भारतीय सेनेचे अभिमानास्पद सेक्युलर चारित्र्य

भारतीय सेना सर्वधर्मभावाच्या पायावर कार्यरत आहे. तेच तिच्यातील एकीचे बळ आहे. प्रत्येक धर्माचा आदर करणे आणि स्वत:च्या धर्मश्रद्धेचे जाहीर प्रदर्शन न करणे, हे या सर्वधर्मसमभावाचे व्यापक स्वरुप आहे. या विरोधात वागणाऱ्यावर लष्कर कारवाई करते. सर्वोच्च न्यायालयही या कारवाईचे समर्थन करते. अशावेळी या सेक्युलर इथॉसच्या विरुद्ध जाणारे वर्तन अयोग्य ठरते.
भारतीय सेनेचे अभिमानास्पद सेक्युलर चारित्र्य
Published on

समाजमनाच्या ललित नोंदी

लक्ष्मीकांत देशमुख

भारतीय सेना सर्वधर्मभावाच्या पायावर कार्यरत आहे. तेच तिच्यातील एकीचे बळ आहे. प्रत्येक धर्माचा आदर करणे आणि स्वत:च्या धर्मश्रद्धेचे जाहीर प्रदर्शन न करणे, हे या सर्वधर्मसमभावाचे व्यापक स्वरुप आहे. या विरोधात वागणाऱ्यावर लष्कर कारवाई करते. सर्वोच्च न्यायालयही या कारवाईचे समर्थन करते. अशावेळी या सेक्युलर इथॉसच्या विरुद्ध जाणारे वर्तन अयोग्य ठरते.

दोन बातम्या. विषय उघड धर्म प्रदर्शनाचा. संबंधित व्यक्ती भारतीय लष्करी सेनेतील मोठ्या पदावरील अधिकारी. पण लावला गेलेला न्याय मात्र भिन्न भिन्न! आणि त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचा ऐरणीवर आलेला प्रश्न!

पहिली बातमी आहे लेफ्टनंट सॅम्युअल कमलेसन यांच्या संदर्भातील. भारतीय सेनेने त्यांच्यावर शिस्तभंग केला म्हणून केलेली बडतर्फीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवून त्यांची याचिका फेटाळली. काय अपराध होता सॅम्युअल कमलेसनचा?

तो तिसऱ्या घोडदळ विभागाचा अधिकारी होता. त्याच्या हाताखाली काम करणारे बहुसंख्य सैनिक शीख व हिंदू होते. भारतीय सेनेत साप्ताहिक सेक्युलर परेडची जुनी परंपरा आहे. आणि दलप्रमुख कोणत्याही धर्माचा असो, तो त्या रेजिमेंटच्या धार्मिक पूजा - प्रार्थना - इबादत वा सर्मन विधिमध्ये आनंदाने सहभागी होत असतो. आपल्या रेजिमेंटची एकता व बंधुता कायम राहावी, त्यांचं ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशा सीमेवरील जीवनात मनोबल टिकून राहावं म्हणून अधिकाऱ्यांनी त्यांचे धर्मविधी व सणासमारंभ यात उपस्थित राहणं आवश्यक असतं.

आपला स्वत:चा धर्म भिन्न असला तरी व आपल्या धर्मपरंपरा त्याची कदाचित परवानगी देत नसली तरी ‘सेनाधर्म’ म्हणून अशा सेक्युलर परेड व पूजाविधित सहभागी व्हायची सेनेची जुनी परंपरा आहे. त्यासाठी प्रत्येक रेजिमेंटची आपली स्वतःची सर्वधर्म स्थळ किंवा मंदिरं, गुरुद्वारे, मशिदी वा चर्च असतात. तिचे सर्व सेनाधिकारी आपल्या सैनिकांसह साप्ताहिक परेडमध्ये आपला स्वतःचा धर्म भिन्न असला तरी सामील होतात. पण सॅम्युअल कमलेसन यांच्यासाठी आपल्या शिख सैनिकांच्या गुरुद्वारात साप्ताहिक धार्मिक परेडमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांची प्रोटेस्टन्ट ख्रिश्चन धर्मश्रद्धा आड येत होती. ते सैनिकांसोबत गुरुद्वारापर्यंत जायचे, पण बाहेर थांबायचे. त्यांना वारंवार वरिष्ठांनी सूचना दिल्या, पण सॅम्युअलनी त्याकडे दुर्लक्ष्य केले. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन व आज्ञाभंग केला म्हणून आणि मुख्य म्हणजे सेनेची सेक्युलर परंपरा मोडली म्हणून त्यांना बडतर्फ केले.

सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ही बडतर्फी योग्य ठरवली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात “सेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःच्या वर्तनातून सैनिकांपुढे उच्च आदर्श घालून दिले पाहिजेत. तुम्ही आपल्या सैनिकांचा अपमान केला. तुमच्या धर्माच्या एका फादरने तुम्हाला ते योग्य असल्याचे सांगितले असताना, तुम्ही तिथेच थांबायला हवे होते. पण तुम्ही हटवादी वागलात… तुमच्या धर्माने काय परवानगी दिली आहे, याची वैयक्तिक श्रद्धा तुम्ही गणवेषात असताना ठेवू शकत नाही ” असे निरीक्षण भारताचे सर न्यायाधीश सूर्यकांत यांनी व्यक्त केले. या बाबत सॅमयुलच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, की त्यांच्या आशिलाचा संविधानाच्या कलम २५ अंतर्गत मिळालेला धर्मपालनाचा मूलभूत अधिकार केवळ ते सेनेच्या सेवेत आहेत म्हणून काढून घेता येणार नाही. त्याला उत्तर देताना खंडपीठ म्हणाले की, भारतीय संविधानाचे कलम २५ केवळ धर्माच्या मूलभूत/अत्यावश्यक गुणवैशिष्ट्यांचे संरक्षण करते, प्रत्येक भावना किंवा संवेदनशीलतेचे नाही. या युक्तिवादानंतर कमलसेनची याचिका डिसमिस करण्यात आली.

मी यासंदर्भात पूण्यातील काही सेवानिवृत्त सेनाधिकाऱ्याशी चर्चा केली असता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा बडतर्फीचा निर्णय योग्य ठरवत सांगितले की, सेनेच्या सेक्यूलर परेड परंपरेचे सॅम्युअल यांनी पालन करणे आवश्यक होते. कारण सैनिक सीमेवर सदैव मृत्यूच्या छायेत असतात. ते देशासाठी आपल्या जीवाचे सर्वोच्च बलिदान देतात, त्यासाठी त्यांची धर्म श्रद्धा आणि ‘सत श्री अकाल’, ‘जय भवानी’, ‘हर हर महादेव’, ‘अल्लाहू अकबर’ अशा धर्मप्रेरित युद्ध घोषणा सहाय्यक ठरतात. प्रत्येक रेजिमेंटचे असे काही मानबिंदू असतात, त्याबाबत कमांड करणाऱ्या अधिकाऱ्यांनी केवळ आदर दाखवायचा नसतो, तर त्यात मनापासून व कर्तव्य बुद्धीने सामील व्हायचे असते. त्याला सॅम्युअलनी नकार दिला ही त्यांची चूक होती, म्हणून दिलेली बडतर्फीची शिक्षा योग्य होती.

या केसच्या निकालावर भाष्य करणाऱ्या एका लेखात लेफ्ट. जनरल सय्यद अता हुसैन यांनी असे भाष्य केले आहे की, भारतीय सैनिक आणि सैन्यदल इतर कोणत्याही संस्थेप्रमाणे धर्मनिरपेक्षतेच्या एका अद्वितीय मॉडेलवर आधारित आहे. त्यात उपेक्षा नाही, तर सर्वसमावेशकता आहे. रेजिमेंटल मंदिर, गुरुद्वारा, सर्वधर्मीय तीर्थक्षेत्रे व युनिट चर्च ही ओळख परंपरा, मनोबल आणि सामयिक उद्देशाची आगळी वेगळी प्रतीके आहेत.

जनरल पुढे असेही लिहितात की, सैन्यात धर्म फूट पाडत नाही, तर उलट सर्वांना एकत्र आणतो. सेनेतली प्रत्येक ऑपरेशनची सुरवात व समाप्ती ही अशा धर्मस्थळातील परेडने होत असते. भारतीय लष्करी संस्कृतीचे सार असे आहे की, तुम्ही तुमचा धर्म सोडत नाही, तर तो वेगळ्या पद्धतीने आचरणात आणायला शिकता. एक सैनिक त्याच्या रेजिमेंटच्या कमांड करणाऱ्या अधिकाऱ्याचे अनुसरण फक्त त्याच्या पदामुळे करत नाही, तर ते त्याच्या पाठीशी सदैव असतील - धोक्यात, अनिश्चित्तेत आणि प्रार्थनेतही - या त्याच्या आत्मविश्वासामुळे करतो.

वरील मते व कारणे पाहता सॅम्युअल कमलसेनना भारतीय सेनेतील रेजिमेंटल इथॉस व त्यामागची सामान्य सैनिकांची मानसिकता, जी सदैव देशासाठी लढण्यास व मर-मिटण्यास तयार असते त्यामागे रेजिमेंटची धार्मिक परेड असते, याचे भान राहिले नाही. भारतातीत सैन्यदल ही सर्वात सेक्युलर संस्था आहे, त्याची प्रचिती या साऱ्या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.

पण याच वेळी आलेली दुसरी बातमी सेनादलाच्या सेक्युलर परंपरच्या विरुद्ध जाणारी आहे. आणि अधिक चिंतेची बाब म्हणजे तिच्या केंद्रास्थानी आहेत भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी. त्यांची माध्यमात प्रसिद्ध झालेली दोन छायाचित्रे बोलकी आहेत. एका फोटोत ते रक्षामंत्री राजनाथ सिंग सोबत महाकाल मंदिरात भगव्या वेषात पूजा करताना दिसत आहेत. त्यांचा दुसरा फोटो चित्रकुट येथे आध्यात्मिक गुरु रामभद्रचार्य यांची भेट घेतल्याचा व चांदीची गदा स्वीकारतानाचा आहे. याबाबत २ डिसेंबरला एका वर्तमानपत्रात लिहिताना जनरल डी. एस. हूद्दा(नि) यांनी त्याबाबत चिंता प्रगट करीत लिहिले आहे की, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धार्मिक स्थळांना खासगीपणे भेटी देण्यात काही गैर नाही, परंतु अशा भेटींची अधिकृत छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर टाकणे चुकीचे आहे. हूडा यांनी पुढे असे सांगितले की, राष्ट्रसेवेसाठी वैयक्तिक ओळख मागे ठेवणाऱ्या सैन्यात, एखाद्या अधिकाऱ्याकडून एकाच धर्माचे समर्थन होत असल्याचा साधा संशय येणेही विविधतेच्या सन्मानातून रुजलेल्या सेनेच्या सेक्युलर चारित्र्याला मारक आहे. इथे तर बिनदिक्कतपणे सेनाप्रमुख आपल्या धर्मश्रद्धेचे उघड प्रदर्शन करताना पाहून हुड्डांनी नाराजी व्यक्त करीत स्पष्ट केले आहे की, खासगी श्रद्धा आणि संस्थात्मक भूमिकेतील सीमारेषा पुसट करण्याचा प्रयत्न करणे अनुचित आहे. कारण ते सैन्याच्या धर्मनिरपेक्ष आणि व्यावसायिक स्वरूपाला बाधक ठरू शकते.

लष्करप्रमुखांचे धर्मप्रदर्शनाचे हे हाय प्रोफाइल आणि बहुसंख्यांक धर्माकडे झुकणारे सार्वजनिक पाऊल, तसेच लेफ्टनंट कमलेसन यांची कृती, या दोन्ही घटना अनुचित व सेनेच्या सेक्युलर इथॉसला मारक आहेत. लष्कराने स्वतःची व्यावसायिक ओळख विसरून, सेनेचा घटक म्हणून असलेली आपली भूमिका विसरून, सेनादलाचे सेक्युलर चारित्र्य विसरून सत्तारुढ सरकारच्या बहुसंख्यांकवादी भूमिकेला साथ देणे, हे बरोबर नाही. ते नजीकच्या भविष्यात पुनर्स्थापित नाही केले तर कदाचित देशाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीती व्यक्त करताना अनेक सेक्युलर अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, देशातील प्रमुख धर्माशी निगडित असणाऱ्या परंपरा लादण्याच्या प्रयत्न करणारे सरकार आणि त्याला साथ देणारे वरिष्ठ लष्करी अधिकारी लष्कराचे धर्मनिरपेक्ष स्वरूप धूसर करण्याचा धोका पत्करत आहेत. त्यामुळे सॅम्युअल कमलसेन प्रकारणातील न्यायालयीन हस्तक्षेप निव्वळ प्रतीकात्मक ठरण्याची शक्यता आहे, परिवर्तन घडविणारा नाही. शेवटी, लष्कराची विश्वासार्हता आजवर यामुळे टिकली आहे की, गणवेष धारण करणारा जवान असो की सेनाधिकारी, त्याची निष्ठा सेना परंपरेशी, जी सेवा, कौशल्य आणि राष्ट्रनिष्ठा यांनी बनली आहे, तिच्याशी तनमनाने तादात्म्य पावण्यावरआहे. धार्मिक किंवा सांस्कृतिक प्रदर्शनावर नाही.

या दोन घटनांनी सेनेच्या सेक्युलर परंपरेवर पडलेला डाग लवकरच धुवून निघावा, हीच इच्छा. कारण शेवटी हेच सत्य आहे - ‘जय हिंद! जय हिंद की सेना!!”

ज्येष्ठ साहित्यिक व अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष.

logo
marathi.freepressjournal.in