
- पाऊलखुणा
वैभवशाली सिंधु संस्कृतीच्या निर्मात्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. त्यांनी लहान मुलांच्या आनंदाला महत्त्व देत, त्यांचं भावविश्व जपणाऱ्या खेळण्यांची निर्मिती केली.
पंजाबमधील रावी नदीचा काठ. साल १९२१. शहराचं नाव हडप्पा. इथे उत्खनन सुरू होतं. मातीचे थर निगुतीने बाजूला केले जात होते. भांडी, मणी, देवतांच्या मूर्ती, जळलेल्या धान्याचे अवशेष. अशा विविध गोष्टी सापडत होत्या. कोणत्याही उत्खननात सापडतात तशा. पण आणखी काही अनोख्या गोष्टी या उत्खननात सापडल्या.
चाक असलेली बैलगाडी, झाडाला लटकलेलं माकड, सुंदरसा पक्षी, बैलगाडीत बसलेली मुलगी, बाहुलीच्या आकाराच्या मूर्ती...ही अशी वेगवेगळी खेळणी सापडत गेली आणि हडप्पा-मोहेंजोदडो इथल्या ‘सिंधु संस्कृती’चं वेगळं वैशिष्ट्य जगासमोर आलं. मातीची भांडी घडवण्याची कला या लोकांना अवगत होतीच, पण त्याचबरोबर त्या कुंभारकामाचा उपयोग करून आपल्या लहान मुलांसाठी खेळणी बनवण्याची वेगळी दृष्टीही या संस्कृतीतल्या लोकांकडे होती. या खेळण्यांचे काही अवशेष आजही दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात आपल्याला पहायला मिळतात. हे अवशेष पाहतानाही ही सुबक खेळणी घडवणाऱ्या हातांचं आणि त्या मागच्या त्यांच्या कलात्मक दृष्टीचं कौतुक वाटतं.
यानंतर धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद इत्यादी ठिकाणीही उत्खननात अशाच प्रकारचे खेळण्यांचे अवशेष सापडले आहेत. ही हडप्पाकालीन खेळणी भाजक्या मातीची बनवलेली असत. डोक्याची पुढेमागे हालचाल करू शकणारा बैल, बैलगाडी, पक्ष्यांच्या आकाराच्या शिट्या, खुळखुळे अशा विविध खेळण्यांचा यात समावेश होतो. ही खेळणी केवळ करमणुकीपुरती मर्यादित नव्हती, तर त्यामधून त्या समाजातील सर्जनशीलता, त्यांचं पशुप्रेम आणि त्यांचं तांत्रिक कौशल्य हे सगळंच प्रकट होतं.
सिंधु संस्कृतीतील लोक संपन्न जीवन जगत होते. शेती, व्यापार उत्तम चालत होता. वस्तूंची परदेशामध्ये आयात-निर्यात होत होती. त्यामुळे विविध कलाकुसरीला वाव मिळाला होता. या संस्कृतीतील लोक वस्तुकलेमध्ये निपुण तर होतेच, शिवाय विणकाम, वेशभूषा, केशभूषा, संगीत, नृत्यकला, अलंकार व खेळणी बनविण्यात पारंगत होते. उत्खननांमध्ये सापडलेल्या विविध वस्तू याची साक्ष देतात.
मोहेंजोदडो आणि चन्हु-दारो येथे उत्खनन करणारे पुरातत्त्व अभ्यासक एर्नेस्ट मॅके लिहितात, “मोहेंजोदडो आणि हडप्पा या शहरांप्रमाणेच चन्हु-दारो येथेही विविध प्रकारची खेळणी व करमणुकीच्या वस्तू सापडल्या आहेत. हडप्पा काळातील लोक आजच्या भारतीयांप्रमाणेच-लहान मुलांच्या आनंदाला महत्त्व देत असावेत, असे यातून दिसते. त्या काळातील मुले स्वतःच्या हाताने साधी मातीची खेळणी तयार करत असत, परंतु त्यांच्याकडे अशा अनेक खेळणीही होती, जी केवळ कुशल कारागिरांकडूनच तयार होऊ शकत होती.”
मॅके पुढे खेळण्यातील बैलगाडीबद्दल लिहितात, “आतापर्यंत उत्खननात मिळालेल्या बैलगाड्यांच्या चाकांच्या आणि तुटलेल्या भागांच्या संख्येवरून असे दिसते की, चन्हु-दारो येथे खेळण्याच्या बैलगाड्या अतिशय लोकप्रिय होत्या. त्या जितक्या सहज तयार करता येत असत, तितक्याच सहजपणे तुटतही असत. उत्खननावेळी जवळजवळ दररोज अशा तुकड्यांचे काही भाग सापडत असत. एकदा का खेळणी तुटली की, ती दुसऱ्या खेळात वापरली जात असावीत.”
तर पुरातत्त्व अभ्यासक बुर्जोर अवारी त्यांच्या ‘इंडिया : दी एन्शन्ट पास्ट’ पुस्तकात लिहितात की, “सिंधु संस्कृतीतील सर्वात महत्त्वाच्या प्राचीन हस्तकला क्षेत्रांमध्ये वस्त्रनिर्मिती, मातीच्या भांड्यांचे उत्पादन, दगड कोरण्याची कला आणि घरगुती वापरातील वस्तूंचा समावेश होता. तसेच दागिने, मूर्ती, लहान शिल्पकृती आणि मुलांसाठीची खेळणी यांचाही यात समावेश होता, त्यातील काही खेळणी यांत्रिक स्वरूपाची होती. ही खेळणी आपल्याला त्या संस्कृतीच्या प्रगतपणाचा, पुढारलेपणाचा सर्वात विश्वासार्ह पुरावा देतात.”
सिंधु संस्कृतीतील लोक फार कुशलतेने मातीची खेळणी बनवत असत, याचे प्रमाण पुरातत्त्व अभ्यासक जोनाथन मार्क केनॉयर यांनी दिलं आहे. विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठात मानववंश शास्त्राचे प्राध्यापक असलेल्या केनॉयर यांनी १९८६ पासून हडप्पा पुरातत्त्व संशोधन प्रकल्पांतर्गत हडप्पा इथे उत्खनन केलं. जोनाथन मार्क केनॉयर ‘एन्शन्ट सिटीस् ऑफ दी इंडस व्हॅली’ पुस्तकात लिहितात, “सिंधु संस्कृतीच्या बहुतांश स्थळांच्या उत्खननात आढळणारी मातीची खेळणी कुशलतेने बनवली जात. विशेषतः अशी करमणुकीची खेळणी ज्यात वेगवेगळे भाग जोडता येऊ शकत होते. जसे की, खेळण्यातील मातीच्या बैलगाड्या ज्यात चाकं, बैल जोडता येऊ शकत होते. आजही सिंधु खोऱ्यातील लोक बैलगाडीच्या शर्यती घेतात.”
सिंधु संस्कृतीतील खेळणी त्या काळच्या संस्कृतीतील बालकांची समज, कल्पकता यांना चालना देणारी होती. तसेच त्यांच्या जीवनशैलीचा आणि सांस्कृतिक समृद्धीचा भाग होती. मुलांसाठी करमणुकीबरोबरच शिकवण देणारी ही खेळणी त्या काळच्या समृद्धतेची साक्ष देतात.
rakeshvijaymore@gmail.com