

नवलनगरी
सोनाली कोलारकर-सोनार
प्लास्टिक म्हणजे कचरा, असेच आपल्याला नेहमी सांगितले जाते. पण याच प्लास्टिकपासून चक्क मजबूत रस्ते तयार होऊ शकतात, हे एका भारतीय शास्त्रज्ञाने जगाला दाखवून दिले!
सन २००१ची गोष्ट आहे. मदुराईच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डॉ. राजगोपालन वासुदेवन आपल्या खोलीत विचारमग्न बसले होते. सरकारने प्लास्टिक बंदीची घोषणा केली होती. ५० ते ७० मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेले प्लास्टिक आता सामान्यांना वापरता येणार नव्हते. राजगोपालन हे घन कचरा व्यवस्थापनातले मोठे नाव! रसायन शास्त्रज्ञ! आणि पेशाने प्राध्यापक. घनकचरा व्यवस्थापन कसे करावे यासाठी त्यांनी भरपूर अभ्यास करून अनेक चांगले उपाय देशाला सुचवले. त्यांच्या मते प्लास्टिक वाईट नाही. खूप उपयोगी आहे. आपण त्याचा वापर नीट करत नाही! आपण ते पाण्यात फेक, रस्त्यावर फेक असे करतो. त्याचे विलगीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावत नाही. ते आधी करायला हवे. कारण जर आपण प्लास्टिक वापरू शकलो नाही तर खूप नुकसान होईल. ते कसे? तर बघा, आधी दूध हे गावागावातून एकत्रित होऊन काचेच्या बाटल्यांमधून वितरित केले जायचे. त्यात मग कधी बाटल्या फुटायच्या, त्या वापरल्यावर पुन्हा दूध केंद्रांवर आणून देताना तर पुनर्वापर करते वेळी नीट निर्जंतुक झाल्या नाहीत तर दूध नासायचे. या प्रक्रियेमुळे दूध वेळेत पोहचायलादेखील अडचणी निर्माण व्हायच्या. यामुळे कित्येक दुर्गम भागात दूध मिळायचे नाही आणि लहान मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढले. प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू झाल्याने दुधाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मिटला. हे एक दुधाचे उदाहरण झाले. अशाच कितीतरी गोष्टी आहेत ज्या प्लास्टिक वापरामुळे सोप्या झाल्या.
वाहनांचे भाग प्लास्टिकमध्ये तयार होऊ लागले आणि वाहने वजनाने हलकी झाली, दळणवळण सोयीचे झाले आणि लोकांचा रोजगाराचा प्रश्न सोडवायला मदत झाली. अनेक छोट्या छोट्या स्वस्त वस्तूत प्लास्टिक वापर बंद झाला तर तयार होणार नाहीत आणि सामान्यांना त्याचा त्रास होईल. म्हणूनच जे घटक प्लास्टिकचे आहेत आणि ज्यांचे विघटन नीट होत नाही, जसे बाजारात मिळणाऱ्या भाज्या, फळे नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिशव्या-‘कॅरी बॅग्ज’ यावर बंदी घालण्यात आली. वाहनात वापरले जाणारे प्लास्टिक आणि दूध पिशव्या यांची विल्हेवाट योग्य रीतीने केली जाते. डॉ. राजगोपालन यांचे म्हणणे असे आहे की, आधी प्लास्टिकची नीट विल्हेवाट कशी करता येईल हे बघायला हवे! पर्यावरणाला हानिकारक प्लास्टिकवर बंदी तर हवीच, परंतु गरजेच्या प्लास्टिकची नीट विल्हेवाट लावणे हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांनी मग यावर विचार करताना एक दिवस आपल्या प्रयोग शाळेत प्लास्टिक वितळवले आणि त्यांच्या अचानक लक्षात आले की, याची जोडून ठेवण्याची ‘बंधन क्षमता’ (बायनडिंग कॅपॅसिटी) खूपच छान आहे!
प्लास्टिकच्या तुकड्यांचा रस्ता तयार केला तर? आणि मग या प्लास्टिकमध्ये डांबर घालून सुरू झाले नवनवीन प्रयोग! प्लास्टिकचे बारीक तुकडे करण्यासाठी ‘श्रेडिंग मशीन’ सज्ज झाले. प्रयोगशाळेत सहकाऱ्यांसोबत काम करताना त्यांच्या लक्षात आले की, या प्रयोगामुळे डांबर पण खूप कमी प्रमाणात लागते आहे. डांबर हे रस्ता तयार करण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा आणि महाग घटक! तेच कमी प्रमाणात लागणार म्हणजे हा प्लास्टिकचा रस्ता स्वस्तात तयार होऊ शक्यतो! राजगोपालन यांना आनंद झाला आणि त्यांनी अधिक जोमाने प्रयोग करायला सुरुवात केली. त्याचदरम्यान एकदा भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी कॅम्पसला भेट दिली. त्यावेळी त्यांनी राजगोपालन यांचा शोध बघून त्यांना सल्ला दिला की, कॅम्पसमधलाच एक रस्ता तुम्ही या तंत्रज्ञानाने तयार करा. राजगोपालन यांना आनंद झाला. त्यांनी साठ फूट लांबीचा रस्ता त्यांच्या डिपार्टमेंटसमोर तयार केला. बस मग काय! देशालाच नाही तर जगाला एका फार मोठ्या संशोधनाने दिलासा मिळाला होता! प्लास्टिकच्या कचऱ्यावर एक अत्यंत उपयुक्त असे उत्तर मिळाले होते. जगभर या प्रयोगाची वाहवा झाली. त्यांना या शोधाचे २००६ साली पेटंट मिळाले.
भारतात साधारणपणे पंचेचाळीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते या तंत्रज्ञानाने आजवर तयार झाले आहेत. पुढेही तयार होतच राहणार आहेत आणि यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक आहे- आपण रोज वापरतो त्या प्लास्टिकच्या भाजीच्या पिशव्या, नोटबुकचे कव्हर, दुधाच्या पिशव्या, प्लास्टिक डिशेस, वाट्या, चमचे, फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि असेच वापरून फेकून दिलेले प्लास्टिक! भारत सरकारने जगाला प्लास्टिक प्रदूषणापासून वाचवणाऱ्या या महान शास्त्रज्ञाला भारतातील प्रतिष्ठित अशा ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानपूर्वक गौरविले! एशियन सायंटिस्ट या प्रतिष्ठित संस्थेने त्यांना ‘एशियन सायंटिस्ट १००’ हा मानाचा पुरस्कार बहाल केला. आशियातील काही मोजक्या महान संशोधकांमध्ये त्यांची गणना होते.
सरकारने प्लास्टिक बंदी जाहीर केली आणि चक्क त्यातून तयार झाले रस्ते! हे रस्ते खास करून ग्रामीण भागाला वरदान ठरताहेत. कारण हे स्वस्तात तयार होतात. या रस्त्यांमुळे कचरा तर कमी होतोच आहे, शिवाय या रस्त्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मुसळधार पावसामुळे जी रस्त्यांची हानी होते ती देखील कमी व्हायला मदत होते आहे. डॉ. राजगोपालन वासुदेवन यांच्या या प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या शोधामुळे त्यांना जगभरात भारतातील ‘प्लास्टिक मॅन’ म्हणून ओळखले जाते. आहे ना कमाल!
पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक
sonalikolarkarsonar@gmail.com