असा मी...तसा मी!

पुरुषाला समजून घेणं तसं अवघड नाही म्हणतात; पण त्याच्या ‘काही नाही’ या उत्तराचा अर्थ लावणं मात्र भल्याभल्यांना जमत नाही! चेहऱ्यावर रुबाब, बोलण्यात आत्मविश्वास आणि प्रत्येक प्रश्नावर ‘मी बघतो’ म्हणण्याची सवय. जगाची काळजी वाहणाऱ्या या माणसाला कधी स्वतःच्या मनाची काळजी घ्यावीशी वाटत असेल का? पुरुष दिनाच्या निमित्ताने त्याच्याच या गमतीशीर, हळव्या आणि करारी विश्वात डोकावून पाहूया.
असा मी...तसा मी!
असा मी...तसा मी!
Published on: 

विशेष

क्रांती गोडबोले-पाटील

पुरुषाला समजून घेणं तसं अवघड नाही म्हणतात; पण त्याच्या ‘काही नाही’ या उत्तराचा अर्थ लावणं मात्र भल्याभल्यांना जमत नाही! चेहऱ्यावर रुबाब, बोलण्यात आत्मविश्वास आणि प्रत्येक प्रश्नावर ‘मी बघतो’ म्हणण्याची सवय. जगाची काळजी वाहणाऱ्या या माणसाला कधी स्वतःच्या मनाची काळजी घ्यावीशी वाटत असेल का? पुरुष दिनाच्या निमित्ताने त्याच्याच या गमतीशीर, हळव्या आणि करारी विश्वात डोकावून पाहूया.

सतत काय त्यांना नावं ठेवायची.. आज जरा त्यांच्या बाजूने विचार करून थोडं त्यांना समजून घेऊ या. काय तर म्हणे खऱ्या आयुष्यात पुरुष रडत नाहीत, असं म्हणतात. रडताना दिसतात ते टीव्हीतच. पण काही महिन्यांपूर्वी बोरिवली स्टेशनवर रडणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. रेल्वे स्टेशनवर माणसांच्या चेहऱ्यांवर अनेक भाव असतात. कुणाला गाडी पकडायची घाई, कुणाला घरी पोहोचण्याची ओढ, कुणी फोनवर भांडत असतं, तर कुणी फोनवरच हसत असतं. या सगळ्या गडबडीत तो तरुण मात्र शांतपणे रडत होता. त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. हा व्हिडिओ तिलक दुबे नावाच्या तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये टिपला आणि त्याच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला. तिलकने त्या तरुणाला रडण्याचं कारण विचारलं. पण त्याने काही उत्तर दिलं नाही. खरं तर काही दुःखांना शब्दांची गरज नसते. त्याचे पाणावलेले डोळेच बरंच काही सांगत होते. भूतकाळातील एखादी घटना अचानक आठवली असावी आणि मनात कुठेतरी दडवून ठेवलेला बांध फुटला असावा. स्टेशनवर तो एकटा रडत होता; पण त्याच्या अश्रूंमध्ये कदाचित अनेक पुरुषांच्या न बोललेल्या गोष्टी दडल्या होत्या.

पुरुषांच्या बाबतीत एक गंमत आहे. त्यांना रडू येतं, पण ते रडण्याआधी आजूबाजूला कोण आहे, याची खात्री करतात. अगदी पावसात भिजण्यापूर्वी छत्री शोधावी तशी! लहानपणीच त्यांना सांगितलं जातं, ‘काय मुलीसारखा रडतोस? मुलं रडत नाहीत!’ पुढे मोठं झाल्यावर स्वतःच्या डोळ्यांत पाणी आलं तरी ते आधी खाकरतात, चष्मा पुसतात आणि मग म्हणतात, ‘काही नाही रे, डोळ्यांत काहीतरी गेलंय!’ मग नक्की पुरुषाचं मन आहे तरी कसं?

पुरुषाच्या मनात डोकावायचं असेल, तर साहित्याची पानं चाळायला हवीत. कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकर आयुष्याच्या उत्तरार्धात माणसाला किती एकटं वाटू शकतं, हे सांगून जातात. राम गणेश गडकरींच्या ‘एकच प्याला’मधील सुधाकर व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या पुरुषाची शोकांतिका उभी करतो. महाभारतातील कर्णाला आयुष्यभर स्वतःची पात्रता सिद्ध करावी लागली. पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्तिरेखांमध्ये पुरुषांच्या अहंकारापासून न्यूनगंडापर्यंत अनेक छटा विनोदातून समोर येतात. या सगळ्या व्यक्तिरेखा सांगतात की, पुरुषाचं बाहेरचं जग कितीही कणखर दिसलं, तरी आत कुठेतरी एक हळवं, अस्वस्थ आणि कधी कधी हरवलेलं मन असतं.

संत कवयित्रींनीही पुरुषाचं एक वेगळंच रूप आपल्या साहित्यात उभं केलं. संत जनाबाईंचा विठ्ठल मंदिरात उभा राहून भक्तांची वाट पाहत नाही, तर त्यांच्या मदतीला घरातही धावून येतो. ‘झाडलोट करी जनी, केर भरी चक्रपाणी’ म्हणत जनाबाईंनी देवाला थेट घरकामात सहभागी केलं. हा केवळ भक्तीचा आविष्कार नव्हता; स्त्रीच्या श्रमांना प्रतिष्ठा देणारा विचारही होता. मीराबाईंचा कृष्ण प्रेमाचा आणि आत्मिक स्वातंत्र्याचा आधार होता. या संत कवयित्रींच्या नजरेतला पुरुष ताकद दाखवणारा नव्हता, तर आधार देणारा होता; अधिकार गाजवणारा नव्हता, तर मन समजून घेणारा होता.

पण पुरुष म्हणजे नेमका कोण? हा प्रश्न विचारला की उत्तरापेक्षा गमतीच जास्त आठवतात. घरातला रिमोट कुठे ठेवायचा, याचा अंतिम निर्णय बहुधा त्याचा नसतो; पण देशाची अर्थव्यवस्था कशी सुधारावी, यावर त्याच्याकडे ठोस मत असतं! स्वतःचा चष्मा डोक्यावर ठेवून अर्धा तास घरभर गोष्टी शोधणारा पुरुष घरातल्या वस्तू जागेवर नसल्याचा आरोप मात्र बायकोवर करतो. मित्रांच्या कट्ट्यावर तो जगाचं राजकारण सोडवतो; घरी मात्र बायकोच्या, मुलांच्या मनात काय चाललंय हे पटकन ओळखता येत नाही. लग्नाआधी ‘तुझ्यासाठी चंद्रतारे तोडून आणीन’ म्हणणारा पुरुष लग्नानंतर घरातला बल्ब गेला की, ‘इलेक्ट्रिशियनला फोन कर’ असं सांगतो. बाहेरच्या जगात तो बॉस असतो; मात्र ‘भाजी कोणती करू?’ या प्रश्नाचं उत्तर देताना त्याची निर्णयक्षमता कसोटीला लागते. पुरुषाला घराचा आधारस्तंभ म्हणतात; पण त्या स्तंभालाही कधी टेकून बसावंसं वाटतं, हे मात्र अनेकदा कुणाच्या लक्षात येत नाही.

सोशल मीडियाच्या काळात तर पुरुषांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक नमुने पाहायला मिळतात. काहींचं घरातलं रूप एक आणि बाहेरचं रूप अगदी वेगळं असतं. घरात पत्नीसमोर स्त्रीच्या सन्मानाच्या गप्पा मारणारा हाच पुरुष सोशल मीडियावर एखाद्या स्त्रीचा फोटो दिसला की तिच्या दिसण्यावरून कमेंट करण्याची संधी सोडत नाही. तिच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा तिच्या नाक-डोळ्यांचं निरीक्षण करण्यातच त्याला अधिक रस असतो. आणखी एक गंमत म्हणजे, काही पुरुषांना घरात सतत त्यांच्याशी जुळवून घेणारी, संसारासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारी पत्नी हवी असते; पण मैत्रीण किंवा प्रेयसी मात्र स्वतंत्र, आत्मविश्वासू आणि स्वतःचं मत असलेली आवडते. म्हणजे स्त्री स्वतंत्र असण्याची कल्पना आवडते; फक्त ती स्वातंत्र्याची किल्ली स्वतःच्या हातात असावी! अर्थात, सगळे पुरुष असे नसतात. अनेक पुरुष आपल्या जोडीदाराचा आदर करतात, तिच्या स्वप्नांना पाठिंबा देतात आणि नात्यात समानतेने जगतात.

घरकामाच्या बाबतीत तर पुरुषी मानसिकतेचे नमुने अधिक मजेशीर दिसतात. स्त्रीने स्वयंपाक केला, मुलांना सांभाळलं, घर आवरलं, तर ते तिचं कर्तव्य. पुरुषाने स्वयंपाकघरात प्रवेश केला की, ‘अरे वा! आज काय विशेष?’ असं कौतुक. पुरुषाने चहा केला तरी घरात त्याचा सत्कार व्हायचा बाकी राहतो; स्त्री रोज पंचपक्वान्नं करते, तेव्हा मात्र कुणाला विशेष वाटत नाही. गंमत म्हणजे, एखादा पुरुष घरकामात सहभागी झाला की त्याचेच काही मित्र त्याला चिडवतात- ‘काय रे, बायकांची कामं करतोस?’ घरकामाला स्त्री-पुरुष अशी लेबलं लावणाऱ्यांना घरातला पसारा मात्र दोघांचाही असतो, हे कधी कळणार? घरकामात सहभागी होणारा पुरुष बायकोचा गुलाम नसतो; तो स्वतःच्या घराचा जबाबदार सदस्य असतो.

पुरुषांच्या या बाह्य रुबाबाआड काही वेगळे संघर्षही दडलेले असतात. लहानपणापासून ‘मुलं रडत नाहीत’, ‘घाबरायचं नाही’, ‘घराची जबाबदारी तुझ्यावर आहे’ अशी वाक्यं त्यांच्या कानावर पडत असतात. लग्नाच्या बाजारात वर म्हणून उभं राहताना तर त्याच्याकडे व्यक्ती म्हणून कमी आणि किती आर्थिकदृष्ट्या श्रीमंत आहे हे पाहिलं जातं. त्यामुळे दुःख, भीती, असुरक्षितता व्यक्त करण्याऐवजी ती मनात ठेवण्याची सवय लागते. मानसशास्त्रात याला भावनांचं दमन (Emotional Suppression) असं म्हटलं जातं. भावना दाबल्या म्हणून त्या नाहीशा होत नाहीत; त्या कधी चिडचिडीतून, कधी रागातून, कधी व्यसनातून, तर कधी एकटेपणातून बाहेर पडू शकतात. पुरुषाचं यशही अनेकदा त्याच्या पगाराशी, नोकरीशी, घराशी आणि गाडीशी जोडलं जातं. नोकरी गेली किंवा आर्थिक नुकसान झालं की त्याला केवळ पैशांची चिंता नसते; स्वतःच्या कर्तृत्वावरही प्रश्नचिन्ह उभं राहतं. पुरुषांतही एकमेकांवर जळणं, पाय खाली खेचणं किंवा पुढे जाण्यासाठी मदत करणं हे प्रकार असतात. त्यांनाही एकमेकांची प्रगती बघवत नाही, दुसऱ्या पुरुषाचं कौतुक त्यांनाही आवडत नाही; फक्त हे सगळं व्यक्त करण्याची त्यांची पद्धत वेगळी असते.

पुरुषांचीही बॉडी शेमिंग होते; फक्त त्यावर त्यांना हसून दाखवावं लागतं! बुटका असो, टक्कल पडलेलं असो, पोट सुटलेलं असो किंवा शरीर किरकोळ असो, त्यावर टोमणे तयारच असतात. लग्नाचं वय उलटलं तरी लग्न झालं नाही म्हणून प्रश्नांची सरबत्ती! स्वतःच्या दिसण्याकडे लक्ष दिलं तर नखरेल आणि नाही दिलं तर गावंढळ. स्वयंपाक केला आणि पत्नीचं ऐकलं तर ‘बायकोच्या ताब्यातला’ किंवा तर ‘बायकोचा गुलाम’! मुलांना सांभाळलं तर ‘घरकोंबडा’, आईचं ऐकणारा ‘ममाज बॉय’, रागावला तर तापट, शांत राहिला तर अहंकारी आणि भावना व्यक्त केल्या तर नाटक करणारा. पुरुषाचीही बिचाऱ्याची पंचाईतच! अर्थात, स्त्रियांवर होणारं बॉडी शेमिंग किंवा अपमानही तितकाच चुकीचा आहे. पण सन्मानाला स्त्री-पुरुष अशी विभागणी नसते. प्रत्येक टोमण्यावर हसणारा पुरुष आतून दुखावलेला नसतोच असं नाही.

पुरुष कसा असावा, याचं उत्तर शोधताना अरुणा ढेरे यांच्या कवितेतील राधा आठवते. तिच्या नजरेतला पुरुष वेगळाच आहे. तो केवळ ताकदवान नाही, तर समजूतदार आहे. तो क्षमा करतो; पण त्याची जाणीव करून देत समोरच्याला कमीपणा देत नाही. स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव असतानाही दुसऱ्याच्या भावनांचा आदर करणं, चूक झाली तर ती मान्य करणं, नात्यांमध्ये माफी मागता येणं आणि गरज पडल्यास अश्रूंनाही वाट करून देणं, यातच पुरुषाचं खरं मोठेपण आहे.

पुरुषांच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलणं म्हणजे स्त्रियांच्या प्रश्नांशी स्पर्धा करणं नव्हे. पितृसत्ताक व्यवस्थेचा फायदा पुरुषांना मिळाला आहे, हे मान्य करतानाच त्या व्यवस्थेने त्यांच्यासाठीही काही कठोर चौकटी आखल्या आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. पुरुषाने स्वतःचा अहंकार तपासणं आणि स्त्रीनेही पुरुषाकडून प्रत्येक वेळी सर्वकाही निभावून नेण्याची अपेक्षा न करणं, दोन्ही गरजेचं आहे.

म्हणूनच पुरुष दिनाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन दरवर्षी १९ नोव्हेंबरला साजरा केला जातो. पुरुषांचं आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, सकारात्मक पुरुष आदर्श, कुटुंब आणि समाजातील त्यांचं योगदान, तसेच स्त्री-पुरुषांमधील अधिक समतोल नातेसंबंध यांवर चर्चा व्हावी, हा त्यामागचा हेतू आहे. हा दिवस महिला दिनाच्या विरोधात किंवा स्त्रियांच्या प्रश्नांना कमी लेखण्यासाठी नाही. पुरुषांच्या आयुष्यातले प्रश्नही ऐकले जावेत, एवढीच त्याची भूमिका आहे.

काही पुरुषांच्या वागण्यामुळे सगळ्याच पुरुषांना एका मापात मोजणं म्हणजे एका आंबट कैरीमुळे अख्खी कैरीची टोपली फेकून देण्यासारखं आहे! कारण आपल्याला बोट धरून चालायला शिकवणारा बाबा पुरुषच असतो. आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा भाऊ, मनातलं बिनधास्त सांगता येणारा मित्र, आयुष्याच्या प्रवासात साथ देणारा नवरा आणि म्हातारपणी आधाराची काठी होणारा मुलगाही पुरुषच असतो. कधी प्रवासात गर्दीच्या वेळी महिला डब्याऐवजी पुरुषांच्या डब्यात चढताना आपल्याला थोडं सुरक्षित वाटतं; म्हणजे पुरुषांवरचा विश्वास अजून संपलेला नाही! अर्थात, प्रत्येक पुरुष विश्वास ठेवण्यासारखाच असतो असं नाही आणि प्रत्येक स्त्रीने सावध राहू नये असंही नाही. पण काहींच्या चुकीची शिक्षा सगळ्यांना कशाला?

शेवटी पुरुष म्हणजे काही एकाच साच्यातून तयार केलेला पदार्थ नाही; कुणी प्रेमळ, कुणी तापट, कुणी मिश्किल, तर कुणी अगदी गोंधळलेला! पण आपल्या आयुष्यातले अनेक सुंदर क्षण एखाद्या पुरुषाच्या प्रेमळ सोबतीमुळेच सुंदर झालेले असतात. म्हणून पुरुष दिनी त्यांना एवढंच सांगावंसं वाटतं- पुरुषांनो, प्रत्येक गोष्ट मनात ठेवण्याचा अट्टाहास कशाला? घरातली बरणी कुठे ठेवली आहे, हे बायकोला विचारता; मग मनातलं दुःख सांगायला संकोच कसला? वस्तू हरवली तर घर डोक्यावर घेता, मग स्वतःचं हरवलेलं हसू शोधण्यासाठीही थोडी मदत मागा! नेहमी दुसऱ्यांसाठी खंबीर राहता, कधी स्वतःसाठीही हळवे व्हा. कारण तुमच्या खांद्यावर घराची जबाबदारी असेल, पण त्या खांद्यांनाही कधीतरी विसाव्याची गरज असते. तुम्ही फक्त कुणाचे बाबा, भाऊ, नवरे, मुलगे किंवा मित्र नाही; त्याआधी तुम्हीही एक माणूस आहात. तुमचं हसणं जितकं महत्त्वाचं, तितकंच तुमचं रडणंही!

या पुरुष दिनी एवढंच म्हणावंसं वाटतं- जगाला दाखवण्यासाठी नेहमी हिरो बनू नका; कधी स्वतःच्या आयुष्यातला साधा, खरा माणूस होऊनही पाहा. कारण सुपरमॅनलाही केप काढून कधीतरी निवांत बसावंसं वाटत असेलच ना! आणि त्यावेळी कुणीतरी प्रेमाने विचारावं, ‘चहा करू का?’ तर त्याच्यासाठी त्याहून मोठं सुख कोणतं?

तुम्हीही थोडं समजून घ्या, आम्हीही थोडं समजून घेऊ; संसारात रिमोट कुणाच्या हातात आहे यापेक्षा एकमेकांचा हात हातात असणं जास्त महत्त्वाचं नाही का?

krantip183@gmail.com