

शिक्षणगुज
युवराज माने
'मला मरायचं नाही…' हा मृत्यूचा नाही, तर आयुष्यावर प्रेम करणाऱ्या ए का मुलीच्या मनातला निरागस प्रश्न आहे— जो एका वर्गात उमलला आणि सगळ्यांना जगण्याचा अर्थ शिकवून गेला.
तो दिवसही इतर दिवसांसारखाच सुरू झाला होता. वर्गात गोंगाट नव्हता, पण जिवंतपणा होता. कोणी गोष्ट सांगत होतं, कोणी प्रश्न विचारत होतं, आणि मी नेहमीप्रमाणे वह्या तपासत होतो. पण कान मात्र लेकरांकडेच होते. स्वातीची वही तपासायला घेतली. तिला जवळ बोलावून काही सूचना देत होतो. आणि तेवढ्यात— अचानक स्वातीच्या तोंडून एक विधान बाहेर पडलं.
“गुरुजी, मला मरावं वाटत नाही…” क्षणभर मला वाटलं, मी चुकीचं ऐकलंय. पण पुढचे शब्द काळजात रुतत गेले.
“कोणी मेलं की मला कसंतरी होतं. एवढं चांगलं आयुष्य सोडून आपण मरणार हा विचार खूप त्रास देतो. मला वाटतं मी मरूच नये. माझे आई-वडील पण मरू नयेत.”
हातातला पेन कधी खाली पडला, ते मला कळलंच नाही. वर्गात शांतता पसरली— ती शिस्तीची नव्हती, ती विचारांची होती. मी स्वातीकडे पाहिलं. डोळ्यांत भीती नव्हती. होती ती कुतूहलाने भरलेली घालमेल— “हे असंच का?” “आपण का मरतो?” “हे टाळता येईल का?” असे प्रश्न तिच्या मनात गर्दी करत होते. त्या क्षणी मला उमगलं— ही भीती नाही. ही जीवनावरचं प्रेम आहे. मी शांतपणे बोलायला सुरुवात केली.
“स्वाती, तुझं असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. ज्याला आयुष्य आवडतं, ज्याला माणसं प्रिय असतात, त्यालाच असं वाटतं.” वर्ग अधिकच शांत झाला.
“आपण एक दिवस मरणार आहोत, हे आयुष्याचं सत्य आहे,” मी पुढे म्हणालो, “पण ते आजचं सत्य नाही. आजचं सत्य म्हणजे— आपण जिवंत आहोत. श्वास घेतोय, हसतोय, आई-वडिलांसोबत राहतोय, मित्रांबरोबर शिकतोय.”
मी क्षणभर थांबलो. “मृत्यू आयुष्याचा शेवट असतो, पण तो आयुष्याचा अर्थ नसतो. आयुष्याचा अर्थ आज आपण कसं जगतो यात असतो.” स्वाती लक्ष देऊन ऐकत होती. इतर लेकरांच्या चेहऱ्यावरही समजून घेण्याची उत्सुकता दिसत होती. “तुला आणि तुझ्या आई-वडिलांना कोणीच मरू नये असं वाटतं.”
मी पुढे म्हणालो, “याचा अर्थ असा की, तू त्यांच्यावर खूप प्रेम करतेस. आणि प्रेम असलं की वेगळं होण्याची भीती मनात येतेच.”
काही लेकरांनी हळूच मान डोलावली. कदाचित त्यांच्या मनातही असाच एखादा न बोललेला प्रश्न दडलेला होता.
मी म्हणालो— “आपण मृत्यू थांबवू शकत नाही, पण आयुष्य रिकामं जाऊ देणं नक्की टाळू शकतो. म्हणूनच शिकायचं, हसायचं, चुका करायच्या, सुधारायचं आणि माणूस म्हणून चांगलं व्हायचं.”
त्या शब्दांनी वर्गातली हवा हलकी झाली. स्वातीच्या चेहऱ्यावर हळूहळू समाधान उमटू लागलं. ती म्हणाली, “मग गुरुजी, आपण चांगलं जगलो तर मरणाची भीती कमी होते का?”
मी हसून उत्तर दिलं— “हो. कारण चांगलं जगणं, शिकणं हेच शिक्षणाचं खरं उद्दिष्ट आहे.” त्या क्षणी वर्गात एक शांत समाधान पसरलं. प्रश्न संपला नव्हता, पण त्याला दिशा मिळाली होती. त्या दिवशी आम्ही मृत्यूबद्दल धडा घेतला नाही. आम्ही जगण्याचं तथ्य समजून घेतलं. मी बोललो, समजावलं, शब्द दिले— पण खरं सांगायचं तर त्या दिवशी मी जास्त ऐकत होतो आणि कमी बोलत होतो. रात्री मात्र झोप येईना. स्वातीचं ते वाक्य माझ्या मनात घुमत राहिलं.
आपण मुलांना नेहमी “मोठं व्हा”, “यशस्वी व्हा” शिकवतो. पण ते आयुष्याला इतकं घट्ट धरून ठेवतात, हे शिकवतो का? स्वातीने मृत्यूबद्दल बोलताना मला आयुष्याचा अर्थ सांगितला. तिला अमर व्हायचं नव्हतं— तिला जगायचं होतं… मनापासून. कदाचित म्हणूनच शाळा केवळ अभ्यासाची जागा नसते. ती अशा प्रश्नांची सुरक्षित जागा असते— जिथे लेकरं मोकळेपणाने आपल्या मनातली भीती, प्रेम आणि आयुष्याविषयीचं कुतूहल मांडू शकतात. त्या दिवशी वर्गात एक धडा शिकवला गेला नाही— एक गूज उलगडलं. आणि गुरुजी म्हणून मला पुन्हा एकदा जाणवलं— शिक्षण म्हणजे उत्तर देणं नव्हे, तर अशा प्रश्नांसोबत थांबून राहणं शिकणं आहे. स्वातीच्या मनातल्या घालमेलीतून त्या दिवशी एक शिक्षणगूज उमगलं—
शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकातली उत्तरं नाहीत, तर आयुष्याशी संबंधित प्रश्न भीती न बाळगता समजून घेण्याची ताकद आहे. कारण ज्या शाळेत “मला मरूच नये वाटतं” असं मोकळेपणाने म्हणता येतं, ती शाळा खर्या अर्थाने जगायला शिकवते.
लेखक, प्रयोगशील शिक्षक आहेत. ‘आनंदाचं झाड’ या टोपणनावाने ते शिक्षणातील अनेक बाबींवर
लेखन करतात