हसरे, चमत्कारिक पण खरे!

बालमित्रांनो, तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, की चकली सरळ केली तर ती किती लांब होईल? किंवा गाईला झेब्रासारखे पट्टे काढले तर काय होईल? असे प्रश्न ऐकून मोठ्यांना हसू येईल; पण काही जिज्ञासू मंडळी अशाच प्रश्नांवर संशोधन करतात. त्यांच्या भन्नाट शोधांना मिळतो एक खास पुरस्कार- ‘इग नोबेल’! चला, जाणून घेऊया या भन्नाट पुरस्काराची मजेशीर गोष्ट!
हसरे, चमत्कारिक पण खरे!
हसरे, चमत्कारिक पण खरे!
Published on: 

नवलनगरी

सोनाली कोलारकर-सोनार

बालमित्रांनो, तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, की चकली सरळ केली तर ती किती लांब होईल? किंवा गाईला झेब्रासारखे पट्टे काढले तर काय होईल? असे प्रश्न ऐकून मोठ्यांना हसू येईल; पण काही जिज्ञासू मंडळी अशाच प्रश्नांवर संशोधन करतात. त्यांच्या भन्नाट शोधांना मिळतो एक खास पुरस्कार- ‘इग नोबेल’! चला, जाणून घेऊया या भन्नाट पुरस्काराची मजेशीर गोष्ट!

काय बालमित्रांनो, धमाल केली ना दिवाळीत? मस्तच! सण मग तो कोणत्याही धर्माचा, देशाचा असो, तो साजरा करताना तिथल्या स्थानिकांना फार मोठा आनंद मिळत असतो. लहानपणी तर छोटंसं कारणही हसायला पुरेसं असतं! आता या दिवाळीत चिनू आणि कंपनीने गुंडाळलेली चकली सरळ केली, तर तिची लांबी किती असते, हे मोजण्याचे उपद्व्याप केले आणि लोटपोट हसले! मोठ्यांचं लक्ष गेलं, तर चक्क त्यांनाही हसू आवरेना! पण त्यातही चिनू म्हणाला की, एक चकली किती सेंटीमीटरची असते, हे कळलं आणि त्यांचं वजन केलं, तर अशा सगळ्या चकल्या सारख्या आकाराच्या केल्या, तर त्या भरून ठेवायला अगदी नेमका, बरोबर डबा तयार करता येईल आणि दुकानदारांना किंवा घरीदेखील सोयीचं होईल! सगळे म्हणाले, अरे वा चिनू! बंड्या म्हणाला, वा मिस्टर चिनू, या संशोधनासाठी तुला ‘इग नोबेल पुरस्कार’ बहाल करण्यात येत आहे! आणि त्याने चिनूला एक चकली पुरस्कार म्हणून आणून दिली!!

सगळे हसले आणि म्हणाले, हा कोणता पुरस्कार? बंड्या म्हणाला, मंडळी, काही शोध हे आधी हसवतात, काहीही काय! असंही म्हणायला लावतात आणि मग विचार करायला लावतात की, हो खरंच की, असं असू शकतं! तर अशा शोधांना इग (IG) नोबेल पुरस्कार देतात! हा पुरस्कार म्हणजे प्रतिष्ठित अशा नोबेल पुरस्काराचा विनोदी आणि उपरोधिक पुरस्कार आहे. याचं घोषवाक्य आहे, ‘ही संशोधनं प्रथम लोकांना हसवतात, मग विचार करायला लावतात!’

१९९१ मध्ये ‘ॲनल्स ऑफ इम्प्रोबेबल रिसर्च’ (Annals of Improbable Research) या विनोदी विज्ञान मासिकाचे संपादक मार्क अब्राहम्स यांनी याची पहिल्यांदा सुरुवात केली. ‘इग नोबेल’ हे नाव ‘नोबेल’ आणि ‘इग्नॉबल’ या शब्दांच्या साधर्म्यातून तयार झाले आहे. तसेच आल्फ्रेड नोबेल यांच्या ‘इग्नॅशियस नोबेल’ नावाच्या काल्पनिक चुलतभावाच्या नावावरून हे नाव दिल्याचे मानले जाते. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात, खऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा होण्यापूर्वी हे पुरस्कार प्रदान केले जातात. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, शांती, अर्थशास्त्र, साहित्य, वैद्यकशास्त्र अशा १० वेगवेगळ्या शाखांमध्ये हे पुरस्कार दिले जातात.

आणि महत्त्वाचं म्हणजे, विजेत्यांना हे पुरस्कार खऱ्याखुऱ्या नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या हस्ते दिले जातात. कारण या पुरस्कार देण्यामागे विज्ञानाला उपहासाने हिणवणं हा हेतू नसून, सामान्य लोकांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाबद्दल कुतूहल आणि रुची निर्माण करणं हा आहे. विचित्र, अजब आणि पहिल्यांदा ऐकायला हसण्यासारखी वाटणारी, पण तरीही खरी वैज्ञानिक संशोधनं यासाठी निवडली जातात. आहे ना गंमत? पुरस्कार प्रदानाच्या वेळी कागदाची विमाने उडवून एक मिनिटात संशोधकाला आपला शोध सांगावा लागतो. भारतीयांनादेखील हा पुरस्कार मिळाला आहे आणि हे शोध महत्त्वाचे देखील मानले जातात.

बंगळुरू येथील ‘इनस्टेम’ संस्थेचे संचारी बॅनर्जी, सुब्रमण्यम रामास्वामी आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय चमूला हा पुरस्कार मिळाला आहे. ‘पॅसिफिक बीटल झुरळाच्या’ दुधातील प्रथिनांचे स्फटिक गाईच्या दुधापेक्षा तीन पट जास्त ऊर्जा देतात, असा शोध त्यांनी लावला आहे. अभियांत्रिकी डिझाइनमध्ये भारतीय विकास कुमार आणि सार्थक मित्तल यांना हा पुरस्कार मिळाला होता. दुर्गंधीयुक्त बुटांमुळे शू-रॅक वापरण्याच्या अनुभवावर कसा परिणाम होतो, याचं त्यांनी सखोल विश्लेषण केलं होतं तर जपानच्या टोमोकी कोजिमा यांनी गाईंच्या अंगावर झेब्रासारखे काळे-पांढरे पट्टे रंगवल्यास त्यांना चावणाऱ्या माशांचा त्रास लक्षणीयरीत्या कमी होतो, हे प्रयोगातून सिद्ध केलं. सर आंद्रे गीम यांनी तर इतिहासच रचला! यांना २००० मध्ये चुंबकाच्या मदतीने जिवंत बेडूक हवेत तरंगवण्यासाठी ‘इग नोबेल’ मिळालं होतं. पुढे २०१० मध्ये त्यांना ग्राफीनवरील संशोधनासाठी खऱ्याखुऱ्या भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला. आहे ना नवल?

मग आवाज न करणारे आणि चक्क प्रदूषण कमी करणारे, पण उलट खूप मजा येईल, हसू येईल असे फटाके तयार करायला काय बरं करता येईल, म्हणजे बघा, इग पुरस्कार वाट बघतो आहे!!

पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक

sonalikolarkarsonar@ gmail.com