

कथा
ईशान पुणेकर
जय, आजोबा आणि दोन खास नाणी यांची ही गोष्ट आहे जुन्या आठवणी, मैत्री आणि नव्या आनंदाची!
जय मजेत उड्या मारत पतंग आणायला चालला होता. तेही आजोबांना कळू न देता. त्याला पतंग उडवायला खूप आवडायचं, तर आजोबांना ते मुळीच आवडत नसे. ते त्याला त्यावरून रागवत असत.
नुकताच त्याचा पतंग गुल झाला होता. आता त्याला नवीन पतंग घ्यायचा होता. तिरंगी रंगाचा आणि खरदार लाल मांजा. त्यासाठी आईला लग्गा लावून त्याने पैसे मिळवले होते.
वाटेत एक चहाची टपरी होती. टपरीशेजारी एक वडाचं मोठं झाड होतं. जाताना त्याची नजर तिथे गेली आणि त्याला काहीतरी फडफडताना दिसलं. खोडामागे लपल्याने ते नीट दिसत नव्हतं. त्याला लगेच वाटलं की, तो पतंग आहे. सध्या त्याचं असं होतं- कुठलीही कागदवजा वस्तू हलताना दिसली की त्याला तो पतंग आहे असंच वाटायचं. तो झाडाजवळ गेला आणि त्याने तिथे थांबून पाहिलं. ती फडफडणारी वस्तू म्हणजे एक आयकार्ड होतं. गळ्यात घालायला निळ्या लेसची पट्टी असलेलं.
त्याने कुतूहलाने ते कार्ड उचललं. त्यावर ठळक अक्षरात नाणी संग्रह प्रदर्शन, शहीद राजगुरू विद्यालय असं लिहिलेलं होतं आणि त्याखाली नाव होतं आलोक. थोडक्यात तो जो कोणी आलोक होता त्याचं आयकार्ड तिथे पडलेलं होतं आणि ते जयला सापडलं होतं.
एक चौक सोडून शहीद राजगुरू विद्यालय होतं. त्या शाळेमध्ये नाण्यांचं प्रदर्शन भरलेलं होतं. दुर्मिळ नाण्यांचं. तिथे सुरुवातीलाच टेबल टाकून स्वयंसेवक बसलेले होते आणि त्यांच्याशी एक कुरळ्या केसांचा माणूस काही बोलत होता. तो स्वयंसेवकांना त्या आयकार्डबद्दलच विचारत होता. जय त्या काऊंटरच्या जवळ गेला आणि त्या माणसाला त्याचं आयकार्ड दिसलं. तोच आलोक होता. त्याने ते आयकार्ड घेतलं.
आलोक जयवर खुश झाला आणि म्हणाला, “थँक्स चल आतमध्ये. तुला नाणी दाखवतो.”
दोघेही आत गेले. आलोक एक नाणी संग्राहक होता. आतमध्ये त्याचा स्टॉल होता. त्याने जयला त्याची नाणी दाखवली. त्याचा संग्रह भारी होता. त्याच्याकडे खूप विविध प्रकारची नाणी होती. भारतीय, परदेशी, नवी-जुनी, ऐतिहासिक आणि शिवकालीनसुद्धा! त्याने जयला काही नाणी दाखवली आणि विचारलं, “ही नाणी तू पाहिली आहेस का?”
जयच्या आजोबांकडे काही नाणी होती खरी. जुनी जुनी. त्यांनी ती अशीच हौसेने जपून ठेवलेली होती. त्याने ती पाहिलीही होती. पण त्याला एवढं काही आठवत नव्हतं.
“नाही”, तो म्हणाला.
ते एक, दोन आणि पाच पैसे होते. त्यावर नया पैसा असं लिहिलेलं होतं. १९५७ साली नवी नाणी काढण्यात आली होती. दशमान पद्धतीवर आधारित. आधी भारतीय रुपया चौसष्ट पैशांचा असे. त्यावेळी तो शंभर पैशांचा करण्यात आला. लोकांना हा फरक कळण्यासाठी त्या नवीन नाण्यांवर ‘नया पैसा’ असं लिहिण्यात आलं. जुने लोक म्हणतात, एक नवा पैसा नाही माझ्याकडे. तोच हा नवा पैसा!
हे आलोकने त्याला समजावून सांगितलं आणि त्याला एक नवा पैसा भेट म्हणून दिला.
जय उड्या मारत घरी आला. कधी एकदा आजोबांना ते नाणं दाखवतो, असं त्याला झालं होतं. तो घरी आला आणि त्याने आजोबांना काय घडलं ते सगळं सांगितलं.
आजोबा म्हणाले, “भारीच की! मी काही नाणी संग्राहक नाही, पण मी काही जुनी नाणी अशीच जपून ठेवलेली आहेत. आपल्याकडे हे नवे पैसे आहेत, हे तुझ्या लक्षात नाही का?”
तेव्हा जयने डोळे मोठे केले, खजील होऊन.
मग आजोबा म्हणाले, “हरकत नाही. मी तुला एक नाणं देतो, ते तुझ्या त्या आलोकला दे. कदाचित त्याच्याकडे असेल नसेल…”
त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नाण्यांमध्ये काही सारखी नाणी जास्त प्रमाणात होती. त्यांनी त्यातलं एक नाणं काढून त्याला दिलं.
त्याचे आजोबा ऐंशीच्या घरात असले, तरीही एकदम उत्साही अन् जॉली होते.
जय पुन्हा उड्या मारत आलोककडे गेला. त्याने ते नाणं त्याला दिलं आणि काय आश्चर्य? तो एकदम खुश झाला. ते नाणं काही अति प्राचीन नव्हतं, तरी त्याच्यासाठी ते भारीच होतं. असं काय होतं त्या नाण्यामध्ये? तर भारतामध्ये १९८२ साली एशियाड गेम्स भरवण्यात आले होते. मोठ्या प्रमाणावर भरवलेली आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा. ज्याने भारताला मोठीच ओळख मिळाली. पहिल्यांदाच. जगाला भारताची क्षमता आणि प्रगती कळली. त्यानिमित्ताने ते नाणं काढण्यात आलं होतं. तरीसुद्धा विशेष असं काय होतं त्यामध्ये?
तर आलोकचे वडील त्यावेळी वयाच्या विशीत होते आणि त्यांनी त्या गेम्समध्ये पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. ते शेवटच्या फेरीपर्यंत काही पोहोचू शकले नाहीत; पण त्यांच्या त्या आठवणी मात्र कायमच जाग्या असायच्या. एखाद्या खऱ्या खेळाडूसारख्या. नंतर आलोकला कळलं त्या स्पर्धेनिमित्त नाणं काढण्यात आलेलं आहे. त्याला असं वाटायचं की, आपण एवढी नाणी जमवतो तर हे नाणं मिळवावं आणि वडिलांना ते गिफ्ट म्हणून द्यावं. पण ते काही त्याला मिळत नव्हतं. तितकं दुर्मिळ नसूनही आणि योगायोगाने ते जयने त्याला दिलं होतं. आता त्याची परतफेड तर व्हायलाच पाहिजे होती.
आलोक म्हणाला, “खास प्रसंगांसाठी सरकार विशेष नाणी काढतं. तुला हे नाणं कोणी दिलं?”
त्यावर जय म्हणाला, “माझ्या आजोबांनी.”
मग त्याने विचारलं, “माझ्या आजोबांचा जन्म १९४७ साली झालेला आहे, तर त्या वेळचं विशेष नाणं असेल का?”
त्यावर आलोक म्हणाला, “माहिती नाही.” मग त्याचे डोळे लकाकले. त्याला काही आठवलं. त्याने त्याची नाणी धुंडाळली आणि…
आलोकने त्याला आणखी एक नाणं दिलं! खास आजोबांसाठी. कसलं नाणं असावं ते?...
जय त्याला थँक्स म्हणाला आणि पळतच घरी निघाला. तो आजोबांकडे आला आणि त्याने ते आणखी एक नवीन नाणं आजोबांना दाखवलं. ते पाहताच आजोबांच्या डोळ्यांत पाणी आलं. काय होतं त्या नाण्यामध्ये असं विशेष? तर आजोबांचा जन्म १९४७ सालचा आणि १९७२ साली स्वातंत्र्य मिळून २५ वर्षं झाली होती. त्यानिमित्ताने भारत सरकारने एक विशेष नाणं काढलं होतं. स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवाची प्रतिमा दाखवणारं.
त्यावेळेस अर्थातच जयचे आजोबा २५ वर्षांचे होते. त्यानिमित्ताने त्यांनी एक नाटक बसवलं होतं. नाटकाचं नाव होतं- नेताजी पालकर. त्याचे आजोबा दिसायला एकदम रुबाबदार, म्हणून त्यांना शिवाजी महाराजांची भूमिका मिळाली होती आणि त्यांच्या मित्राने नेताजींची भूमिका केली होती. नाटकाचा विषय होता नेताजींचा पराक्रम, त्यांचं मुघल दरबाराची चाकरी पत्करणं आणि स्वराज्यात परत, असा तो नाटकाचा विषय होता.
नाटक मुख्यतः नेताजींवर होतं. त्यामुळे त्या भूमिकेला अनेक पदर होते. त्यामुळे मित्राने केलेली नेताजींची भूमिका लोकांना जास्त आवडली. ते नाटक बघण्यासाठी गावातल्या बँकेच्या मॅनेजरसाहेबांना बोलवण्यात आलं होतं. ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. नाटक संपल्यावर त्यांनी आजोबांच्या मित्राचं कौतुक केलं आणि सरकारने काढलेलं ते खास नाणं त्याला भेट म्हणून दिलं. त्यावेळच्या तरुण आजोबांना असं वाटलं की, आपण शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे तर ते नाणं आपल्यालाही मिळेल. पण ते त्यांना किंवा इतर कोणालाच मिळालं नाही. आजोबांच्या त्या अशा जुन्या आठवणी होत्या. स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव, त्यांनी केलेलं नाटक, शिवाजी महाराजांची केलेली भूमिका आणि ते न मिळालेलं गिफ्ट.
जे योगायोगाने आज त्यांना जय आणि आलोकच्या रूपाने मिळालं होतं. आजोबा एकदम जुन्या काळात हरवले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
ते म्हणाले, “त्या आलोकला भेटायला मला आवडेल आणि त्याचा नाणी संग्रहही बघतो.”
त्यांनी डोळ्यातलं पाणी पुसलं. त्यांना खूप आनंद झाला होता. ते मनाने तरुण झाले होते. ते जयला म्हणाले, “चल! आज माझ्याकडून तुला एक गिफ्ट!”
जयचे डोळे पुन्हा मोठे झाले, “काय आजोबा?”
“अरे, दोन-चार मोठे पतंग, एक नवीन आसारी आणि भरपूर मांजा. खास तुझ्यासाठी! चल आलोकला भेटून पुढे जाऊ या.”
बस! जयला अजून काय पाहिजे होतं? तो आजोबांना थँक्स म्हणाला आणि पुढे म्हणाला, “एक तिरंगी पतंग घेतो आणि बाकी इतर. आपण भारी मांजा घेऊ या, लाल रंगाचा. पण तो चायनीज
मांजा नको.”
“का रे? स्वातंत्र्याचा विषय निघाला म्हणून की
काय- एकदम स्वदेशी वगैरे?”
“आजोबा स्वदेशी तर खरंच, पण त्या मांजाने अपघात होतात, माणसांचेही आणि पक्ष्यांचेही.”
आजोबा म्हणाले, “बरोबर. दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत आणि ऐक, आज टेरेसवर मीही येणार पतंग उडवायला!”
त्यावर जयने, काय हे? अशा अर्थाने डोळे उडवले.
आजोबा लहान झाले होते, नवीन झाले होते. जणू नवे पैसे तसे नवे आजोबा!
ज्येष्ठ साहित्यिक
Bip499@hotmail.com