

आनंदाचे झाड
युवराज माने
गुरुजी लहानपणी खूप शांत, लाजाळू होते. वर्गात शिक्षकांनी कौतुक करणं, पाठीवरून हात फिरवणं, तू चांगलं करशील असं सांगणं… या सगळ्याची त्यांना नेहमीच आस असे. तेव्हा त्यांच्या नकळत एक स्वप्न रुजत असे. कधीतरी मी गुरुजी झालो… तर माझ्याकडून कधीही एखादं लेकरू असं रिकामं, एकटं, धीर न मिळालेलं राहता कामा नये. वर्षं गेली आणि एक दिवस ते स्वतः गुरुजी झाले.
त्यांनी वर्गात पाऊल टाकताच लेकरांच्या डोळ्यांत चमक यायची.
कोणीतरी धावत येऊन हाताला धरायचं, कोणीतरी खांद्याला बिलगायचं, कोणी वही पुढे करून ‘गुरुजी, मी लिहिलं’ म्हणायचं. गुरुजी एकेकाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारे. अडखळणाऱ्याला धीर देणारे. चांगलं करणाऱ्याचं लाडीक कौतुक करणारे.
कधी कधी तर लेकरं त्यांच्या जवळ बसायला स्पर्धाच लावायची, ‘मी पुढे!’ ‘मी गुरुजींच्या शेजारी!’
गुरुजींसाठी लेकरं म्हणजे फक्त विद्यार्थी नव्हते तर त्यांच्यासाठी ती लेकरं म्हणजे जीव की प्राण होती.
त्या लेकरांमध्ये करुणा ही गोडगोड बोलणारी, डोळ्यांत प्रचंड निरागसता असलेली गोड मुलगी होती. गुरुजींनी तिला अनेकदा आधार दिला होता. कधी तिची पाटी धरून दुरुस्त केली, कधी तिच्या रडवेल्या चेहऱ्यावर हसवणारं वाक्य ठेवलं तर कधी तिच्या संघर्षात तिचा आत्मविश्वास बनून उभे राहिले.
ती सहावीला गेली, मग सातवीला.
पण गुरुजींचा आणि तिचा स्नेह तसाच होता—निर्मळ, पवित्र, जिव्हाळ्याचा.
आणि अचानक… एका दिवसात सर्व बदललं.
शाळा सुटल्यावर एक मुलगी धावत येऊन गुरुजींच्या समोर उभी राहिली. थरथरत म्हणाली, “गुरुजी,… करुणा… तुमच्याबद्दल विचित्र बोलतेय. तिला वाटतं की, तुम्ही तिला मुद्दाम जास्त जवळ घेता, म्हणून….. ”
त्या वाक्याने जणू जगच कोसळलं. गुरुजी स्थिरच बसून राहिले. काही क्षण काहीच आवाज नाही. फक्त छातीत काळीज चिरणारा वेदनेचा धडधडणारा नाद.
जे प्रेम, जिव्हाळा, जपणूक त्यांनी दिली… तेच नातं संशयाच्या कुंपणात अडकू शकतं का?
त्या रात्री गुरुजी झोपलेच नाहीत. अंगणात बसून त्यांनी आकाशाकडे पाहिलं…; करुणाचा निखळ चेहरा, तिचं हसू, तिचा विश्वास, तिचं कौतुक सगळं सगळं डोळ्यांसमोर फिरत राहिलं.
“मी एवढं चुकीचं वागलो का?” की एवढ्या वर्षांच्या प्रेमावर असा आरोप केला गेला.. ?”
त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं…. एकेक लेकरु त्यांना आठवत होतं, शाळेचा पहिला दिवस आठवत होता. आणि करुणाच्या मनातल्या त्या गैरसमजाने ते आतून अक्षरशः मोडून पडले होते.
दुसऱ्या दिवशी… संपूर्ण वर्गासमोर गुरुजी शांत उभे होते, पण चेहऱ्यावर असह्य वेदना होती. लेकरं गोंधळलेली, चिंताग्रस्त. थरथरत आवाजात गुरुजींनी सुरुवात केली,
“बाळांनो… मी आयुष्यभर एकच प्रयत्न केला… की, तुमच्यावर कुणाचं तरी प्रेम असावं, तुम्ही एकटं समजू नये म्हणून तो आधार मी तुम्हांला दिला. मी स्वतः लहानपणी तो प्रेमाचा हात शोधत होतो…, पण तो हात मला मिळाला नाही म्हणून मी तुम्हांला तो देत राहिलो.”
मग त्यांनी करुणाकडे पाहिलं. डोळ्यांत फक्त अश्रू, राग नव्हता पण मनावरची जखम मात्र खूप खोल होती.
“करुणा…, सात वर्षं मी तुला प्रोत्साहन दिलं, तुझ्या चुकीत तुला शिस्त लावली, समजावलं, तू रडलीस तर पाठीवरून हात फिरवला. हे सगळं तुला वाईट कसं वाटलं ग बाळा? मी तुझ्याबाबतीत असा विचार करीन का कधी.. तू माझ्याबद्दल असं बोलशील याची कल्पनाही केली नव्हती.”
गुरुजींचं बोलणं तुटत होतं. ते रडले—निराशेने, वेदनेने. वर्गात पूर्ण शांतता. करुणा थरथरू लागली. तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचं सावट. तिच्या डोळ्यांतून मोठमोठे अश्रू गळू लागले. करुणाचं मन कोसळलं… ती धावत गुरुजींच्या पायांजवळ बसली.
“गुरुजी, माफ करा… मला, मी चुकीचा विचार केला…. माझी चूक झाली गुरुजी…. तुम्ही दिलेलं प्रेम मी समजूनच घेतलं नाही.”
गुरुजींनी तिला हलकेच जवळ घेतलं. “बाळा, जगात अनेकदा प्रेमाला संशयाची सावली लागते. पण त्या सावलीच्या आधी तू ओळखायला हवं होतं की, माझं प्रत्येक वागणं पित्याच्या हातासारखं होतं. शिक्षकाचं प्रेम कुण्या एका बाळापुरतं नसतं. ते सगळ्या लेकरांचं असतं. ते पवित्र असतं आणि त्यावर संशय नसतो घ्यायचा.”
गुरुजींच्या या शब्दांनी करुणाच्या मनातली गाठ सुटली. तिला तिची चूक किती भयंकर होती ते उमगलं. गुरुजींचे डोळे लाल होते, तो राग नव्हता… तर ते दुःख होतं. तुटलेपण होतं. मनावर कोरलेली जखम होती.
पण गुरुजी तिथेच थांबले नाहीत… त्यांनी संपूर्ण वर्गाला सांगितलं, “कधीही एखाद्या पवित्र नात्यावर प्रश्नचिन्ह लावण्यापूर्वी, एकदा मनापासून विचार करा. शिक्षक म्हणजे हात धरून नेणारा प्रकाश आहे, त्या प्रकाशावर संशयाची सावली पडू देऊ नका.”
करुणा त्या दिवसापासून आधीपेक्षा जास्त जपून वागू लागली. गुरुजींच्या डोळ्यांतला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी तिने तिच्या छोट्या जगात स्वतःला बदलवून टाकलं.
गुरुजींची जखम भरली… होती पण त्या दिवसाचा धडा त्यांच्या मनात कायमचा राहिला. ही घटना फक्त संशयाची नाही…, हा एका पवित्र नात्याची किंमत समजावून देणारा अनुभव आहे. ‘शिक्षकाचं प्रेम शंका घेण्यासाठी नसतं, जपण्यासाठी असतं.’
प्रयोगशील शिक्षक