भारतातील विज्ञानाला दिशा देणारा एक विलक्षण शास्त्रज्ञ

शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी पुण्यात 'आयुका' या खगोलशास्त्र संस्थेची स्थापना करून भारतीय विज्ञानाला जागतिक स्तरावर नेले. त्यांनी संस्थेच्या इमारतींसह वैज्ञानिक कार्यपद्धतीत सौंदर्य व शिस्त आणली. त्यांच्या दूरदृष्टीने 'आयुका' आघाडीची संस्था बनली. त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर यांचाही संस्थेच्या विकासात मोलाचा वाटा होता. नारळीकर अत्यंत विनम्र, सुसंस्कृत, कुशल प्रशासक होते.
भारतातील विज्ञानाला दिशा देणारा एक विलक्षण शास्त्रज्ञ
Published on

विशेष

रोहिणी भट-साहनी

शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी पुण्यात 'आयुका' या खगोलशास्त्र संस्थेची स्थापना करून भारतीय विज्ञानाला जागतिक स्तरावर नेले. त्यांनी संस्थेच्या इमारतींसह वैज्ञानिक कार्यपद्धतीत सौंदर्य व शिस्त आणली. त्यांच्या दूरदृष्टीने 'आयुका' आघाडीची संस्था बनली. त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर यांचाही संस्थेच्या विकासात मोलाचा वाटा होता. नारळीकर अत्यंत विनम्र, सुसंस्कृत, कुशल प्रशासक होते. त्यांनी विज्ञानसंशोधनासोबत मराठीत लेखनही केलं आणि अनेक सन्मान प्राप्त केले.

मी आणि माझं कुटुंब तेव्हा कॅनडामधील टोरोंटो शहरात राहत होतो. १९९० सालच्या फेब्रुवारी महिन्यात एक दिवस प्रोफेसर जयंत नारळीकर आमच्या घरी जेवायला आले. माझे पती वरुण साहनी- स्वतः एक खगोलशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांची प्रोफेसर नारळीकरांशी आधीपासूनच चांगली ओळख होती. प्रोफेसर नारळीकर आम्हाला म्हणाले की, ते पुण्यात- पुणे विद्यापीठाच्या आवारात एक नवीन ॲस्ट्रोनॉमीची (खगोलशास्त्राची) इन्स्टिट्यूट सुरू करत आहेत. “इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स” (IUCAA) - आयुका नावाची. त्या इन्स्टिट्यूटला सायंटिस्ट म्हणून वरुणला जॉईन होशील का म्हणून ते विचारत होते. ते म्हणाले, ही इन्स्टिट्यूट नवीन आहे, पण लवकरच तिचा विस्तार होईल आणि ती भारतातली एक टॉपची इन्स्टिट्यूट होईल. वरुण त्यांना म्हणाला, “मी विचार करतो,” आणि लवकरच त्याने प्रोफेसर नारळीकरांना की तो जॉईन होईल, असं कळवलं सुद्धा.

आलो आम्ही पुण्याला आणि राहायला लागलो प्रोफेसर नारळीकरांच्या घराच्या जवळच्या एका घरात, १९९१ साली. ही इन्स्टिट्यूट स्थापन करायला घेतली तेव्हा प्रोफेसर नारळीकर पन्नाशीच्या घरात होते. पण त्यांची ऊर्जा एखाद्या तरुणासारखी होती. आपल्या देशात एक जागतिक स्तरावरील रिसर्च इन्स्टिट्यूट निर्माण करायचा त्यांचा उत्साह इतका विलक्षण होता की ती इन्स्टिट्यूट जॉईन केलेला प्रत्येक माणूस- मग तो सायंटिस्ट असो की अ‍ॅडमिन असो की चहा आणणारा असो... सगळ्यांच्या अंगात एक नवीनच स्फूर्ती मी स्वतः डोळ्यांनी पाहिली आहे.

आपल्याकडे साधारणपणे युनिव्हर्सिटीच्या... इन्स्टिट्यूटच्या इमारती आणि सगळंच कॅम्पस हे ‘ऑर्डिनरी’ दिसणारं असतं. त्यात कधी एक ‘सौंदर्याचा दृष्टिकोन’ कुणी घालताना मी कमी पाहिलाय. प्रोफेसर नारळीकरांच्या मनातल्या आयुकाचं मात्र तसं नव्हतं. नारळीकरांनी आपल्या देशातल्या सगळ्यात कुशल आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांना सगळ्या इन्स्टिट्यूट आणि सगळ्या घरांची संरचना करायला पाचारण केलं होतं. इतकी सुंदर आणि बोजडपणा नसलेली, हलकी-फुलकी, हवेशीर ऑफिसं आणि घरं मी तरी फार क्वचितच पाहिली आहेत- विशेषतः सरकारी बांधकाम केलेली घरं आणि ऑफिसं.

पण नुसत्या इमारती सुंदर होत्या एवढ्यावर प्रोफेसर नारळीकर थांबले नाहीत. त्या इमारतींत संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांची लेव्हलही तितक्याच उंचीची होती. नारळीकरांच्या दृष्टीची झेप इतकी उत्तुंग होती की त्यांनी निवडून अत्यंत उत्तम सायंटिस्ट आपल्या देशातून आणि परदेशातून आयुकात कामाला बोलावले होते. मी आयुकाच्या प्रगतीचा आलेख, तिथे जवळजवळ तीस वर्षं राहून, माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे. आज ती इन्स्टिट्यूट भारतातच नव्हे तर जगभरात टॉपची खगोलशास्त्रीय इन्स्टिट्यूट म्हणून नावाजली जाते आहे.

प्रोफेसर नारळीकरांच्या बरोबरीनेच त्यांची पत्नी- डॉक्टर मंगला नारळीकर यांचाही आयुकाच्या रचनेत मोठा वाटा आहे. त्या स्वतः गणित या विषयात पीएच.डी. झालेल्या एक विदुषी होत्या. परंतु त्या दोघांची- प्रोफेसर नारळीकर आणि मंगला यांची वागणूक एका प्रेमळ, अगत्यशील जोडप्याची होती. इतके साधे आणि सरळ... कुठलाच बडेजाव नाही. एक दिवस वरुणला थंडी आणि ताप आला होता... तेव्हा मंगला स्वतः त्याच्यासाठी आल्याचा काढा करून घेऊन आल्या. इतकं अगत्य मी जगाच्या पाठीवर कुठेच पाहिलं नाही.

भारतातल्या युनिव्हर्सिट्या मी स्वतः जवळून पाहिल्या आहेत. सुरुवातीच्या काळात त्या चांगल्या चालतात. पण हळूहळू त्यात पॉलिटिक्स... आपसातली भांडणं... असूया असं सुरू होतं आणि त्या युनिव्हर्सिटीचा किंवा इन्स्टिट्यूटचा ऱ्हास व्हायला लागतो. मी पाहिलं... आयुकात असं अजिबात झालं नाही. ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय प्रोफेसर नारळीकरांच्या दूरदृष्टीला जातं.

प्रोफेसर नारळीकरांनी अगदी सुरुवातीपासूनच त्या इन्स्टिट्यूटमध्ये अतिशय शिस्तशीर आणि दूरगामी सिस्टिम्स सुरू केल्या. आयुकामध्ये कितीतरी अ‍ॅक्टिव्हिटीज होत असत. त्या इन्स्टिट्यूटमधल्या वैज्ञानिकांनी केलेलं संशोधन ही अर्थात सर्वात महत्त्वाची अ‍ॅक्टिव्हिटी. तीही जोरात चालू असतानाच आयुका भारतभरच्या विद्यापीठांना त्यात सामावून घेण्याचं... त्यांना हवं ते मार्गदर्शन आणि संशोधन सहाय्य करण्याचं काम करत असे. आयुकाने अगदी शाळकरी मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी एक सायन्स पॉप्युलरायझेशन सेंटर निर्माण केलं होतं. त्यात अक्षरशः हजारो शाळकरी विद्यार्थी येऊन शिकून जात असत. जागतिक स्तरावरील कॉन्फरन्सेस तिथे होत असत... हे सगळं अतिशय बिनबोभाट... कोणताही गोंधळ न होता व्यवस्थित पार पडत असे. एक जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक असूनसुद्धा ते एक अतिशय कुशल अ‍ॅडमिनिस्ट्रेटर- संचालक होते. तेही नेहमी हसरे आणि आपुलकीने वागणारे. त्यांनी विज्ञानात संशोधन तर केलंच, पण मराठीत विज्ञानावरची अनेक पुस्तकं लिहिली. “तुम्हाला कधी हो मिळतो वेळ इतकं लिहायला?” असं मी जेव्हा त्यांना विचारलं... तेव्हा ते म्हणाले, “मला बराच प्रवास करावा लागतो... त्यावेळी, विमानतळावर नाहीतर विमानात बसलेलं असताना मी हे लिहितो.”

देशभरातून विद्यार्थी आणि वेगवेगळ्या युनिव्हर्सिट्यांतील प्राध्यापक, रिसर्चर्स हे आयुकात काही काळ घालवत असत. आयुका जागतिक स्तरावरील सायंटिस्ट‌्सना भेट द्यायला बोलावत असे. कितीतरी नोबेल विजेते आयुकाला भेट द्यायला आले आहेत... दरवर्षी २८ फेब्रुवारीला साजरा केला जाणारा सायन्स डे आयुका इतक्या उत्साहाने साजरा करत असे... आजही करते... हजारोंच्या संख्येने शाळकरी मुलं आयुकात त्या दिवशी येतात आणि खगोलशास्त्राचा आनंद अनुभवतात.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट प्रोफेसर नारळीकरांविषयी सांगितल्याशिवाय राहवत नाही. ज्या दिवशी प्रोफेसर नारळीकर रिटायर झाले, त्या दिवशी ते आयुका सोडून गेले. ते आयुकाचे फाऊंडिंग डायरेक्टर आणि त्यानंतर एमेरिटस प्रोफेसर होते. पण त्यांनी आपली पोझिशन स्वतःसाठी वापरली नाही.

इतका विद्वान... इतका मोठा माणूस आणि इतका साधा. कोणताच बडेजाव नसलेला. अतिशय सुसंस्कृत कुटुंबातून आलेला. त्यांचे वडील प्रोफेसर विष्णू नारळीकर हे बनारस हिंदू विद्यापीठात गणित आणि विज्ञानाचे मोठे प्राध्यापक होते, त्यांची आई संस्कृत भाषेची तज्ज्ञ होती. स्वतः नारळीकर केम्ब्रिज विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलेले. १९६३ साली त्यांनी त्या विद्यापीठातून डॉक्टरेट केली. १९७२ साली ते मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत झाले आणि त्यानंतर १९८८ साली त्यांनी आयुका या इन्स्टिट्यूटची स्थापना केली.

त्यांना १९६५ साली, म्हणजे त्यांनी वयाची तिशी गाठायच्या आधीच, भारत सरकारने पद्मभूषण हे अवॉर्ड दिलं आणि २००४ साली पद्मविभूषण हे अवॉर्ड जाहीर केलं होतं. भारताचा वैज्ञानिकांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार - शांतीस्वरूप भटनागर अवॉर्डही त्यांना दिला गेला होता.

काही महिन्यांपूर्वी मी आणि वरुण त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. ते थोडे आजारी होते, पण चेहरा तरतरीत होता. गंमत म्हणून वरुणने त्यांना पत्त्यांची एक जादू करून दाखवली. ती पाहून “तू हे कसं केलंस?” असं म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावरचं लहान मुलासारखं ते हास्य अजूनही माझ्या मनात आहे. त्यांच्यासारख्या मोठ्या माणसाची मैत्री आणि सहवास आम्हाला लाभला यासाठी खरंच परमेश्वराचे आभार मानायला हवेत. परमेश्वर त्यांच्या अनमोल आत्म्याला शांती देवो ही प्रार्थना.

अर्थशास्त्राच्या निवृत्त अध्यापक

logo
marathi.freepressjournal.in