

दुसरी बाजू
प्रकाश सावंत
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीने देशातील वातावरण भारलेले असतानाच्या काळात मुंबईतील श्रीमंत घरात वाढलेली एक तरुणी आपले ऐषोआरामी जीवन मागे सोडून दुष्काळाने हवालदिल झालेल्या व दारिद्र्याने पिचलेल्या साताऱ्याच्या माण तालुक्यात जाते. कडाक्याच्या उन्हातान्हात रस्ते तयार करणाऱ्या, दगड फोडून घाम गाळणाऱ्या कष्टकरी महिलांच्या वेदना पाहून तिचे मन द्रवते. मग ती ‘माण’लाच आपली कर्मभूमी मानून तेथील ग्रामीण महिलांच्या जीवनातील गरिबीचा अंध:कार दूर करते व त्यांना समृद्धीचा यशोमार्ग दाखवते. ध्येयवेडाने झपाटल्यागत समाजकार्याला वाहून घेतलेल्या या जननायिका आहेत राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या चेतना गाला सिन्हा.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जननायिका चेतना गाला सिन्हा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्या आपुलकीच्या भावनेतून आत्मियतेने बोलत होत्या. त्यांची साधी राहणी, उच्च विचारसरणी, गरीबांच्या उद्धाराचा ध्यास त्यांच्या बोलण्यातून पदोपदी जाणवत होता. त्यातूनच त्यांच्या आभाळाएवढ्या उत्तुंग सामाजिक कार्याची ओळख पटत गेली. त्यांच्याशी मराठीतून झालेला हा मुक्तसंवाद नवचैतन्य, नवप्रेरणा व मनस्वी आनंद देणारा ठरला...
चेतना गाला सिन्हा सांगत होत्या, त्यांचे आजोबा गुजरातच्या कच्छमधून मुंबईत आले. त्यांची अन्नधान्याची दुकाने, कोठारे होती व ती आजही आहेत. त्यांच्या वडिलांचा जन्म मुंबईचा. त्यांचा स्वत:चा जन्मसुद्धा मुंबईच्या नळ बाजारातला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’शी त्यांचा संपर्क आला. संघर्ष वाहिनीच्या आंदोलनात त्यांनी स्वत:ला झोकून देऊन काम केले. नोकरीच्या शोधार्थ गावाकडून येऊन मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये स्थिरावलेल्या गोरगरीब जनतेचे खडतर जीवन जवळून अनुभवले. त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी काम केले. त्याचवेळी ‘खेड्याकडे चला’ या चळवळीने जोर धरला होता. अनेक तरुण-तरुणी ग्रामीण भागातील दुष्काळाच्या झळा बसलेल्या जनतेच्या मदतीसाठी धावत होत्या. माझा सहकारी मित्र विजय सिन्हा हासुद्धा माणमधील दुष्काळग्रस्तांच्या न्यायहक्कासाठी आंदोलने करीत होता. स्थानिकांना सरकारी रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध व्हावीत, त्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या मजुरीचे दर वाढावेत यासाठी त्याने रस्त्यावर उतरून आंदोलने केली. त्यातून अडीच रुपयांचा मजुरी दर पुढे हळूहळू वाढत गेला.
दरम्यानच्या कालावधीत चेतना गाला यासुद्धा १९८१मध्ये ‘माण’मध्ये आल्या. त्यांना तेथील दुष्काळाची धग जाणवली. ४५ अंश सेल्सिअस तापमानात कष्टकरी महिलावर्ग रोजगार हमी योजनेवरील कामाचा भाग म्हणून दगड फोडत होता. रस्ता करीत होता. ते दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. त्या मनोमन व्यथित झाल्या. माण भागात स्थानिकांना रोजगाराची संधी नव्हती. त्यांच्यापुढे स्थलांतर हाच पर्याय होता. तेव्हा स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक होते. या दुष्काळग्रस्तांचे जीवनमान उंचावण्यासाठी काहीतरी करायला हवे या जिद्दीतून त्यांनी ‘माण’लाच आपली कर्मभूमी मानले. मित्र विजय सिन्हा याला त्या मदत करीत होत्या. पुढे मैत्रीचे रूपांतर उभयतांच्या विवाहात झाले. मुंबई शहरातील सोयीसुविधा, सुरक्षितता आणि ऐषोआरामाचे आयुष्य मागे सोडून त्यांनी अवघड, अनिश्चित आणि संघर्षमय जीवनाचा मार्ग निवडला होता. या मार्गात काटे खूप होते, परंतु त्यावर त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर मोठ्या जिद्दीने मात केली.
पहिली ग्रामीण महिला बँक
स्थानिक बँका गरीब महिलांची अल्प बचतीसाठीची साधी खातीसुद्धा उघडायला तयार नव्हत्या. हे विदारक चित्र पाहून अस्वस्थ झालेल्या चेतनाताईंनी रिझर्व्ह बँकेकडे धाव घेऊन कष्टकरी महिलांसाठी बँक सुरू करण्याच्या परवान्याची मागणी केली. तुमच्या महिलांना लिहिता-वाचता येत नाही, मग तुम्ही बँक कशी चालवणार? आकडेमोड कशी करणार? असा सवाल रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना विचारला. या प्रकाराने खचून न जाता त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढली. महिलांसाठी प्राथमिक शिक्षणाचे वर्ग सुरू केले. त्यानंतर त्यांनी पुन्हा रिझर्व्ह बँकेकडे अर्ज केला. बँकेने कष्टकरी व निरक्षर महिला वर्गाची परीक्षा घेण्याचे ठरविले. १५ महिलांनी हे आव्हान स्वीकारले. या परीक्षेला एकीकडे या महिला, तर दुसरीकडे बँक अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक प्रश्नाची अचूक उत्तरे अधिकाऱ्यांआधीच महिलावर्ग देत होता. ‘आम्हाला लिहिता, वाचता येत नसले, तरी आम्हाला मोजता येते’ हा आत्मविश्वास आणि जिद्द पाहून अधिकारी वर्ग अवाक् झाला. त्यानंतर तब्बल ५ महिन्यांनी रिझर्व्ह बँकेतून ट्रंककॉल आला. रिझर्व्ह बँकेचा निरोप होता, आम्ही तुमच्या पहिल्या ग्रामीण माणदेशी महिला सहकारी बँकेला परवाना दिला असून तो पोस्टाने आपल्याकडे पाठवला आहे. केवढा आनंदाचा क्षण? म्हसवडमधील माणदेशी महिला सहकारी बँकेचे ९ ऑगस्ट १९९७ रोजी उद्घाटन झाले. प्रारंभी या बँकेत १२०० महिलांनी बचत खाते उघडले होते. पुढे सात ते आठ हजार महिला खातेधारक बनल्या. आजवर या बँकेने १ लाख ७० हजार महिलांना कर्ज देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचा मार्ग दाखविला आहे. बँकेच्या ८ शाखा असून त्यात ७८ महिला कर्मचारी कार्यरत आहेत. ज्या महिलांच्या नावावर संपत्ती आहे अशा महिलांना कर्जावरील व्याजावर दोन टक्क्यांची सवलत दिली जात आहे. ज्या महिलांना कधी संधी मिळाली नव्हती अशा महिला व्हिजिटिंग बँकिंग करून अर्थार्जन करत आहेत हे विशेष. त्यातून आर्थिक स्वावलंबनासोबतच मानसन्मान, प्रतिष्ठा वाढून महिलांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
माती परीक्षण सखी
माणमधील दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनने माण नदीसह आसपासच्या ओढ्यांवर तब्बल २३ बंधारे बांधून ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’चा प्रयोग यशस्वी राबविला. याशिवाय, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी महिलांना माती परीक्षणाचे धडे दिले. त्यातून माती परीक्षण सखी तयार झाल्या. त्या शेतकऱ्यांना कोणत्या भागात कोणते पीक घ्यायचे याविषयी मार्गदर्शन करीत आहेत. शिवार फुलवत आहेत. शेतकऱ्यांच्या समृद्धीला हातभार लावत आहेत. शेतकऱ्यांच्या संसाराला आणि काय हवे?
क्रीडा अकादमी
आम्ही म्हसवडमध्ये माणदेशी क्रीडा अकादमी सुरू केली असून त्याचे उद्घाटन भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी केले आहे. एका ऊसतोड कामगाराची मुलगी काजल आटपाडकर हिने आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यात आपली चमक दाखवली, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. सात हजार मुलांच्या जडणघडणीचे काम या अकादमीत होत आहे. ‘लहान मुलांना खेळून घाम यायला हवा तेव्हाच देशाचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल होईल,’ हा विचार चेतनाताईंनी कृतीत उतरविलाय.
माणदेशी फाऊंडेशनची स्थापना
माणमधील महिलांना आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखविण्याच्या उद्देशाने चेतना गाला सिन्हा यांनी जानेवारी १९९६ मध्ये माणदेशी फाऊंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून पंचायत राज प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. फाऊंडेशन अंतर्गत २००७ पासून माणदेशी उद्योग केंद्र स्थापन केले. खाद्यपदार्थ, मसाले, वस्त्रप्रावरणे, फॅशन डिझाईनच नव्हे, तर पुरुषांचे वर्चस्व असलेल्या उद्योगातही महिला पुढे गेल्या. त्यांनी मशीनमार्फत पेपरप्लेट, पुठ्ठ्याचे बॉक्स निर्मिती सुरू केली. पुढच्या टप्प्यात या महिलांना पॅकेजिंग, लेबलिंग, ब्रँडिंगसोबतच टेक्स्टाईल युनिट, इन्स्टिट्यूट चालवण्याचे प्रशिक्षण देणे सुरू झाले. अनेक महिलांनी लहान-मोठे उद्योग सुरू केले. त्यातून जवळपास १० लाख महिला स्वावलंबी झाल्या. त्यांच्यापैकी ४० टक्के महिलांनी आणखी १५ लाख महिलांना स्वावलंबनाचे धडे दिले. अशा प्रकारे फाऊंडेशनच्या कार्याचा विस्तार होत गेला. त्यामुळे महिलांचे केवळ आरोग्य, शिक्षण सुधारले नाही, तर स्थानिक भागाचीसुद्धा अर्थव्यवस्था बळकट झाली. माणदेशी फाऊंडेशन केवळ महिलांना प्रशिक्षण देऊन थांबले नाही, तर त्यांचा उद्योग, व्यवसाय कसा वाढेल याकडेही त्यांनी कटाक्षाने लक्ष पुरविले. लायसन्स, ब्रँड, ट्रेडमार्क, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्ट, मार्केटिंग यासारख्या सोयीसुविधा पुरवून त्यांच्या विकासाला नवी दिशा दिली. माणदेशी फाऊंडेशनच्या १४ शाखांमध्ये जवळपास ४०० महिला कार्यरत आहेत. हा महिला वर्ग प्रत्येक महिलेची तिच्या आर्थिक क्षमतेनुसार प्रगती करण्यासाठी झटत आहे. डिजिटल बँकिंग, ई-कॉमर्सवर आपला ऑनलाइन बिझनेस करीत आहेत. मोठे उद्योग करणाऱ्या महिलांना अत्याधुनिक ऑटोमॅटिक मशीन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पन्नवाढीला हातभार लावत आहेत.
अभिमानास्पद काम कोणते?
दुष्काळी माण तालुक्याचे भाग्य बदलण्यासाठी मागील २७ वर्षांपासून अहोरात्र कष्ट करणाऱ्या चेतना गाला सिन्हा यांना आपल्या आयुष्यातील सर्वात आवडलेले काम कोणते याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, राज्यातील पहिली ग्रामीण महिला सहकारी बँक स्थापन केली. माणदेशी फाऊंडेशन स्थापन केले. त्यातून नवनव्या महिला उद्योजक तयार केल्या. दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू केल्या. माती प्रशिक्षण परीक्षण सखींना घडविले. मागे वळून पाहताना याबद्दल मनस्वी समाधानाची भावना आहे.
आयुष्यातील खंत कोणती?
आयुष्यातील खंत कोणती याविषयी आपले मनोगत मांडताना त्या म्हणाल्या की, अजूनही महिलांच्या नावे मालमत्ता होत नाही. शेतकरी श्रीमंत होत नाहीत. त्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळत नाही. ‘ज्या देशात शेतकरी सुखी नाही तो देश सुखी होऊ शकत नाही.’
जीवनातील आनंदाचा क्षण कोणता?
आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता याविषयी त्या म्हणाल्या की, ज्यांनी आपल्या प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेतले त्या वनिता पिसे यांना पंतप्रधानांच्या हस्ते गौरविण्यात आले, तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. रेडिओ जॉकी केराबाई सरगर यांना महाराष्ट्र शासनाचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार मिळाला तेव्हासुद्धा मला खूप आनंद झाला. दावोसमध्ये ‘वर्ल्ड इकाॅनॉमिक फोरम’च्या बैठकीत सहअध्यक्ष म्हणून काम करायला मिळाले. २०१८मध्ये मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा जीवनाचे सार्थक झाल्याचे भाव मनी उमटले.
सरकारने काय करायला हवे?
राज्य व केंद्र सरकारकडून काय अपेक्षा आहेत यावर त्या म्हणाल्या की, ग्रामीण भागात महिलांना बचत करण्याची संधी उपलब्ध व्हायला हवी. शेतमालाला भाव मिळायला हवा. कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान खेडोपाडी पोहोचण्याची व्यवस्था व्हायला हवी.
धाडस हेच मुख्य भांडवल!
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपले विचार मांडताना त्या म्हणाल्या की, यंदाची संकल्पना म्हणजे ‘द्या व मिळवा’ अशी आहे. यंदाचे महिला शेतकरी वर्षसुद्धा आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी नारीशक्तीचा, त्यांच्या नेतृत्वाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. धाडस हेच महिलांचे मुख्य भांडवल आहे. त्यातूनच त्या आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर गगनभराऱ्या घेऊ शकतील. गरीबांना कधीही गरिबीचा तोडगा न देता, त्यांना श्रीमंतीचा, समृद्धीचा मार्ग दाखवायला हवा, हेच त्यांचे म्हणणे आहे. चेतनाताईंचा मागील तीन दशकांचा जीवन प्रवास लाखो ग्रामीण महिलांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरला आहे. या जननायिकेची यशोगाधा हेच सांगतेय, ‘संघर्ष कितीही मोठा असला, तरी जिद्द आणि ध्येय स्पष्ट असेल, तर त्यात यश नक्की मिळते.’
चारा छावण्या : राज्यात २०१२ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हा जनावरांचे चारा-पाण्याअभावी हाल होत होते. शेतकऱ्यांवर आपली जनावरे विकण्याची वेळ आली होती. तेव्हा माणदेशी फाऊंडेशनने चारा छावण्या सुरू केल्या. तिथे १४ हजार जनावरे आणि ५००० शेतकरी होते. दुष्काळ लांबल्याने त्या चारा छावण्या तब्बल १८ महिने सुरू होत्या. या छावण्या जनावरांना नवसंजीवनी देऊन शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद जागवत होत्या.
९ फिरती कौशल्यविकास केंद्रे
दुर्गम खेड्यातील गोरगरीब महिला म्हसवडमध्ये येऊ शकत नव्हत्या. म्हणून माणदेशी फाऊंडेशनने ९ बसेसच्या माध्यमातून मसालेनिर्मिती, ब्युटी पार्लर व अन्य लघु उद्योगांचे प्रशिक्षण देण्यासाठी फिरती कौशल्यविकास प्रशिक्षण केंद्रे सुरू केली. या बसमध्ये दोन ते तीन प्रशिक्षक असून ते दुर्गम भागातील महिलांना कौशल्याआधारित प्रशिक्षण देत आहेत. २००९ पासून हा उपक्रम यशस्वीपणे सुरू आहे.
रेडिओ केंद्र
माणदेशी फाऊंडेशन व माणदेशी महिला सहकारी बँक हातात हात घालून कार्यरत आहेत. त्यांनी महिलांची यशोगाथा तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने एक रेडिओ केंद्र सुरू केले असून ते दिवसाचे जवळपास नऊ तास कार्यरत असते. या केंद्रावरून अशिक्षित महिला आपल्या संस्कृती परंपरा सांगतात. त्यांचे विचार व कार्य पाहून लोक अचंबित होतात. रेडिओ जॉकी केराबाई सरगर या जात्यावरची गाणी म्हणून माणदेशी लोकसंस्कृतीचे दर्शन घडवत आहेत. प्रगती म्हणजे आणखी दुसरे काय असते?
prakashrsawant@gmail.com