
दृष्टिक्षेप
प्रकाश पवार
गेल्या दशकभरात धर्मांधतेत वाढ होताना दिसत आहे. धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या घटना वाढत आहेत. मुळात भारतीय मातीतील धर्मनिरपेक्षतेचा प्रवास सरळ नाही, तो अनेक वळणांचा आहे. त्यामुळे स्यूडो विज्ञान आणि स्यूडो धार्मिकता या दोन्ही गोष्टी समाजजीवनात एकत्र पाहायला मिळतात.
भारतीय धर्मनिरपेक्षतेचा प्रवास हा सरळ झालेला नाही. अनेक आडवळणं घेत तो झाला आहे. त्यामुळे देशातल्या धर्मनिरपेक्षतेच्या शोकांतिकेची एक स्वतंत्र गोष्ट तयार झाली आहे. म्हणजेच राजकारणातून आणि मानवी जीवनातून धर्मनिरपेक्षतेला वगळण्याची गोष्ट उदयाला आली. कारण या संकल्पनेबद्दल प्रचंड पूर्वग्रह तयार झाले. तसेच या संकल्पनेबद्दल भीतीही निर्माण केली गेली. ही धर्मनिरपेक्षतेच्या कथेची एक बाजू आहे, तर दुसरी बाजू म्हणजे धर्मनिरपेक्षतेला समजून न घेता तिचे पारायण करण्याची कथा उदयाला आली. ही कथा केवळ भारतातील नाही, तर युरोप आणि अमेरिकेत देखील ती याच पद्धतीने घडत गेली आहे. मुख्य मुद्दा म्हणजे भारतात या नकारात्मक कथेला जाणीवपूर्वक वाढवले गेले. या नकारात्मक कथनावर मात करून धर्मनिरपेक्षतेचा स्वतःशीच संघर्ष करणारा एक नवीन मार्गही उदयाला आला.
भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत धर्मनिरपेक्षता या संकल्पनेची भारतीय समाज जीवनाच्या संदर्भात फार कमी चर्चा झाली. भारतात धर्मनिरपेक्षतेची चर्चा धर्माच्या संदर्भात किंवा राज्यसंस्थेच्या संदर्भात झाली. भारतीय समाज जीवनासाठी धर्मनिरपेक्षता ही प्राणवायूसारखी गरजेची आहे. हा संदर्भ जवळपास दुर्लक्षित राहिला. भारतीय राज्यघटना स्वीकारल्यापासून धर्मनिरपेक्ष राज्यसंस्था स्थापन झाली. त्यामुळे आता वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही, अशी धारणा तयार झाली. परंतु भारतीय राज्यघटनेच्या २५ ते ३० या कलमांमध्ये धार्मिक अधिकार आणि धर्मनिरपेक्षता यांचा विचार मांडलेला आहे. तसेच मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समान नागरी कायदा करावा, असेही मार्गदर्शक तत्त्व आहे. गुलामगिरीतून मुक्ती हा धर्मनिरपेक्षतेचा सकारात्मक प्रभाव आहे, या मुद्द्यावरही भर दिलेला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू यांनी भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर धर्मनिरपेक्ष राज्यसंस्था, नागरी समाज इत्यादी संदर्भात विशेष कार्य केले. मात्र या दोन व्यक्ती वगळता पन्नाशीच्या दशकात इतर नेत्यांनी धर्मनिरपेक्षतेसंदर्भात फारसा विचार केला नाही. साठीच्या दशकात पंडित नेहरू यांचे निधन झाले. त्यानंतर धर्मनिरपेक्षता हा विचार राजकीय प्रक्रियेत व सामाजिक जीवनात फारसा स्वीकारला गेला नाही. औपचारिकता म्हणून धर्मनिरपेक्षतेबद्दल आवर्जून उल्लेख केले गेले. परंतु विचारपूर्वक राजकीय व्यवहार आणि सामाजिक व्यवहार झाला नाही.
सत्तरीच्या आणि ऐंशीच्या दशकात धर्मनिरपेक्षतेची थट्टा आणि अवहेलना सुरू झाली. या काळापासून भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीविषयीची चर्चा न्यायव्यवस्थेकडून सुरू झाली. त्यांनी धर्मनिरपेक्षता हा विचार राजकीय व्यवहारांचा आणि सामाजिक व्यवहारांचा महत्त्वाचा भाग म्हणून अधोरेखित केला. तसेच आशिष नंदी आणि टी. एन. मदन यांनी ‘भारतीय धर्मनिरपेक्षता’ या चौकटीत धर्मनिरपेक्षतेची चर्चा सुरू केली. एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात महाराष्ट्रात ‘धर्मनिरपेक्ष चळवळ’ उदयास आली. सांगली येथील गौतमीपुत्र कांबळे यांनी धर्मनिरपेक्ष चळवळीचे नेतृत्व केले. या सर्व घडामोडींमुळे धर्मनिरपेक्षता या संकल्पनेचा नवीन अर्थ आणि दृष्टिकोन विकसित होत आहे. ही धर्मनिरपेक्षता या संकल्पनेची नवीन कथा उदयाला आली आहे.
भारतीय धर्मनिरपेक्षता
यातून भारतीय धर्मनिरपेक्षता हा एक स्वतंत्र प्रवाह आहे; भारतीय धर्मनिरपेक्षता ही संकल्पना पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षतेपेक्षा वेगळी आणि स्वतंत्र आहे; भारतीय भूमीमध्ये ही संकल्पना खोलवर पोहोचलेली आहे; असे एक नवीन चर्चाविश्व सुरू झाले आणि भारतीय धर्मनिरपेक्षतेचा स्वतंत्र संवाद सुरू झाला. यामुळे भारतीय धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भात नवीन उपविद्या शाखा उदयाला आल्या. सुरुवातीला पंडित नेहरूंच्या विचारांच्या अवतीभवती धर्मनिरपेक्षतेची चर्चा सुरू झाली. नंतर धर्मनिरपेक्षतेच्या संबंधित विचारांचे एक नवीन स्कूल उदयास आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरून धर्मनिरपेक्षतेची चर्चा नव्याने सुरू झाली. त्यामुळे ‘धर्मनिरपेक्षताविषयक आंबेडकरवाद’ हे एक स्कूल उदयास आले. त्याचवेळी डॉ. आंबेडकर व पंडित नेहरू या दोन्हीही प्रकारांपेक्षा धर्मनिरपेक्षतेसंदर्भात वेगळी चर्चा सुरू झाली. विशेषतः महात्मा गांधी यांच्या विचारांच्या अवतीभवती धर्मनिरपेक्षतेची चर्चा नवगांधीवादी विचारवंतांनी सुरू केली.
थोडक्यात भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचा आधार घेत डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू अशा तीन धर्मनिरपेक्षता विचारांच्या प्रवाहांची पुनर्मांडणी सुरू झाली. त्यावर आधारित सामाजिक जीवनाचा आणि राजकीय प्रक्रियेचा आग्रह धरला जाऊ लागला. यातून भारतीय धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक प्रक्रिया उदयास आली.
विज्ञानकेंद्री चळवळी
भारत स्वतंत्र झाल्यापासून वैज्ञानिक संस्था आणि वैज्ञानिक दृष्टिकोन (scientific society) विकसित झाला होता. मात्र याचवेळी अवैज्ञानिक दृष्टिकोन असणारा (non scientific society) समाजही अस्तित्वात होता. अवैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेला समाज धर्मनिरपेक्षतेला वगळण्याचा विचार मांडत होता. त्या दरम्यान भारतातील वैज्ञानिक संस्था, वैज्ञानिक संस्थेतील संशोधक, वैज्ञानिक तत्त्वांचा पुरस्कार करणारे बुद्धिवंत यांनी धर्मनिरपेक्षतेचे समर्थन सुरू केले. तसेच समाजामध्ये विज्ञानाचे वातावरण असावे असा आग्रहही धरला. यामुळे ‘लोक विज्ञान चळवळ’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ’ अशा चळवळी महाराष्ट्रात सुरू झाल्या व वाढल्या. सामाजिक प्रश्न घेऊन धर्मनिरपेक्षता व विवेकवाद यांची चर्चा सुरू झाली. ‘जटा निर्मूलन चळवळ’ महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सुरू झाली आणि वाढली. ही चळवळ देखील सामाजिक संदर्भात धर्मनिरपेक्ष आणि वैज्ञानिक वातावरणाची बाजू घेऊ लागली. विज्ञानाच्या अंगाने धर्मनिरपेक्षतेचे हे एक नवीन स्कूल उदयास आले. ‘धर्मनिरपेक्ष आर्ट चळवळ’ही उदयास आली. या चळवळीने अजंठा येथील गौतम बुद्धांच्या मूर्तीचित्रांचे चित्रण केले. त्याचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले. थोडक्यात कलेमधूनही धर्मनिरपेक्षतेच्या नवीन प्रवाहाची सुरुवात झाली.
इतिहासाचा मागोवा
डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित नेहरू या तीन धर्मनिरपेक्ष विचारांच्या प्रवाहांबरोबरच विज्ञानाच्या वातावरणाला मध्यवर्ती ठेवून धर्मनिरपेक्षतेचा विचार अधिक प्रवाही करणारा चौथा प्रकार उदयास आला. धर्मनिरपेक्षतेचा अन्वयार्थ लावण्यासाठी इतिहासाचा आधार घेतला गेला. वर नोंदवलेल्या चार प्रवाहांनी इतिहासाच्या अंगाने धर्मनिरपेक्षतेचे नवीन विवेचन केले होतेच. पण स्वतंत्रपणे देखील इतिहासाच्या अंगाने धर्मनिरपेक्षतेची चर्चा सुरू झाली. कारण इतिहास आणि धर्मांधता, इतिहास आणि जमातवाद यांचे चर्चाविश्व ऐंशीच्या दशकापासून पुढे सुरू झाले होते. त्यापेक्षा वेगळ्या इतिहास लेखनाची पद्धत सुरू झाली. त्यामुळे ‘इतिहासातून उदयाला आलेला धर्मनिरपेक्ष विचार’ हा एक पाचवा प्रकार ठरला. उदाहरणार्थ, गौतम बुद्धांचे विचार धर्मनिरपेक्ष होते. मुघल सम्राट अकबराने सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार केला होता. संत कबीरांचे विचार धर्मनिरपेक्ष होते. छत्रपती शिवरायांनी घडवलेल्या राजकीय प्रक्रियेमध्ये धर्मनिरपेक्षता होती, अशी चर्चा सुरू झाली. मोहन धारिया यांनी शिवरायांच्या धर्मनिरपेक्षतेवर स्वतंत्र पुस्तिका लिहिली. महात्मा फुले यांनी घडवलेल्या सामाजिक जीवनाच्या प्रक्रियेमध्ये धर्मनिरपेक्ष व्यवहार होत होता. या अशा अंगाने इतिहासाचे विश्लेषण केले गेले. यामुळे ‘इतिहास’ हा धर्मनिरपेक्षतेचा एक मुख्य स्रोत ठरत गेला. याबरोबरच डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित नेहरू या तीन धर्मनिरपेक्षतेच्या प्रवाहांनी इतिहासातून धर्मनिरपेक्षतेला आधार मिळवून दिले. त्यामुळे हे तीन प्रवाह धर्मनिरपेक्षतेचा इतिहासाच्या अंगाने प्रचार व प्रसार करत आहेत.
डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर आधारलेल्या संघटना, व्यक्ती आणि विचारवंत यांनी गौतम बुद्ध, कबीर, महात्मा फुले, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड यांच्या विचारातील धर्मनिरपेक्ष विचारांची तत्त्वे आणि सामाजिक व्यवहार या संदर्भात धर्मनिरपेक्षतेचा नवीन प्रवाह विकसित केला. भक्ती चळवळीतील सर्वधर्मसमभाव या संदर्भातही धर्मनिरपेक्षतेचा विचार मांडला गेला. पंडित नेहरूंच्या विचारांवर आधारित वैज्ञानिक संस्था आणि विचारवंत हेही धर्मनिरपेक्षतेचे समर्थन करतात. या तीन प्रवाहांमध्ये काही मुद्द्यांवर मतभिन्नता आहेत. मात्र त्याचवेळी धर्मनिरपेक्ष जीवनाची गरज म्हणून हे तीनही प्रवाह परस्परांशी संवाद साधण्याची मानसिकताही घडवत आहेत.
स्त्रीवादी चळवळीतील धर्मनिरपेक्षता
सत्तरीच्या दशकानंतर स्त्रीवाद उदयास आला. स्त्रीवाद एकाच प्रकारचा नाही. परंतु या विचार प्रवाहात स्त्रीला मध्यवर्ती ठेवून धर्मनिरपेक्षता, विज्ञान, विवेकवाद अशी चर्चा घडू लागली. यामुळे धर्मनिरपेक्ष विचारांचे महत्त्व स्त्रीवादी चळवळींमधून देखील अधोरेखित झाले. धार्मिक विश्वाचे नियम महिलांची प्रतिष्ठा, महिलांचे स्वातंत्र्य, महिलांमधील भगिनीभाव, महिला आणि पुरुषांमधील नैतिकता अशा अनेक धर्मनिरपेक्ष गोष्टींचा ऱ्हास घडवतात. याविषयीचे आत्मभान स्त्रीवादी चळवळींमधून विकसित झाले.
धर्मनिरपेक्षतेपुढची आव्हाने
असे असले तरी समकालीन काळात भारतीय धर्मनिरपेक्षतेपुढे मोठी आव्हाने आहेत. धार्मिक विचार यापेक्षाही ‘छद्मी’ (स्यूडो) धार्मिक विचार हे भारतीय धर्मनिरपेक्षतेपुढील मोठे आव्हान आहे. तसेच छद्मी वैज्ञानिकता हे देखील भारतीय धर्मनिरपेक्ष संकल्पनेपुढचे आव्हान आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यापैकी तंत्रज्ञानाचा वापर गैरवैज्ञानिक समाजाकडून मोठ्या प्रमाणावर केला जातो. इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, इंटरनेट, व्हाॅट्सॲप इत्यादींमधून तंत्रज्ञानाचा उपयोग धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात केला जातो. अशी आव्हानांची यादी मोठी आहे. परंतु मुख्य मुद्दा म्हणजे धर्मनिरपेक्षतेच्या विविध प्रवाहांनी एकत्रित येऊन धर्मनिरपेक्षतेची एक कॉमन विषयपत्रिका (अजेंडा) ठरवणे हे एक मोठे आव्हान आहे. कारण प्रत्येक प्रवाहाचा धर्मनिरपेक्षतेचा स्वतंत्र अजेंडा आहे. तसेच प्रत्येक धर्मनिरपेक्षतेच्या प्रवाहाची दुसऱ्या प्रवाहाशी अंतर्गत स्पर्धाही आहे. त्या स्पर्धेमध्ये पूर्वग्रहदूषित मतप्रवाहही आहेत. यामुळे लहान-लहान चळवळींमध्ये धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरला गेला असला तरी त्यांची दखल घेतली जात नाही. परंतु लहान लहान चळवळी धर्मनिरपेक्षतेसाठी संघर्ष करत आहेत. उदाहरणार्थ, अलीकडेच १४ व १५ जून रोजी ‘सेक्युलर मुव्हमेंट महाराष्ट्र’ या संघटनेचे पुणे येथे अधिवेशन झाले. गौतमीपुत्र कांबळे यांनी ही चर्चा घडवून आणली. त्यांनी ‘आंबेडकर स्कूल’ (Ambedkar School of secularism) मधून उदयास येणाऱ्या धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक चर्चा केली. अशी चर्चा आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, जटा निर्मूलन चळवळ, विचारवेध संमेलनांच्या माध्यमातून झाली आहे. राजन गवस यांनी ‘भंडारभोग’ व ‘चौंडक’ या कादंबऱ्यांमध्ये धर्मनिरपेक्षतेचा भारतीय संदर्भ विकसित केला आहे. त्यावर आधारित ‘चौंडक’ हा चित्रपट देखील भारतीय धर्मनिरपेक्षता आणि महिलांच्या शोषणमुक्तीसाठी व दुःखमुक्तीसाठी धर्मनिरपेक्षतेचा विचार मांडतो.
म्हणजेच सार्वजनिक जीवनात धर्मनिरपेक्षतेचा विचार चळवळी आणि साहित्याच्या क्षेत्रातून विकसित होत आहे. या प्रक्रियेतून धर्मनिरपेक्षतेचा अर्थ ऐहिक जीवनावरील छद्मी धर्माचे वर्चस्व कमी करणे आणि मानवी जीवनातील जास्तीत जास्त क्षेत्रे इहवादी विचारांच्या प्रभावाखाली आणणे हा आहे.
राज्यशास्त्राचे अध्यापक व राजकीय विश्लेषक.