
हितगुज
डॉ. शुभांगी पारकर
व्यसनांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी जगभर २६ जून हा आंतरराष्ट्रीय व्यसनविरोधी दिन साजरा केला जातो. कधी अधिकाधिक आनंद मिळवण्यासाठी, तर कधी दु:ख विसरण्यासाठी व्यसनाला सुरुवात होते. सुरू झालेले व्यसन मग सुटता सुटत नाही. यातच जुन्या व्यसनांमध्ये नव्या व्यसनांची भर पडते आणि एक भोवरा तयार होतो. यातून सुटायचे तर स्वत:पाशी परतायला हवे. ‘तुझे आहे तुजपाशी’ हे ओळखायला हवे.
एकीकडे आनंद देणाऱ्या गोष्टींची विपुलता आणि दुसरीकडे वाढता ताणतणाव..आपले सध्याचे जगणे हे असे दुहेरी आहे. आनंद देणाऱ्या काही सामान्य गोष्टी निरुपद्रवी असतात, पण त्यातल्या काही इतक्या व्यसनात्मक असतात की त्या आपल्या आरोग्यावर, नातेसंबंधांवर आणि मनःशांतीवर खोल परिणाम करतात. सुरुवातीला केवळ कुतूहलाने किंवा करमणुकीसाठी सुरू झालेली एखादी गोष्ट हळूहळू सवय बनते आणि शेवटी आपले त्या गोष्टीवरचे नियंत्रणच हरवते. व्यसन म्हणजे चारित्र्यदोष नाही, तर ही मेंदूतील बदलांची आणि मानसिक संघर्षाची स्थिती आहे.
या लेखात आपण व्यसनविज्ञान, व्यसनाचे शरीरावर आणि मनावर होणारे परिणाम आणि पुनर्वसनाच्या शक्यता यांचा विचार करू. शास्त्रीय संशोधनानुसार व्यसनाला मेंदू व मज्जासंस्थेतील केमिकल असंतुलनाशी, एका न्यूरोबायोलॉजिकल म्हणजे मेंदूच्या जैवशास्त्रीय कार्याशी जोडले गेले आहे.
व्यसन काही एका रात्रीत निर्माण होत नाही. व्यसन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. जेव्हा व्यक्ती एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होते, उदा. भावनात्मक उत्साह, लैंगिक उत्तेजना किंवा कल्पनाविलास त्यावेळी ही ‘ॲडिक्टिव्ह प्रोसेस’ सुरू होते. व्यसनात्मक वर्तनांचा अभ्यास करताना असे दिसून आले आहे की, काही व्यसनजन्य वागणुकी या सुखविलासाने प्रेरित असतात. उदा. ड्रग्ज, जुगार, लैंगिक वर्तन इत्यादी, तर काही व्यसने महत्त्वाकांक्षा, स्नेहभावना व काळजी घेण्याच्या प्रेरणेने उत्पन्न होतात. उदा. कामाचा अतिरेक, खरेदी, प्रेमात गुंतणे, व्यायामाची अतिशयोक्ती इत्यादी.
काही व्यक्तींचा कल जन्मतःच व्यसनांच्या दिशेने असतो किंवा व्यक्तिमत्त्वातील दोषामुळे ते व्यसनाकडे अधिक आकृष्ट होतात. स्वतःला व्यसनी म्हणवणाऱ्या अनेक व्यक्तींच्या मते व्यसन सुरू होण्याआधीच त्यांना स्वतःला इतरांपेक्षा भावनिकदृष्ट्या वेगळं वाटायचं. उदा. बेचैनी, अस्वस्थता, एकटेपणा किंवा अपूर्णतेची भावना, तर दुसरीकडे काही लोकांना एखादी क्रिया, एखादी गोष्ट खूप आवडते, तिचे परिणाम झपाट्याने जाणवतात आणि मग ती क्रिया, ती गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटते. ते त्यात गुंतत जातात.
व्यसन म्हणजे काय?
व्यसन म्हणजे एक अशी दीर्घकालीन स्थिती ज्यात स्वतःच्या शरीराला किंवा वर्तनाला होणारे तोटे जाणूनही संबंधित व्यक्ती ती सवय काही केल्या टाळू शकत नाही. सुरुवातीला केवळ एकदा प्रयोग म्हणून एखाद्या गोष्टीला सुरुवात होते. उदा. एखाद्या पार्टीत दारू पिणे, मित्रांसोबत सिगारेट ओढणे, वेळ घालवण्यासाठी सोशल मीडिया वापरणे इत्यादी. पण हळूहळू हे सगळे नियंत्रणाच्या बाहेर जाते. सुरुवातीला होणाऱ्या आनंदाच्या भावनेने व्यसन चालू राहते, परंतु आनंदाची तीव्रता हळूहळू कमी होतेच आणि नंतर वेदना किंवा यातना टाळण्यासाठी व्यसन टिकवून ठेवले जाते. सुप्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी म्हणतात तसे पहिल्यांदा तुम्ही दारू गिळता, मग ती तुम्हाला गिळते. आजच्या आधुनिक युगात व्यसन फक्त दारू, सिगारेट किंवा ड्रग्जपुरते मर्यादित राहिलेले नाही. ‘वर्तनात्मक व्यसन’ हा नवीन प्रकार उदयाला आला आहे. म्हणजे मोबाइल, गेमिंग, सोशल मीडिया, ऑनलाइन खरेदी यांनाही आता ‘व्यसन’ म्हणून मान्यता मिळाली आहे.
व्यसन का लागते?
कोणत्याही व्यक्तीला व्यसन का लागते, याची अनेक कारणे आहेत. त्यामागे अनेक जैविक, मानसिक आणि सामाजिक घटक असतात. व्यसन कोणाला लागेल याचा अंदाज लावणे कठीण आहे. हा एक बहुआयामी विकार आहे. यात अनेक घटक एकत्र येतात. यातील काही प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत -
मेंदूतील रिवॉर्ड सिस्टिम
आपल्या मेंदूत एक रिवॉर्ड सिस्टिम असते. ती आनंददायी अनुभवांना प्रतिसाद देते. जेव्हा आपण काही चांगले काम करतो, तेव्हा ‘डोपामिन’ नावाचे रसायन मेंदूमध्ये स्रवते. हे रसायन आनंदाची अनुभूती देते. दारू, सिगारेट, ड्रग्ज किंवा अगदी सोशल मीडियासारख्या व्यसनमूलक गोष्टी डोपामिनचं अत्याधिक स्रवण करतात. त्यामुळे मेंदू पुन्हा-पुन्हा तोच उत्तेजक अनुभव मागतो.
अनुवांशिकता
काही लोकांमध्ये व्यसन लागण्याची शक्यता अनुवांशिक दृष्टिकोनातून देखील अधिक असते.
मानसिक आरोग्य
आत्मविश्वास कमी असणे, चिंता, नैराश्य, एकटेपणा किंवा पूर्वीच्या आघातांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक व्यसनाकडे वळतात. काही लोकांना जीवनात कोणताही अर्थ, उद्देश आहे असे वाटत नाही, आनंद जाणवत नाही. परिणामी ते व्यसनातून तात्पुरती ऊर्जा, आनंद किंवा ओळख मिळवत असतात.
व्यसन आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व
संवेदनशील व्यक्तिमत्त्वाची माणसे व्यसनांमध्ये अधिक अडकलेली आढळतात.
अविचारी/इम्पल्सिव्ह व्यक्तिमत्त्व
अशा व्यक्ती विचार न करता लगेच कृती करतात. भविष्यातील बऱ्या-वाईट परिणामांचा विचार न करता त्वरित आनंद किंवा उत्तेजन शोधतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये व्यसनमूलक पदार्थ किंवा वर्तनाची सुरुवात लवकर होते.
थ्रिल-सीकिंग
ज्यांना नेहमी काहीतरी नवीन, रोमांचक आणि तीव्र अनुभवांची गरज असते अशा व्यक्ती व्यसनाच्या दुष्टचक्रात सहज अडकतात. ही गरज अमली पदार्थ, जुगार, वेगवान वाहनचालक किंवा सेक्सचा अतिरेक, अशा वर्तनातून पूर्ण केली जाते.
नैराश्य किंवा चिंताप्रवण व्यक्तिमत्त्व
सतत चिंता, निराशा किंवा असमाधानी भावना असलेल्या व्यक्ती आपले दुःख तात्पुरते कमी करण्यासाठी व्यसनाची मदत घेतात. अशा व्यक्तींमध्ये समस्यांशी दोन हात करण्याची क्षमता (coping mechanism) आणि प्रेरणा कमी पडते. त्यामुळे त्यांच्यामध्ये व्यसन विकसित होण्याचा धोका अधिक असतो.
नकारात्मक आत्मप्रतिमा
स्वतःबद्दल नकारात्मक भावना असलेले, ‘मी काहीच चांगले करू शकत नाही’ असे वाटणारे लोक इतरांकडून मान्यता मिळवण्यासाठी व्यसनात्मक वर्तन करतात.
सामाजिक दबावाला बळी पडणारे
जे इतरांना खुश करण्यासाठी किंवा मित्र-मैत्रिणींच्या गटात सामील होण्यासाठी आपले वर्तन बदलतात, अशा व्यक्ती मित्रगटाच्या किंवा वातावरणाच्या प्रभावाखाली व्यसन सुरू करतात.
भावनिक अस्थिरता
भावनात्मक चढ-उतार अधिक प्रमाणात जाणवणाऱ्या चंचल व्यक्तींना तणावातून बाहेर पडण्यासाठी व्यसनाचा आधार वाटतो. सुरुवातीला आनंद मिळवण्यासाठी व्यसन केले जाते, परंतु आनंदाची तीव्रता हळूहळू कमी होते आणि नंतर वेदना किंवा यातना टाळण्यासाठी व्यसन टिकवून ठेवले जाते.
एकाकीपणा आणि सामाजिक विलगीकरण
ज्या व्यक्तींच्या आयुष्यात मैत्रीपूर्ण, आधार देणाऱ्या संबंधांची उणीव असते, ज्यांना नाती टिकवता येत नाहीत, अशा व्यक्ती एकटेपणा दूर करण्यासाठी व्यसनाकडे वळतात.
पर्यावरणीय व सामाजिक घटक
तरुणांमध्ये मित्रांच्या दबावामुळे, नोकरीचा अभाव वा आर्थिक अस्थिरता असल्यास व्यसन सुरू होण्याची शक्यता जास्त असते. जिथे व्यसनमूलक वस्तू सहज उपलब्ध असतात, तिथे हा धोका अधिक असतो.
यातील कोणत्याही एका गोष्टीमुळे व्यसन लागते असे नाही, पण ही वैशिष्ट्यं व्यक्तीमधील व्यसनाची शक्यता वाढवतात. या जोखमीच्या बाबी ओळखून योग्य काळजी आणि मानसिक आरोग्य सल्ला घेतल्यास व्यसन टाळता येऊ शकते.
व्यसनाची लक्षणं
व्यसनाची लक्षणं ही व्यक्तिपरत्वे तसेच व्यसनासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांवर किंवा वर्तनाच्या प्रकारांवर अवलंबून असतात. तरीही व्यसनाची काही सामान्य आणि ओळखण्याजोगी लक्षणं खालीलप्रमाणे आहेत -
थांबवण्याची असमर्थता
व्यसन असलेल्या व्यक्तींना त्या पदार्थाचा वापर किंवा आपले हानिकारक वर्तन थांबवायचे असले तरीही ते त्यांना शक्य होत नाही. ते अनेक वेळा व्यसन असलेल्या गोष्टीचा वापर कमी करण्याचा किंवा ते सोडण्याचा प्रयत्न करतात, पण अपयशी ठरतात. अशावेळी ते आपल्या प्रियजनांशी खोटं बोलतात किंवा व्यसन लपवण्याचा प्रयत्न करतात.
अधिक प्रमाणात सेवन
काळाच्या ओघात, पूर्वी मिळणारा आनंद किंवा ‘हाय’ किंवा ‘किक’ मिळवण्यासाठी व्यसनी व्यक्तीला त्या पदार्थाचे अधिक प्रमाणात सेवन करावे लागते किंवा ती क्रिया अधिक वेळा आणि तीव्रतेने करावी लागते.
व्यसनाविषयी सतत विचार
व्यसन असलेल्या व्यक्ती त्या पदार्थाविषयी किंवा वर्तनाविषयी सतत विचार करत राहतात. त्यांचं संपूर्ण आयुष्य त्या गोष्टीभोवती फिरतं. कशाप्रकारे तो पदार्थ व ती संधी मिळवायची, त्याची आठवण काढत किंवा त्याची कल्पना करत राहतात. यामुळे जीवनातील इतर सर्व विधायक आणि आवश्यक गोष्टींकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ लागते.
नियंत्रण हरवणे
अशा व्यक्तींना जाणवते की, त्यांनी स्वतःवरील नियंत्रण गमावले आहे. त्यांना असहाय्य वाटू लागते. अनेकदा अपराधी भावना, नैराश्य किंवा न्यूनगंड जाणवू लागतो. आपल्या आयुष्यात व्यसनामुळे आपले किती नुकसान झाले आहे हे समजूनही आपण काही करू शकत नाही, या जाणिवेने ते खच्ची होतात.
वैयक्तिक व आरोग्याच्या समस्या
व्यसनामुळे त्यांच्या शारीरिक आरोग्यावर, मानसिक आरोग्यावर, नातेसंबंधांवर आणि करिअरवर गंभीर परिणाम होतो. कामावर, शाळेत किंवा घरी जबाबदाऱ्या नीट पार पडत नाहीत. जरी व्यसनाचे दुष्परिणाम स्पष्टपणे दिसत असले तरीही ते व्यसन सोडू शकत नाहीत.
सोडतानाची तडफड
व्यसन थांबवले असता अशा व्यक्तींना भावनिक आणि शारीरिक त्रास जाणवतो. ‘जलबीन मछली’सारखी तडफड होते. उदाहरणार्थ, अंगाची थरथर होणे, घाम येणे, मळमळ होणे, उलटी होणे. तसेच ते चिडचिडे, बेचैन किंवा उदास होतात. दारूसारख्या व्यसनात काळ, वेळ, आपण कुठे आहोत ही जाणीव राहत नाही.
आजची सामान्य व्यसनं
दारू:
आजच्या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीमध्ये व्यसनं विविध रूपांत आपल्या आजूबाजूला वाढत आहेत. काही व्यसनं पारंपरिक स्वरूपाची असून काही नव्याने उदयास आली आहेत. आज सर्वात जास्त दिसून येणारं व्यसन म्हणजे दारूचं व्यसन. ते केवळ यकृत विकारांसाठी कारणीभूत ठरत नाही; तर अपघात, कौटुंबिक कलह आणि सामाजिक तणावांमागचे मुख्य कारण बनते.
निकोटीनयुक्त उत्पादने:
सिगारेट किंवा इतर निकोटीनयुक्त उत्पादने अत्यंत व्यसनात्मक असून फुफ्फुसांचा कॅन्सर, हृदयविकार अशा गंभीर आरोग्यविषयक समस्या निर्माण करतात.
अमली पदार्थ:
याशिवाय गांजा, अफू, कोकेन, ब्राऊनशुगर यांसारख्या अमली पदार्थांचे सेवन मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम करते.
औषधं:
अलीकडे औषधांचाही गैरवापर वाढला आहे. झोपेच्या गोळ्या, वेदनाशामक किंवा तणाव कमी करणारी औषधं यांचा अनियंत्रित वापर व्यसनात्मक ठरतो.
वाढता स्क्रीनटाइम:
तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे नवनवीन व्यसनंही उदयास आली आहेत. मोबाइल आणि इंटरनेटचे व्यसन, विशेषतः तरुण आणि किशोरवयीनांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. सतत स्क्रीनकडे बघणे, समाजापासून तुटणे आणि एकटेपणा वाढणे अशा प्रकारे परिणाम दिसून येतात. याचेच पुढचे पाऊल म्हणजे सोशल मीडियाचे व्यसन. या आभासी जगातला ‘लाइक्स’ आणि ‘फॉलोअर्स’वर आधारलेला आत्मसन्मान व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करतो. तसेच ऑनलाइन गेमिंगचे व्यसन सुद्धा किशोरवयीन मुलांमध्ये गंभीर स्वरूप धारण करत आहे. सुरुवातीला केवळ मनोरंजनासाठी सुरू केलेली सवय हळूहळू व्यसनात बदलते. यासोबतच सट्टा आणि अतिरेकी खरेदीचे व्यसन देखील समाजात वाढताना दिसते. त्यातून तात्पुरत्या आनंदासाठी मोठे आर्थिक नुकसान होते आणि मानसिक अस्थिरताही निर्माण होते.
ही सगळी व्यसने एकत्रितपणे आजच्या समाजासमोर उभी आहेत आणि त्यातून सामाजिक, कौटुंबिक आणि आरोग्यविषयक आव्हाने निर्माण होत आहेत. त्यांचे वेळेत निदान होणे व त्यांचा लवकरात लवकर प्रतिबंध करणे अत्यंत आवश्यक आहे.
उपचार आणि पुनर्वसन
होय. व्यसन बरे होऊ शकते. अनेकांनी यशस्वीपणे व्यसनातून बाहेर पडत पुनर्जन्म घेतलेला आहे. उपचाराच्या प्रक्रियेत वैद्यकीय मदत, समुपदेशन आणि सामाजिक पाठिंबा यांना अतिशय महत्त्व असते. डिटॉक्सिफिकेशन, औषधोपचार आणि मानसिक आरोग्य तपासणी यांसारख्या वैद्यकीय हस्तक्षेपांमुळे शरीर आणि मेंदू व्यसनातून मुक्त होऊ लागतो. समुपदेशन आणि मानसोपचार या माध्यमातून व्यक्तिमत्त्व समजून घेऊन योग्य ‘कोपिंग स्कील्स’ शिकवता येतात. दीर्घकालीन पुनरुज्जीवनासाठी ती आवश्यक असतात.
पुनर्वसन केंद्रे ही शास्त्रीय वातावरणात रुग्णाला व्यसनमुक्त होण्यासाठी आणि पुन्हा सामाजिक आयुष्यात सामावून घेण्यासाठी मदत करतात. यासोबतच आधारगटाच्या माध्यमातून एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याची संधी मिळते. यातून ‘तुम्ही एकटे नाही’ ही जाणीव निर्माण होते. कुटुंबाचा सहभाग, माहिती आणि भावनिक आधार हे देखील पुनर्वसनच्या मार्गावर मोठा आधार ठरतात. योग, ध्यान आणि नियमित व्यायाम हे मनःशांती आणि शरीरसामर्थ्य टिकवण्यासाठी फार उपयुक्त आहेत. या प्रवासात चढ-उतार असतात. कधी रुग्ण पुन्हा व्यसनाकडे वळू शकतो. पण ते ‘अपयश’ नसून पुनर्वसनाच्या प्रक्रियेचाच तो एक भाग आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. गरज आहे ती संयम, समजूत आणि सातत्यपूर्ण पाठिंब्याची.
व्यसनग्रस्त व्यक्तींना समजून घेणे आणि उपचाराची संधी देणे, हाच खरा मानवधर्म आहे. व्यसनमुक्ती ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती एका माणसाच्या प्रेरणादायी संघर्षाची कथा असते.
मनोविकार चिकित्सक व अधिष्ठाता.