

स्ट्रेट ड्राईव्ह
क्रिकेट हा ‘जंटलमन्स गेम’ म्हणजेच सज्जनांचा खेळ आहे, असे फार पूर्वीपासून म्हटले जाते. मात्र आधुनिक क्रिकेट सर्व पायंडे मोडीत काढून एका नव्या दिशेने निघाला आहे, असे म्हणता येईल. नुकताच झालेल्या आशिया चषकात भारत-पाकिस्तान यांच्यातील तिहेरी लढतींच्या निमित्ताने विविध घटनांवरून या खेळात राजकारण प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले. यामध्ये बरोबर कोण किंवा चूक कोण, याचे उत्तर प्रत्येकाचे वेगळे असले, तरी या नव्या चालीमुळे खेळाला मात्र नक्कीच धोका उद्भवला आहे.
मैदानात जवळपास तासभर लोळत पडलेले, छायाचित्र घेण्यात मग्न असलेले भारताचे खेळाडू, मंचावर ताटकळत उभे असलेले आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष मोहसीन नक्वी आणि ड्रेसिंग रूममध्येच थांबून राहिलेला पाकिस्तानचा संघ, असेच काहीसे चित्र २८ सप्टेंबरच्या रात्री संपूर्ण विश्वाला पाहायला मिळाले.
भारत-पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकवर पाच गडी राखून विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने रात्री १२च्या सुमारास विजयाची नोंद केली. मात्र एक वाजला तरीही या सामन्याचा पुरस्कार वितरण सोहळा सुरू झालेला नव्हता. त्यामुळे या तासभरातील नाट्यमय घडामोडींचीच चर्चा आजही सगळीकडे आहे. भारताने स्पर्धा जिंकल्यानंतर नक्वी यांच्याकडून चषक स्वीकारण्यास मनाई केली. नक्वी हे पाकिस्तानचे मंत्री असून तेच पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्षही आहेत. त्यामुळे नियमानुसार त्यांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक देण्यात येणार होता.
संपूर्ण स्पर्धेत भारताने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले. त्याचप्रमाणे पाकिस्तानी मंत्र्यांच्या हातून चषकही स्वीकारला नाही. नक्वी बराच काळ मंचावर ताटकळत होते. त्यावेळी पाकिस्तानचा संघही मैदानात नव्हता, तर भारताचे खेळाडू मात्र मैदानातच बसून होते. अखेरीस एका तासाने पारितोषिक वितरण सोहळा सुरू झाला. भारताने वैयक्तिक पुरस्कार अन्य पदाधिकाऱ्यांच्या हातून घेतले. मात्र जेतेपदाचा चषक आपणच देणार, यावर नक्वी ठाम होते. अखेरपर्यंत नक्वी अन्य कुणाच्या हातून भारताला चषक देण्यास तयार झाले नाहीत व ते चषक घेऊनच माघारी परतले. त्यामुळे भारताने स्वत:च चषकाच्या आभासी प्रतिकृतीसह जल्लोष केला. भारतीय संघाच्या या कृतीचं भारतातील अनेकजण कौतुक करत आहेत, तर पाकिस्तानला भरपूर ट्रोल केले जात आहे. काहींना भारताची भूमिकाही पटलेली नाही.
दुराव्याची पार्श्वभूमी
या सर्व प्रकरणांची सुरुवात कोठून झाली, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध बिघडले असून याचा परिणाम क्रिकेटवरही झाला आहे. फक्त आयसीसी स्पर्धा किंवा आशिया चषक यांसारख्या बहुद्देशीय स्पर्धांमध्येच भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने येतात. २००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून भारतीय संघ कोणत्याही स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जात नाही. २०१२-१३नंतर भारत-पाकिस्तान यांच्यात एकही मालिका झालेली नाही. एकमेकांच्या देशात न खेळण्याच्या या दोन्ही देशांच्या निर्णयामुळे आयसीसीने फेब्रुवारी २०२५ मध्ये एक नवा नियम केला. पुढील तीन वर्षांत, २०२७ पर्यंत ज्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतील त्यात हे दोन देश परस्परांच्या देशात न जाता तो सामना त्रयस्थ ठिकाणी खेळतील. मार्च महिन्यात पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवले. मात्र भारतीय संघ सर्व सामने दुबईत खेळला. त्याचप्रमाणे आशिया चषकासाठी पाकिस्तान भारतात येणे अशक्य असल्याने, ही स्पर्धादेखील यूएई येथे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकासाठीही पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही.
युद्धाचा परिणाम
इथवर सर्व काही आलबेल सुरू होते. ताण होता, पण तो मैदानाबाहेरच. मैदानात समोरासमोर आल्यावर दोन्ही संघ खेळाचे सर्व उपचार पाळत होते. मात्र एप्रिल महिन्यात पहलगाम येथे पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय नागरिकांचा बळी गेला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये हवाई हल्ले झाले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. याचा परिणाम क्रिकेटवरही झाला. देशभरातून भारताने पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धांत खेळू नये, अशी मागणी करण्यात आली. भारताने ‘लिजंड्स वर्ल्ड चॅम्पियनशीप लीग’मध्ये (निवृत्त खेळाडूंची) पाकिस्तान संघाविरुद्ध दोन्ही सामने न खेळण्याचा निर्णय घेतला. याचेच उदाहरण देत आशिया चषकातही भारताने पाकिस्तानशी खेळू नये, असे अनेकांचे म्हणणे होते.
भविष्यातील परिणाम
मात्र आशिया चषक तसेच आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान लढत रोखल्यास भारताला अन्य क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांमध्ये मोठा फटका पडू शकतो. भारताला भविष्यात राष्ट्रकुल व ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद भूषवायचे असल्याने दोन्ही देशांमधील क्रीडा सामने थांबवता येणार नाहीत. तसेच आंतरराष्ट्रीय संघटना व महासंघांकडून भारतावर बंदी येऊ शकते, असे कारण देत शासनाच्या परवानगीनुसार भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले.
क्रिया-प्रतिक्रिया
आशिया चषकाच्या सुरुवातीला झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार सूर्यकुमार एसीसीचे अध्यक्ष नक्वी व पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली यांच्याशी संवाद साधताना तसेच हस्तांदोलन करतानाही आढळला. परंतु प्रत्यक्षात स्पर्धा सुरू झाल्यावर मात्र भारतीय खेळाडूंची भूमिका बदलली. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या साखळी लढतीत सामनाधिकाऱ्याने दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीच्या वेळी हस्तांदोलन करू नये, असे सांगितले. त्यानंतर सूर्यकुमारने विजयी षटकार लगावल्यावर पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच तो ड्रेसिंग रूमकडे परतला. पाकिस्तानचे खेळाडू मैदानात प्रतीक्षा करत असताना भारताने ड्रेसिंग रूमचा दरवाजा बंद केला. याचा निषेध म्हणून पाकिस्तानने आयसीसीकडे तक्रार केली. तसेच सामनाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचीही मागणी केली. इतकेच नव्हे, तर यूएईविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान एक तास उशिराने मैदानात दाखल झाला.
याच स्पर्धेत आठवडाभराने पुन्हा एकदा सुपर-फोर फेरीत भारत-पाकिस्तान आमनेसामने आले. तेव्हा तर दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमकही झाली. पाकिस्तानच्या खेळाडूंनी केलेल्या हातवाऱ्यामुळे रोष आणखी वाढला. काहींनी हवेत गोळ्या झाडल्याची, तसेच भारताचे विमान पाडल्याचे हातवारे केले. भारतीय खेळाडूंनीही त्यास प्रत्युत्तर दिले. मग गेल्या रविवारी म्हणजेच २८ सप्टेंबरला झालेल्या अंतिम सामन्यातील नाट्य खेळाला वेगळ्याच वळणावर घेऊन गेले.
भारताला अद्यापही आशिया चषक देण्यात आलेला नाही. नक्वी यांनी स्वत:च्या हस्तेच भारताला चषक देण्याचा अट्टाहास केला आहे, तर भारताचे खेळाडू मायदेशी परतून अन्य मालिकाही खेळू लागले आहेत. बीसीसीआयने नक्वींविरोधात आयसीसीकडे तक्रार केली असून अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. मात्र स्टेडियममधून तसेच टीव्हीवरून अंतिम सामना पाहणाऱ्या अनेकांना खेळात शिरलेले राजकारण आवडलेले नाही. भारताने फक्त चषक स्वीकारून नक्वी यांच्याशी हस्तांदोलन न करता जल्लोष केला असता तर ते योग्य ठरले असते, असेही काही जाणकारांचे मत आहे. तर शासनासह बीसीसीआयची बाजू घेत भारताने पाकिस्तानला शिकवलेला धडा योग्य आहे, नक्वी यांनी मोठेपणा दाखवून भारताला त्यांच्या हक्काची ट्रॉफी द्यावी, असे म्हणणाराही वर्ग आहे. नक्वी यांनी भारताची ट्रॉफी चोरली, असेही म्हटले जात आहे.
मुळात भारतीय संघातील खेळाडू हे केंद्र शासनाच्या दडपणाखाली खेळत असल्याचे या स्पर्धेत दिसून आले. तसेच स्पर्धेपूर्वीची त्यांची भूमिका व स्पर्धेदरम्यानची वागणूक यामध्ये तफावत असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे भविष्यातही भारत-पाकिस्तान सामन्यात हे प्रकरण आणखी पेटले जाण्याची शक्यता आहे.
आशिया चषक स्पर्धा संपली असली तरी भारतात महिलांचा एकदिवसीय विश्वचषक सुरू झाला आहे. त्यातच रविवार, ५ ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान महिला संघ श्रीलंकेतील कोलंबो येथे एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया यांनी काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानविरोधात देशाची भूमिका एकच असेल, असे सांगितले होते. या लढतीत आता भारतीय महिला संघ पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणार का, यावर सगळ्यांचे लक्ष असेल.
खेळभावना महत्त्वाची
“मी आशिया चषकातील भारत-पाकिस्तानमधील अंतिम सामना प्रत्यक्ष स्टेडियममधून पाहिला. त्यावेळी माझ्या आजूबाजूला असलेल्या अन्य देशांतील अनेकांचे म्हणणे इतकेच होते की, भारतीय संघाने चषक स्वीकारायला हवा होता. एक क्रिकेट प्रशासक म्हणून मी इतकेच म्हणेन की आपल्याकडे सत्ता आहे, पैशांची ताकद आहे, मात्र क्रिकेटच्या मैदानात खेळभावना महत्त्वाची आहे. मैदानाबाहेर तुमची जी काही भूमिका असेल, ती वेगळी. भारताने आपल्या भूमिकेचा विचार केला नाही, तर भविष्यात आपल्यालाही त्रास होऊ शकतो.”
- नदीम मेमन, क्रिकेट प्रशासक
दोघांनीही पुनर्विचार करावा
“मला कोणत्याही देशाचे नाव घ्यायचे नाही. मात्र सध्या क्रिकेट हा जंटलमन्स गेम राहिलेला नाही. प्रतिस्पर्धी संघांतील खेळाडूंना अपमानित करणे योग्य नाही, असे मला वाटते. खेळ व राजकारण वेगळे असायला हवे. दोन्ही देशांतील शासन व क्रिकेट मंडळ याविषयी विचार करतील व योग्य तो निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.”
- सय्यद किरमाणी, माजी क्रिकेटपटू
bamnersurya17@gmail.com