

जगतवारी
मेधा आलकरी
जपानी संस्कृतीतील चहापानाची नजाकत, बुलेट ट्रेनचा अफाट वेग आणि शिबुया क्रॉसिंगवरचा मानवी ‘बहर’ यांचा सुरेख संगम. तसेच तंत्रज्ञान आणि परंपरांची सांगड घालणाऱ्या जपानची ही एक रसाळ सफर...
जपानमध्ये घरी अचानक पाहुणे आले असता घरच्या स्त्रीला हसून ‘चहा टाकते हं पटकन..’ असं म्हणायची सोय नाही. हा एक साग्रसंगीत सोहळा असतो. चहापान हे त्यांच्या संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे. चहा करणारी स्त्री चहाच्या कपात (नव्हे वाडग्यात) चहा नाही, जणू आपला जीव ओतते. या सोहळ्यात एक सौंदर्य आहे, आदरातिथ्य आहे, अदब आहे.
क्योटोजवळील ऊजी शहर हे जपानमधील ‘माचा’ चहाचं जन्मस्थान. याचं पीक सावलीत उगवून, जात्यावर दळून ही अत्युत्कृष्ट दर्जाची चहाची पावडर तयार केली जाते. चहा ‘फक्कड’ जमण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीत हवी माचाची वस्त्रगाळ पावडर, कलाकुसर केलेला वाडगा, गरम पाणी, बांबूची व्हिस्क (छोटी केरसुणी वाटावी असा ब्रश) आणि फक्त नखभर पावडर येईल इतका छोटा चमचा. चहाची हलकी कडवट चव तोंडात रेंगाळायला नको म्हणून सोबत एक गोड बिस्कीट दिलं जातं.
एका सांस्कृतिक कार्यक्रमात आम्ही हा साग्रसंगीत चहा सोहळा पाहिला होता. किमोनो घातलेल्या यजमानीणबाईंनी मोठ्या अगत्यानं पाहुण्यांना आमंत्रित करून चहाच्या बुटक्या टेबलापाशी बसवलं. सगळी मंडळी पटकन वज्रासनात बसली. आता तिनं चहाच्या वाडग्यात गरम पाणी घालून, गोलाकार फिरवून वाडगा चक्क विसळून घेतला. तोही पाहुण्यांसमोर? मला आश्चर्यच वाटलं. त्याचं इंगित असं की चहाचा हा चिनीमातीचा वाडगा गरम राहावा. मग मऊ मुलायम कपड्यानं तिनं तो स्वच्छ पुसून घेतला. आता त्या इवल्याशा चमच्यानं नखभर चहाची हिरवीगार वस्त्रगाळ पावडर चहाच्या वाडग्यात काढून त्यावर तिनं गरम पाणी ओतलं. उकळतं नव्हे. उकळतं पाणी घातलं की चहाची भट्टी बिघडून तो कडवट होतो. धूळ काढणारा ब्रश दिसावा अशा त्या बांबूच्या केरसुणीला उत्तर-दक्षिण दिशेने घुसळवून तिने ते मिश्रण एकजीव केलं. हा ब्रश एकाच बांबूमधून कोरलेला असतो. हे घुसळणं वाटतं तितकं सोपं नाही. वाडगा डाव्या हातानं घट्ट धरलेला हवा आणि उजव्या हाताची ब्रशवरील पकड मात्र ढिली हवी. मनगटाच्या जोरावर त्याला वरखाली फिरवताना त्याचं वाडग्याच्या तळाशी घर्षण होणार नाही याची काळजी मात्र घ्यायची. हे तंत्र जमलं तर या चहाला खूप फेस येतो. शेवटी फुलून वर आलेल्या त्या फेसात एकदाच तिने तो ब्रश चक्राकार फिरवला आणि बाजूला ठेवला. वाडगा आता पाहुण्यांच्या समोर चटईवर ठेवला गेला. तो धरायची एक विशिष्ट पद्धत आहे. पाहुण्यांनी कमरेत किंचित वाकून तो वाडगा उचलून डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवला आणि आदराप्रीत्यर्थ उजव्या हाताच्या तळव्याने तो यजमानीणबाईंच्या दिशेने दोनदा फिरवला. आता हा साधारण कोमट झालेला चहा पाहुण्यांनी साडेतीन घोटात पोटात रिचवायचा असतो. सगळ्यांनी तीन मोठे घोट घेतले आणि उरलेला फेस तोंडात ओढून घेण्यासाठी आणि ‘चहा फक्कड जमलाय वहिनी’ याची बाईसाहेबांना पावती देण्यासाठी हा अर्धा घोट त्यांनी चक्क फुरका मारून संपवला. मात्र उष्टा कप तसाच न ठेवता त्याचा काठ पुसून वाडगा दोनदा आपल्या दिशेनं फिरवून मूळ स्थितीत आणला. यजमानीणबाईंना तो परत देण्यापूर्वी सगळ्यांनी त्यावरील कलाकुसरीचं तोंडभरून कौतुक केलं. हे आदबशीर चहापान म्हणजे चव चहाची आणि नखरा कॉफीचा!
चहाची ही नजाकत, तर पाककौशल्य काय अफाट असेल जपान्यांचं! काही पर्यटक नुसती खाद्यभ्रमंती करण्यासाठी जपानला जातात. आम्ही शाकाहारी असल्यामुळे या प्रांतात शिरून त्याचा आस्वाद घेणं शक्य नव्हतं, तरी मिळेल त्या एक दोन शाकाहारी पदार्थांशी दोस्ती करून एकतरी जपानी पद्धतीचं जेवण घ्यायचं असं ठरवून एका आहारगृहात गेलो. पाच मिनिटांच्या वर वज्रासनात बसणं आमच्या आवाक्याबाहेरची गोष्ट. सुदैवाने विदेशी पर्यटकांसाठी तिथे टेबल-खुर्चीची सोय होती आणि इंग्रजी मेन्यू कार्डवर चक्क शाकाहारी पदार्थ होते. चारचारदा खात्री करून आम्ही ऑर्डर दिली. त्या छोटेखानी आहारगृहाच्या वेटरला कामचलाऊ इंग्रजी येत होतं. थोड्या वेळाने आमच्या टेबलावर जेवण यायला सुरुवात झाली. सर्वप्रथम आल्या कोळशाचे निखारे असलेल्या दोन शेगड्या. मग त्यावर बसणाऱ्या हंड्यांमध्ये आल्या गरम रटरटत्या टोफूयुक्त भाज्या. मग आला वाफाळता भात आणि तांदळाचे कुरकुरीत पापड. बाजूला होता रंगबिरंगी सॅलडचा वाडगा. इतर देशांमधील अनुभवांवरून शहाणे झालो असल्यामुळे आम्ही ते सॅलड वरखाली करून पाहिलं. कुठेही शिंपले दिसले नाहीत, उलट खूप वेगवेगळी मोड आलेली धान्ये होती. ते मोडही खूप लांब आणि नाजूक. तरीही ताक फुंकून प्यायचं म्हणून वेटरला त्याची इंग्रजी नावं विचारून घेतली आणि गुगलबाबाने शाकाहारी असा शिक्कामोर्तब केल्यावरच वदनी कवळ घेतला. अप्रतिम चव! कुठेही उग्रता नव्हती, ना वासात, ना चवीत. सगळ्या गोष्टी नेमक्या, त्यामुळे स्वादिष्ट! पदार्थातील रंगसंगतीही उत्तम. रंगसंगतीतली ही कलात्मकता स्टेशनवरच्या स्टॉलवरसुद्धा दिसे. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या संस्कृतीत वाढलेले आपण भारतीय सहसा अन्नाचा नास करत नाही. हे जेवण आवडलं नाही तर पानात टाकावं लागेल अशी भीती मनात घेऊन रेस्टाॅरंटमध्ये शिरलो होतो. बाहेर आलो ते भरल्यापोटी आणि तृप्त मनानं. सगळं अन्न स्वाहा!
जपानमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वीच मला त्यांच्या बुलेट ट्रेनची स्वप्नं पडत असत. जपानमध्ये त्याला म्हणतात शिंकांसेन. वा! काय राजेशाही नाव आहे. आपल्या तानसेन, चित्रसेनचं भावंड जणू! जपानमध्ये असताना शिंकांसेनमध्ये बसण्याची एकही संधी आम्ही सोडली नाही. आरामदायी आसनव्यवस्था, स्वच्छता आणि वक्तशीरपणा या अपेक्षांवर तर ती तंतोतंत उतरलीच; पण मला त्यात बसण्यापेक्षा अधिक भावलं ते तिचं डोळ्यासमोरून धडधडत जाणारं रूप. टोकियोहून फुजीला जाताना आम्ही एका छोट्या स्टेशनवर उभे होतो आणि फास्ट ट्रॅकवरून एक बुलेट ट्रेन प्रचंड वेगाने डोळ्यासमोरून निघून गेली. या वेगवान राजबिंड्या गाडीचं सुईसारखं निमुळतं टोक वाऱ्याला कापत ताशी तीनशे किलोमीटर वेगाने धावतं. कॅमेरा सज्ज करायच्या आत क्षणार्धात ती नजरेच्या टप्प्यापलीकडं गेली होती. दिवाळीत बाटलीत लावलेलं रॉकेट कधीतरी आकाशात उडायच्या ऐवजी बाटली कलंडल्यामुळे जमिनीला समांतर उडतं त्याची आठवण झाली. या राणीचा थाटच वेगळा. त्याचे फलाट वेगळे, ट्रॅक वेगळे. ही जपानची राणी सुसाट वेगाने धावते ते पाहणं जितकं नयनमनोहर तितकंच देखणं तिचं फलाटावर येऊन थांबणं! ठराविक जागेच्या अर्धा इंच सुद्धा मागेपुढे नाही. गाडीच्या गंतव्यस्थानी सगळे प्रवासी उतरून गेले की सफाई कामगार आत शिरणार; परंतु घाईघाईनं किंवा गप्पा मारत एकामागोमाग एक चढताहेत असं नाही, तर एकाच वेळी ‘बाये मूड’ असा आदेश मिळाल्यावर लष्करातल्या जवानांनी वळावं तसं. आपल्याला नेमून दिलेल्या दारातून आत जात, ठराविक वेळेत काम उरकून ते खाली उतरून उभे राहणार. पहिल्या दाराशी उभ्या असलेल्या त्यांच्या सेनापतीकडे तोंड करून ही तुकडी उभी असते. एकसाथ सारे कमरेत लवून नमस्कार करून मगच पांगणार. राणीसाहेब मग पुढच्या फेरीसाठी सज्ज! गाडी सुरू होण्यापूर्वी दहा एक मिनिटच आधी दारं उघडणार. प्रवाशांना आत जाण्यास तेवढा अवधी पुरतो.
चेरीच्या फुलांइतकाच फुललेला माणसांचा बहर पाहायला आम्ही टोकियोमधील ‘शिबुया क्रॉसिंग’ला जाऊन पोहोचलो. जपानला जाणाऱ्या पर्यटकांचं हे एक लाडकं ठिकाण होऊन बसलंय. शिबुया लोकल स्टेशनच्या बाहेरील चौकात चार नाही तर चक्क आठ रस्ते येऊन मिळतात. पादचाऱ्यांच्या सोयीसाठी त्या आठही दिशांना झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या आखल्या आहेत. पादचाऱ्यांसाठीचा सिग्नल हिरवा झाला की त्या आठही दिशांना थांबलेली माणसं विविध दिशांनी रस्ता ओलांडू लागतात. रस्त्याच्या मध्ये एकमेकांसमोर आले की दर वेळेस गमतीदार असा सावळा गोंधळ उडतो. प्रत्येकाला घाई असल्यामुळे अगदी स्वाभाविकपणे एखादा समोरच्यावर आपटतोय, कुणी डावी-उजवीकडे सरकला तर शेजारी चालणाऱ्या माणसाच्या पावलावर पाऊल पडतंय, तर कुणी अनावधानानं एका क्षणासाठी स्प्रिंगसारखे एकमेकांभोवती फिरताहेत, कुणी आधी सरकावं? डावीकडे जावं की उजवीकडे? हा निर्णय होईपर्यंत ही ‘स्प्रिंगक्रिया’ चालू राहते. सिग्नल आपला हिरवा रंग बदलायच्या मार्गावर असताना थोडा तांबूस झाला की काही धावणाऱ्या माणसांची छोटी शर्यत पाहायला मिळते. वाहनांची पाळी आली की ती मात्र सैरावैरा न धावता शिस्तीत आपल्या लेनमधून चालत असतात. हळूहळू प्रत्येक सिग्नलपाशी माणसांची गर्दी जमू लागते आणि बघता बघता फुगत जाते. हा फुगलेला फुगा ग्रीन सिग्नलची टाचणी लागली की फुटतो आणि एखाद्या पुरचुंडीतून मोहरी सांडावी तशी माणसं रस्त्यावर घरंगळू लागतात. काळ्या सुटाबुटातील ती माणसं पाहून मला काळ्या मुंग्यांची आठवण झाली. इतका वेळ एका पादचारी पुलावरून ही धांदल बघत पोट धरून हसणारे आम्ही आता मैदानात उतरलो. आठही दिशांच्या सिग्नलपाशी थांबून या महासागरात पोहून आलो. कितीही सावध राहिलो तरी समोरील माणसाशी स्वाभाविकपणे टक्कर होण्याची संभावना असते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि खो खो हसलो.
असा हा सर्वांगसुंदर जपान.. मला वेडच लावलं या देशाने. ले गया दिल!
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com