

अजब निसर्ग
मकरंद जोशी
निसर्गाची साखळी ही लाखो वर्षांच्या ओघात ‘ट्राइड ॲन्ड टेस्टेड’ पध्दतीने तयार झालेली आहे. त्यामुळेच या साखळीचे दुवे एकमेकांशी घट्ट जोडलेले पाहायला मिळतात. हे दुवे म्हणजेच निसर्गातले वेगवेगळे घटक एकमेकांवर अवलंबून असल्याने, त्यांच्यातील मैत्री अगदी घट्ट असते. त्यातला एक घटक किंवा एक जीव त्याच्या जागेवरुन हलला, नष्ट झाला तर त्याचा परिणाम होऊन दुसरा जीवही संकटात येतो. याचं आदर्श उदाहरण म्हणजे फुलं येणाऱ्या वनस्पती आणि किटक. वनस्पतींना आपला बीज प्रसार करायला किटकांची मदत, साथ लागतेच. त्यासाठीच तर त्या आपल्या फुलांच्या रंगांनी, सुवासाने किटकांना आकर्षित करुन घेतात. किटक या पृथ्वीवर अवतरले ते सुमारे अठ्ठेचाळीस कोटी वर्षांपूर्वी. त्याच काळात वनस्पतीही पाण्याचा आसरा सोडून जमिनीवर स्थिरावू लागल्या होत्या. मात्र या सुरुवातीच्या काळातल्या वनस्पती अपुष्प म्हणजे फुलं न येणाऱ्या होत्या. त्यांच्या गटातील फर्न म्हणजे नेचा आजही त्याच रुपात आपल्याला पाहायला मिळतो. किटकांच्या आगमनामुळे त्यांचा उपयोग करुन वनस्पतींचा प्रसार अधिक वेगाने आणि खात्रिशीरपणे करता येईल हे निसर्गाच्या लक्षात आलं आणि वनस्पतींना फुलं यायला सुरुवात झाली.
मग मधमाशांसारखे अनेक किटक त्या फुलांमधील मधुरस चाखण्यासाठी फुलांवर रुंजी घालू लागले आणि आपोआप परागी भवन होऊन झाडांना फळे येऊ लागली. या फळांमधील बियांमुळे झाडांची संख्या वाढायला सुरुवात झाली.
अशी चाळीस-पंचेचाळीस कोटी वर्षांची दोस्ती किटक आणि वनस्पतींमध्ये रुजलेली पाहायला मिळते. मात्र निसर्गाच्या अजब कारभारात काही वेळा दोस्त दोस्त न राहा असंही होतं आणि दोस्त बनला वैरी याचा अनुभव येतो. ज्या किटकांच्या मदतीने वनस्पती आपला बीज प्रसार करतात, त्याच किटकांची शिकार करणाऱ्या वनस्पतीही या निसर्गात पाहायला मिळतात. यांना किटकभक्षी वनस्पती म्हणून ओळखलं जातं. अंटार्क्टिका वगळता जगातल्या प्रत्येक खंडात किटक भक्षी वनस्पतींचे प्रकार पाहायला मिळतात. पृथ्वीतलावर सगळ्यात पहिल्यांदा सुमारे साडे आठ कोटी वर्षांपूर्वी या किटकभक्षी वनस्पती अवतरल्या. या वनस्पती सर्वसाधारणपणे जिथल्या मातीत पुरेशी पोषण मुल्ये नसतात, आम्लाचे प्रमाण जास्त असते आणि पाणथळ भाग असतात तिथे वाढताना दिसतात. किटकांना मारुन त्यांच्यातील नायट्रोजन मिळवत असल्याने या वनस्पती अशा परिसरात सहज वाढू शकतात. एकिकडे मानवी अतिक्रमण,अधिवासाची हानी यामुळे किटकभक्षी वनस्पती धोक्यात आलेल्या असतानाच दुसरीकडे त्यातील काही जाती मात्र ‘टिश्शू कल्चर’तंत्रज्ञानामुळे हौशी लोकांना आपल्या बागेत लावायला सहज मिळताना दिसतात. जगभरात अशा किटकांचा फराळ करणाऱ्या वनस्पतींच्या सुमारे ८०० जाती नोंदवण्यात आल्या आहेत. दरवर्षी त्यात नवीन जातींची भर पडत असते. या प्रकारच्या वनस्पतींवर डार्विनने दीर्घ काळ संशोधन केलं आणि किटक भक्षणाची यंत्रणा ही वेगवेगळ्या जातीच्या वनस्पतींमध्ये स्वतंत्रपणे विकसीत झाली असल्याचा निष्कर्ष नोंदवला होता. काही किटकभक्षी वनस्पती किटकांना पकडण्यासाठी सापळे तयार करतात तर काही वनस्पती आपल्या फुलांभोवती चिकट स्राव पाझरुन किटकांना अडकवतात.
शाळेच्या विज्ञानाच्या पुस्तकात ज्याविषयी आपण हमखास वाचलेलं असतं अशी किटकभक्षी वनस्पती म्हणज ‘पिचर प्लँट’ अर्थात घटपर्णी. ही अफलातून वनस्पती ‘नेपेन्थेसी’कुळातील आहे. आपल्या भारतामध्ये ही वनस्पती फक्त मेघालय राज्यात पाहायला मिळते. त्यामुळे तिथे आढळणारी प्रजाती ‘नेपेन्थीस खासिआना’ म्हणून ओळखली जाते. मेघालयातील खासी, गारो आणि जैंतिया टेकड्यांवर ही वनस्पती आढळते. या वनस्पतीला एखाद्या पिचरच्या म्हणजे सुरई किंवा जगाच्या आकाराचा भाग असतो जो त्याच्या पानांचे रुपांतर असतो. या पिचरमध्ये म्हणजे निसर्गाने दिलेल्या घड्यामध्ये किटकांना पकडून ही वनस्पती तिला आवश्यक असलेली पोषक द्रव्ये मिळवते. या पिचरच्या तोंडावर काही ग्रंथी असतात ज्यातून मधासारखा द्रव पाझरत असतो, ज्यामुळे किटक तिकडे आकर्षित होतात आणि आत घसरुन पडतात. आतल्या घसरड्या भागावरुन त्यांना पुन्हा वर येता येत नाही शिवाय या पिचरच्या अर्ध्या भागापासून या किटकांना नामोहरम करणारे एन्झाइम स्रवणाऱ्या ग्रंथी असतात. या एन्झाइममुळे किटकांच्या शरीराचे विघटन सुरू होते आणि त्यांच्यातील पोषक द्रव्ये वनस्पतीला मिळतात.
आपल्या महाराष्ट्रात काही विशिष्ट ठिकाणी म्हणजे कासचे पठार, महाबळेश्वर, कोकणातील काही सड्यांवर पाहायला मिळणारी किटकभक्षी वनस्पती म्हणजे ‘ड्रॉसेरा ईंडिका’. आकाराने अगदी चिमुकली असलेली ही वनस्पती अनेकदा नजरेला पटकन दिसतही नाही. मात्र जमिनीवर बसकण मारून बारकाईने पाहिल्यावर या वनस्पतीला ‘सनड्यू’ किंवा ‘दवबिंदू’ का म्हणतात ते कळतं. या चिमुकल्या वनस्पतीवर तितकीच चिमुकली पण मोहक फुले येतात. या फुलांच्या देठांना दवबिंदूंप्रमाणे चमकणारे गोडसर थेंब लगडलेले असतात. हे थेंब चिकट असतात आणि हेच या झाडाच्या फुलांकडे आकर्षित झालेल्या किटकांचा घात करतात. या दवबिंदूं असलेल्या थेंबांच्या गोड वासाने किटक या झाडाकडे आकर्षित होतात आणि फुलावर बसून त्यातील मधुरस मिळवायचा प्रयत्न करतात तेव्हा फुलालगतच्या चिकट थेंबांमध्ये ते फसतात, त्यावरुन उडून जाऊ शकत नाहीत मग त्या फुलाभोवती असलेल्या झाडाच्या नांग्या एकत्र येतात आणि अडकलेल्या किटकाच्या शरीरातील जीवनरस ( विशेषतः नायट्रोजन) शोषून घेतला जातो आणि चिपाड झालेला किटकाचा मृतदेह बाहेर फेकला जातो.
किटकभक्षी वनस्पतींमधील सर्वांत मोहक प्रकार युट्रिक्युलारिया गटात पाहायला मिळतो. कासच्या पठारावर फुललेली चिमुकली जांभळी फुले तुम्ही पाहिली असतील. ‘सितेची आसवे’ अशा भारदस्त नावाने ओळखल्या जाणाऱ्या या फुलांचे झाडही किटकांची शिकार करते. त्यासाठी या झाडाच्या मुळांवर असलेल्या गाठींचा वापर केला जातो. सन ड्यूच्या कुळातील पण वेगळ्या पध्दतीने किटकांची शिकार करणारी वनस्पती म्हणजे ‘व्हिनस ट्रॅप.’ यु.एस.ए.मधील काही राज्यांमध्येच ही वनस्पती पाहायला मिळते. या वनस्पतीच्या पानांचे रुपांतर चिमट्यात किंवा चापात झालेलं असतं. जेव्हा हा चिमटा विलग असतो तेव्हा आतील लाल रंग किटकांना आकर्षित करतो. किटक पानावर बसल्यानंतर पानाच्या संवेदनशिल तंतूंची हालचाल होते आणि पानाचा चिमटा बंद होतो. किटकाचा पानाला स्पर्श झाल्यापासून सेकंदाच्या दहाव्या भागात हे घडतं,त्यामुळे अक्षरशः आपल्या डोळ्यांची पापणी लवायच्या आधी व्हिनस ट्रॅपने किटकाची शिकार केलेली असते. आता ‘व्हिनस ट्रॅप’ नर्सरींमध्येही विक्रीला उपलब्ध असते.
या किटकभक्षी वनस्पती म्हणजे अजब निसर्गाच्या गजब करामतीचं अनोखं उदाहरणच आहेत. ज्यांची कायमची दोस्ती आहे अशा जीवांनासुध्दा प्रसंगी स्वतःच्या फायद्यासाठी शत्रू बनवण्याची किमया निसर्गातच पाहायला मिळते. निसर्ग जितका सुंदर आहे तितकाच तो कठोरही आहे.
निसर्ग अभ्यासक व लेखक
makarandvj@gmail.com