चला, प्रोजेक्ट करूया

तुम्हाला शाळेत वेगवेगळे प्रोजेक्ट करायला सांगितले जातात. होना? काही जणांना ते प्रोजेक्ट्स करायला आवडतात, तर काहींना नाही आवडत. पण वाचणाऱ्या मुलांना नवनवीन गोष्टी, उपक्रम करायला नक्की आवडतात हे मला माहिती आहे. बरं, मग शाळेतील प्रोजेक्ट करताना तुम्ही ते स्वतः करता का ते ग्रुप प्रोजेक्ट असतात?
Photo - Canva
Photo - Canva
Published on

खुल जा सिम सिम

ज्योती कपिले

Hi friends! कसे आहात? तुम्हाला शाळेत वेगवेगळे प्रोजेक्ट करायला सांगितले जातात. होना?

काही जणांना ते प्रोजेक्ट्स करायला आवडतात, तर काहींना नाही आवडत. पण वाचणाऱ्या मुलांना नवनवीन गोष्टी, उपक्रम करायला नक्की आवडतात हे मला माहिती आहे. बरं, मग शाळेतील प्रोजेक्ट करताना तुम्ही ते स्वतः करता का ते ग्रुप प्रोजेक्ट असतात? तुम्हाला एकट्याला जेव्हा एखादा प्रोजेक्ट करायला सांगितले जाते आणि तुम्हाला त्यात काही अडचण येते तेव्हा तुम्ही कोणाचं सहकार्य घेता? आई, बाबा, दादा, ताई, आजी, आजोबा? प्रोजेक्ट करताना कोणाचं तरी मार्गदर्शन, सहकार्य जरूर घ्यावं. परंतु मुळात संपूर्ण प्रोजेक्ट स्वतः आवडीने पूर्ण करावा. प्रोजेक्ट्स तुम्हाला घडवतात. तुमच्यातील क्रिएटिव्हिटी बाहेर काढतात. वेगवेगळे प्रोजेक्ट करताना तुमची निरीक्षण शक्ती, आकलन क्षमता वाढते. यातूनच तुमचा सर्वांगीण विकास होत असतो.

तुम्हाला पक्षी आवडतात का? मलाही खूप आवडतात. मला नेहमी वाटतं की पक्षी किती सहजतेने, मुक्तपणे आकाशात विहार करत असतात. हो ना? त्यांना उडताना बघून मलाही वाटतं की मला असं पक्ष्यांसारखं उडता आलं पाहिजे…किती मस्त ना..आणि तुम्हाला माहीत आहे का, की आपल्याला असं कधी उडता येईल, याच उत्सुकतेने, उद्देशाने विमानाचा जन्म झाला... तुमच्यापैकी काही मुलांना तरी हे माहिती असेलच. विमानाचा शोध लावण्याचे श्रेय राईट बंधूंना दिलं जातं, कारण त्यांनी १९०३ मध्ये किट्टी हॉकमध्ये (उत्तर कॅरोलिना) ‘राईट फ्लायर’ नावाचे पहिले यशस्वी, नियंत्रित आणि मानवी उड्डाण केलं. त्यांनी विमानाचा शोध लावण्यासाठी अनेक वर्षांपासून संशोधन केलं आणि अनेक चाचण्या घेतल्या. या शोधाने विमान वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवून आणली. बघा, त्यांनी जर उडण्याचा ध्यास घेतला नसता, संशोधन केलं नसतं तर???.. आपण विमानात बसून देशा-परदेशात जाऊ शकलो असतो का?

तुम्हाला हेही माहिती आहेच की, झाडावरून सफरचंद खाली पडले. आयझॅक न्यूटनने ते पाहिले आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. तेव्हापासून सफरचंदाचं झाड म्हणजे न्यूटनला त्याची अभूतपूर्व कल्पना विकसित करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या प्रेरणेच्या क्षणाचं जणू प्रतीक बनलं आहे. या अशा विविध निरीक्षणांमुळेच कित्येक वैज्ञानिक शोध लागले आहेत.

आपण किती सहजतेने कोणी हरलं की ‘शून्य’ किंवा ‘झिरो’ म्हणतो. पण शून्य ही संख्या अशी आहे जी इतर कुठल्या संख्येच्या मागे उभी राहिली तर तिची किंमत दहापट वाढते. जसं की, एक या संख्येच्या मागे शून्य उभे असले की त्याला आपण ‘दहा’ म्हणतो… बरोबर नं? आता मला सांगा शून्याचा शोध कोणी लावला? बरोबर ओळखलंत.. शून्याच्या शोधाचा मान आपल्या भारताचा आहे बरं का! आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त या दोन भारतीय गणित तज्ज्ञांनी शून्याचा शोध लावला किंवा त्याची संकल्पना मांडली, असं मानलं जातं. त्यांनी शून्याला संख्येची मान्यता दिली.

थोडक्यात काय, तर आपल्या मनीच्या आशा, आपल्या उत्कट इच्छा, कुतूहल, आपली संशोधन वृत्तीच तर अनेक शोधांना निमंत्रण देत असते. तुम्ही तुमच्यातील संशोधन वृत्ती सतत जागृत ठेवा हं! त्यामुळेही बऱ्याच गोष्टी सोप्या होतात आणि तुम्हाला भरपूर आनंदही मिळतो आणि याच महत्त्वाच्या कारणांमुळे तुम्हाला शाळेत वेगवेगळे प्रोजेक्ट करायला देत असतात. जेणेकरून तुम्हाला तुमची आवड-निवड कळावी, त्याला बालपणापासून खतपाणी मिळावं, तुम्ही छोटे मोठ्ठे शोध लावावेत आणि आईवडिलांचं, देशाचं आणि स्वतःचंही नाव उज्ज्वल करावं. चला, तर मग आपापले प्रोजेक्ट करूया.. Ok?

ज्येष्ठ बालसाहित्यिक

logo
marathi.freepressjournal.in