भाषा अनेक, पण मातृभाषा एकच..?

मातृभाषा ही मानवी विचार, भावना आणि संस्कृतीचा आधारस्तंभ असून, २१ फेब्रुवारी हा दिवस तिच्या संवर्धनासाठी आणि भाषिक अस्मितेच्या गौरवार्थ साजरा केला जातो.
भाषा अनेक, पण मातृभाषा एकच..?
भाषा अनेक, पण मातृभाषा एकच..?
Published on

साधक-बाधक

क्रांती गोडबोले-पाटील

मातृभाषा ही मानवी विचार, भावना आणि संस्कृतीचा आधारस्तंभ असून, २१ फेब्रुवारी हा दिवस तिच्या संवर्धनासाठी आणि भाषिक अस्मितेच्या गौरवार्थ साजरा केला जातो.

माणूस हा निसर्गातील एकमेव प्राणी आहे ज्याला भाषेचं वरदान लाभलं आहे. हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो. आपण व्यक्त व्हायला सुरुवात करतोच ती आपल्या मातृभाषेपासून.

"माझी माय सरस्वती, तिच्या कृपेचा पाझर... तुझ्या मायबोलीतूनी, येई अमृताचा दरवळ..." या ओळींमधून वाहणारी आत्मियता केवळ शब्दांची रचना नाही, तर ती आपल्या मुळांशी असलेल्या घट्ट नात्याची साक्ष आहे. २१ फेब्रुवारी हा 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो, तेव्हा त्यामागे केवळ एक औपचारिक दिनविशेष नसून भाषेसाठी सांडलेल्या रक्ताचा इतिहास आणि मानवी मेंदूच्या विकासाचं शास्त्र दडलेलं आहे. १९५२ साली ढाका विद्यापीठातील तरुणांनी आपल्या बंगाली भाषेच्या हक्कासाठी दिलेले बलिदान हे जगाच्या इतिहासातील एक दुर्मिळ उदाहरण आहे, ज्याने सिद्ध केलं की, माणूस आपल्या प्राणांपेक्षाही आपल्या भाषेला अधिक महत्त्व देतो.

भाषा हे केवळ संवादाचं माध्यम नसून ती मानवी संस्कृतीचा आरसा, विचारांचं वाहन आणि भावनांची अस्खलित अभिव्यक्ती असते. दुःख झाल्यावर तोंडातून निघणारे उत्स्फूर्त शब्द, आनंदात गायलेले गाणं किंवा रागाच्या भरात उमटलेले स्वर हे नेहमी मातृभाषेतूनच सर्वाधिक प्रभावीपणे व्यक्त होतात. मानवी जीवनात मातृभाषेचा प्रवास हा शाळेच्या पायरीपासून नव्हे, तर आईच्या गर्भातूनच सुरू होतो. विज्ञानाने हे अधोरेखित केलं आहे की, सात-आठ महिन्यांचं गर्भस्थ बाळ बाहेरील ध्वनी टिपू लागतं, ज्यात आईच्या आवाजाची लय आणि तिचे शब्द त्याला सर्वाधिक स्पष्टपणे ऐकू येतात.

मानवी मेंदूमध्ये भाषेसाठी दोन महत्त्वाचे विभाग कार्य करत असतात, ज्यांना आपण 'वर्निक' आणि 'ब्रोका' या शास्त्रज्ञांच्या नावावरून ओळखतो. 'वर्निक' हा भाग प्रामुख्याने भाषेचं आकलन करण्याच्या कामात गुंतलेला असतो. बाळ जन्माला आल्यापासून आसपासची माणसं जे काही बोलतात, ते सर्व शब्द आणि त्यांचे अर्थ या भागात साठवले जातात. साधारण दीड ते दोन वर्षांचा काळ लोटल्यानंतर मेंदूतील 'ब्रोका' हा भाग विकसित होतो, जो प्रत्यक्षात भाषेच्या निर्मितीला म्हणजे बोलण्याला सुरुवात करतो. गमतीची गोष्ट अशी की, मूल तेच बोलते जे त्याच्या 'वर्निक' भागात आधी साठवलेलं असतं. त्यामुळे मुलाच्या आजूबाजूला जी भाषा बोलली जाते, तीच त्याची मातृभाषा बनते. या पहिल्या दोन-तीन वर्षांत मुलाचा मेंदू इतका लवचिक असतो की, तो मातृभाषेतील व्याकरणाचे नियम, विशिष्ट उच्चार आणि लहेजा कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय आत्मसात करतो. मराठीतील 'ळ' या अक्षराचा उच्चार जितक्या सहजतेने आपल्या मुखातून येतो, तितका तो परप्रांतीयांना जमत नाही; कारण ती आपल्या मेंदूची आणि जिभेची घडण आपल्या मातीने केलेली असते.

भारतासारख्या विविधांगी देशात २२ अधिकृत भाषा असल्या तरी १६०० पेक्षा जास्त बोलीभाषा आहेत. या बोलीभाषाच खऱ्या अर्थाने मुख्य भाषेला समृद्ध करत असतात. एखाद्या प्रांतात गेल्यावर तिथल्या बोलीतून केवळ शब्द समजत नाहीत, तर तिथल्या मातीचा सुगंध, परंपरा आणि लोकसंस्कृतीचं दर्शन घडतं. युनेस्कोने जेव्हा मातृभाषा जपण्याचा आग्रह धरला, तेव्हा त्यामागे हेच उद्दिष्ट होतं की, या बोलींमध्ये दडलेलं अगाध ज्ञान, मौखिक परंपरा आणि लोककथा लुप्त होऊ नयेत. कुठल्याही नवीन गोष्टीचं आकलन करताना आपण आपल्या 'पूर्वज्ञानाचा' वापर करतो. जर मुलाचं प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून झालं, तर त्याच्या मेंदूतील संकल्पना स्पष्ट होण्यास वेळ लागत नाही. अंक आणि शब्द जर घरच्या भाषेतून समजले असतील, तर गणितीय क्रिया किंवा विज्ञानातील गूढ सिद्धांत मुलाला ओझं वाटत नाहीत. जपान, जर्मनी आणि फ्रान्स यांसारख्या विकसित देशांनी तेथे संपूर्ण तांत्रिक व वैद्यकीय शिक्षण मातृभाषेतून देऊनच जागतिक प्रगती साधली आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे.

प्रगतीसाठी परकीय भाषांचे ज्ञान आवश्यक असलं, तरी मातृभाषा हे आपल्या अस्तित्वाचं मूळ आणि संस्कारांची शिदोरी देणारी जमीन आहे. यावेळी एक वाचलेला किस्सा आठवतो, पुण्याच्या एका विद्यापीठात एका परदेशी विद्याथ्यर्थ्यांन विचारलेला प्रश्न आजही अंतर्मुख करणारा आहे;

तो म्हणाला होता, "मराठीत 'मायेचा स्पर्श' म्हटल्यावर जी ओढ वाटते, ती 'Touch of Love'मध्ये का जाणवत नाही?" याचं उत्तर त्या भाषेच्या संस्कृतीत आहे. 'माया' हा शब्द केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून तो भावनेच्या अथांग विश्वाशी जोडलेला आहे.

आज पालकांमध्ये मुलाला सुरुवातीपासून इंग्रजी माध्यमात घालण्याची जी चढाओढ लागलेली आहे, त्यातून आपण नकळतपणे मुलाच्या कल्पनाशक्तीवर मर्यादा आणत आहोत. संशोधनानुसार, ज्या मुलांचा मातृभाषेचा पाया पक्का असतो, ती मुले इतर भाषा अधिक वेगाने आणि सखोलपणे आत्मसात करू शकतात. डिजिटल युगाच्या आगमनाने भाषा नष्ट होतील, अशी भीती व्यक्त केली जात होती; मात्र उलट तंत्रज्ञानाने मातृभाषेला नवीन व्यासपीठ मिळवून दिले आहे. सोशल मीडिया, पॉडकास्ट आणि यूट्यूबच्या माध्यमातून आज स्थानिक बोलीभाषा जागतिक स्तरावर पोहोचत आहेत. तरीही, घरातून मातृभाषेचा ऱ्हास होणे ही चिंतेची बाब आहे. जेव्हा आजी-आजोबा आपल्या नातवाशी त्यांच्या मायबोलीतून संवाद साधू शकत नाहीत, तेव्हा केवळ भाषा मरत नाही, तर पिढ्यांमधील प्रेमाची वीण सैल होत जाते. आपल्या पूर्वजांनी दिलेले खगोलशास्त्र, गणित आणि आयुर्वेद हे ज्ञान आधी त्यांच्या मातृभाषेतच उमजलं होतं.

शेवटी, मातृभाषा म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही, तर ती आईच्या अंगाईतील माया, आजीच्या गोष्टीतील संस्कार आणि आपल्या मातीचा सुगंध आहे. जर आपण आपली भाषा जपली, तरच आपली संस्कृती जगेल आणि जर संस्कृती जगली, तरच मानवी समाज समृद्ध होईल. आपली भाषा हाच आपला वारसा आहे, उत्तमरीत्या व्यक्त होण्याचं प्रभावी माध्यम आणि आपला अभिमान आहे.

krantip 183@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in