हणून महादेव देवळे यांचे नाव आजही सर्वतोमुखी कायम आहे. अंधेरीचे शांताराम आंब्रे, पांडुरंग आंब्रे झाडाखाली थांबून जनतेची गाऱ्हाणी ऐकत. म्हणूनच ते ‘झाडवाले बाबा’ म्हणून विभागात परिचित होते.

राजाभाऊ चिंबुलकर, आर. आर सिंह, रा. ता. कदम, रामदास नायक, प्रेमकुमार शर्मा, चंद्रकांत पडवळ, शांताराम चव्हाण, रमेश जोशी, सुरेश खाड्ये, सरदार तारासिंग, चंद्रकांत हंडोरे, रवींद्र पवार, नंदू साटम, विश्वनाथ नेरुरकर, दिगंबर कांडरकर, पुष्पकांत म्हात्रे, अरुण देव, सुनील प्रभू, बशीर पटेल, सुहेल लोखंडवाला यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महापालिका गाजवली. हरेश्वर पाटील, रामकृष्ण केणी, मोतीराम तांडे, शैलेश फणसे आदींनी पालिकेत जाऊन सामाजिक कार्याला नवे आयाम दिले. रणरागिणी अहिल्या रांगणेकर, लाटणेवाल्या बाई मृणाल गोरे, इंदुमती पटेल, अलका देसाई, पुष्पा वागळे, कमल देसाई, निर्मला सामंत प्रभावळकर, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, शुभा राऊळ, स्नेहल जाधव, स्नेहल आंबेरकर, किशोरी पेडणेकर यांनी नगरसेविका म्हणून आपली कारकीर्द घडवली.

गिरगावात एक नगरसेवक होते आणि लवकर ते भल्या पहाटे स्कुटरवरून संपूर्ण प्रभाग फिरायचे व मग सफाई कामगारांच्या चौक्यांवर जायचे. तेथील मुकादमांना कुठे गटार तुंबलेय, कुठे कचरा साचलाय याच्या सूचना द्यायचे. त्यामुळे त्यांच्या काळात गिरगावचे रस्ते स्वच्छ व सुंदर दिसायचे. आणखी एक नगरसेवक होते सोहन सिंग कोहली. ते आपल्या छोट्याशा चंद्रमौळीत वर्षानुवर्ष राहत होते. ते आपला प्रवास बेस्ट बसमधूनच करायचे. साधी राहणी, उच्च विचारसरणी हीच त्यांची खासियत होती. रुस्तम तिरंदाज हे पारसी व कायद्याचे अभ्यासक असलेले नगरसेवक महापालिकेच्या सभागृहात मुंबईकरांच्या ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवायचे.

या पूर्वसुरींचे कार्य लक्षात घेता, नगरसेवक कसा असावा तर तो जनतेचे प्रश्न शांतपणे ऐकून घेणारा. त्यांच्यासाठी वेळ देणारा. त्यांच्या प्रश्नांवर तज्ज्ञांचे, जाणकारांचे मत घेऊन त्यांचा पाठपुरावा करणारा. ते प्रश्न कालबद्धरित्या कसे सुटतील हे पाहणारा. नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील संभाव्य प्रश्नांची यादी तयार करायला हवी. ते प्रश्न सोडवण्याआधी त्यांचे प्राधान्यक्रम ठरवायला हवेत. त्यानंतर त्यापैकी चुटकीसरशी सुटणारे प्रश्न कोणते, कोणत्या प्रश्नांना दीर्घ काळ लागेल याची माहिती घ्यायला हवी. या सर्व बाबी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना देऊन ती स्थानिकांपर्यंत पोहोचवायला हवी. त्यातूनच आपल्या विभागातील प्रश्नाविषयी सामान्य नागरिक सजग राहतील.

नगरसेवकांनी स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांची एक टीम निर्माण करायला हवी. या टीमला शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी, रुग्णालय, पोलीस ठाणे, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, शववाहिनी, स्मशानभूमी याविषयीची ताजी माहिती द्यायला हवी. तसेच नागरिकांना नियमित भेटून त्यांना भेडसावणाऱ्या दैनंदिन प्रश्नावर आवाज उठवायला हवा. आपल्या विभागातील अधिकाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक ठळक दिसतील अशा ठिकाणी लावायला हवेत. आजकाल प्रदूषित हवेचे मोजमाप करणारे डिजिटल बोर्ड काही ठिकाणी लागले आहेत व तसेच बोर्ड आपल्या विभागात लावून प्रदूषणाबाबत आपण किती दक्ष आहोत हे दाखवून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

आपल्या प्रभागात कुठे कुठे झाडे लावता येतील याचा अंदाज घेऊन पावसाळ्याआधी वृक्षारोपणाचा धडक कार्यक्रम राबवायला हवा. आपल्या विभागात चोऱ्या, गुन्हे होऊ नये व झाल्यास त्याची पोलिसांना मदत होईल अशा पद्धतीने सीसीटीव्हीची व्यवस्था उपलब्ध करायला हवी. आपल्या विभागात किती शाळा आहेत, किती महाविद्यालय आहेत, किती रुग्णालय आहेत, किती स्वयंसेवी संस्था आहेत याची खडान‌्खडा माहिती घेऊन त्यांच्या माध्यमातून आपल्या विभागातील शाळांचे प्रश्न कोणते आहेत ते लक्षात घेत, शाळेतील विद्यार्थी पालक शिक्षकांचे प्रश्न समजून त्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

प्रत्येक नगरसेवकाने पालिकेतील सभांना नियमित हजेरी लावायला हवी. त्याचप्रमाणे आपल्या कार्यालयात दररोज किमान दोन तास हजर राहून नागरिकांची दैनंदिन गाऱ्हाणी ऐकून घ्यायला हवीत. आपल्या विभागातील नागरिकांना पुरेसा वेळ द्यायला हवा. राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्याशी मोबाईल फोनवरून कुणाही नागरिकाला केव्हाही संवाद साधता येत असे. ते कुणाचाही फोन अगदी सहजगत्या उचलत असत. त्यामुळे सामान्यतः सामान्य नागरिकांच्या व्यथा वेदना काय आहेत याची त्यांना पुरेपूर खबरबात मिळत असे. अशाप्रकारे प्रत्येक लोकप्रतिनिधी हा सदैव नागरिकांच्या थेट संपर्कात हवा.

या मुंबईचे आपण मालक नव्हे तर विश्वस्त आहोत ही भावना नगरसेवकांमध्ये असणे गरजेचे आहे. त्यांनी सदैव सेवेसी तत्पर राहायला हवे. राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये नगरसेवकांमध्ये निकोप स्पर्धा असावी, तुलना व्हायला हवी, तीसुद्धा त्यांच्या चांगल्या कामाची, शहकाटशहची नव्हे. मुख्य म्हणजे किती वेळा नगरसेवकपद भूषवल्यावर थांबायचे हेही प्रत्येक नगरसेवकाने आधीच ठरवायला हवे व त्यातच त्यांचा मानमरातब सामावलेला आहे हेही लक्षात घ्यायला हवे. नगरसेवकपद हे जनकल्याणाचे साध्य असायला हवे, श्रीमंत होण्याचे साधन नव्हे. आपल्या कृतीशील विचारांमधून व विधायक कार्यातून जेव्हा प्रत्येक नगरसेवकांच्या सामाजिक कार्याची कीर्ति सर्वतोमुखी होईल, तोच असेल शहरवासीयांसाठी सुदिन.

prakashrsawant@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in