पडद्यामागच्या घडामोडींचे जिवंत चित्रण जय भवानी! जय मराठी!

राजकीय कादंबरी हा प्रकार मराठीत तसा फार कमीच लिहिला गेला आहे. मराठी माणसाला राजकारणात अतीव रस असला तरी ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या प्रेमातून बाहेर पडत राजकीय कादंबऱ्यांकडे तो फारसा वळत नाही. शिवाय वर्तमानकालीन राजकीय वास्तवाचे कल्पित चित्रण करणारे लेखकही मराठीत मोजकेच आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे महेश केळुसकर यांचे.
पडद्यामागच्या घडामोडींचे जिवंत चित्रण जय भवानी! जय मराठी!
Published on

रसास्वाद

डॉ. अनंत देशमुख

राजकीय कादंबरी हा प्रकार मराठीत तसा फार कमीच लिहिला गेला आहे. मराठी माणसाला राजकारणात अतीव रस असला तरी ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या प्रेमातून बाहेर पडत राजकीय कादंबऱ्यांकडे तो फारसा वळत नाही. शिवाय वर्तमानकालीन राजकीय वास्तवाचे कल्पित चित्रण करणारे लेखकही मराठीत मोजकेच आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे महेश केळुसकर यांचे. त्यांची नवी कादंबरी महाराष्ट्रातील सद्यकालीन राजकारणाचा विस्तृत पट कवेत घेण्यात यशस्वी झाली आहे.

डॉ. महेश केळुसकर हे एक प्रतिभाशाली लेखक आणि कवी आहेत.‌ सभोवतालचे समकालीन वास्तव त्यांच्या संवेदनशील मनाला चटकन जाऊन भिडते आणि मग ते योग्य वेळी त्याला सृजनशील अभिव्यक्ती देतात.‌ समकालीन वास्तवाचे निरीक्षण करून, त्याला कलात्मक साहित्यकृतीत आविष्कृत करण्याची त्यांची आस विलक्षण आहे‌.

१९९० साली रत्नागिरीत ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ भरले होते. त्या संमेलनात कविता वाचण्याची संधी केळुसकरांना मिळाली.

“शरदाच्या चांदण्यात वसई मी न्हाते गं..

एक एक भूमिखंड सावकाश खाते गं..”

ही राजकीय कविता त्यावेळी त्यांनी वाचली आणि तिने प्रचंड खळबळ निर्माण केली. या कवितेचे पडसाद संमेलनावर पडले होते. तेव्हा प्रस्थापित समाज व्यवस्थेवर आसूड ओढण्याच्या कामाची आणि संकटं ओढवून घेण्याची केळुसकर यांची वृत्ती सुरुवातीपासूनच राहिली आहे. याच वृत्तीतून त्यांनी ‘यू कॅन ऑल्सो विन’ आणि ‘क्रमश:’ या कादंबऱ्या लिहिल्या. ‘जय भवानी जय मराठी’ ही त्यांची आताची बहुचर्चित ताजी राजकीय कादंबरी, त्यांच्या त्याच लेखकीय निर्भयतेची साक्ष देते.

अलीकडेच महाराष्ट्रात एक महत्त्वाचे राजकीय स्थित्यंतर झाले. मराठी माणसाच्या हितरक्षणार्थ स्थापन झालेला कडवा महत्त्वाचा राजकीय पक्ष फुटला. नाव आणि चिन्हही गेले. ही एक अशक्यप्राय आणि धक्कादायक वाटावी अशी घटना होती. या पक्षाची पाळंमुळं अतिशय मजबूत आणि घट्ट होती. पण काहीतरी अनपेक्षित झालं आणि फुटलेल्या गटाला घेऊन नवी राजवट आली. मूळ पक्ष आपणच आहोत असा दावाही फुटलेल्या गटाने केला. या सत्तांतरात गुप्तता, रहस्यमयता आणि नाट्यमयता होती. या विषयावर कादंबरी लेखन करणे हे एक अवघड काम होते.‌ तिथे चातुर्याची आणि साहसाची आवश्यकता होती. केळुसकरांनी ते काम केले.

कादंबरीत मुंबई ते गोहत्ती ते गोवा अशा विस्तृत पटलावर घडणाऱ्या लक्षणीय हालचाली नोंदवल्या जातात. काही खऱ्या, काही काल्पनिक. पक्षफूट प्रकरण रहस्यपूर्ण आणि नाट्यपूर्ण होत जाते.

या साऱ्या घटना उत्कंठावर्धक, कुतूहलजनक असल्या तरी त्यांना ललितसाहित्याच्या कोंदणात बसवणे तसे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हते. वास्तवातील घटनांना तर धक्का लावायचा नाही आणि अतिशय समंजसतेने आणि जबाबदारीने चित्रण करायचे ही खरेतर तारेवरील कसरत होती. कलावंत म्हणून एक प्रकारची तटस्थता आणि कल्पकता इथे महत्त्वाची होती. कादंबरीतल्या पात्रांचे वैयक्तिक जीवनातील व्यक्तींशी असलेले साधर्म्य शोधण्याची वाचकांना सवय असते.‌ अशावेळी लेखकाला आपल्या लेखणीला काबूत ठेवावे लागते. हे आव्हान डॉ. केळुसकर यांनी जाणीवपूर्वक स्वीकारल्याचे दिसते आणि त्यात त्यांना यश आल्याचे प्रत्ययाला येते.

या साऱ्या कालखंडातील बारीकसारीक घटना, त्यांच्याशी संबंधित असलेल्या लहानमोठ्या राजकीय व्यक्ती, त्यांच्या सूक्ष्मतर हालचाली, डावपेच आणि पवित्रे‌ हे तत्कालीन वृत्तपत्रांच्या पानांवरून, चित्रवाहिन्या आणि अन्य दृक्श्राव्य माध्यमांतून प्रत्यही आपल्या कानांवर, डोळ्यांवर आदळत होते. त्याचबरोबर आपापले बलाबल दाखवण्यासाठी सर्वच पक्षांनी काढलेले मोर्चे, केलेले राडे, घडवून आणलेल्या दंगली आणि सत्ता स्पर्धेसाठी चाललेल्या खटाटोपी सामान्य माणसांनाही कळत होत्या. स्वाभाविकच या विषयावर कादंबरी लिहिणे हे अधिक धाडसाचे आणि आव्हानात्मक होते. पण कादंबरीतील प्रत्येक प्रसंग जास्तीत जास्त वास्तवाला समांतर जाणारा, पण सर्जनाच्या पातळीवर उतरलेला आहे. हे करीत असताना प्रसंग, पात्रं आणि घटनानिर्मितीचे शक्य तितके स्वातंत्र्य त्यांनी घेतले आहे. त्या त्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचे व्यक्तिविशेष, लकबी, स्वभाव आणि भाषावैशिष्ट्य त्यांनी जबरदस्त ताकदीने टिपलेले आहेत. मानवी स्वभावाची त्यांनी केलेली वर्णनं तर लाजवाब. जणू काही डॉ. केळुसकर या राजकीय व्यक्तींच्या नित्य संपर्कात असावेत अशी वास्तवाभास निर्माण करणारी वर्णनं आहेत. उदाहरणार्थ - भैरवनाथने अघोरी शक्तीला थैली देऊन जादूटोणा करणे. यातून राजकारणी व्यक्तींवरील धार्मिकतेचा पगडा स्पष्ट होतो.

भैरवनाथ, दादासाहेब गडकरी, कौशल, सून अवंती, नातू मोहक, श्रीराम खरे, समरेंद्र सावंत, ॲडव्होकेट गवाणकर या मंडळींच्या सत्तेच्या पटावरील बौद्धिक हालचाली लेखक बारकाईने चित्रित करतो. प्रजा सेना, देशभक्त पक्ष, रयतवादी पक्ष आणि लोकसेवा पक्ष हे प्रमुख पक्ष. यांच्या राजकीय सत्तेची खेचाखेची हा एक आकर्षक विषय.

दादासाहेब गडकरी हे प्रजासेना पक्षाचे संस्थापक. त्यांचे कार्य अतुलनीय. पण आता ते भूतकाळात जमा झालेले. त्यांचा चिरंजीव कौशल. त्याला राजकारणात फारसा इंटरेस्ट नव्हता. दादासाहेबांचा नातू कोमल. तो आईच्या छायेत राजकारणाचे धडे घेतोय. अवंती ही दादासाहेबांची सून आणि कोमलची पत्नी. तिला राजकारणात विलक्षण रस. तिची मुख्यमंत्रीपदाची शक्ती वापरण्याची महत्त्वाकांक्षा विलक्षण कल्पकतेने केळुसकरांनी उघड केली आहे. तिच्या विविध भावावस्था चित्रित करणारी भाषणे डॉ.‌ केळुसकरांनी समर्थपणे रंगवली आहेत.

“प्रजा सेना ही दादासाहेब गडकरींनी मराठी माणसांच्या उत्थानासाठी स्थापन केलेली संघटना. आपल्यासारख्या हजारो प्रजासैनिकांच्या कष्टांमुळे, मेहनतीमुळे ही संघटना अजून टिकून आहे आणि पुढेही टिकून राहणार आहे. मराठी मनांचा, मावळ मातीचा, भक्तीच्या ऐलतीराचा आणि शक्तीच्या पैलतीराचा हा महाराष्ट्र. तो पुढे पुढे जात असताना दुश्मनांनी दिल्लीपुढे मुजरे करणारे हुजरे फोडले आणि डाव साधला. बेदिली, फसवणूक आणि गद्दारीने अवघ्या महाराष्ट्राचा चिखल केला. पण ह्या सगळ्यांना धडा शिकवण्याएवढी हिम्मत हजारो प्रजासैनिकांमध्ये आहे”, असा आशावाद अवंती व्यक्त करते. अवंती हे कादंबरीतील एक महत्त्वाचे पात्र. लेखकाने तिला मुख्यमंत्रीपदी बसवले आहे. तिच्या इच्छा, सत्ताकांक्षा यांना कादंबरीत अनन्य स्थान आहे.

डॉ. केळुसकर यांनी समकालीन राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या जीवनातील ऐवज आणि घटितांचा वापर अत्यंत चातुर्याने आणि संयतपणे कादंबरीत केला आहे.

भैरवनाथ हे एक तडफदार व्यक्तित्व. दादासाहेबांचे पक्के अनुयायी. त्यांच्या दोन लाडक्या मुलींचा तलावात पडून मृत्यू झाला. ते खचले. पण त्यांना दादासाहेबांनी आधार दिला. त्यावेळच्या प्रत्येक दिवसातील घटना लेखकाने जणू तो तिथे उपस्थित होता, अशा पद्धतीने लिहिल्या आहेत. इथे लेखकाच्या ठिकाणची लक्षणीय कल्पनाशक्ती प्रत्ययाला आल्याशिवाय राहात नाही.

कादंबरी १५५ पानांची आहे. ती २० जून २०२२ ला सुरू होते आणि २९ जून २०२२ला संपते. म्हणजे अवघ्या दहा दिवसांतील राजकीय घडामोडींचे एखाद्या चित्रपटासारखे धावते चित्रण ही कादंबरी करीत असली तरी तिला १९६० पासूनच्या महाराष्ट्रातील राजकीय घटनांची पार्श्वभूमी असल्याने त्या विस्तृत पटाशी संबंधित लहानमोठ्या ताकदीच्या माणसांच्या नोंदी आवर्जून येतात. त्यातून अर्थपूर्ण तपशील भरला जातो.

डॉ. केळुसकरांच्या सर्जनशीलतेचा एक आकर्षक भाग म्हणजे त्यांनी या राजकारणी व्यक्तींबरोबर निष्क्रिय बुद्धिवादी म्हणजे मतदान न करणाऱ्या इंटेलेक्चुअल वर्गाचे केलेले चित्रण. ते त्याविषयी अधिक भाष्य करीत नाहीत. वा स्पष्टीकरण देत नाहीत, पण जे आहे ते पुरेसे बोलके आहे. दादासाहेब गडकरी, अवंतीबाई, श्रीराम खरे, समरेंद्र सावंत यांनी केलेली निवेदनं, दिलेले बाइट‌्स, प्रवास डायरी, चॅनेलवरील बातम्या, मुलाखती, फेसबुक लाइव्ह यांची भाषा अभ्यासणे हा स्वतंत्र विषय आहे. या कादंबरीत भ्रष्ट समाजाच्या स्खलनशील वृत्तीचे दर्शन आहे. मंत्री अलका राजगडकर म्हणजे लेदर करन्सीच्या माध्यमातून राजकारणात महत्त्वाकांक्षी प्रगती करणाऱ्या महिलांची प्रतिनिधी आहे. या कादंबरीत बेकायदेशीर आर्थिक चलनवलनाचे उल्लेख येतात, पण लेखक त्यावर रेंगाळत नाही. त्याचा रोख चक्रव्यूहातील राजकीय व्यक्तींच्या लक्षणीय हालचाली टिपण्याकडे आणि वाचकांना त्यात गुंतवून ठेवण्याकडे आहे.

ही कादंबरी वाचताना वाचकाच्या मनात ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा?’ हा प्रश्न उपस्थित करण्यात लेखक यशस्वी झाला आहे.

ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक

logo
marathi.freepressjournal.in