

विशेष
निळू दामले
इराणवर इस्रायल व अमेरिकेने हल्ला केल्याने जगभर इंधनाची टंचाई व महागाई भडकली आहे. गँस टंचाईमुळे हॉटेल, रेस्टॉरंट बंद पडत आहेत. लोकांचे जेवणाखाण्याचे वांदे झाले आहेत. युद्ध लांबले तर भीषण अशा इंधन टंचाईला भारताला तोंड द्यावे लागेल. यापूर्वी सुरु झालेले रशिया-युक्रेन युद्ध सुरुच आहे. आर्थिक अस्थैर्याच्या गर्तेत भारत व भारतीय सापडले आहेत. अशा परिस्थितीत भारताच्या धोरणांचा तिरकस शैलीत घेतलेला वेध.
पादकानी विचारले 'इराण युद्धाचा भारताच्या राजकीय धोरणावर काय परिणाम होईल? ' काय राजकीय परिणाम होणार? भारत आता एका अध्यात्मिक उन्नत स्थितीत पोहचला आहे. भारत राळेगण शिंदीतल्या एका विशाल वृक्षाखाली एका बाकड्यावर बसला आहे. भारताचे डोळे उघडे आहेत. पण भारत जागा नाही. भारताचे डोळे कधी मिटलेले असतात पण भारत झोपलेला नसतो. भारत कधी चालत असतो, पण त्याला कुठंही जायचं नसतं. भारत कॅमेऱ्याला पोज देत आकाशाकडं पहात असतो पण तो विचार करत नसतो. भारत कधी निवांत बसलेला असतो पण तरीही अंतर्मनात तो अनंत योजने चालत असतो.
भारताच्या सीमेच्या अगदी जवळ शत्रूचे रणगाडे पोचले होते. सेनापती अस्वस्थ झाले. काही केलं नाही तर रणगाडे भारतात घुसून नाश करणार. काही केलं तरी युद्ध सुरु होऊन पुन्हा नाशच होणार. करायचं काय? सेनापतीनं भारताला विचारलं, "मी काय करू."
भारत म्हणाला- "वत्सा तुला जे योग्य वाटेल ते कर."
वत्स म्हणजे सेनापती विचारतो, "सर, मी तुम्हाला गेले कित्येक तास विचारतोय, तुमचं आपलं हेच उत्तर आहे. मी काहीही केलं नाही तर?
भारताचं भरत वाक्य होतं 'वत्सा तुला योग्य वाटतं ते कर.'
रशियानं दीड लाख सैन्य युक्रेनच्या सीमेवर उभं केलं. साऱ्या जगाला ते सॅटेलाईट चित्रात दिसलं. भारतालाही ते दिसलं. भारत झाडाखाली निवांत होता.
'बरेच दिवस झाले. रशियन सैन्याला काही काम नव्हतं. बिच्चारं कंटाळलं होतं. पाय मोकळे करायला युक्रेनच्या हद्दीवर पाठवलं असणार. चांगलंच आहे की. रशियन सैन्याला पातंजलीची योग सुत्रं पाठवा' भारत म्हणाला. रशियानं पातंजली पोचायची वाट पाहिली नाही. तोफा डागल्या. ड्रोन सोडले. विमानं बाँब टाकत फिरली. अग्नीबाणांचा पाऊस पडला. युक्रेनमधली पोरंबाळं मरू लागली. आकाशात टक लावून बसलेल्या भारताच्या डोक्यावरवरून एक कावळा शिटला. तरीही भारत शांत होता. ब्रह्मानंदी टाळी लागली होती. 'रशियाला गीतेच्या प्रती पाठवा. युक्रेनलाही पाठवा. त्यांना माझा निरोप द्या. दोघांनीही बंदुका खाली ठेवाव्यात, गीतेचं पारायण करावं. त्यांना मराठी कळतं की नाही याची चौकशी करा, येत असल्यास ज्ञानेश्वरी पाठवा. युद्ध थांबेल.' भारत म्हणाला. रशियानं भारताचे आभार मानले. रशिया म्हणाला ' भारतानं योग्य मार्गदर्शन केलं. भारताला शांततेचं पारितोषिक द्यायला हवं.' भारताच्या गालावर खळी पडली. भारत मंदसं हसला.
तीन वर्षे होऊन गेली. युक्रेनचे काही लाख, रशियाचे काही लाख मेले. राजकारणाशी संबंध नसलेले म्हातारे बायकापुरुष मेले, जगणं सुरूही न झालेली मुलं मेली. भारत शांत आहे. ध्यानात मग्न आहे. भारताच्या कानावर आलं की गाझानं अमानुष खोडी काढलीय. इस्रायलची निष्पाप माणसं मारलीत.माशी कानाशी घोंगावल्यावर जशी वारतात तशी ही बातमी भारतानं वारली.
इस्रायलनं बदल्याची कारवाई सुरु केली. गाझाच्या काही तासांच्या उद्योगाला अनंत महिन्यांचं उत्तर इस्रायलनं दिलं. गाझा पार उध्वस्थ केलं. गाझात दररोज दोनशे अशा दरानं माणसं मरत आहेत. दोन चार माशा घोंगावल्या सारखं झालं, भारताच्या कपाळावर एक आठी पडली, अनुवठीखाली धरलेला हात काढून भारतानं त्या माशांना हाकललं. काय या माशा, त्यांना कळत कसं नाही की, मी ध्यानात आहे. भारतानं समोर पाहिलं. कॅमेरामनला भारताची भाषा कळत होती. कॅमेरा ऑन झाला. भारतानं मागं वळून पाहिलं. एक सेवक पुढं आला. 'गीतेच्या प्रती शिल्लक आहेत ना? पाठवा गाझा आणि इस्रायलमधे' भारतानं सेवकाला सांगितलं.
वाक्य संपल्यावर भारत दहा सेकंद थांबला. भारतानं खुणावलं. कॅमेरामननं ट्रायपॉड उचलला. बाजूला सरकला. दुसरा कॅमेरा आला. कॅमेरामननं कॅमेरा सेट करून भारताला खूण केली. सेवकानं एक मोर आणला. भारतासमोर ठेवला. भारतानं मोराला दाणे घातले. मोर दाणे खाईच ना. त्याला कंटाळा आला होता. गेले काही तास भारत सतत मोराला दाणे भरवत होता. मोराचं पोट भरलं होतं. मोराला अजीर्ण झालं होतं. भारत थांबेना, कॅमेरा थांबेना. शेवटी कंटाळून मोरानं एकदोन दाणे टिपले. भारताच्या चेहऱ्यावर अध्यात्मिक आनंद पसरला. कॅमेऱ्यानं तो क्षण अचूक पकडला. झाड तेच. बाकडं तेच. भारतही तोच. परिस्थिती बदलली होती. इराण युद्ध.
समोर मॉनिटर होता. अमेरिकेत पहाटेचे अडीच वाजले होते. अमेरिकेचे प्रेसिडेंट फ्लोरिडातल्या रिसार्टवर होते. प्रेसिडेंट म्हणाले ' मी इराणवर हल्ला करायची आज्ञा लष्कराला दिली आहे. कॅमेऱ्यापाठी उभा ठाकलेल्या पत्रकारानं कारण विचारलं. काहीशा विस्कटलेल्या प्रेसिडेंटनी एक कारण सांगितलं. टीव्हीचा माणूस कॅमेरा गुंडाळून निघाला. प्रेसिडेंटनं त्याला थांबवलं. एक नवं कारण सांगितलं. कॅमेरामननं रेकॉर्डिंग केलं. निघाला. प्रेसिडेंटनी पुन्हा त्याला बोलावलं. तिसरं कारण.
सभोवताली बर्फ पडत असतानाही कॅमेरामनला घाम फुटला. भारत हे सारं समोर ठेवलेल्या मॉनिटरवर पहात होता. हनुवटीखाली हात. भारताचा छान वेळ चालला होता. मोरांपाठोपाठ पोपट आले. भारतानं पोपटांना पेरू खायला घातले. भारत थकला. मागं उभा असलेला सेवक गोमूत्राचा ग्लास घेऊन आला. भारत विचारात पडला. त्यानं ग्लास घेऊन जा अशी खूण केली. तो सेवक गेला. दुसरा सेवक आला. त्याच्या हातात हळद घातलेलं दूध होतं. भारताच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. मॉनिटरवर इराणवर पडणारे बाॅम्ब दिसत होते. भारतानं इस्रायलच्या पंतप्रधानांना अभिनंदनाचा संदेश पाठवला. सेवकानं विचारलं की अमेरिकेच्या प्रेसिडेंटला संदेश पाठवू का? भारत काहीसा गोंधळला. सेवकाच्या कानात भारत म्हणाला, ‘संदेश धाडू नका. फोन लावा. तिकडून फोन उचलला की मी बोलेन.’ अमेरिकन प्रेसिडेंटनी फोन उचलला नाही. भारत ध्यानमग्न होता. सर्व पक्ष्यांना दाणे घालून झाले होते. आता काय, असा प्रश्न सेवकासमोर होता. सेवकानं दबकत दबकत भारताच्या कानाजवळ तोंड नेऊन विचारलं ‘वनतारात नेण्यासाठी एक वाघ आणलाय. सध्या तो आपल्याच पिंजऱ्यात आहे. तसा तो माणसाळलेला आहे. आणू का?’ तेवढ्यात सेवकानं सेलफोन आणला, भारतासमोर ठेवला. ‘सर. होर्मुझची खाडी बंद झालीय. तेल येत नाहीये. तेल महागलंय. ढोकळा- फाफडा खाऊ घालणारी रेस्टॉरंटही बंद पडत आहेत. हॉटेलवाले म्हणत आहेत की सिलिंडरची किंमत चौपट झालीय, सिलिंडर मिळत नाहीये, मिळवण्यासाठी पैसे चारावे लागत आहेत, काय करावं?’ भारत शांत होता. भारताचा हात पुन्हा हनुवटीखाली गेला. भारतानं आकाशाकडं पाहिलं. कॅमेरामन सरसावला.
भारतानं खुणावलं, कॅमेरा नको म्हणाला. सेवकाला सांगितलं, “लिहून घ्या.” ‘जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणीजात. इस्रायलची वांछा, अमेरिकेची वांछा, उद्ध्वस्त इराणची वांछा, उद्ध्वस्त गाझाची वांछा, उद्ध्वस्त युक्रेनची वांछा. सर्वांच्या वांछ्या पुऱ्या होवोत.’
सेवकानं विचारलं ‘माध्यमांकडं पाठवू?’
भारतानं डोळे किलकिले केले. म्हणाले, ‘आपल्या आयटी सेलकडं पाठवा’ सेवक पळाला.
भारत पुन्हा ध्यानमग्न झाला।।
damlenilkanth@gmail.com