जागर पर्यावरणाचा

मागच्या दोन वर्षांपासून या गावाकडे पाऊसच न फिरकल्यामुळे गाव कसे भकास, उदास वाटत होते. पाऊसपाणी नाही म्हणून शेतात पिकं नव्हती. लोकांची रोजंदारीच्या कामासाठी कोसो दूर फरपट चालली होती. घरात दिवसभर म्हातारी माणसं आणि लहान मुलंच असायची. काही ठिकाणी पाणी पिण्यासाठी टँकरने पाणी पुरवलं जायचं.
जागर पर्यावरणाचा
Published on

बालोद्यान

एकनाथ आव्हाड

बाळू, शमी यावेळी मे महिन्याची उन्हाळी सुट्टी मजेत घालवण्यासाठी मामाच्या गावी....म्हणजेच धरणगावी आले होते खरे. पण गावचे उघडेबोडके डोंगर, आटत चाललेली इथली नदी, विहिरींचा पाण्याशिवाय दिसून येणारा तळ, ओसाड, उजाड माळरान, पाण्यासाठी गावाची चाललेली वणवण, गायवासरांचे चारापाण्याशिवाय होणारे हाल... हे सारंच पाहून ते आतून दुखावले होते. गावचं हे चित्र त्यांच्या मनात कधीच नव्हतं. शमी तर नेहमी म्हणायची,

“मामाचा गाव आहे,

नदीच्या काठावर,

आनंदाचे गाणे इथे,

साऱ्यांच्या ओठावर...”

पण आता गावातली नदी नुसती नावालाच सांगण्यापुरती होती आणि गावाच्या ओठावरचे आनंदाचे गाणे तर केव्हाच विरून गेले होते.

मागच्या दोन वर्षांपासून या गावाकडे पाऊसच न फिरकल्यामुळे गाव कसे भकास, उदास वाटत होते. पाऊसपाणी नाही म्हणून शेतात पिकं नव्हती. लोकांची रोजंदारीच्या कामासाठी कोसो दूर फरपट चालली होती. घरात दिवसभर म्हातारी माणसं आणि लहान मुलंच असायची. काही ठिकाणी पाणी पिण्यासाठी टँकरने पाणी पुरवलं जायचं. पण तेही पुरेसं नसायचं. कारण माणसं जास्त आणि पाणी कमी अशी अवस्था झाली होती. मामाच्या गावचं बाळू-शमीच्या मनातलं सुंदर चित्र आणि आताचं गावचं वास्तव रूप यात आता खूप फरक पडला होता.

पण मामाच्या मुलांसोबत तसंच गावातील इतर मुलांमुळे आणि मुख्य मामा-मामीच्या प्रेमामुळे बाळू-शमीची उन्हाळी सुट्टी तशी थोडीफार सुसह्यच गेली. पण बाळूला पाण्याशिवाय गावची होणारी केविलवाणी अवस्था अनेकदा जाणवायची. त्याला वाटायचं, आपल्या शहरात, आपल्या घरात केवढं मुबलक पाणी असतं. त्यामुळे आपल्याला कधी पाण्याची खरी किंमतच कळली नाही. पाणी वाचवण्याचा विचार आपल्या कधी ध्यानीमनीच आला नाही. पाणी नसेल तर जनजीवन विस्कळीत होतं, हे आपण कधी लक्षातच घेतलं नाही. ‘पाणी हेच जीवन’ हे शाळेतल्या फलकावर लिहिलेलं वाक्य त्याला इथे पदोपदी आठवायचं. ही सुट्टी आली तशी गेली, पण जाताना ती बाळूला, शमीला पाण्याचं महत्त्व नकळत सांगून गेली.

आता सुट्टी जशी संपत आली तशी बाळू-शमीला घरची ओढ लागली. जून महिना सुरू झाला. मामासोबत ते आपल्या मुंबईच्या घरी यायला निघाले. पण रेल्वेची तिकिटंच मिळेनात. सर्व रेल्वे गाड्यांची रिझर्वेशन फुल्ल. इथेही माणसं जास्त गाड्या कमी, हा विचार बाळूच्या बालमनात आलाच. मग शेवटी एसटीनेच मुंबईला यायचं ठरलं. धरणगावाहून मुंबईला येणारी एकच रात्रीची नऊची एसटी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सातला ती मुंबईला पोहचते. पण तिलाही प्रचंड गर्दी. सदानकदा माणसांनी ती फुल्ल भरलेली. मुंबईला निघायच्या दिवशी तब्बल एक तास आधीच जेवूनखाऊन मामा बाळू-शमीला घेऊन त्यांच्या सामनासकट एसटी स्टँडवर येऊन बसला. एसटी आली तसा मामा जीव मुठीत घेऊन एसटीत जागा अडवण्यासाठी धावला. जागा मिळाल्यावर बाळू-शमीला घेऊन सामानासकट एसटीत कसाबसा शिरला. बसायला जागा मिळाली म्हणून बरं. एवढा लांबचा प्रवास उभ्याने कसा करायचा! तरीसुद्धा काही माणसं नाइलाजाने उभ्याने प्रवास करत होती. बसलेली माणसं मध्ये काही ठिकाणी उतरतील, मग आपल्याला बसायला जागा मिळेल या भाबड्या आशेने एसटीच्या मोकळ्या जागेत ती तग धरून उभी होती. बाळूच्या चिमुकल्या डोक्यात पुन्हा विचार आला, केवढी ही जिकडेतिकडे माणसांची तुडुंब गर्दी. त्याला यावर्षी आपल्या नववीच्या वर्गात भूगोल शिकवणाऱ्या सरांनी सांगितलेले लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम एकदम चटचट आठवले.

...लोकसंख्या वाढीमुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होतो. कुटुंबामध्ये जास्त माणसं वाढली की सर्वांना नीट आहार मिळणं अशक्य होतं. खर्च वाढतो. पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई होते. लोकसंख्या वाढीमुळे दुष्काळग्रस्त भागांना पुरेशा सुविधा पुरवणं शासनालाही कठीण जातं. लोकसंख्या वाढीमुळे घरं अपुरी पडतात. जागेसाठी जंगलं तोडली जातात. लोकसंख्या वाढीमुळे दळणवळण, शैक्षणिक व आरोग्य सुविधा अपुऱ्या पडतात. जळण, घरबांधणी, फर्निचर यांसाठी तसेच उद्योगधंद्याच्या जागेसाठी जंगलतोड मोठ्या प्रमाणावर होते. लोकसंख्या वाढीचा परिणाम निसर्गावर झाल्याने पर्यावरणाचं संतुलन बिघडतं. याचा परिणाम मग पाऊस वेळेवर न पडण्यावर होतो. पाऊस नसल्यामुळे नद्या, नाले, विहिरी आटतात. पावसावर अवलंबून असलेल्या शेतातून उत्पन्न मिळत नाही. मग रोजगार मिळत नाही. खेड्यातली लोकं रोजगारासाठी शहराकडे धाव घेतात. यातून स्थलांतर वाढते. यातूनही मग खूप समस्या निर्माण होतात. साधनसंपत्ती व ऊर्जेची कमतरता भासू लागते. नोकरी मिळत नाही. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत जाते. या सगळ्यांमुळे स्वस्थ व सुरक्षित जीवन जगण्यात खूप अडथळे निर्माण होतात. बाळू स्वतःशीच स्वगतासारखं हे सारं पुटपुटत होता. लोकसंख्या वाढीमुळे घडणाऱ्या अनिष्ट गोष्टींचा जणू त्याने पाढाच वाचला मनातल्या मनात. “बाळू, कुठे हरवलास रे?” मामाने असं विचारताच बाळू खरा जागा झाला. काही नाही, असं म्हणून तो खिडकीबाहेर पाहू लागला.

एसटीने आता चांगलाच वेग धरला होता. एसटीच्या खिडकीतून हवा आत येऊन मध्ये मध्ये गारव्याचा शिडकावा करत होती. त्यामुळे उकाडा कमी होऊन वातावरण आल्हाददायक होत होतं. आता उभी असणारी मंडळीही एसटीच्या मधल्या मोकळ्या जागेत अंगाचं मुटकुळं करून बसली. बाळूच्या डोळ्यांवर हळूहळू झोप यायला लागली. शमी तर केव्हाच मामाच्या खांद्यावर झोपी गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळी एसटी मुंबईला पोहोचली. बाळू-शमीने घरात पाऊल टाकताच हुश्श करून सुस्कारा सोडला. शमी लगेच आईला म्हणाली, “आई, एसटीत केवढी गर्दी. बापरे! उकडतही खूप होतं. कधी एकदा घरी पोहोचतो असं झालं मला. पंखा फास्ट कर आधी, घामाघूम झालेय मी.” बाळू लगेच म्हणाला, “शमू, प्रवासी माणसं जास्त, वाहनं कमी. मग गर्दी होणारच. बरं आई, मला अर्धाच ग्लास पाणी आण गं प्लीज. तहान लागलीय.” शमी लगेच हसून म्हणाली, “बाळूदा नुसतं पाणी दे म्हणालास तरी कळेल आईला, अर्धाच ग्लास पाणी दे, असं काय विचित्र म्हणतोस?” “अगं शमू, विचित्र-बिचित्र काही नाही. तू मामाच्या गावची परिस्थिती पाहिलीस ना? अगं, आपण सर्वांनी मिळून पाणी वाचवलं पाहिजे. आता मला अर्धा ग्लासच पाणी लागत असेल तर पूर्ण ग्लासभर पाणी घेऊन उरलेलं पाणी मी उष्ट कशाला करू? आपण पाणी जपून वापरायला नको का? आजपासून शमू आपल्या घरात कुणीच शॉवरखाली आंघोळ करायची नाही. शॉवरमुळे खूप पाणी वाया जातं. आंघोळीला पाणी बादलीतच घेऊ. पाणी बचतीची सवय आपण साऱ्यांनीच लावून घेतली पाहिजे. ही सुरुवात आपल्यापासून, आपल्या घरापासूनच करायला हवी की नाही.” बाळूचं म्हणणं साऱ्यांनाच पटलं.

सर्वांच्या आंघोळी झाल्या, नाश्ता झाला. शमीने, बाळूने मामाच्या गावी केलेल्या गमतीजमती घरात सांगितल्याच. शिवाय विहिरी, नदीचं पाणी आटल्यामुळे गावात निर्माण झालेल्या अडचणीही कथन केल्या. शासनानेही गाव दुष्काळग्रस्त जाहीर केलंय. शमीने आईला विचारलं, “आई का ग, मामाच्या गावी पाऊस का बरं पडत नसेल? पाऊस रुसलाय का गावावर?” आई म्हणाली, “हो ग शमू, पाऊस रुसलाय खरा. पण याला माणूसच जबाबदार आहे बरं. माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी जंगलतोड केली, झाडं नष्ट झाली. निसर्गाचा समतोल त्याने बिघडवून टाकला. मग निसर्गराजा पाऊस हा रुसणारच. आपण सगळ्यांनीच ही वसुंधरा वृक्षराजीने पुन्हा हिरवीगार करण्याचा वसा घेतला पाहिजे. निसर्ग आपल्या साऱ्यांचा जीवाभावाचा मित्र झाला पाहिजे. मग बघ, हा रुसलेला पाऊस पुन्हा खुदकन हसेल.”

तेवढ्यात बाहेर टपटप.. टपटप.. असा आवाज सुरू झाला. बाळू आनंदाने मोठ्ठ्याने ओरडला...“पाऊस आला.....पाऊस आला.” पाऊस म्हटल्याबरोबर पुस्तकातली कविता लगेच शमीच्या ओठावर आली. ती कविता गुणगुणायला लागलीसुद्धा..

“पाऊस नसला की, झाडही रुसते,

धरणीमाय तर गप्पच बसते,

पण तो आल्यावर, पानं वाजवतात टाळ्या,

पावसाला झेलत, मग हसतात कळ्या...”

मग बाळूही लगेच गुणगुणला,

“पाऊस पाणी, जमिनीवर खेळे,

शिवार शेत, आता फुलतील मळे..”

...आता बाहेर पावसानेही बाळू-शमीच्या गाण्यावर टपटप बरसत छानच ताल धरला होता.

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक

logo
marathi.freepressjournal.in