किती झाकायचे?

जम्मू-काश्मीर राज्यातील पहलगाम दहशतवादी हल्ल्याला दीड महिना उलटला तरी पाकधार्जिणे हल्लेखोर दहशतवादी कुठून आले आणि कुठे गायब झाले याचा थांगपत्ता अजूनही आपल्या केंद्रीय गृह खात्याला लागलेला नाही. आपल्याच भूमीत जागतिक दहशतवाद्यांना राजाश्रय व मोकळे रान देणाऱ्या पाकिस्तानला लाल गालिचा अंथरून आर्थिक मदत, लष्करी रसद पुरवून त्यांच्या विकासाला हातभार लावण्याचे प्रयत्न जगभरातील विविध देशांकडून होत आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रफोटो - एएनआय
Published on

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

जम्मू-काश्मीर राज्यातील पहलगाम दहशतवादी हल्ल्याला दीड महिना उलटला तरी पाकधार्जिणे हल्लेखोर दहशतवादी कुठून आले आणि कुठे गायब झाले याचा थांगपत्ता अजूनही आपल्या केंद्रीय गृह खात्याला लागलेला नाही. आपल्याच भूमीत जागतिक दहशतवाद्यांना राजाश्रय व मोकळे रान देणाऱ्या पाकिस्तानला लाल गालिचा अंथरून आर्थिक मदत, लष्करी रसद पुरवून त्यांच्या विकासाला हातभार लावण्याचे प्रयत्न जगभरातील विविध देशांकडून होत आहेत. भारत-पाक युद्धाच्यावेळी कोणताही देश आपल्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला नाही. आपले परराष्ट्र धोरण फसले असून देशाच्या सीमाही सुरक्षित नसल्याचे आढळून आले आहे. हे दुहेरी अपयश झाकायचे तरी कसे?

भारत, अमेरिका, रशिया, इराण, तुर्कीये, जर्मनी, फ्रान्स, इस्रायल, स्वीडनसह जगातील ९९.७% लोकसंख्या असलेल्या १६३ देशांना दहशतवादाने ग्रासले आहे. काँगो, सीरिया, पाकिस्तान, नायजेरिया, म्यानमार यांसारखे देश दहशतवादाने आतून पोखरले आहेत. या दहशतवादी हल्ल्यातून काही देश सावरले असले तरी अनेकांची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली असल्याची विदारक स्थिती ‘इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस’च्या ‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स’च्या ताज्या अहवालाने उजेडात आणली आहे.

इस्लामिक स्टेट, तहरिक-ए-तालिबान, अल शबाब यांसह जवळपास ३० दहशतवादी संघटनांनी जगभरात उच्छाद मांडला आहे. त्यांच्या दहशतवादी हल्ल्यात गतवर्षी ७,५५५ निरपराध नागरिकांचे हकनाक बळी गेले आहेत. या हल्ल्याने विविध देशांची मनुष्य व वित्तीय हानी केलेलीच नाही, तर त्यांचे मानसिक आरोग्यही बिघडविले आहे. त्यांच्या मनात भय, चिंता निर्माण करून त्यांचे जगणे हराम केले आहे. जागतिक दहशतवादाचे दीर्घकालीन परिणाम सारे जग भोगत आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने मुंबईकरांवरच नव्हे, तर समस्त भारतीयांवर सातत्याने आघात केले आहेत. त्याची मोठी किंमत देशाला सोसावी लागली आहे.

हाफीज सईद, मसूद अझरने भारतावर दहशतवादी हल्ले करण्यासाठी चिथावण्या दिल्या. दाऊद इब्राहिमने मुंबईत बॉम्बस्फोट मालिकाच घडवून आणली. हे दहशतवादी पाकिस्तानमध्ये राजाश्रय घेऊन सुखनैव जीवन जगत आहेत. ज्या देशातील सरकार कमजोर आहे तिथेच दहशतवादी टोळ्या अधिक फोफावल्या आहेत हे त्यामागील विदारक सत्य आहे. त्यामुळेच पाकिस्तानमधील दहशतवादी कारवाया हा भारताच्याच नव्हे तर जगाच्या चिंतेचा विषय व्हायला हवा होता. पाकिस्तानला ‘दहशतवादी राष्ट्र’ म्हणून एकाकी पाडायला हवे होते. त्या देशाची आर्थिक कोंडी करून लष्करी नाकाबंदी करण्याचीही गरज होती. प्रत्यक्षात काय घडतेय?

जगभरातील २५ देशांचा समावेश असलेल्या दहशतवादविरोधी समितीचे उपाध्यक्षपद पाकिस्तानला बहाल करण्याबरोबरच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील ‘तालिबान प्रतिबंधक समिती’च्या अध्यक्षपदाची धुराही पाकिस्तानवर सोपवण्यात येणार आहे. शिवाय पाकिस्तानमधील सार्वजनिक सेवा, खासगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी, शिक्षण, आरोग्य, वीज, पर्यावरण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी जागतिक बँकेने पाकिस्तानला ४ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ८५०० कोटींची मदत केली आहे. भारताने विरोध करूनही आशियाई विकास बँकेने ६८६८ कोटी रुपयांची मदत पाकिस्तानला देऊ केली आहे. कुवेतने पाकिस्तानवरील व्हिसा निर्बंध हटविले आहेत. इराण, संयुक्त अरब अमिरातीसह आखाती देशांनी पाकिस्तानबरोबर व्यापार, वाणिज्यविषयक करार केले आहेत. पाकिस्तानचा पाठीराखा असलेल्या चीनने पाकिस्तानला लष्करी, तांत्रिक, आर्थिक मदत करण्याची आपली परंपरा अखंडपणे चालवली आहे. अमेरिकेनेही पाकिस्तानसाठी या ना त्या प्रकारे मदतीचा हात पुढे केलेला आहे. याउलट भारताच्या संदर्भात काय घडतेय?

भारत-पाकिस्तान या दोन देशांमध्ये तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करण्याची कोणतीही गरज नसताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानच्या युद्धविरामाची एकतर्फी घोषणा करून युद्ध थांबविले. एवढेच नव्हे, तर त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांवर शैक्षणिक निर्बंध लादले आहेत. भारतावरील आयात शुल्कही वाढवले आहे. तसेच भारतामधील कंपन्यांच्या उत्पादनावरही अधिक कर लावले आहेत. आता हे ट्रम्प महाशय मीच भारत-पाकिस्तान युद्धात मध्यस्थी केल्याचे उच्चारवाने सांगत आहेत.

रशिया हा भारताचा पारंपरिक मित्र. या मित्रानेही पाकिस्तानमधील बंद पडलेला पोलाद प्रकल्प कार्यान्वित करण्याबरोबरच त्यांच्याशी अन्य व्यापार व गुंतवणुकीचे विविध करारमदार केले आहेत. नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार या शेजारी राष्ट्रांबरोबरचे आपले संबंधही अलीकडच्या काळात ताणले गेले आहेत. पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धाची ठिणगी पडली असताना कोणत्याही देशाने भारताची ठोस बाजू घेतलेली नाही. उलट तुर्कीयेसारखे देश पाकिस्तानच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिल्याचे चित्र साऱ्या जगाने पाहिले आहे.

अमेरिकेनंतर चीन हा भारताचा दुसरा व्यापारविषयक भागीदार देश ठरला आहे. गतवर्षी भारत आणि चीन यांच्यात अंदाजे १२,७७० कोटी रुपयांचा व्यापार झाला आहे. भारत-पाक युद्धप्रसंगी चीनने आपल्या लष्करी उपग्रहांचा वापर पाकिस्तानला करू दिला. एवढेच नव्हे, तर लष्करी साधनसामग्रीही पाकला पुरवली. भारताविरुद्धच्या लढाईत पाठिंबा दिल्याबद्दल सौदी अरेबिया, तुर्कीये आणि चीन यांचे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी जाहीर आभार मानले आहेत. भारतासोबत एकीकडे व्यापारवृद्धी करायची व दुसरीकडे पाकिस्तानची तळी उचलून धरायची असे दुटप्पी धोरण चीनने स्वीकारलेले असतानाही, त्या देशावर कडक व्यापार निर्बंध लागू करण्याबाबत आपल्या देशाने नेहमीच कचखाऊ भूमिका घेतलेली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा दहशतवादी समर्थक चेहरा उघडा पाडण्यासाठी भारताने आपली बहुपक्षीय सात शिष्टमंडळे जगभरातील ३३ राजधानी शहरांमध्ये पाठवली. या शिष्टमंडळांनी आपल्याला नेमून दिलेले कर्तव्य व जबाबदाऱ्या राष्ट्रनिष्ठेने पार पाडल्या आहेत. तथापि देशातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांना विश्वासात न घेताच त्यांच्या नेत्यांची नावे शिष्टमंडळाच्या यादीत परस्पर घुसविण्याचे प्रकार टाळून देशाच्या एकजुटीचे दर्शन साऱ्या जगाला करता आले असते. तथापि सत्ताधाऱ्यांनी इथेही राजकारण केले. प्रतिमावर्धन, इव्हेंट मॅनेजमेंट आणि २४ तास निवडणूक मूडमध्ये राहून देशांतर्गत अथवा जागतिक पातळीवरचे प्रश्न सोडवता येत नाहीत. त्यासाठी राजकीय मुत्सद्देगिरी लागते. त्यात आपण कमी पडत आहोत. त्यामुळेच पाकिस्तानसारख्या देशाचे फावते आहे.

पूंछ, गंदेरबल, गुलमर्ग व पहलगाम इथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे काय झाले? मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याची चिथावणी देणाऱ्या हाफीज सईद, मसूद अझर यांची कोंडी का करता आली नाही, असे प्रश्न काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी उपस्थित केले आहेत. देशाचे परराष्ट्र धोरण फसले आहे. हे राजनैतिक अपयश असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे. दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांच्या महत्त्वाच्या समित्यांवरील पाकची निवड ही भारतीय राजनैतिक मुत्सद्देगिरीला चपराक असल्याची भावना माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. आपली शिष्टमंडळे केवळ दुसऱ्या देशातील दुय्यम नेत्यांना भेटली आहेत, तेथील धोरणकर्त्यांना नाही. युद्धविराम कसा झाला? तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप आपण का मान्य केला? याची उत्तरे मिळायला हवीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठून आले व कुठे गेले याचा छडा लावण्यात केंद्रीय गृह खाते अद्याप चाचपडत आहे. जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकाकी पाडण्यात आपले परराष्ट्र व्यवहार मंत्रालय अजूनही यशस्वी झालेले नाही. पाकिस्तान, चीन ही आपली शत्रूराष्ट्रेच आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोणाचेच नाहीत अशी बिकट स्थिती जगभरात उद्भवली आहे. शेजारील नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार यांच्याशीही आपले संबंध सलोख्याचे राहिलेले नाहीत. रशियासारखा मित्रही आज आपल्यासोबत नाही. भारताच्या सीमेवर अजूनही तणाव आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची राजकीय मुत्सद्देगिरी यशस्वी होताना दिसत नाही. हे अपयश किती झाकायचे हा एक प्रश्नच आहे.

prakashrsawant@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in