
विशेष
महेश केळुस्कर
जयवंत दळवी हे नाव उच्चारलं की, त्यांचं साहित्य आणि त्यांचं मासेप्रेम आठवतं. आजच्या शाकाहार-मांसाहारच्या वादात त्यांनी मत्स्यप्रेमींची बाजू हिरिरीने मांडली असती. कोणालाही न घाबरता. कारण त्यांच्यासाठी सर्व प्रकारचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचं होतं. म्हणूनच “आम्ही सोबत आहोत, माफी मागायची नाही” असा दिलासा ते नवोदित कवीला देऊ शकले. जयवंत दळवींच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत असताना आठवणीतले दळवी निर्भय होण्याचाच सांगावा देत आहेत.
जयवंत दळवी सरांचा आणि माझा पत्रव्यवहार नेमका कधी सुरू झाला, हे आता आठवत नाही. पण १९८२ ते १९९० च्या दरम्यान मी रत्नागिरीला आकाशवाणीवर काम करत असताना त्यांची मला आलेली आंतर्देशीय पत्रं आठवतात. अनेक दिवस ती पत्रं मी जपून ठेवली होती. पण मुंबईतील बिऱ्हाडांच्या हलवा-हलवीमध्ये कुठेतरी ती मध्येच गहाळ झाली.
‘१३/ विकास, भवानी शंकर रोड, दादर, मुंबई २८’, हा जयवंत दळवींचा पत्ता होता. ‘दशावतार-चित्रकथी-लळित’ या विषयावर माझा पीएचडीचा अभ्यास सुरू होता तेव्हा रत्नागिरीहून मी रजा टाकून मुंबईला यायचो आणि कधी चार दिवस, तर कधी आठवडाभर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अतिथीगृहात थांबायचो. या दौऱ्यात एकदा तरी दळवी सरांच्या दादरच्या घरी जायचोच. उमाकाकी बाहेर गेलेल्या असल्या तर दळवी सर स्वतः चहा करायचे आणि मग जवळजवळ तासभर आम्ही गावगोष्टी करायचो. समोरचा माणूस काहीतरी थापा मारतोय असा त्यांना संशय आला तर ते मध्येच एकदम गप्प व्हायचे आणि आपल्या निळ्या घाऱ्या भेदक डोळ्यांमधून रोखून बघत राहायचे. तेवढा सिग्नल पुन्हा लायनीवर यायला पुरेसा असायचा.
रत्नागिरीला असताना ‘पुरुष’ नाटक बघितल्यावर मी दळवी सरांना पत्र टाकलं की, एवढ्या वास्तववादी नाटकात ‘बंडा’सारखं पात्र (अप्रत्यक्ष का होईना पण) आणण्याचं कारण काय? तर त्यांचं उत्तर आलं की ‘बंडा’ हे लेखकाचं आणि प्रत्येक प्रेक्षकाचं wishful thinking (मनोराज्य) आहे. अंबिकासारख्या स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या गुलाबरावांसारख्या माजोरड्या सत्ताधीशांना धडा शिकवायचा असेल तर त्यांचा लिंगविच्छेदच करायला हवा, असं म्हणणारे अनेक प्रेक्षक नंतर दळवींना भेटले असल्याचं त्यांनी कळवलं. दळवी सरांच्या अनेक पुस्तकांवर, नाटकांवर, सिनेमा आणि मालिकांवर मी माझ्या पद्धतीने माझा जो काय असेल तो अभिप्राय थेट कळवत असे. काही वेळा त्यांच्याशी मतभेद व्यक्त करत असे. पण त्यांनी माझ्यासारख्या त्यावेळी कुणीही नसलेल्या लहान माणसाशी दरवेळी मोठ्या मनाने, मोकळेपणाने संवाद केला, चर्चा केल्या. या चर्चांनी माझा आत्मविश्वास वाढवला.
माझ्या मराठी आणि मालवणी कवितांविषयी दळवी सरांना मनापासून आस्था आणि उत्सुकता होती. मालवणला झालेल्या मालवणी संमेलनात वामन पंडितने माझी ‘सुमला लय मगो आकडाक लागला’ ही कविता प्रभावीपणे वाचल्याचे दळवींनी मला पत्र पाठवून कळवले. या संमेलनाला मी जाऊ शकलो नव्हतो. नंतर ‘झिनझिनाट’ही कविता ‘दीपावली’च्या १९८८ च्या दिवाळी अंकासाठी मागवून घेऊन, कोठावळेना ती छापायला सांगितली. पुढे दळवी सरांच्या आग्रहामुळेच ‘मॅजेस्टिक’ प्रकाशनने ‘झिनझिनाट’ हा संपूर्ण मालवणी कवितांचा संग्रह काढला. मॅजेस्टिकच्या प्रकाशन इतिहासातला तो पहिला आणि अखेरचा कवितासंग्रह होय. माझा ‘मोर’ हा पहिला कविता संग्रह मी दळवी सरांना पाठवला होता. त्यावर त्यांनी छान अभिप्रायही दिला होता. १९८६-९० च्या काळात मी लेखक-कवी म्हणून नुकता वर येऊ लागलो होतो. काही फारसं नाव-बिव नव्हतं आणि माझ्या ओळखीही फारशा नव्हत्या.
अशा परिस्थितीत १९९० च्या डिसेंबरमध्ये रत्नागिरीला ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ झालं. त्या संमेलनातील निमंत्रितांच्या कविसंमेलनामध्ये मी ‘शरदाच्या चांदण्यात’ ही कविता वाचली. त्या कवितेत महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध लोकनेत्यांच्या राजकीय वर्तन-विसंगतीवर उपरोधिक टीका होती. परिणामी कविता वादग्रस्त झाली. कवीने बिनशर्त माफी मागावी, अन्यथा आम्ही मंडप उधळून देऊ, अशी शिवसेनेच्या तत्कालीन स्थानिक शाखाप्रमुखाने जाहीर धमकी दिली. कवीच्या जीवालाही धोका निर्माण झाला, म्हणून साध्या वेषातील पोलिसांचं संरक्षण (न मागता) मला परस्पर देण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जरा लवकरच संमेलन स्थळी गेलो, तर तिथे मलुष्टेंच्या छायाचित्र प्रदर्शनाच्या तंबूत जयवंत दळवी सर आणि त्यांची पत्नी प्रदर्शन पाहताना दिसले. तिथे बाकी कोणी नव्हतं. मी पुढे गेलो आणि उभयतांना नमस्कार केला. दळवींनी उमाकाकींना माझ्याबद्दल सांगितलं आणि लगेच मला प्रश्न केला, “माफी मागण्याबाबत काय ठरलं?” मी उत्तर दिलं, “कोणत्याही परिस्थितीत माफी मागायची नाही, असं मी ठरवलं आहे.” ते ऐकताच दळवींनी एकदम उत्स्फूर्तपणे माझ्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, “हेच अपेक्षित होतं. अजिबात घाबरायचं कारण नाही. पुढे काही लीगल मदत लागली किंवा राजकीय; तर आम्ही सोबत आहोत.” माझं हृदय तत्क्षणी अपार आदराने आणि कृतज्ञतेने भरून आलं. जयवंत दळवींसारखी मोठी माणसं मला आयुष्यात वेळेच्या वेळी भेटत गेली म्हणून पुढे निभावत गेलं.
१९९१ साली मी ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चा आजीव सभासद झालो आणि ‘कोमसाप’चं काम करू लागलो. दळवी सरांना हे कळलं. त्यानंतर एका रविवारी मी त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलेलो असताना त्यांनी मला सांगितलं, “क्रिएटिव्ह लेखकांनी संस्थात्मक कामात शक्यतो न पडलेलं बरं. पुढे पुढे तुमची क्रिएटिव्हिटी त्यांना त्रासदायक होते. तुमचा उपयोग करून घेतल्यावर संस्थेतले नॉन क्रिएटिव्ह लोक तुम्हाला फेकून देतात.” २०१९ साली मी जेव्हा संस्था सोडली तेव्हा दळवी सरांचे ते शब्द आठवले.
कालांतराने दळवी सर दादरहून बोरिवलीला राहायला गेले. त्यांना दोन दिवसांआड डायलिसिस लावावं लागतं हे कळल्यावर, आ. ना. पेडणेकर आणि मी त्यांना भेटायला गेलो. खूप गप्पा वगैरे झाल्या. दळवींची आणि आनांची जुनी दोस्ती. ते दोघे बोलत असताना एक-दोन वेळा दळवींच्या डोळ्यात पाणी आल्याचा भास मला झाला. नंतर अचानक ते म्हणाले, “आता माझे थोडे दिवस उरले. मला आयुष्यात खूप काही मिळालं. समाधानी आहे मी. फक्त एकच दुःख आणि सल माझ्या मनात राहणार आहे..”
आम्ही प्रश्नार्थक चेहरा केला. तर पुढे म्हणाले, “अरे, डॉक्टरने मला मासे खायला बंदी केलीय. खरं तर मासे खाता खाता या जगाचा निरोप घेण्याची माझी इच्छा होती..”
आणि दळवी कधी नव्हे ते मोठ्याने खळखळून हसले. ही त्यांची शेवटची भेट. मग काही दिवसांनी ते गेले ते गेलेच. त्या दिवशी मला खूप निराधार झाल्यासारखं वाटलं. वाटत राहिलं...
ज्येष्ठ कवी आणि साहित्याचे अभ्यासक.