

स्मरण
जगदीश काबरे
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू कोट्यवधी भारतीयांच्या रूपात भारतमातेला पाहत होते. देशाच्या भौतिक प्रगतीबरोबरच देशाचा प्रदीर्घ सांस्कृतिक वारसा त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता. धर्मनिरपेक्षतेचे मूल्य हा त्यांच्या विचारकार्याचा गाभा होता. १४ नोव्हेंबर हा नेहरूंचा जन्मदिन. भारतीय संस्कृतीचा शोध घेणाऱ्या नेहरूंचे विचारकार्य आजही महत्त्वाचे आहे.
सध्या देशाला 'भारतमाता' म्हणून देव्हाऱ्यात ठेवून तिला पुजणारे तिच्याच परधर्मीय लेकरांचा म्हणजेच आपल्या भावंडांचा दुस्वास करत, त्यांचे झुंडबळी घेत भारतमातेला रक्तबंबाळ करत आहेत. देशाला माता किंवा पिता समजणाऱ्या वृत्तीच्या भावनिक लोकांविषयी पं. जवाहरलाल नेहरूंना नेहमीच करुणा वाटत असे. कारण देशाचे उन्नयन हे भावनेवर नाही तर शास्त्रीय विचाराने होत असते, असे त्यांचे म्हणणे होते. त्यासाठी हिंदुस्थान किंवा इतर कोणताही देश यांच्यावर मानवी गुणधर्म कल्पिण्याची वृत्ती बालिशपणाची आहे, असे त्यांचे मत होते. देश म्हणजे व्यक्ती नव्हे नेहरूंनी लिहिलेल्या 'भारताचा शोध' या पुस्तकात पृष्ठ क्रमांक ६९आणि ७१ वर ते म्हणतात, "देश म्हणजे हातपाय असलेली एखादी व्यक्ती नव्हे. मी तरी असली कल्पना कधी केली नाही. अशा स्वरूपात भारताकडे कधी पाहिले नाही. भारतीय जीवनातील विविधता, शेकडो भेद, नाना वर्ग, जातीजमाती, धर्म, वंश, सांस्कृतिक विकासाच्या निरनिराळ्या पातळ्या या सर्वांची मला स्पष्ट जाणीव आहे. परंतु मला असे वाटते की, ज्या देशाला अखंड अशी सांस्कृतिक परंपरा आहे, एका दीर्घ परंपरेची ज्याला पार्श्वभूमी आहे, ज्या देशातील लोकांची जीवनाकडे पाहण्याची एक समान दृष्टी आहे, त्या देशाचे विशिष्ट असे अंतरंग निर्माण होत असते आणि त्या अंतरंगाचा त्याच्या सर्व अपत्यांवर ठसा उमटत असतो. त्यांचे आपसात मग कितीही मतभेद असोत, परंतु राष्ट्राच्या विशिष्ट वृत्तीचा स्पष्ट ठसा त्यांच्यावर उमटल्याशिवाय राहत नाही."
भारतमाता म्हणजे काय?
ते पुढे लिहितात, "कधी कधी सभास्थानी मी पोहोचताच प्रचंड जयघोषांनी माझे स्वागत केले जाई. 'भारतमाता की जय' या गर्जना उठत. या घोषणेचा अर्थ काय ? असे मी त्यांना विचारी तेव्हा ते बुचकळ्यात पडत. कारण मी असा काही प्रश्न करीन अशी त्यांची अपेक्षा नसे. ज्या भारतमातेचा जय व्हावा असे तुम्हाला वाटते ती भारतमाता म्हणजे काय ? या प्रश्नाचे त्यांना नवल वाटे, काय उत्तर द्यावे हे ध्यानात न आल्यामुळे ते एकमेकांकडे बघत आणि नंतर माझ्याकडे बघत. मी पुनः पुन्हा विचारीत राहिलो की एखादा तडफदार, जमिनीशी पिढ्यान् पिढ्या एकरूप झालेला असा किसान उभा राही आणि उत्तर देई की, "भारतमाता म्हणजे ही धरित्री, ही हिंदुस्थानची सुंदर जमीन". परंतु मी पुन्हा प्रश्न विचारी की, 'कुठली जमीन?', 'तुमच्या खेडेगावातील जमिनीचा तुकडा की जिल्ह्यातील सारी जमीन की प्रांतातील की या सर्व हिंदुस्थानातील?' अशा रीतीने प्रश्नोत्तरे चालत आणि ते शेवटी अधीर होऊन म्हणत, 'आम्हाला समजत नाही, तुम्ही नीट सांगा' आणि मी तसा प्रयत्न करी."
भारतीय जनतेचा जयजयकार
नेहरू आपली भूमिका उपस्थितांना कशी समजावीत, हे समजून घेणे आज कधी नव्हे इतके आवश्यक आहे. ते सांगतात, "तुम्ही समजता त्याप्रमाणे सर्व हिंदुस्थान यात येतोच, परंतु आणखीही काही अधिक त्यात आहे. भारतातील पर्वत व नद्या, अरण्ये व अन्न देणारी अफाट शेतजमीन या साऱ्या गोष्टी आपणास प्रिय आहेतच; परंतु शेवटी भारत म्हणजे मुख्यत्वेकरून भारतीय जनता, तुमच्या-माझ्यासारखे हे सारे लोक, या अफाट देशात सर्वत्र पसरलेली हिंदी जनता हा भारतमातेचा मुख्य अर्थ. भारतमाता म्हणजे कोट्यवधी हिंदी बंधुभगिनी. भारतमातेचा जय म्हणजे या भारतीय जनतेचा जय."
नेहरू पुढे सांगतात, "तुम्हीही सारे या विशाल भारतमातेचे अंश आहात. तुम्ही स्वतःच एक प्रकारे मूर्तिमंत भारतमाता आहात. हळूहळू हा विचार त्यांच्या मनोबुद्धीत मुरत जाई, हृदयात घुसे आणि मग एखादा मोठा नवीन शोध लागावा अशा रीतीने त्यांच्या डोळ्यात एक नवीन प्रभा चमके."
उत्स्फूर्त भाषणे
पं. नेहरूंची गणना जगातील सर्वोत्कृष्ट अशा पाच इंग्रजी गद्य-लेखकांत केली जाते. पं. नेहरूंच्या उल्लेखनीय अशा काही भाषणांपैकी बरीचशी भाषणे उत्स्फूर्त किंवा त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरातील आहेत. त्यापैकी १४-१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री झालेल्या स्वातंत्र्याच्या स्वागतसमयी उद्देशून केलेले त्यांचे 'भवितव्याशी भेट' हे सुप्रसिद्ध भाषण त्यांनी स्वतःच लिहून काढलेले होते. महात्मा गांधींच्या खुनानंतरचे आकाशवाणीवरील 'प्रकाश लोपला' हे भाषणसुद्धा असेच उत्स्फूर्त व कोणत्याही टिपणांच्या आधाराशिवाय केलेले होते.
कामाने कोणी मरत नाही
१९४६च्या सप्टेंबरपासून पंतप्रधानपदी कार्यरत असणारे नेहरू रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशीही आपल्या कार्यालयाचे काम पहात. ते दिवसही धामधुमीचे होते. त्यामुळे त्यांना पाच तासही झोप मिळत नसे. त्याचा परिणाम म्हणून ते बैठकीस बसले की डुलकी घेत असत. रविवारी, सुट्टीदिवशी त्यांनी दुपारी एखादी झोप काढावी, असे त्यांना कोणी सांगितले तरी ते पटणारे नव्हते. कारण त्यांना आपल्या शरीर प्रकृतीविषयी अभिमान होता. एकदा त्यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या एम. ओ. मथाई यांनी त्यांना सांगितले की,
"कार्यालयातील स्वीय सहाय्यक व इतर कर्मचारी ही कुटुंब असणारी, मुलबाळं असणारी मंडळी आहेत. एखाद्या दिवशी त्यांना वाटते की बायकामुलांना बाजारात घेऊन जावे, एखादा सिनेमा पहावा. त्यांच्यावर मेहरबानी म्हणून तुम्ही रविवार किंवा इतर सुट्ट्यांच्या दिवशी कार्यालयात दुपारी जाणे थांबवावे."
त्यांचा हा प्रस्ताव पंतप्रधान नेहरूंनी स्वीकारला. पण तो स्वीकारण्यापूर्वी नेहरू म्हणाले होते, "कामाने कोणीही मरत नाही."
त्यावर मथाई म्हणाले, "अहो, पण अतिश्रमाने माणूस थकतो. तुम्हाला थकून चालणार नाही." या चर्चेनंतर नेहरू रविवारच्या दिवशी विश्रांती घेऊ लागले. तसेच दररोज जेवणानंतर अर्ध्या तासाची वामकुक्षीही घेऊ लागले.
एकाकी झुंज
म. गांधीजींप्रमाणेच, पं. नेहरूंच्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण फाळणी व फाळणीनंतरच्या काळात आला. ज्या निधर्मी राष्ट्राचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते ते राष्ट्र भलत्याच धोक्यात सापडले होते. धार्मिक वेडाचार आणि खवळलेला जनसागर यांच्याविरुद्ध वीरोचित लढा देण्यासाठी नेहरू एकटेच पुढे सरसावले. खरोखरच, एकाकी झुंज दिली त्यांनी त्या पाशवी शक्तींशी ! सरकारातील कोणी सहाय्याला आले नाही, आपलेच काही प्रमुख सहकारी थट्टा उडवत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, न डगमगता त्यांनी झगडा दिला. गुलामगिरीच्या प्रश्नावर लढत असताना एक वेळ अशी आली की, अब्राहम लिंकनदेखील समझोत्याच्या तयारीस लागले होते. पण नेहरू एखाद्या खडकासारखे अविचल राहिले. आपल्या मूलभूत निष्ठांना तिलांजली देण्याची त्यांची तयारी नव्हती. प्रवाहाविरुद्ध स्वतःला झोकून देताना त्यांनी आपले राजकीय भवितव्य आणि स्वतःचे जीवन पणाला लावले. त्यांना गांधीजींचा उदात्त आधार मिळाला आणि अंतिम जय नेहरूंचाच झाला. एखादा कमी कर्तृत्वाचा, हिमतीचा माणूस कोलमडून पडला असता पार. त्या अंधारयुगात नेहरूंना हात दिला तो त्यांची दूरदृष्टी, धैर्य, श्रद्धा आणि प्रचंड व्यक्तिगत प्रतिष्ठा यांनी. उन्मादाने बेफाम झालेल्या निर्वासितांवर कॅनॉट सर्कसमधील एका मुसलमानाचे दुकान लुटणाऱ्यांवर त्वेषाने, मुठी आवळून धावून गेलेले नेहरू पाहताना त्याकाळी लोकांना बायबलमधील ख्रिस्ताची आठवण झाली.
९ ऑक्टोबर १९५२ ला, मद्रास बीचवर भाषण करताना नेहरूंनी स्वतःचा मृत्युलेखच लिहिला म्हणू या "जर कोणाला माझ्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करायची इच्छाच असेल तर त्यांनी असे म्हटलेले मला आवडेल - हा (नेहरू) एक माणूस असा होता ज्याने तनमनाने भारत व भारतीय जनता यांच्यावर प्रेम केले, त्यांनीही त्याचे खूप लाड केले, आपले प्रेम, अंतःकरण भरभरून वाहेपर्यंत आणि कसलीही काटकसर न करता, दिले त्याला !"
भारतीय जनता नेहरूंकडे याच भावनेने पाहील सदोदित. मग त्यांची अवहेलना करण्याचा केविलवाणा प्रयत्न काही क्षुद्र जीव करेनात का ! किरकोळ माणसे राजकीय रंगमंचावरील त्यांच्या वाट्याला आलेला काळ घालवतील कसाबसा आणि जातील निघून. त्यांचे नावही निघायचे नाही काही काळाने. पण नेहरूंच्या बाबतीत तसे कधीच घडणार नाही. अखिल विश्वाला गवसणी घालणारे, विशाल, दयाद्र अंतःकरणाचे जवाहरलाल नेहरू, या जनतेचे मुक्तिदाते, या लोकसत्ताकाचे संस्थापक आणि या राष्ट्राचे निमति या नात्याने भारतीयांच्या चिरंतन स्मरणात राहतील.
मानवाची मुक्ती हाच हेतू
अजोड ख्यातीच्या, ऑस्ट्रोव्हस्की या लेखकाचे एक पुस्तक आहे - हाऊ द स्टील वॉज टेम्पर्ड (How the Steel was Tempered) म्हणून. त्यातील एक उद्धरण नेहरूंना सर्वात जास्त आवडायचे. त्यांनी ते तोंडपाठ केले होते. ऑस्ट्रोव्हस्की म्हणतो, "माणसाजवळचा सर्वात प्रिय असा ठेवा म्हणजे त्याचे आयुष्य. त्याच्या वाट्याला ते एकदाच आलले असते, तेवढ्यापुरतेच जगायचे असते त्याला. म्हणून जगत असताना त्या आयुष्याला बुजऱ्या आणि बावळट भूतकाळाचा लज्जास्पद डाग लागणार नाही याची खबरदारी अवश्य घ्यावी, आपल्या जगण्याला काही हेतू नसतानाही आपण खूप वर्षे जगलो असा छळवाद करणारी बोचणी लागून राहणार नाही याची दक्षता त्याने घेतलीच पाहिजे. म्हणजे या जगाचा निरोप घेताना तो म्हणू शकेल, माझे सारे जीवन आणि माझी सारी शक्ती मी या जगातील आद्य हेतूकरता समर्पित केली -मानवाची मुक्ती हाच तो हेतू."
माझी अशी एक समजूत आहे, त्यांच्या निधनाच्या दिवशी, सकाळच्या प्रहरी, वरील उद्धरण त्यांच्या मनःचक्षुसमोर तरळले असावे, त्यांच्या अंतःकरणाला तो एक मोठा दिलासा मिळाला असावा. कदाचित, त्यामुळेच की काय मृत्युशय्येवर पहुडलेले जवाहरलाल नेहरू इतके प्रसन्न व शांतचित्त दिसत होते. या लोकोत्तर आणि लोभसवाण्या मानवाबद्दल असे म्हणता येईल "खरोखरच, त्याचे जीवन म्हणजे नियतीने स्वतःच्या हातांनी लिहिलेले एक महान महाकाव्यच होते!"
सामाजिक प्रश्नांचे व नेहरू चरित्राचे अभ्यासक
jetjagdish@gmail.com