महिला दिनाची अस्वस्थ पार्श्वभूमी

जागतिक राजकीय अस्थिरता, युद्धजन्य परिस्थिती आणि वाढते सामाजिक गुन्हे या पार्श्वभूमीवर २०२६ चा आंतरराष्ट्रीय महिला दिन येतो आहे. अशा काळात स्त्रिया आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक तीव्रतेने समोर येतो- महाराष्ट्रात वाढणाऱ्या बेपत्ता स्त्रियांच्या आणि मुलींच्या घटनांनी ही चिंता आणखी गडद केली आहे.
महिला दिनाची अस्वस्थ पार्श्वभूमी
Published on

विशेष

अमोल केरकर

जागतिक राजकीय अस्थिरता, युद्धजन्य परिस्थिती आणि वाढते सामाजिक गुन्हे या पार्श्वभूमीवर २०२६ चा आंतरराष्ट्रीय महिला दिन येतो आहे. अशा काळात स्त्रिया आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक तीव्रतेने समोर येतो- महाराष्ट्रात वाढणाऱ्या बेपत्ता स्त्रियांच्या आणि मुलींच्या घटनांनी ही चिंता आणखी गडद केली आहे.

२०२६ सालचा आंतरराष्ट्रीय महिला दिन अशा वातावरणात येतो आहे जेव्हा अनेक राष्ट्रांचे सार्वभौमत्व पायदळी तुडवले जात आहे. बेमुर्वतखोरपणे लष्करी कारवाया केल्या जात आहेत. देशोदेशीचे राष्ट्रप्रमुख जागतिक पातळीवरच्या राजकारणात सर्वात असुरक्षित होत आहेत. बरेचसे जग दररोजच्या आर्थिक धमक्यांकडे असहाय्यपणे बघत आहे. फारच थोडे नेते पाठीचा कणा ताठ ठेवून त्याचा प्रतिकार करत आहेत. अशा या आर्थिक, राजकीय अस्थिरतेमध्ये समाजातील सर्वात दुर्बल घटकांवर सर्वाधिक विपरीत परिणाम होतो. ते घटक आहेत स्त्रिया व मुले! इस्रायलने गाझा पट्टीमध्ये चालवलेल्या नरसंहारात आत्तापर्यंत दोन वर्षांत साधारण ७५ हजार लोक मारले गेले आहेत. निवासी इमारती व घरांमध्ये मारले गेलेल्यांमध्ये ७० टक्के स्त्रिया व मुले तसेच ज्येष्ठ नागरिक आहेत.

अशा या अस्वस्थ करणाऱ्या वातावरणात बेपत्ता होणाऱ्या स्त्रिया व मुलींची महाराष्ट्रातून येणारी बातमी हादरवून टाकणारी आहे. २०२४-२५ या दोन वर्षांत महाराष्ट्रातून ९३ हजार ९४० स्त्रिया बेपत्ता झाल्या. त्यातील ६७ हजार ४५८ जणी सापडल्या. त्याच काळात २३ हजार ४२९ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्यातील १८ हजार ७६९ परत आल्या. त्यातही २०२४ पेक्षा २०२५ सालात गायब होणाऱ्या स्त्रिया मुलींची संख्या वाढली आहे. मुंबईतून बेपत्ता झालेल्या मुला-मुलींमध्ये मुलींची संख्या मुलांच्या जवळजवळ दुप्पट होती. सबंध भारताची किंवा राजधानी दिल्लीची परिस्थिती यापेक्षा बरी असण्याची शक्यता नाही.

घोषित होणारे आकडे पोलिसांकडे नोंदवल्या गेलेल्या प्रकरणांवरून तयार होतात. जी प्रकरणे पोलिसांपर्यंत जात नाहीत त्यांची नोंद या आकडेवारीत होत नाही. त्यामुळे घोषित आकडेवारी हिमनगाचे टोक असण्याची शक्यता जास्त. गुन्हा नोंदणीचे प्रमाण भारतात बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. गरिबी, अज्ञान, नातेवाईक व गावातील समाजाचा दबाव यामुळेही बेपत्ता मुलांची प्रकरणे नोंदवली जात नाहीत. गुन्हे नोंदवणे व पूर्ण तपास करून छडा लावणे याबाबत भारतातल्या पोलीस यंत्रणांची ख्याती काय आहे ते नव्याने कोणाला सांगण्याची गरज नाही. अनास्था, असंवेदनशीलता, भ्रष्टाचार, गावातील धनदांडग्यांचा दबाव, राजकीय हस्तक्षेप या सर्व गोष्टी इथे हातात हात घालून गुण्यागोविंदाने नांदत असतात.

अठरा वर्षांखालील मुलगा किंवा मुलगी आई-वडिलांना माहीत नसताना किंवा त्यांच्या संमतीशिवाय घरी परतली नाहीत तर त्यांना बेपत्ता मुले मानले जाते. घरी आई-वडिलांशी पटत नाही म्हणून किंवा मनासारखे वागण्याचे स्वातंत्र्य नाही म्हणून, मारहाणीला कंटाळून मुले योजना आखून किंवा वाट फुटेल तिकडे निघून जातात. यातील बरीचशी मुले लवकरच सापडतात. पण बाकीची अपघात, मृत्यू, भिकेला लावणे, अपहरण या प्रकारात सापडतात. या प्रकारात मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण अधिक आढळते. पालकांबरोबर विसंवाद किंवा मित्रांची संगत ही प्रमुख कारणे आढळतात.

अल्पवयीन मुलींमध्ये जाती-धर्माबाहेर ठरवलेले लग्न, त्याला आई-वडिलांचा विरोध, यामुळे मित्राबरोबर आई-वडिलांना न कळवता घर सोडणाऱ्या मुलींचे प्रमाण आढळते. ती अल्पवयीन आहे याचा फायदा घेऊन मुलीचे आई-वडील तिच्या मित्राविरुद्ध अपहरणाची तक्रार नोंदवतात. बरेच वेळा मुलगा

तुरुंगात खितपत पडतो. मुलीचे मनाविरुद्ध स्वजातीत किंवा स्वधर्मात लग्न लावून दिले जाते. त्यांच्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याच्या स्वातंत्र्यावर अशाप्रकारे गदा येते. स्त्री संघटनांच्या कौटुंबिक समुपदेशन केंद्रात अशा प्रकारच्या केसेस येत असतात.

या स्वेच्छेने निघून जाणाऱ्या मुला-मुलींपलीकडे त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन किंवा प्रलोभने दाखवून अपहरण केल्या गेलेल्या किंवा खंडणीकरिता ओलीस ठेवलेल्या मुलांची संख्याही मोठी आहे. जबरदस्ती, फसवणूक तसेच बळजबरीने सक्तीचे काम किंवा वेश्याव्यवसाय यासाठी दुसरीकडे नेऊन विकणे याला मानवी व्यापार किंवा ट्रॅफिकिंग असे म्हटले जाते. या प्रक्रियेमुळे माणूस पूर्णपणे दुसऱ्या माणसाच्या नियंत्रणाखाली जातो. हे नियंत्रण ठेवण्यासाठी बळाचा किंवा हिंसेचा वापर केला जातो. गुलामगिरीवर कायद्याने बंदी असल्यामुळे हे सर्व व्यवहार बेकायदेशीरपणे केले जातात. ते छुप्या पद्धतीने चालतात. गुलामांचा व्यापार पूर्वीप्रमाणे उघडपणे चालू नसला तरी ते गुलामीसारख्या परिस्थितीत अडकतात. गरीब, वंचित लोक यामध्ये जास्त प्रमाणात फसतात. भारतात व आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या अशा टोळ्या आहेत. त्यांच्या कारवायांना बळी पडणाऱ्यांना देशामध्ये किंवा परदेशात नेऊन विकले जाते. बेकारी, गरिबी, शिक्षणाची संधी नाही, समाजातील अस्थिरता, अशांत टापू, युद्ध, दहशतवाद अशा अनेक कारणांनी मुले, स्त्रिया या मानवी तस्करांच्या जाळ्यात ओढले जातात.

अमेरिका, युनायटेड अरब एमिरेट्स, पश्चिम युरोपातील श्रीमंत राष्ट्रे किंवा मध्यपूर्वेतील इतर श्रीमंत देश येथे अशा अपहरण केलेल्या लोकांना मागणी असते. सक्तीच्या श्रमाप्रमाणे सक्तीचा वेश्याव्यवसायही या श्रीमंत देशांमध्ये स्त्रियांच्या फसवणुकीतून फोफावतो. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया खंडातील गरीब देशातून अनेक मुली व स्त्रिया या देशात नोकरीचे प्रलोभन दाखवून नेल्या जातात व सक्तीच्या वेश्याव्यवसायात अडकतात. या लैंगिक शोषणाच्या बळी असणाऱ्या स्त्रियांची संख्या जगात लाखोंच्या घरात आहे. या स्त्रियांच्या प्राथमिक गरजा व परतण्याचा प्रवासखर्च यांची पूर्तता करता येत नसल्यामुळे त्या याच व्यवसायात अडकून पडतात.

१७ नोव्हेंबर २०२५ रोजी नायजेरियातील एका शाळेतून सशस्त्र बंडखोरांनी २४ मुलींचे अपहरण केले. आठवड्याभरात त्यांना परत सोडून देण्यात आले. ज्या देशांमध्ये बंडखोरांचे सशस्त्र उठाव चालू आहेत तेथे स्त्रिया व मुली यांचे अपहरण ही नित्याची बाब झाली आहे. नायजेरियामध्ये २००९ सालापासून बोको हराम या दहशतवादी संघटनेने अनेक अपहरणे केली आहेत. २०१४ सालातील २७६ शाळकरी मुलींचे अपहरण हे सर्वात गाजलेले प्रकरण! मुलांची संघटनेत भरती करणे व मुलींशी लग्न करणे, खंडणीखोरी यासाठी ही अपहरणे केली जातात. सीरिया व इराकमध्ये वाढलेल्या इस्लामिक स्टेटनेही कधी प्रलोभने दाखवून तर कधी धाकदपटशाने मुला-मुलींची अपहरणे केली. त्यांना गुलाम बनवून विक्रीसाठी

बाजार भरवले.

पण आत्तापर्यंतचे जगाच्या इतिहासातले कोवळ्या मुलींच्या लैंगिक शोषणाचे सर्वात विकृत, दीर्घकाळ चालणारे कांड एपस्टिन फाइल्सच्या निमित्ताने जगासमोर आले. जगातील सर्वाधिक श्रीमंत सत्ताधीश, तसेच शक्तिशाली, प्रभावशाली राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, दूतावासातले उच्च अधिकारी, उद्योगपती, अब्जाधीश, अगदी ब्रिटनचे राजपुत्रही या गलिच्छ खेळात सामील होते. स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे ही धारणा २१ व्या शतकातही संपलेली नाही. त्यातही ती अजाणता वयातली असेल तर सुखाची परमावधी! पण हे एवढेच नाही. एपस्टिनचे उद्योग अमेरिकन गुप्तहेर संघटना सीआयएच्या आशीर्वादाने चालले असावेत जगभरात सत्तेचे राजकारण खेळण्यासाठी! नाही तर एवढ्या ईमेल, संदेश जपून ठेवण्याचे कारण नव्हते. आयातकर, व्यापारअटी, शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे ही अपुरी पडली म्हणून त्यांनी कोवळ्या वयातल्या मुलींना वापरले. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबयांची आयुष्ये उद्ध्वस्त करून ते सत्तेचे राजकारण खेळत आहेत. अशा या विपरीत वातावरणात सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा!

amol.kerkar1957@gmail.com

लेखिका व स्त्रीमुक्ती संघटनेच्या पदाधिकारी

logo
marathi.freepressjournal.in