वाचन : एक आनंदयात्रा

स्क्रीनच्या मोहात अडकलेल्या आजच्या बालपणात वाचनाची गोडी लावणे कठीण असले, तरी अशक्य नाही. योग्य वातावरण आणि दर्जेदार साहित्याचा आधार घेतल्यास, अभ्यासाचे ओझे न वाटता वाचन हा मुलांच्या जगण्याचा एक रसाळ भाग होऊ शकतो.
वाचन : एक आनंदयात्रा
Published on

साधक-बाधक

क्रांती गोडबोले-पाटील

स्क्रीनच्या मोहात अडकलेल्या आजच्या बालपणात वाचनाची गोडी लावणे कठीण असले, तरी अशक्य नाही. योग्य वातावरण आणि दर्जेदार साहित्याचा आधार घेतल्यास, अभ्यासाचे ओझे न वाटता वाचन हा मुलांच्या जगण्याचा एक रसाळ भाग होऊ शकतो.

आजच्या डिजिटल कोलाहलात लहान मुलांच्या हातात पुस्तक दिसणं, हे दुर्मिळ होत चाललं आहे की काय, अशी भीती वाटण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. मोबाईलच्या स्क्रीनवर वेगवान गतीने सरकणारी ‘रील्स’ आणि मेंदूला क्षणिक आनंद देणारे आभासी गेम्स यांच्या विळख्यात आजचं ‘बालपण’ कुठेतरी हरवत चाललं आहे. अशा वेळी ‘वाचाल तर वाचाल’ हा केवळ सुभाषित न राहता, तो मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक अस्तित्वाचा मंत्र ठरत आहे. माझ्या वैयक्तिक प्रवासातही हा प्रश्न एखाद्या मोठ्या आव्हानासारखा उभा होता. आजच्या काळात मुलांच्या आयुष्यात वाचनाची गोडी लावणं हे अत्यंत कठीण काम झालं आहे, हे मी मान्य करते. तरीही, जेव्हा मी माझ्या मुलाला पुस्तकांच्या विश्वात रमताना पाहते, तेव्हा जाणवतं की, हे शिवधनुष्य पेलणं कठीण नक्कीच आहे, पण अशक्य मुळीच नाही. माझ्या मुलाला मी वाचनाकडे वळवू शकले, कारण ‘वयम्’ आणि ‘चिकू-पिकू’सारख्या दर्जेदार मासिकांची सोबत मिळाली. केवळ मासिकंच नव्हे, तर घरात वाचनाचं वातावरण निर्माण केलं, मुलाबरोबरीने रोज वाचायला, त्याला वाचून गोष्टी सांगायला सुरुवात केली. तसेच अनेक महनीय व्यक्तींशी झालेली चर्चा आणि त्या व्यक्तींचं प्रत्यक्ष वागणं यांतून वाचनाचे संस्कार कसे करायचं याचं ज्ञान मिळालं. परंतु, आजही अशी अनेक मुले आणि पालक आहेत, जे या आनंदापासून मैलोन्मैल दूर आहेत. त्यांच्यासाठी वाचन हा एक अभ्यासाचा भाग नसून तो जगण्याचा एक रसाळ उत्सव कसा होऊ शकतो, याचा सखोल विचार करणं ही आज काळाची गरज आहे.

२ एप्रिल हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. थोर बालसाहित्यिक हॅन्स ख्रिश्चन अँडरसन यांचा हा जन्मदिवस म्हणजे चिमुकल्या हातांत पुस्तकांचे उबदार स्पर्श सोपवण्याचा एक जागतिक सोहळा आहे. वाचन ही केवळ अक्षरांची ओळख नसून ती मुलांच्या भावविश्वाचा विस्तार करणारे सर्वात प्रभावी माध्यम आहे. ज्या गोष्टी आपण प्रत्यक्ष आयुष्यात अनुभवू शकत नाही, त्या केवळ एका पुस्तकाच्या पानांतून अनुभवता येतात. प्रत्येक मुलाला अंतराळात जाण्याची संधी मिळेलच असे नाही, परंतु एखाद्या रंजक पुस्तकामुळे तो घरात बसल्या जागी अंतराळवीर होऊन ताऱ्यांच्या दुनियेत फेरफटका मारू शकतो. जंगलातल्या सफारीचा थरार अनुभवण्यासाठी किरण पुरंदरेंसारख्या लेखकांचे शब्द पुरेसे ठरतात, तर बिरबलाच्या चातुर्यकथांमधून जगण्याची व्यवहारशक्ती आणि बुद्धीचा कल्पक वापर कसा करावा, याचे धडे नकळतपणे मिळतात. वाचनातून मिळणारी ही कल्पनाशक्ती मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी कोणत्याही टॉनिकपेक्षा श्रेष्ठ ठरते.

एकीकडे मोबाईलच्या स्क्रीनवर सरकणारी रील्स आणि दुसरीकडे पुस्तकाच्या पानांचा तो मंद सुवास; या संघर्षात आजचं बालपण एका विचित्र वळणावर उभं आहे. जेव्हा आपण मुलांच्या वाचनविन्मुखतेबद्दल बोलतो, तेव्हा आपण हे विसरतो की, मुलं ही अनुकरणप्रिय असतात. ठाण्यातील ‘बुक कल्चर’ (Book Culture) सारख्या आगळ्यावेगळ्या बाल वाचनालयाचा प्रवास जेव्हा मी जवळून पाहिला, त्यावरून लक्षात येतं की, मुलांच्या हातात पुस्तक देणे ही एक कला आहे. सविता राणे यांनी जेव्हा हे वाचनालय सुरू केलं, तेव्हा त्यांच्यासमोर सर्वात मोठं प्रश्नचिन्ह हेच होतं की, आजच्या ‘डिजिटल’ युगात मुलं लायब्ररीत येतील का? परंतु त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा विचार मांडला- वाचन हे ‘ओझं’ न ठेवता ‘आनंद’ बनवलं पाहिजे. त्यांच्या जुळ्या मुलांना वाचनाची आवड होती, त्यातूनच त्यांना ही कल्पना सुचली. एका पालकासाठी दररोज नवीन पुस्तक विकत घेणं आर्थिकदृष्ट्या कठीण असतं, म्हणूनच वाचनालयाची गरज निर्माण होते. त्यांच्या प्रवासात त्यांचे दहापैकी आठ प्रयोग अपयशी ठरले तरी हार मानली नाही. आज त्यांच्याकडे दोन वर्षांच्या बालकांपासून ते किशोरवयीन मुलांपर्यंत सर्वांसाठी पुस्तकांचा खजिना आहे. येथे मुले वाचनालयातून घरी जायला तयार नसतात, हे दृश्य कोणत्याही पुस्तकप्रेमीसाठी सुखावह आहे.

शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर वाचनाचा परिणाम केवळ मनावरच नाही, तर प्रत्यक्ष मेंदूच्या रचनेवरही होत असतो. संशोधनानुसार, जेव्हा आपण एखादी कथा वाचतो आणि त्यातील प्रसंगांमध्ये गुंतून जातो, तेव्हा आपल्या मेंदूतील ‘मिरर न्यूरॉन्स’ सक्रिय होतात. जणू काही तो प्रसंग प्रत्यक्ष आपल्यासोबतच घडत आहे, अशी संवेदना मेंदूला मिळते. यामुळे मुलांमध्ये संवेदनशीलता आणि सहानुभूती (Empathy) वाढते. दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार करण्याची वृत्ती वाचनामुळे जोपासली जाते. आजच्या डिजिटल युगात मुलांचा ‘अटेंशन स्पॅन’ म्हणजेच एकाग्रतेचा कालावधी कमालीचा कमी झाला आहे. मोबाईलवरील छोटे व्हिडीओ किंवा रील्स बघण्यामुळे मेंदूला झटपट मिळणाऱ्या आनंदाची (Instant Gratification) सवय लागते. याउलट, सलग वाचनामुळे मुलांमध्ये संयम निर्माण होतो. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी लागणारी एकाग्रता केवळ पुस्तकेच देऊ शकतात. हे कौशल्य केवळ शालेय यशासाठी नाही, तर संपूर्ण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

बालसाहित्याच्या या प्रवासात केवळ गोष्टींची पुस्तके देऊन चालत नाही, तर मुलांच्या वयोगटानुसार त्यांचं भावविश्व समजून घ्यावं लागतं. मानवी शरीराची रचना (Human Body) उलगडणारी थ्री-डी (3D Pop-up) पुस्तकं मुलांच्या कुतूहलाला खतपाणी घालतात. लहान मुलांसाठी ‘Touch and Feel’ बुक्स असतात, ज्यातून त्यांना स्पर्शाची जाण होते. एखादी गोष्ट खरखरीत आहे की गुळगुळीत, हे त्या पुस्तकातून शिकताना मुलांच्या डोळ्यांत जी चमक येते, ती कोणत्याही गॅजेटमधून मिळू शकत नाही. म्युझिक बुक्सच्या माध्यमातून प्राण्यांचे आवाज ऐकताना मुलं पुस्तकांशी संवाद साधू लागतात. हे सर्व प्रयोग मुलांच्या स्मृतीमध्ये (Memory) कायमचे कोरले जातात. आजच्या पालकांची एक तक्रार असते की मुलांना स्पेलिंग लक्षात राहत नाहीत. परंतु अनुभवातून असं दिसतं की, जेव्हा मुले वारंवार चित्रं आणि त्याखालील शब्द पाहतात, तेव्हा त्यांना वेगळे स्पेलिंग पाठ करावं लागत नाही; ते त्यांच्या मेंदूत आपोआप ‘सेव्ह’ होतं. ही बाब मला सविता ताईंकडून कळली. बुक कल्चरमध्ये अशा जाणिवा जागृत करणारी अनेक पुस्तकं आहेत.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठीही या बालवाचनालयाने लावलेला एक मोलाचा नियम आजच्या काळासाठी आदर्श आहे. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांची संख्या मोठी आहे, पण सविता राणे यांच्याकडे येणाऱ्या मुलाला किमान एक तरी मराठी पुस्तक वाचणं बंधनकारक असतं. “तुम्ही सहा पुस्तके नेताय, तर त्यातलं एक मराठी असलंच पाहिजे,” ही सक्ती नसून ती मातृभाषेशी जोडलेली नाळ आहे. पालकांनाही हे मनापासून पटतं, कारण घरातून जे मराठी हळूहळू लोप पावत चाललं आहे, ते या निमित्ताने पुन्हा जिवंत होते. भाषेची गोडी मुलांना लागावी यासाठी दर्जेदार मासिकं दीपस्तंभासारखं काम करत आहेत. यामध्ये ‘वयम्’ आणि ‘चिकू-पिकू’ या मासिकांचा उल्लेख करणे अनिवार्य आहे. ‘चिकू-पिकू’सारखी मासिके अत्यंत कल्पकतेने वाचण्याची त्यांची शैली लहान मुलांमध्ये रुजवत आहेत. ही मासिकं आणि मुलांसाठी असलेली अनेक पुस्तकं मिळून मुलांचा एक असा ‘इकोसिस्टम’ तयार करतात, जिथे माहितीसोबतच संस्कारही घडतात.

आजच्या पालकांची एक सार्वत्रिक तक्रार असते की, “आजकालची मुलं वाचतच नाहीत.” परंतु, मुलांच्या या वाचनविन्मुखतेमागे नक्की काय कारणं आहेत आणि आपण त्यांना वाचनाकडे कसं वळवू शकतो, याचा विचार गांभीर्याने व्हायला हवा. मुलं उपदेशापेक्षा निरीक्षणातून जास्त शिकतात. जर पालकांच्या हातात मोबाईलऐवजी पुस्तक असेल, तर मुलंही आपोआप पुस्तकाकडे वळतात. पालकांनी मुलांसोबत बसून वाचण्याची सवय लावून घेतली पाहिजे. जेव्हा पालक मुलांसोबत वाचतात, तेव्हा त्या पुस्तकातून नवनवीन विषयांवर गप्पा मारण्याची संधी मिळते. संवादाची दरी सांधण्यासाठी वाचनासारखा दुसरा उत्तम पर्याय नाही. आजी-आजोबा आणि नातवंडे यांच्यात अनेकदा भाषेची किंवा तंत्रज्ञानाची भिंत असते, परंतु एखादे बालमासिक किंवा गोष्टींचं पुस्तक दोघांनी एकत्र वाचलं, तर ती भिंत गळून पडते. “त्या पात्राने तसं का केलं असावं?” किंवा “कथेचा शेवट तुला कसा हवा होता?” अशा प्रश्नांमधून मुलांच्या विचारप्रक्रियेला चालना मिळते.

वाचनाची गोडी लावताना पुस्तकांची निवडही तितकीच महत्त्वाची आहे. अगदी लहानपणापासूनच मुलांना चित्रांची, रंगांची आणि विविध स्पर्शांची ओळख करून देणारी पुस्तकं द्यावीत. अक्षर ओळख नसतानाही मुलांनी पुस्तकं हाताळली पाहिजेत. मुलांच्या आवडीनुसार साहित्याची निवड करताना त्यांच्यावर सक्ती करू नये. काही मुलांना साहसी कथा आवडतात, तर काहींना विज्ञान किंवा प्राणीविश्वात रस असतो. सत्यजीत रे यांच्या कथा, तोतोचान, लंपन किंवा हॅनाची सुटकेस यांसारखी पुस्तके मुलांच्या संवेदनशीलतेला खतपाणी घालतात. थोर व्यक्तींच्या संघर्षाची चरित्रं वाचल्याने मुलांना अपयशावर मात करण्याची प्रेरणा मिळते. त्यांना हे समजतं की, जगातली कोणतीही मोठी व्यक्ती संघर्षाशिवाय घडलेली नाही. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि ते आयुष्यातील संकटांना सामोरे जाण्यासाठी सक्षम होतात.

शिक्षकांची भूमिकाही वाचनसंस्कृती जोपासण्यात मोलाची आहे. केवळ भाषा शिक्षकांनीच वाचनावर भर द्यावा, हा एक गैरसमज आहे. विज्ञानाचे शिक्षक ‘का आणि कसे’ची उत्तरे शोधण्यासाठी मुलांना संदर्भ ग्रंथांकडे वळवू शकतात. भूगोलाचे शिक्षक जगातील चालू घडामोडींचा संदर्भ देऊन नकाशांच्या पलीकडचे जग दाखवू शकतात. जेव्हा शिक्षक वर्गात पाठ्यपुस्तकाबाहेरचं काहीतरी वाचून दाखवतात, तेव्हा मुलांमध्ये कुतूहल जागृत होते. पूरक वाचनामुळे मुलांचे विषयाचे ज्ञान तर वाढतेच, पण त्यांची भाषिक समृद्धीही होते. ज्या मुलांचं वाचन अफाट असतं, त्यांची अभिव्यक्ती आणि शब्दसंपदा अधिक प्रभावशाली असते. त्यांना आपली मतं मांडणं सोपं होतं आणि तार्किक बुद्धीचा विकास होतो.

जसं की मुलाच्या शारीरिक वाढीसाठी आपण प्रथिनांचा आणि जीवनसत्त्वांचा विचार करून पौष्टिक आहार देतो, तसंच त्याच्या मेंदूच्या आणि मनाच्या पोषणासाठी ‘बौद्धिक खाऊ’ म्हणजेच चांगली पुस्तकं देणं आवश्यक आहे. पुस्तक हे केवळ कागदांचे बंडल नसून ती एक शिदोरी आहे, जी आयुष्यभर मुलांच्या सोबत राहते. आजच्या मुलांना भूत आणि परीच्या गोष्टींपेक्षा वास्तववादी आणि त्यांच्या कुतूहलाला साद घालणारं साहित्य जास्त आवडतं. मुलांच्या प्रश्नांची उत्तरं देणारी आणि त्यांना विचार करायला लावणारी पुस्तकं त्यांच्या हातात देणं, हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे. वाचन हा केवळ वेळ घालवण्याचा मार्ग नाही, तर तो शिक्षणाचा पाया (Foundation) आहे. ज्या मुलाचं वाचन चांगले आहे, त्याची शिकण्याची क्षमता (Learning Process) इतर मुलांपेक्षा अधिक असते. वाचनाने मुलांची एकाग्रता वाढते, त्यांची शब्दसंपत्ती समृद्ध होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना जगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो.

शेवटी, २३ एप्रिलला येणारा ‘जागतिक पुस्तक दिन’ आणि हा २ एप्रिलचा ‘जागतिक बालपुस्तक दिन’ आपल्याला एकाच गोष्टीची आठवण करून देतो- ती म्हणजे अक्षरांशी असलेली आपली मैत्री तुटू देऊ नका. ज्या घरांमध्ये पुस्तकांची कपाटं असतात, त्या घरातील मुलं कधीच एकाकी नसतात. पुस्तकासारखा दुसरा चांगला मित्र नाही, कारण ती कधीच काही मागत नाहीत, फक्त देतात. आपण आपल्या मुलांना महागडी खेळणी देतो, ब्रँडेड कपडे देतो, पण जर त्यांना ‘वाचनाची गोडी’ लावली तर आपण त्यांना आयुष्याची सर्वात मोठी शिदोरी देतोय यात शंका नाही. वाचनाची ही ज्योत जर आपण पेटवत ठेवली, तर येणारी पिढी केवळ साक्षर होणार नाही, तर ती सुसंस्कृत आणि विचारक्षम होईल. कारण जो वाचन या आनंदाच्या प्रवासात सामील होतो, त्याचं आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध होतं. म्हणूनच, वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी बालपणापासूनच पायाभरणी करणं ही काळाची गरज आहे. जेणेकरून उद्याचा समाज अधिक सुजाण आणि प्रगल्भ असेल. मुलं आणि पुस्तकं यांचं नातं घट्ट झालं की, जगातील कोणतंही स्क्रीन त्यांची कल्पनाशक्ती चोरू शकणार नाही.

krantip183@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in