

जगतवारी
मेधा आलकरी
जपानमधील ‘साकुरा’ म्हणजे वसंत ऋतूत फुलणाऱ्या गुलाबी चेरी ब्लॉसमचा बहर, जो निसर्गसौंदर्य आणि सांस्कृतिक उत्सव अनुभवायला देतो. हनामीपासून माऊंट फुजीपर्यंत फुलांचा वर्षाव आणि रंगबेरंगी बागा जपानच्या मोहिनीची झलक दाखवतात.
जपानला जाणारी वाट ही मला माझ्या ‘स्वप्नामधील गावा’ नेणारी होती. शांत वाहणाऱ्या नदीच्या काठांवर उभी असलेली, गुलाबी फुलांनी डवरलेली आणि त्यांच्या भारानं वाकलेली चेरीची हजारो झाडं, त्या झाडांप्रमाणेच अदबीनं कमरेत लवणारी जपानी प्रजा, जपानी पंखा हलवत ‘सायोनारा’ म्हणणाऱ्या त्या नाजूक ललना, तो हिममुकुटधारी माऊंट फुजी आणि हो, मराठीत ज्याला आपण मावशी हा प्रत्यय लावतो ती जपानी ‘सुशी’.
मार्च महिन्याच्या अखेरीस बहरणाऱ्या या चेरीच्या झाडांना एकत्रितपणे पाहणं हा खरोखरंच एक रोमांचकारी अनुभव आहे. तसा हा ‘चेरी ब्लॉसम’ थोडासा लहरीच. कधी आठवडाभर लवकर बहरतो तर कधी उशिरा. जानेवारी, फेब्रुवारीच्या दरम्यान ओकिनावा या दक्षिणेकडील बेटावर फुलायला लागलेला हा बहर, मध्य जपानमध्ये म्हणजे टोकियोत येईपर्यंत मार्चची अखेर उजाडते आणि उत्तरेकडे होक्काईडोमध्ये तो मेपर्यंत असतो.
जपान एअरलाइन्सचा सुखद अनुभव घेऊन आम्ही टोकियोला पोहोचलो तेव्हा गुलाबी रंगात न्हायलेलं टोकियो शहर बघण्यासाठी आम्हाला थोडा उशीरच झाला होता. यावेळेस चेरी ब्लॉसमची गाडी ‘बिफोर टाइम’ आली होती. काही उशिरा बहरणारी मोजकीच झाडं शिंजुकू गोएन पार्कमध्ये पाहिली. परंतु तेवढ्यानेच आमच्या डोळ्याचं पारणं फिटलं. झाडं डवरून फुलली होती आणि मी मोहरून फुलले होते.
चेरीच्या या बहराला जपानी भाषेत ‘साकुरा’ म्हणतात. जपानच्या राष्ट्रीय फुलाचा हा बहर म्हणजे वसंताची चाहूल आणि नित्यनूतनता व अनंत आशा याचं प्रतीक! जपानमध्ये एकंदर दोनशे जातीची चेरीची झाडं आहेत. त्यातलं सर्वात मनमोहक आहे ‘सोमी योशिनो’ नावाचं, हलकी गुलाबी छटा असलेलं पांढरं फूल. सहसा या फुलांचे गुच्छ असतात; परंतु लोंबत्या फुलांच्या एका जातीला ‘विपिंग’ चेरी म्हणतात. जणू डोळ्यातून झरणारे अश्रू! त्याचं पाण्यातील प्रतिबिंब अप्रतिम दिसतं.
शिंजूकू गोएन पार्कमध्ये पांढऱ्या फुलांची पाच पन्नास झाडं आमची वाट पाहत होती. बागेत शिरल्या शिरल्या पाहिलेल्या एकल्यादुकल्या गुलाबी चेरीच्या झाडांना पाहून हरखलेलं मन इथे पोहोचल्यावर उचंबळून उड्या मारायला लागलं. चेरीच्या बहरात फुलं आधी फुलतात आणि मग पालवी फुटते. त्यामुळे ऐन बहरात वरपासून खालपर्यंत फक्त शुभ्र पांढरा रंग दिसतो आणि खाली पाकळ्यांचा सडा! ताज्या भुसभुशीत बर्फासारख्या दिसणाऱ्या या सड्याला म्हणतात ‘साकुरा युकी’! म्हणजे पाकळ्यांचा बर्फ!
या चेरी ब्लॉसमची एक खास बात म्हणजे नेमेचि येणाऱ्या या बहराचा आनंद लुटण्यासाठी जपानी लोक बहरलेल्या चेरीच्या झाडाखाली बसून मस्त मौजमजा करतात. या काळात प्रत्येक सार्वजनिक ठिकाण आपलं रूप पालटून उत्सवाचं माहेरघर बनून जातं. जपानी त्याला म्हणतात ‘हनामी’! त्याचा शब्दशः अर्थ आहे फुलांचं दर्शन. फार पूर्वी शेतकऱ्यांना वाटायचं की स्वर्गीची देवताच या फुलांच्या रूपानं आपल्याला भाताच्या भरघोस पिकाचा आशीर्वाद द्यायला आली आहे. फुलांचा बहर भातलावणीच्या सुरुवातीच्या दिवसांत असतो. या देवतांना मग भाताच्या दारूचा, ‘साके’चा नैवेद्य दाखविला जाई. राजेमहाराजे, त्यांचे दरबारी मेजवान्या झोडत असत. उच्चभ्रू समाजातील अमीर उमराव फक्त याच मोसमात झाडाखालून पायी फेरफटका मारीत असत. एरव्ही कधीही जमिनीला न लागणारी त्यांची पावलं अलगदपणे पाकळ्यांच्या गालिच्यावर पडत असत. प्रियेला आळवणारी आर्त प्रेमगीतं या गुलाबी फुलांच्या छायेत झंकारून उठत. त्या मोहरलेल्या झाडांना पाहून कवींची काव्यप्रतिभाही अंकुरीत होत असे.
चालत चालत आम्ही बागेच्या मध्यावर येऊन पोहोचलो आणि ते पूर्णबिंबासारखं सुरेख झाड आमच्या नजरेस पडलं. हलक्या गुलाबी रंगाच्या फुलांनी डवरलेल्या त्या झाडाच्या फांद्या इतक्या वाकल्या होत्या की जमिनीपासून त्यांचं अंतर फारफार तर एखाद दोन फूटच असावं. त्या झाडाचं आकाश पांघरून मंडळी हनामी साजरी करत होती. हनामीमध्ये उत्साहाची जणू लाट असते. हास्यकल्लोळ असतो. सहकुटुंब सहपरिवार आयोजित केलेली ही सहल पाहण्यात आम्ही रंगून गेलो. ‘साके’च्या संगतीनं, घरून रांधून आणलेल्या पदार्थांवर ताव मारणं, तालबद्ध संगीतावर लयबद्ध नाचणं, गप्पा, गाणी या सगळ्याला उधाण आलेलं होतं. अशी मौजमजा चालू असताना वाऱ्याची एक झुळूक आली आणि अंगावर त्या मऊशार पाकळ्यांचा वर्षाव झाला. मन अगदी गुलाबी झालं. रात्रीच्या साकुराला म्हणतात ‘योझाकुरा’! रात्री चेरीच्या झाडांवर लटकवलेल्या कागदी कंदीलांच्या मंद प्रकाशामुळे झाडांच्या फांद्यांनी बनलेलं छत गुलाबी दिसायला लागतं. या वातावरणाची धुंदी न्यारीच! या चेरीच्या बहरात रंगलेल्या जपानमधील उपाहारगृहात त्या दिवसांत ‘पिंक ब्रेड’ असलेला बर्गर मिळतो आणि चेरीच्या चवीचं आइस्क्रीम!
दुसऱ्या दिवशी बुलेट ट्रेनचा प्रवास करून आम्ही जपानमधील सर्वात मोठं आकर्षण असलेल्या माऊंट फुजीला भेट देण्यासाठी ‘कावागुची’ या गावी पोहोचलो. माऊंट फुजी पाहून झाल्यावर जवळच असलेली ‘चेरीराई’ पाहायला गेलो आणि चिरस्मरणात राहील असा फुलांचा बहर आम्हाला पाहायला मिळाला. कावागुची तलावाच्या काठानं चेरीची हजारो झाडं जपानी शिस्तीत उभी होती. प्रत्येकाचं रूप वेगळं. कुणाचा आकार छत्रीसारखा तर कुणी सरळसोट वाढलेला. एखाद्या झाडानं पाण्यात हात घालण्यासाठी आपली फुलांनी डवरलेली फांदी तलावाच्या दिशेनं वाकवलेली दिसली. तलावाच्या एका काठावर होता शुभ्र फुलांचा डोलारा, पैलतीरी तो धीरोदात्त हिममुकुटधारी माऊंट फुजी आणि वर निळ्याभोर आकाशाचं छत्र. त्या चेरीच्या झाडांखालून मजेत केलेली रपेट आणि येता-जाता मान वळवून पाहिलेला ‘फुजीसान’, सारंच अप्रतिम!
जपानमध्ये एकंदरच फुलांची रेलचेल असते. ऋतू बदलला की वेगळ्या जातीच्या आणि वेगळ्या रंगांच्या फुलांची शाल पांघरून धरणीमाता नव्या वेशात सजते. चेरीचा बहर ओसरला की अतिशय चटकदार रंगाची अझेलियाची फुलं फुलतात. त्यानंतर फुलतात मदनगंध असलेली विस्टेरियाची फुलं. याला जपानी भाषेत म्हणतात फुजी. या फुलांच्या सौंदर्याची आणि मदमस्त सुगंधाची मोहिनी माझ्या मनावर पुढे कित्येक दिवस होती. ‘अशिकागा फ्लॉवर पार्क’ ही विस्टेरियासाठी प्रसिद्ध असलेली बाग. गुलाबी, जांभळ्या, पांढऱ्या आणि पिवळ्या अशा चार रंगात ही फुलं फुलतात. या फुलांचं रुपडं वेगळंच. एखाद्या लावण्यवतीनं कानात मोठी लोंबती झुंबरं घालावीत तशी ही फुलं. हे खाली लटकणारे गुच्छ साधारण एक ते दीड फुटांचे असतात. काही जाती तर तीन फुटांचे गुच्छ मिरवतात. फुलांच्या सुगंधाने वेडे झालेले कितीतरी भुंगे त्यांच्याभोवती पिंगा घालीत असतात. ९२००० चौरस मीटरच्या या बागेत साडेतीनशे जातीची विस्टेरियाची झाडं आहेत. त्यातलं एक झाड दीडशे वर्षं जुनं आहे. त्याच्या फांद्या एक हजार चौरस मीटर दूर पसरल्या आहेत. ऐन बहरात विस्टेरियाच्या फांद्यांचा भार पेलण्यासाठी मांडव टाकावा लागतो.
या बागेत ऐंशी मीटर लांबीचे दोन बोगदे तयार केले आहेत. एकावर पांढऱ्या फुलांचं आच्छादन, तर एकावर पिवळ्या. पांढऱ्या विस्टेरियाची तर एक भिंतच उभी केली आहे आणि त्याला साजेसं नाव दिलंय- ‘वॉटरफॉल’! दुरून पाहिलं तर धबधबाच वाटावा. आधी गुलाबी, मग जांभळी नंतर पांढरी व शेवटी पिवळी अशा क्रमानं ही फुलं फुलतात. या बागेच्या मध्यावर एक कृत्रिम तळं तयार करून त्यात फुलझाडांची मनमोहक रचना केलेली आहे. त्याच्या काठावर गुलाबी विस्टेरियाचं अर्धचंद्राकृती छत असलेली विश्रांतीची जागा आहे. हे जपानी लोक आपल्या बागा अतिशय कलात्मकरीत्या सजवतात. रंगसंगती आणि पुष्परचना या प्रांतात आघाडीवर असलेल्या जपान्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं. इथे आम्ही विस्टेरिया फुलाच्या स्वादाचं आणि रंगाचं म्हणजे चक्क जांभळं आइस्क्रीम चाखलं. अंधार पडायला लागला तसे बागेतील हजारो छोटे छोटे दिवे लागले. संध्याकाळी तो सुगंध अधिकच मदमस्त वाटू लागला. वाटलं, आपण एखाद्या रमणीय परीराज्यात येऊन पोहोचलो आहोत.
जपानमध्ये सारंच प्रेक्षणीय. अनोखं निसर्गसौंदर्य, जुनी पुराणी परंतु सुस्थितीत असलेली मंदिरं, मानवनिर्मित अभियांत्रिकी आश्चर्य, जपानी संस्कृती, प्रथा, आख्यायिका… विविधतेचा आनंद देणारा हा उगवत्या सूर्याचा देश पाहायलाच हवा. पुढच्या लेखात पाहूया जपानमधील अल्पाईन पर्वतराजींची सफर आणि फुजीसानला दिलेली भेट.
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com