माय! जिंकलीस गं!

आईची माया आणि तिने दिलेला शब्दाचा विश्वास, एका खोडकर मुलाचं आयुष्य कसं सुवर्णाक्षरांनी लिहू शकतो, याची ही प्रेरणादायी हृदयस्पर्शी गोष्ट-
माय! जिंकलीस गं!
Published on

कथा

शोभा नाखरे

आईची माया आणि तिने दिलेला शब्दाचा विश्वास, एका खोडकर मुलाचं आयुष्य कसं सुवर्णाक्षरांनी लिहू शकतो, याची ही प्रेरणादायी हृदयस्पर्शी गोष्ट-

महाविद्यालयाच्या इमारतीतील ‘पुरंदरे सभागृह’ आज अगदी दिमाखदार दिसत होतं. फुलांच्या रंगीबेरंगी माळा, दारात देखणी रांगोळी, पताका; सारंच उत्साहाचं वातावरण! कारणही तसंच होतं. महाविद्यालयात नव्यानं सुरू झालेल्या एम.बी.ए.च्या पहिल्या तुकडीचा आज बक्षीस समारंभ होता. जोडीला करमणुकीचे कार्यक्रम असल्यामुळे, सगळी मुलं अनोख्या आनंदाने भारावून गेली होती.

व्यासपीठाच्या मागे जोरात तयारी सुरू होती. सभागृहात स्वयंसेवकांची लगबग सुरू होती. सारी व्यवस्था चोख झाल्यानं तरुणाईच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटत होती. पाहुण्यांचे आगमन झाले. सोहळा सुरू झाला. ईशस्तवन, स्वागतगीत पार पडलं.

आता बक्षीस समारंभ! एम.बी.ए.ला तिसरा आणि दुसरा क्रमांक आलेले विद्यार्थी बक्षीस घेऊन उतरले आणि... पहिला आला होता 'अतुल देशमाने'! नाव पुकारताच तो वर गेला, दिलेलं बक्षीस स्वीकारून खाली उतरला. खूप आनंदात पण काहीसा गंभीर असलेला अतुल आपल्या खुर्चीत येऊन बसला. आजूबाजूचं त्याला काहीच भान नव्हतं. मनातल्या मनात तो केव्हाच आपल्या शाळेत पोहोचला होता...

कष्टकरी, गरीब वस्तीतली त्याची ती लाडकी शाळा, छोटीशीच पण टुमदार! त्या दिवशीही शाळेत असाच बक्षीस समारंभ होता. सारा सोहळा अतुलच्या नजरेसमोर आत्ता घडत असल्यासारखा पुढे-पुढे सरकत होता. पाचवी ते दहावीचे विद्यार्थी सतरंजीवर बसले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता तरळत होती आणि... बक्षीस समारंभ सुरू झाला. पाटीलबाई एकेकाचं नाव घेत होत्या.

आज हॉलमध्ये मात्र विलक्षण शांतता होती. समोर बसलेल्या मुलांना खोड्या काढायला उसंत नव्हती, कारण प्रत्येक चार रांगांवर लक्ष ठेवायला बाजूला एकेक शिक्षक उभे होते. त्यामुळे अतुलला गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. अगदी इकडे-तिकडे देखील बघता येत नव्हतं. शिवाय बक्षिसासाठी आपलं नाव येणार नाही, याची तर त्याला खात्रीच होती. अगदी नाईलाजाने तो समोर बघत होता. सगळी बक्षिसं देऊन झाली.

इतक्यात पाटीलबाई म्हणाल्या, “मुलांनो, या वर्षीपासून शाळेनं एक नवीन पुरस्कार द्यायचं ठरवलं आहे.” बाईंच्या या वाक्याने सर्व विद्यार्थ्यांत चैतन्याची एक लहर चमकून गेली. तोच सेवक रामकाका एक देखणी, सुंदर आणि मोठी ट्रॉफी टेबलावर ठेवून गेले. आता तर सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती. पाटील बाईंनी मुख्याध्यापक सरांना विनंती केली की, “सर, या सुंदर ट्रॉफीचा मानकरी कोण? त्याचं नाव आपण जाहीर करावं.”

हॉलमध्ये शांतता पसरली. अवघे डोळे लुकलुकले. प्रत्येकाच्या मनात येत होतं – ‘कोणाला बरं मिळेल ही ट्रॉफी? त्याला की तिला?’ तेवढ्यात सर म्हणाले – “या पहिल्यावहिल्या ‘मिशन माणुसकी’ ट्रॉफीचा मानकरी आहे – अतुल देशमाने!”

अतुलचं नाव ऐकून सारेच अवाक झाले. खरंतर शाळेतला सर्वात मस्तीखोर आणि खोडकर मुलगा अतुल! अतुलला तर काही उमजेना. त्याच्या मनात आलं, 'यांना आपला पोपट करायचाय की काय?'

तोच पाटील बाई म्हणाल्या, “मुलांनो, आश्चर्य वाटतंय ना? अतुलसारख्या अतुलनीय दंगेखोर मुलाला ही ट्रॉफी? खरं नाही वाटत ना? पण ही का देतोय ते सांगते. बघा, आज सकाळी अचानक आपल्या या कार्यक्रमाचं स्थळ बदललं. कार्यक्रम खरंतर तळमजल्यावर होता, परंतु वीजजोडणीची अडचण आल्यानं तो ‘दुसऱ्या मजल्यावर आहे’ असं जाहीर करावं लागलं. असा जागाबदल होताच अतुलनं काय केलं माहीत आहे तुम्हाला?”

सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. तेव्हा हसतच पाटीलबाई म्हणाल्या, “आजारात पाय कमकुवत झालेल्या राघवला पाठीवर घेऊन, झपाझप जिना चढून तो वर आला. आणि अतुल हे नेहमीच करतो. राघवलाही त्याची सवय झाली आहे. आपण सारे याचे साक्षीदार आहोत.”

इतक्यात समितने अतुलने कुत्र्याच्या पिल्लाचा जीव वाचवल्याचे सांगताच, इतर मुलांनीही त्याच्या चांगुलपणाची उदाहरणे दिली. अतुल रहमान चाचांना रस्ता ओलांडण्यास मदत करतो, शेजाऱ्यांची कामं करतो, घरात स्वयंपाक आणि आईला घरकामात मदत करतो. अशी कामं तो आनंदाने करायचा. इतकेच नव्हे, तर शाळेच्या बागेतील हिरवाई जपणाराही तोच होता. अतुलच्या या अष्टपैलू माणुसकीच्या कार्याची साक्ष सर्व मुलांनी एकसुरात दिली अतुल अतुल!

“म्हणूनच पहिल्या ‘मिशन माणुसकी’ पुरस्काराचा मानकरी आहे अतुल देशमाने.” टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. तो स्टेजवर गेला. सरांनी त्याला ती मोहक ट्रॉफी दिली. तो पटकन सरांच्या आणि बाईंच्या पाया पडला.

सगळ्यांकडून कौतुक घेऊन अतुल आनंदाने घरी आला. अनपेक्षित मिळालेली ट्रॉफी मायला दाखवत त्याने ती ‘बा’च्या फोटोसमोर ठेवली. त्याचा ‘बा’– दारू पिऊन देवाघरी गेलेला. एरवी खूप प्रेमळ असलेला, मात्र रोज आईशी पैशांसाठी भांडणारा त्याचा ‘बा’. रोजचं हे घरातलं चित्र पाहून अतुलचा चांगल्या गोष्टींवरचा विश्वासच उडाला होता. मनाविरुद्धच तो बिनधास्त आणि मस्तीखोरपणे वागत असे. मात्र आईवर त्याचा खूप जीव होता. तिचे कष्ट कमी व्हावेत म्हणून तो सतत धडपडत असे.

ट्रॉफी पाहून मायेनं अतुलला पोटाशी धरलं. ‘बा’ची आठवण काढून दोघंही पोटभर रडले. मायेचं ऐकलं की आपलं भलं होतं, हे त्याला मनोमनी पटलं. “बाळा, आता तरी माझं मनावर घे, हुशारी अभ्यासात दाखव,” मायेच्या पोटतिडकीच्या बोलण्यानं आणि या पुरस्कारानं अतुलचं सारं भावविश्वच बदलून गेलं. फक्त मायेच्या सांगण्यानुसार वागायचं हे पक्कं झालं आणि पूर्वीचा मस्तीखोर अतुल आमूलाग्र बदलला.

मायेचं ऐकून 'अभ्यास एके अभ्यास' आणि 'गाणं' ही दोनच ध्येयं ठेवून त्याने खूप कष्ट केले. दिवसरात्र एक करून, कधी जागून तर कधी पहाटे उठून त्याने अभ्यासाचा ध्यास घेतला. मात्र मायेला मदत करायला तो कधीच विसरला नाही. या प्रचंड मेहनतीचंच फळ म्हणजे आजचं हे एम.बी.ए.चं बक्षीस!

खुर्चीवर बसल्यापासून भूतकाळातला हा सारा चित्रपट त्याच्या डोळ्यासमोरून तरळत गेला. तेच दिवस डोळ्यांपुढे असताना कॉलेजची मित्रमंडळी ओरडत होती, “अतुल... अतुल... गाणं झालंच पाहिजे! गाणं झालंच पाहिजे!” हा आरडाओरडा ऐकून अतुल भानावर आला. खिशातून रुमाल काढून त्याने पटकन डोळे पुसले.

“माय! जिंकलीस गं!” म्हणत तो धावतच स्टेजवर गेला. माईक हातात घेत हा एम.बी.ए.चा मानकरी गाऊ लागला –

“नाम गूम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा l

मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे...”

Shobha.nakhare@yahoo.co.in

logo
marathi.freepressjournal.in